मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Buy Nothing! ©® ज्योती रानडे 2024 JyotiRanade.

Buy Nothing!

©® ज्योती रानडे

निशा कामाहून घरी येताना सायकलच्या दुकानात थांबली. तिच्या आठ वर्षाच्या मुलाला नवी सायकल घ्यायची होती. निळ्या रंगाची, गिअर असलेली फॅन्सी सायकल व हेल्मेट घ्यायचं होतं पण दुकानातील अनेक प्रकारच्या महागड्या सायकली बघून ती गोंधळून गेली.

बॅास्टन जवळच्या एका छोट्या गावात तिनं व रविने संसार थाटला होता. दोघेही IT मधे काम करत होते. सेल वर गोष्टी आल्या की पैसे वाचतात म्हणून ती बऱ्याच गोष्टी घेऊन ठेवत असे. घरात हळूहळू करत इतकं सामान जमलं की कपाटं कमी पडतं. पर्सेस, चपला, बूट,फ्लावरपॅाटस्, खरी व खोटी फुलं, फुलझाडे, पुस्तकं, कॉफी मेकर, कपडे, टोप्या, फ्रेम्स, खेळणी अशा हजारो गोष्टींनी घर भरून वहात होतं.

ती सायकली बघत असताना दोन बायकांची कूजबूज तिच्या कानावर आली. एवढे पैसे पाच वर्षाच्या मुलाच्या सायकलवर नको टाकायला! “बाय नथिंग” कडे नक्की मिळेल लहान मुलांची सायकल. तिने कान टवकारले.. ती बाई म्हणाली की मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हाच मोठी सायकल घ्यावी.
तोपर्यंत “बाय नथिंग”!

तिने त्यांना “बाय नथिंग” हा काय प्रकार आहे विचारलं. त्या म्हणाल्या, “हा पत्ता व फोन बाय नथिंगचा. . रिबेका भेटेल तिथे. ती सगळी माहिती देईल.”

निशा कुतूहलाने “बाय नथिंग” चा पत्ता शोधत गेली. एका ५० वर्षाच्या हसऱ्या चेहऱ्याच्या बाईनं तिचं स्वागत केलं.

“माझं नाव रिबेका. वेलकम टू बाय नथिंग!” ती म्हणाली.

निशानं विचारलं “बाय नथिंग हा नक्की काय प्रकार आहे?”

रिबेका चष्मा नाकावर आणत म्हणाली,” हा फेसबुक ग्रूप मी व माझ्या मैत्रीणीनी सुरू केला. माझी सहा सात वर्षांपूर्वी पैशाची फार चणचण होती. मी मला लागणाऱ्या गोष्टी कोणी काही काळापुरत्या देतील का असं लोकांना विचारायला सुरूवात केली. अगदी जेवण सुध्दा दिलं लोकांनी! माझी परिस्थिती सुधारल्यावर मी हा ग्रूप जीवनावश्यक गोष्टींसाठी बनवला.

ह्या लोकल बाय नथिंग ग्रूप मधे हजाराहून जास्त मेंबर्स आहेत. मेंबरशिपसाठी अगदी नॅामिनल पैसे घेतात व काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. (हा भाग मी परत चेक करून कळवेन.)
तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर हजार लोकांमधे कुणाकडे तरी असतेच. ती गोष्ट वापरा व काम झालं की परत करा.

अजिबात काहीही खरेदी करण्याची जरूर नाही. तुम्ही जी गोष्ट वापरत नसाल ती ज्याला हवी त्याला द्या आणि तुम्हाला हवी ती एखाद्या कडून घ्या. यानं पैसा तर वाचतोच पण जगातील कचरा कमी होतो, पर्यावरण सुधारते, ओळखी होतात. पर्सनल हायजीन साठी लागणाऱ्या गोष्टी फक्त विकत घ्या. आपल्या गावाचा हा जसा ग्रूप आहे तसे अनेक गावात हे ग्रूप आहेत. जवळजवळ १६ लाखाहून जास्त मेंबर्स आहेत सध्या!”

निशानं फेसबुक बाय नथिंग ग्रूप तिथेच जॅाईन केला व निळी, गिअरची सायकल आहे का विचारले. लगेच ३०-४० उत्तरं व सायकलीचे फोटो आले. तिने त्यातून एक सायकल निवडली. सात गियरची! लोक एकमेकांची बेबी क्रिब्ज,बीच चेअर्स, व्हील चेअरस्, मुलांची खेळणी, पुस्तकं वगैरे हजारो गोष्टी एकमेकाकडून घेत होते. देवाण घेवाण एक पैसा न वापरता होत होती त्यामुळे भांडणं नव्हती!

रिबेका म्हणाली,”माणसांकडे लक्ष द्यायला शिकायचं. वस्तूवरचं प्रेम कमी करायचं! एवढं लक्षात ठेवायचं.”

हे विश्वची माझे घर चा खरा अनुभव घेत तिनं निळी सात गिअरची सायकल घेतली व ती घरी आली. रवी थक्क झाला.
निशाच्या डोक्यात रिबेकाचे शब्द घुमत होते..
“कशासाठी जमवायचं एवढं? बरोबर थोडच नेणार आहे?”

निशानं एक एक करत तिच्या संग्रही असलेल्या अनेक गोष्टी
बाय नथिंग फेसबुक ग्रूप वर पोस्ट केल्या. अनेकांना त्या वापरायला द्यायला सुरूवात केली. आता तिच्या गावात बऱ्याच ओळखी झाल्या आहेत. विचारांची देवाण घेवाण होत आहे. भारतापासून लांब रहात असताना एखादी मावशी, काकू, दादा भेटत राहतात तिला हल्ली. नाती जुळत आहेत.

माणूस आयुष्यभर गोष्टी जमवत राहतो. जाताना यातलं काहीही बरोबर नेता येणार नाही हे माहित असूनही! त्यापेक्षा स्नेह, मैत्री, दुवा जमवण्याचा तिनं निश्चल केला आहे!

आपणही “बाय नथिंग” तत्व आचरणात आणूया ना?

Give something
Grow something
Create something
Donate something
Buy Nothing!

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

Related Articles

One Comment

  1. Classic ….
    खूप सुंदर आहे लेख. मी १००% सहमत आहे ….
    खरच असा group असेल तर आवडेल मला join करायला…
    Anyways writing सुरेख च…
    Keep it up

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}