दुर्गाशक्तीमनोरंजन

ऋणानुबंध — मकरंद कापरे  ,पुणे ४११०४१  , मो. 9049056284  , makarand.kapare@gmail.com

ऋणानुबंध

सकाळचे सूर्योदयाची वेळ खूप छान वाटायचे नीताला उगवता सूर्य पहायला. लाल केशरी झालेले आकाश त्यातून डोकावणारा सूर्य. तिचा सगळा शीण निघून जायचा. पक्षांची किलबिल, पोपट, भरद्वाज, मैना, तांबट आणि कितीतरी छान पक्षी दिसायचे. त्यांचे चिवचिवाट ऐकण्यात एक तास कसा जायचा ते कळायचेच नाही. टेकडीवर आले की पाण्याच्या टाकीकडे जायचे आणि त्या बाजुनेच रस्ता उतरायचे. एकदा टेकडी उतरत असतानाच नीताला ठेच लागली. मागून माई आणि काका येत होते. त्यांनी तिला जवळच्या दगडावर बसवले. “काय नाव ग तुझे”, माईंनी विचारले. “नीता”, नीता तिचा अंगठा दाबून धरत म्हणाली. पण तिला थोडे अस्वथ वाटत होते. ती पटकन उठून बाजूला गेली आणि तिने दोन तीन उलट्या काढल्या. माई तिच्याकडे निरखून पहात होत्या. काका म्हणाले,”हे पाणी घे, बरे वाटेल”. तिने पाणी पील्यावर माई म्हणल्या,”आता बरे वाटत आहे का, आमच्याबरोबर चल, जवळच घर आहे आमचे”. ती नको म्हणत असताना तिला माई आणि काका त्यांच्या घरी घेवून गेले. माईंच्या बैठ्या बंगल्याची मांडणी खूपच आकर्षक होती. व्हरांड्यात झोपाळा पुढे बसायला जागा, नंतर बैठकीची खोली. “छान बंगला आहे तुमचा काकू”. “ हो ना, आवडला ना, तू कुठे राहतेस नीता?” माईंनी चहाचा कप तिच्या हातात देत विचारले. नीता म्हणाली,”पुढेच दोन गल्ल्या सोडून, ती एटीएम ची गल्ली आहे ना तिथेच”.

काका आत गेलेत हे पाहून माईंनी तिला विचारले,”कितवा महिना चालू आहे ग”. माईंनी हा प्रश्न विचारल्यावर तिला आश्चर्य वाटले. ती हसून म्हणाली,”तिसरा, पण तुम्हाला कसे कळले काकू”. माई म्हणल्या,” कळेल तुला माझ्याएवढी होशील तेव्हा, आणि काकू नाही, माई म्हणतात सगळे मला, तू पण माई म्हटले तरी चालेल, कधीपासून आहात तुम्ही इथे, आधी कधी पाहिले नाही तुला,”. नीता म्हणाली,”आम्ही दोन महिन्यापूर्वी आलो इथे रहायला इथे भाड्याचा फ्लॅट आहे, ”. माई म्हणाल्या,”थांब पहिल्यांदाच आली आहेस, कुंकू लावते, असे नसते जायचे”. कुंकू लावताना माईंनी विचारले,”मिस्टर कुठे असतात तुझे कामाला?”. नीता म्हणाली,”एबी कंपनीमध्ये काम करतात, आज टूर वर गेलेत, नाहीतर टेकडीवर येतात माझ्याबरोबर”. “हो ना, तेच म्हटले मी, तुझा नवरा कसा नाही आला टेकडीवर तुझ्या बरोबर, आणि दुपारी ये स्वेटर शिकवीन विणायला, बाळासाठी”. माई अगदी मनातले बोलल्या, ती म्हणाली,”हो येईन, मला आवडेल शिकायला तुमच्याकडून”. माईंनी विचारले,”जाशील ना गं, ठीक वाटत आहे ना, की काकांना पाठवू सोबत”. “नको काकू, सॉरी माई जाईन मी” आणि नीता ने त्यांचा निरोप घेतला.

ती निताची आणि माईंची पहिली भेट. पहिल्या भेटीतच माईंनी त्यांच्या प्रेमळ स्वभावाने तिचे मन आपलेसे केले होते. आभाळ भरून आले होते, थोड्याच वेळात पाऊस सुरू झाला. जेवण झाल्यावर नीता माईंच्या घरी आली. गप्पांच्या ओघात माईंनी तिला विचारले,”नीता तुझे सासू सासरे कुठे असतात”. नीता म्हणाली,”सासरे आमच्या सोबतच आहेत, सासूबाई आमच्या लग्नानंतर सहा महिन्यांनी गेल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे झाली मागच्या सोमवारी. आकाश ला पण खूप जड गेले आई चे आकस्मिक जाणे”. तिच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून माई म्हणल्या,”अरेरे, उगीच विचारले मी, असू दे, प्रत्येकाचे आयुष्य असते, भगवंता पुढे आपले काय चालणार, आणि आकाश आला की त्याला घेवून ये आमच्याकडे” आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणल्या,”चहा घेणार ना बेटा?” मग हळू हळू चहा पिताना नीता ने आपल्याबद्दल थोडक्यात माईना संगितले॰ माईंनी पण आपल्या कुटुंबाबद्दल तिला सांगितले. मागच्या वर्षी नीता ची आई किरकोळ आजाराने सोडून गेली होती. माई चा धाकटा मुलगा राकेश अमेरिकेत नोकरीसाठी गेलेला आणि मोठा नितिन पुण्यात त्यांच्याजवळ होता. चार नातवंड माईंना, मोठ्या ची दोन मुले आणि धाकट्याच्या दोन मुली. नीताचा हरहुन्नरी आणि बोलका स्वभाव माईना खूप आवडला.

मग तिचे आणि नवरा आकाश चे रोजच माई आणि काकांबरोबर टेकडीवर जाणे चालू झाले. पाचव्या महिन्यात मात्र माईंनी तिला टेकडी चढायला मनाई केली.  बाळासाठीचा स्वेटर, टोपडे पूर्ण झाले होते. आकाश आणि नीता माईंच्या घरच्या सदस्या सारखेच झाले होते. माई बरेचदा संध्याकाळी त्या दोघांना आपल्या घरीच जेवायला बोलवत. नीता पण मग एखादी भाजी किंवा पराठे करून घेवून जात असे, नीताच्या सासर्‍यांना पण येण्याचा आग्रह काका करत, ते ही आढेवेढे न घेता येत. काकांना आणि नितिन ला तिने केलेली वांग्याची भाजी आणि पनीर पराठे खूप आवडायचे. मग अशा वेळेला काका पण मधुमेह असून आपल्या जीभेचे चोचले पुरवून घ्यायचे. नीताला ते मुद्दाम काहीतरी गोड करायला सांगणार, कारण तिने केले आहे म्हणून माई पण त्यांना खाऊ देत असत.नितिन ची बायको अनघा तिची चांगली मैत्रीण झाली होती. शॉपिंगला सुद्धा दोघी बरेचदा बरोबर जात असत. असेच संध्याकाळी एकदा जेवताना आकाश म्हणाला,”काका, एक परदेशातल्या कंपनीचा इंटरव्ह्यु आहे उद्या, पण काय करू बाहेर जॉब करू की नको?”. काका म्हणाले,”कर ना बिनधास्त, पण नीताला इथेच राहू दे”. त्यावर सगळे खळखळून हसले. माई म्हणाल्या,”काकांचे काही एकू नको रे, तिला पण घेवून जा. काका आमच्या लग्नानंतर दीड वर्ष कुवेत ला होते मला इथे एकटीला सोडून, एका स्त्रीलाच माहिती दुसर्‍या स्त्री ची व्यथा”. काका म्हणाले,” हे बघ, बायकांना नवरा त्यांच्या दिमतीसाठी हवाच असतो नेहमी, पण आलेली संधी चांगली असेल तर नाही सोडायची, थोडे अॅडजस्ट करायचे, बायकांना पण सवय हवी ना एकटे परिस्थिती हाताळायची, पण नीताला तुझी गरज आहे सध्या पुढच्या महिन्यात ती बाळंत होईल, तेव्हा तिच्या सोयीचा निर्णय तुला घ्यावा लागेल.” माई लगेच हसून म्हणाल्या,”बघ, मानस कन्येची काळजी बोलत आहे” यावर परत सगळे हसले. नीताच्या आयुष्यात आईच्या आकस्मित जाण्यामुळे जीवनात आलेली पोकळी आता माई च्या सहवासात भरू लागली होती.

नीताला बाळंतपणसाठी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केले, त्याच रात्री आकाश ला ताप भरला. त्याने क्रोसिन घेवून थोडे वेळ निभावून नेली पण परत दुसर्‍या दिवशी त्याला ताप आला. त्याच्या फॅमिली डॉक्टर ने त्याला ब्लड टेस्ट करून घ्यायला सांगितली. इकडे माई आणि नीताचे सासरे नीताबरोबर हॉस्पिटल मध्ये होते. नीता माईना म्हणाली,”माई, तुम्ही आणि अनघा किती काळजी घेत आहात माझी, खरेच खूप करत आहात तुम्ही दोघी माझ्यासाठी.” माई म्हणाल्या,”असू दे ग, काही जास्त नाही, माझी मुलगी असती तर तिच्यासाठी पण केलेच असते ना, अरुण भाऊजी आकाश ला काय म्हणाले डॉक्टर?”. आकाश चे बाबा,”ब्लड टेस्ट रीपोर्ट उद्या येतील, तेव्हाच कळेल’. नीता म्हणाली,”बाबा, सगळे नॉर्मल असेल ना, मला खूप काळजी वाटत आहे”. ते म्हणाले,”काळजी नको करूस, किरकोळ असेल काहीतरी”. त्या दिवशी परत आकाश ला ताप भरला. डॉक्टररांनी त्याला त्याच हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करून घेतले. रक्त तपासणी आणि सोनोग्राफी मध्ये किडनी चे इन्फेक्शन निघाले. “माई, हे काय होवून बसले हो, माझा आनंद पाहावला नाही देवाला, बघा ना उद्या माझी डिलीवरी आहे आणि नेमका आकाश जवळ नसणार”. माई तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या,”नीता, धीर धर, आम्ही आहोत ना सगळे तुझ्याबरोबर, आणि आकाशला डॉक्टर सोडतील ना बाळाला पहायला”. दुसर्‍या दिवशी नीता ने गोंडस मुलीला जन्म दिला. माई आणि घरातल्या सगळ्यांच खूप आनंद झाला. माई आणि आकाशच्या बाबांच्या विनंतीला मान देवून आकाश ला व्हील चेअर वरून वॉर्ड बॉय घेवून आला. त्याला खूप छान वाटले, मुलगी त्याच्याकडे टुकटुक नजरेने पाहत होती. “बाबांना ओळखले तिने” माई म्हणाल्या. आकाश मुलीच्या डोळ्यासमोर हात हलवत म्हणाला,”बेटा, बाबा नाही घेऊ शकत तुला आता, पण बरे झाले की घेणार तुला बाबा”. माईंनी मग तिला उचलून त्याच्या जवळ नेले. तो नीता कडे पहात म्हणाला,”डोळे आई सारखेच आहेत बाळाचे”.

नीताने त्याला हाताने जवळ ओढले. आणि ती रडू लागली. “काय हे, असे रडतात का, बाळ काय म्हणेल”. नीता म्हणाली,”किती सुजला आहे हात तुझा, सलाईन च्या सुई मुळे, दुखत नाहीये ना?” आकाश म्हणाला,”थोडे दुखत आहे, उद्या परत ब्लड टेस्ट आहे”. नीता म्हणाली,”माई होत्या म्हणून मी तग धरून होते. नाहीतर काय झाले असते कोणास ठाऊक माझे”. आकाश म्हणाला,”माई, तुमचा खूप आधार आहे आम्हाला, तुमचे उपकार नाही फेडू शकणार आम्ही.” माई म्हणाल्या,”तुम्ही दोघेही मला नितिन आणि अनघा सारखेच आहात, आणि परत असे बोलायचे नाही. सगळे ठीक होईल.” दोनच दिवसात आकाश ला डिस्चार्ज मिळाला, दिवस भर भर सरत होते मुलगी एक महिन्याची झाली होती. “आकाश मला माईं साठी काहीतरी करायची इच्छा आहे, काय करता येईल”. आकाश तिला म्हणाला,”आपण माईंना आणि काकांना आपल्याबरोबर मॉरिशस सिंगापूर ट्रीप ला घेवून जाऊ या” तिलाही त्याची कल्पना आवडली. माई आणि काकांना सुद्धा त्यांचा आग्रह मोडता आला नाही.

दिवस पालटत राहिले आणि ऋणांनुबंध दृढ होत गेले.

मकरंद कापरे  ,पुणे ४११०४१  , मो. 9049056284  , makarand.kapare@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}