★★सांगू कशी कुणाला★★(५) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग पाचवा
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(५)
राजस….
आजवर मी इतके प्रदर्शनं बघितले. काही ठिकाणी माझी पोर्ट्रेटस,पेंटींग्ज होती. पण आजचा दिवस काहीतरी वेगळं घेऊन आला होता. आज बघितलेली ती सुंदर तरुणी डोळ्यासमोरून हलत नाहीय. भगवान ने फुरसत से बनाया है..असं वाटावं इतकी सुंदर! गोरीपान,मऊ केस,थोडंस वर आलेलं गोड नाक, आणि डोळे तर..हरिणाक्षीच जणू! काळेभोर,टपोरे! पण त्यातलं कारुण्य मला अस्वस्थ करून गेलं. पोर्ट्रेटसाठी कितीतरी सुंदर मुली मी आजवर बघितल्या होत्या. पण कधीच कुणाची तारीफ करावीशी वाटली नाही. माझ्या प्रोफेशनचा एक भाग म्हणून मी त्यांच्याशी जोडला गेलो होतो. पण ह्या मुलीने..हो मुलगीच; तिच्या चेहऱ्यावरचा निरागस भाव,अगदी एखाद्या लहान मुलीसारखा होता. आपल्या सौंदर्याचा कुठलाही तोरा नसलेली एक साधी गोड तरुणी. ती पोर्ट्रेट बघत असताना,मी तिच्याकडे साईडने बघत होतो. तिची थोडी वर झालेली मान, पेन्सिलने आकार दिल्यासारखे ओठ,आणि तिच्या लांबसडक पापण्या! मला राहवलं नाही. मी कागद,पेन्सिल काढून तिचं एक रफ स्केच काढलं. व्हॉट अ ब्युटी! अगदी मुळगावकरांच्या चित्रातली सोज्वळ पण अतिशय आकर्षक तरुणी!
माझ्याशी बोलताना गळ्यातील मंगळसूत्र सतत हातात धरत होती. तिच्या आयुष्यात असं कधी घडलंच नसावं, एखाद्या पुरुषाने इतक्या धीटपणे तिच्या सौंदर्याची स्तुती करणं! असुरक्षित वाटलं असावं तिला. पण माहिती नाही,मला तिच्याशी ओळख वाढावी, तिच्याशी मैत्री करावी असं खूप आतून वाटतंय. त्यात कुठेही लालसा नाही. एक छान मैत्रीण असावी अशी! आणि त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मला तिच्याशी खूप बोलावसं वाटतंय. का माहिती नाही पण आम्ही दोघेही एकमेकांचे खूप घट्ट मित्र होऊ शकतो असं मन सांगतंय. लेट्स सी अँड होप!…..
रागिणी….
जेवण झालं आणि झोपायला बेडरूममध्ये आले. पंकजचा व्हीडिओ कॉल आला. “रागिणी, ऑल ओके ना? तुझं कॉलेज कसं सुरू आहे? स्टडी हार्ड! त्यात तुला करिअर करायचं आहे. मी मजेत आहे. टेक केअर आणि बाय.”
“रागिणी,आय मीस यु,आय लव्ह यु.” हे ऐकायला माझे कान आतुर होते पण पंकज असं काहीही बोलला नाही. त्याच्या स्वभावाची मला सवय का होत नाही? डोळ्यातून एक बंडखोर अश्रू गालावर ओघळलाच.
गार वाऱ्याची झुळूक आली म्हणून जरा खिडकीशी आले. अर्धी सोसायटी निद्राधीन झाली होती. पंकज यु एसला गेल्यापासून माझी झोपच उडाली होती. मी आणि पंकज एकमेकांमध्ये खूप गुंतलो नव्हतोच,असं असलं तरी तो माझ्या शेजारी झोपलाय, माझ्या हक्काचा आहे ही भावना तर होतीच ना! एक सामान्य घरातून आलेली मी मुलगी! माझ्या आयुष्याबद्दल अगदीच साध्या कल्पना होत्या. पण म्हणतात न,तुम्हाला जे हवं असतं ते फारच क्वचित मिळतं. ते माझ्याच बाबतीत घडावं! समोर एक निष्पर्ण चाफा दिसला. अवघे झाड निष्पर्ण असताना,हा चाफा कसा काय फुलू शकतो? निसर्गाच्या प्रत्येक कृतीतून आपण काहीतरी बोध घ्यावा, हीच विधात्याची अपेक्षा असते का?
उद्या आणखी एका हॉटेलवर जायचं होतं. लँडस्केप्स बघायला. उद्यासाठी गॉगल,रुमाल ठेवायला मी पर्स उघडली आणि ते कार्ड दिसलं. मी ते कार्ड बघितलं. राजस आठवला.
माझ्या सौंदर्याची दिलखुलास स्तुती करणारा पहिला पुरुष! काही क्षण मी बावरले, घाबरले होते पण त्याची स्वच्छ नजर बघून भीती पळालीच! उलट ती नजर कुणाला तरी प्रचंड आधार देऊ शकते असं वाटलं. माझ्या मनाने घरी आल्यावर कबुली दिली की मला राजसशी अजून बोलायचं होतं. त्याच्याशी मी मोजून पाच मिनिटं बोलले पण मला आतून खूप छान वाटत होतं. राजस आयुष्य भरभरून जगणारा वाटला. मला कुठून हिम्मत आली माहिती नाही. मी कार्डवरचा नंबर सेव्ह केला आणि राजसला व्हाट्स अपवर मेसेज टाकला…
—राजस,रागिणी हिअर. माझा नंबर सेव्ह करून ठेवा. तुमच्याशी बोलायला आवडेल. आय ट्रस्ट यु. तुमचं वय काय आहे?–
राजसचा दहा मिनिटातच मेसेज आला.
—हाय रागिणी! आय एम हॅपी. तुम्ही पुढाकार घेतला. आणि वय कशाला? समजा मी तुमच्यापेक्षा पाच वर्षांनी मोठा किंवा पाच वर्षांनी लहान असेल तर तुम्ही मैत्री करणार नाही का?—
—तसं नाही,सहज विचारलं!—
–फरगेट अबाऊट एज. आणि एकमेकांना एकेरी हाक मारू. म्हणजे औपचारिकता संपते.—
जवळपास पंधरा मिनिटं मी राजसशी बोलले. पण त्याचं लग्न झालं असेल तर? इतक्या रात्री मी त्याला डिस्टर्ब करायला नको होतं. मला भान कसं राहिलं नाही? चुकलेच मी,परत असं व्हायला नको. मित्र झाला तरी त्याला त्याचं वैयक्तिक आयुष्य आहेच की!
मी दिवा मालवला. रोजची झोपतानाची हुरहूर आज कुठेच नव्हती. तमनमनात एक आनंद भरून आला होता. खूप रिलॅक्स वाटत होतं.कित्ती दिवसांनी असं शांत वाटत होतं,मन आतल्या आत हसत होतं. लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच……..
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★(५) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे