★★सांगू कशी कुणाला★★ (७) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (७) ९ भागांची सुरेख , आश्चर्यकारक आणि गुंतवून ठेवणारी कथा . भाग सातवा
((२४ मे २०२४ पासून रोज unityexpression.in वर वाचा ))
कथाकार ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (७)
राजस……
रागिणीशी मैत्री होऊन दोन महिने होऊन गेले. ह्या दोन महिन्यात आम्ही फक्त एकदाच भेटलो,तेही एका प्रदर्शनात. रागिणी एक सुरक्षित कवच घेऊन वावरत होती. तिला माझी मैत्री हवी होती,पण ती खुलेआम स्वीकारायला घाबरत होती. परत तेच,संस्कार! मी आजपर्यंत अनेक स्त्रियांना कामानिमित्त बाहेर,हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी भेटत होतो. पण रागिणीने कॉलेजमध्ये देखील असं काही केलं नसावं. कॉलेज कँटीन पलीकडे ती कुठे गेली नसावी. उद्या तिला मी माझ्या घरी बोलावलं आहे. तिचं पोर्ट्रेट मला काढायचं आहे. ते ऐकून ती नाहीच म्हणाली.”म्हणजे तू कॅलेंडरसाठी देणार आहेस का? असलं काही मी करणार नाही हं!”
“तुझी परवानगी घेतल्याशिवाय मी असं काहीही करू शकत नाही रागिणी! मला स्वतःसाठी तुझं पोर्ट्रेट काढायचं आहे. दोन तीन सिटिंगसाठी येऊ शकशील का तू?”
“कॉलेजवरून डायरेक्टच येईन. घरी गेले की मी अडकले.”
मी जे काही रागिणीला ओळखलं होतं त्यावरून तिला बंधनकारक आयुष्य नको होतं पण बंधनं झुगारून द्यायची तिची तयारी नव्हती. हल्लीच्या मुलींमध्ये रागिणी जरा वेगळीच होती. संस्कार तर अनेक मुलींमध्ये असतात. पण हिच्या मनावर संस्काराची भीती होती. स्वतःला काय हवं आहे ह्यापेक्षा, लोकं काय म्हणतील ह्या विचारात अडकलेली. माझ्याबद्दल तिच्या काय भावना आहेत,हे मला अजून नीटसं कळलंच नाही. मला रागिणी खूप आवडते पण म्हणून मला तिचा संसार उध्वस्त करायचा नाही. हो,आवडते मला रागिणी! आणि मला ह्यात काहीही गैर वाटत नाही. हे असं,इतकं उत्कट प्रेम आपल्या लाईफ पार्टनर विषयी वाटलं तरच संसार सुखाचाच होतो. आय एम शुअर, रागिणीला हा अनुभव आला नाही. ती हे सगळं प्रेम माझ्यात शोधते आहे. तिला मी हवा आहे पण तिच्या संमिश्र भावना तशाच ठेऊन!
तिला पोर्ट्रेट काढायला बोलवेन,तेव्हा तिचं मन मोकळं करायचा प्रयत्न करतो. मी का पंकज,हे तिचं द्वंद्व संपायलाच हवं.ती माझी होऊ शकत नाही,हे सत्य मी स्वीकारलं आहे. रागिणीने हे स्वीकारायला हवं……
रागिणी…..
राजसने तीन दिवस त्याच्या घरी मला पोर्ट्रेटसाठी बोलावलं आहे. पण मी घरी काय सांगू? रोज तीन दिवस घरी उशीरा आले तर प्रश्न समोर येतीलच. मी तीन दिवस आईकडेच जाते. तिथे माझ्या मनावर ताण तरी नसेल. आईने विचारलं तर मी खरं सांगू शकते. मी आठ दिवस माहेरी जायचं ठरवलं.
“आई,मला तीन-चार दिवस घरी यायला उशीर होईल. माझी एका प्रदर्शनात एका व्यक्तीशी ओळख झाली आहे. राजस कुलकर्णी; उत्तम चित्रकार आहेत. त्यांना माझं पोर्ट्रेट काढायचं आहे.”
“पंकजला विचारलंस का?”
आईच्या ह्या प्रश्नाने माझ्या डोक्यात तिडीकच गेली. तो मला कुठे काय सांगतो? प्रत्येक गोष्टीत मला गृहीतच तर धरतो. यु एसला जॉब बघणार,हे एकदाही माझ्याशी बोलला नाही.
“त्याला कशाला विचारायचं? तो बसलाय तिकडे जाऊन! मी इथे एकटी! माझा आनंद मी शोधतेय,त्याला त्याची हरकत का असावी? आणि तू तरी मी पंकजला विचारावं,ही अपेक्षा का करतेस? माझं पोर्ट्रेट एखाद्या स्त्री कलाकाराने काढलं असतं, तर तुझ्या डोक्यात हे काही आलंच नसतं. राजस पुरुष आहे म्हणून का?”
“इतकं संतापायला काय झालं? जे काही करणार आहेस,ते विचार करून कर. आम्ही केलेले संस्कार लक्षात असू दे.”
“संस्कार,संस्कार… वीट आलाय ग आई ह्याचा! बाईचं अर्ध आयुष्य ह्या संस्काराच्या ओझ्याखाली निघून जातं. आणि जेव्हा मोकळीक मिळते,तेव्हा वय होऊन गेलं असतं. माझ्या मर्यादा मला कळतात. मी आणि सुगंधा कधीही तुझ्या आणि बाबांच्या शब्दाबाहेर गेलो नाही. बाहेरचं जग बघ ग आई! मुली किती स्वतंत्र झाल्या आहेत. त्यांच्या विचारांशी ठाम असतात.”
“तुला काय म्हणायचं आहे? आम्ही चुकीचं वागलो का?”
मी त्या क्षणी धीट झाले. मला राजसकडे जायचं होतं. त्याचा सहवास हवा होता. मी कोणाचीही पर्वा करणार नव्हते.
“कोण चूक,कोण बरोबर हा वाद मला करायचा नाही. मी उद्या राजसकडे जाणार,माझं ठरलं आहे.”
तीन दिवस मी कॉलेजला येणार नाही,हे मी सानिकाला सांगितले. राजसच्या घरी गेले. तो एकटाच राहत होता. आईवडील सोलापूरला होते. फ्लॅट छोटा होता,पण राजसची सौंदर्यदृष्टी सगळीकडे दिसत होती.
“वेलकम रागिणी!”
पांढऱ्या शुभ्र नेहरुशर्ट आणि पायजमामध्ये राजस फार छान दिसत होता. अगदी हसरा,प्रसन्न! मला गरम,कडक कॉफी देऊन,जरा वेळ माझ्याशी गप्पा मारून,त्याने मला रिलॅक्स केलं. पोर्ट्रेटसाठी मला पोझ सांगितली. त्या पोझमध्ये मला बराच वेळ बसायचं होतं. अर्थात, मधून मधून ब्रेक घेत! राजसने ड्रॉइंग बोर्डवर पोर्ट्रेट काढायला सुरवात केली. सलग एक तास बसल्यावर मी कंटाळले.
“राजस,तुम्हा चित्रकारांमध्ये किती पेशन्स असतो रे. मी तर आजच कंटाळले. असं किती दिवस मला बसावं लागेल?”
“दोन दिवस तर नक्कीच! बाकी इमॅजीनेशनने मी पूर्ण करेन.”
काल मी बराच वेळ पोझ देऊन बसले होते. घरी यायला उशीर झालाच होता. आईने काहीच विचारले नाही. सुगंधाला माझ्यातला आणि आईमधला तणाव जाणवला. मला कोणी काहीही विचारू नये,असंच मला वाटत होतं. मला दोन दिवस फक्त राजसचा सहवास हवा होता. तो दिसायला चार चौघांसारखाच होता,पण त्याच्यात काहीतरी असं नक्कीच होतं, ज्याने मी त्याच्याकडे ओढल्या जात होते. त्याच्या सहवासात मला खूप शांत,सुरक्षित वाटत होतं. ह्याक्षणी माझं मन,फक्त माझंच ऐकणार होतं. मी उद्या देखील राजसकडे जाणारच आहे,माझ्या मनाचं ऐकून!…..
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★सांगू कशी कुणाला★★ (७) ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे