डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा ——– गीता गाती… – डॉ. सतीश गुप्ते
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
गीता गाती…
– डॉ. सतीश गुप्ते
———————————
वैद्यकीय महाविद्यालयातला माझा पहिला दिवस मला अजूनही आठवतो. उत्साहानं मी नुसता सळसळत होतो. एक दिवस मी’ डॉक्टर’ अशी उपाधी लावून या महाविद्यालयातून बाहेर पडणार होतो. दिवसांमागून दिवस आणि वर्षांमागून वर्ष गेली आणि एम. बी. बी. एस. ची शेवटची परीक्षा देऊन मी खरोखरचा ‘डॉक्टर’ झालो… पण इस्पितळांमधून प्रत्यक्ष काम करायला सुरवात केल्यावरच लक्षात आलं, की आपण डॉक्टर झालो असलो, तरी आपलं व्यावहारिक ज्ञान अगदीच अत्यल्प आहे !
मी अगदी सुरवातीच्या काळात इस्पितळात काम करायला लागलो, तेव्हाच्या आमच्या प्रमुखाचं व्यक्तिमत्त्व अगदी मिश्किल असंच होतं. एकदा आम्ही इस्पितळातून फेरी मारत असताना, त्यांनं आमच्यातल्याच एका ‘जादा’ शहाण्या डॉक्टरला रोग्याच्या छातीची स्पंदनं तपासायला सांगितलं. त्यानंही मोठ्या उत्साहानं आपला स्टेथॉस्कोप रोग्याच्या छातीला लावला. ‘मोतीलाल, तुला काय ऐकू येतंय?’ आमच्या प्रमुखानं त्याला सवाल केला.
‘मला जराशी धडधड मर्मर ऐकू येतेय…’ मोतीलालनं उत्तर दिलं… म्हणजे नेमकं काय ऐकू येतंय, या आमच्या प्रमुखाच्या प्रतिप्रश्नावर मोतीलालंन आपलं ज्ञान पाजळण्याची संधी घेतली. हृदयाच्या दुर्मिळ अशा विकारात ऑस्टिन फ्लिंट मर्मर’ असा शब्दप्रयोग त्यानं ऐकलेला होता. त्यामुळे मोतीलालनं तातडीनं सांगून टाकलं, ‘हा ऑस्टिन फ्लिंट मर्मर आहे !’
-हा एक अशा प्रकारचा विकार असतो की, फारसा अनुभव नसलेल्या नुसत्या पदवीधारक डॉक्टरला त्याचं निदान करता येणं शक्यच नसतं. आपला संताप आमच्या प्रमुखाला लपवता येत नव्हता. त्यानं मोतीलालला अगदी जवळ बोलवलं आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून तो उद्गारला : ‘मोतीलाल, तू औषधशास्त्र शिकत आहेस. पण मला मात्र स्वतःवर नियंत्रण कसं ठेवावं, ते शिकायला मिळतंय!’ आम्हा सर्वांना हसू लपवता येत नव्हतं…
त्यानंतर मोतीलाल हा ‘ऑस्टिन फ्लिट’ याच टोपणनावानं सगळीकडे ओळखला जाऊ लागला.
बधिरीकरण आणि भूल देण्याचं शास्त्र यांचे प्राथमिक धडे मी पहिल्यांदा गिरवले ते उत्तर इंग्लंडमधील एका इस्पितळात. माझ्यावरील जबाबदारी मी ओळखून होतो आणि शेवटची शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी तिथं थांबत असे. पण एकदा का तिथले तीन वरिष्ठ डॉक्टर निघून गेले, की दोन डॉक्टरांच्या तावडीत असे. त्यापैकी एक होता आयर्लंडचा, तर दुसरा पोलंडमधील. त्यांनी कधीही आपल्या विषयात, पदवीनंतर अधिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला नव्हता. दोघेही चाळिशी उलटून गेलेले होते आणि बराच अनुभव त्यांच्या पाठीशी होता. वरिष्ठ डॉक्टरांना रात्रीच्या वेळी बोलवलेलं आवडत नसे. त्यामुळे या दोघांवरच इस्पितळाची सारी भिस्त असायची… पण त्यापैकी आयरिश डॉक्टर हा आपली सारी संध्याकाळ ही इस्पितळाच्या ‘पब ‘मध्ये दारू पीत घालवायचा. दारूचा गुत्ता बंद झाल्यावरच तो माघारी यायचा. पोलिश डॉक्टर म्हणजे तर भयानकच प्रकरण होतं. तो दिसायचाच मुळी एखाद्या पहेलवानासारखा. युद्धाच्या वेळी निर्वासित म्हणून तो इंग्लंडला आला होता आणि त्यानं तिथंच आपलं कायम बिऱ्हाड थाटलं होतं.
त्या दोघांचीही काम करण्याची पद्धत ‘आगळी ‘च होती! रात्रीच्या वेळी कितीही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला, तरी ते आमच्यापैकी एखाद्या नवशिक्या डॉक्टरला बोलवत आणि त्याच्यावरच सारं काही सोपवून मोकळे होत. नशीब ! तरीही बहुतेक पेशंटच्या आयुष्याची दोरी बळकटच होती, असंच निष्पन्न व्हायचं…
एके दिवशी, फक्त एकच शस्त्रक्रिया बाकी उरलेली असताना या पोलिश डॉक्टरनं माझ्यावर सारी जबाबदारी सोपवून, इस्पितळातून निघून जाण्याचा निर्णय घेतला. बधिरीकरणाच्या कामातील माझा तुटपुंजा अनुभव अवघ्या १५ दिवसांचाच आहे, हे वारंवार सांगूनही त्यानं ऐकलं नाही. मला काही जुजबी सूचना देऊन त्यानं इस्पितळातून काढता पाय घेतला.
ऑपरेशन टेबलवरील पेशंट हा चांगलाच गलेलठ्ठ, मधुमेह झालेला असा होता आणि उच्च रक्तदाबाचाही त्याला विकार होता. अनुभवी बधिरीकरण तज्ज्ञासाठी ही कसोटीची वेळ होती. तरी पण हाती आलेले काम तडीस नेण्याची जबाबदारी मला उचलावीच लागणार होती. भूल देण्यासाठी म्हणून मी पेंशटच्या चेहऱ्यावर मुखटा चढवला आणि त्याला प्राणवायू, नायट्रस ऑक्साइड आणि हॅलोथेन द्यायला सुरवात केली. पेशंटचा श्वसनमार्ग मोकळा राखणं, मला हळूहळू कठीण जाऊ लागलं… त्याला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला आणि परिस्थिती गंभीर दिसू लागली. थोड्याच वेळात पेशंटचा चेहरा पूर्णपणे निळा – जांभळा पडला. गोऱ्या कातडीच्या लोकांमधे हा बदल फार चटकन दिसून येतो. माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. हा माझा पहिलाच पेशंट होता आणि मी घोटाळा करून ठेवला आहे, हे अगदी स्पष्ट दिसत होतं. माझी झालेली पंचाईत मला साह्य करणाऱ्या एका परिचारिकेनं ओळखली आणि तिनं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर धाव घेतली. जॉन नावाचा एक सल्लागार डॉक्टर तिला योगायोगाने इस्पितळाच्या आवारात भेटला. त्याला घेऊनच ती ऑपरेशन थिएटरमध्ये आली. त्यानं तातडीनं पेशंटच्या श्वसनमार्गात एक नळी घातली आणि त्याला सहजगत्या श्वास घेता येईल, अशी व्यवस्था काही क्षणांतच केली. हळूहळू त्या पेशंटचा मूळचा गोरा रंग त्या चेहऱ्यावर परत दिसू लागला. शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डॉ. जॉन माझ्याबरोबरच थिएटरमध्ये थांबले होते. इस्पितळातलं काम संपताच मी माझ्या खोलीवर आलो आणि तिथं लावलेल्या दत्ताच्या तसबिरीपुढं उभा राहून मोठ्या संकटातून वाचवल्याबद्दल करुणा भाकली… मी पूर्णपणे खचून गेलो. डॉ. जॉन यांच्या खोलीवर जाऊन मी त्यांचे आभार मानले.
डॉ. जॉन हे वागायला अत्यंत चांगले आणि समजूतदार होते. ते मला मेसमध्ये घेऊन गेले आणि मला काहीतरी त्यांनी खायलाच लावलं. दोन तास ते माझ्याशी बोलत होते. माझ्या बाबतीत जे घडलं, तसंच जवळपास भूल देणाऱ्या प्रत्येक डॉक्टरच्या बाबतीत घडलेलं असतं, असं सांगून ते म्हणाले : कठीण परिस्थितीतून पळ काढणं हे पराभव स्वीकारण्यासारखंच असतं! तू निराश होण्याचं काहीच कारण नाही. फक्त जीवनात परिस्थितीवर मात करायला शीक आणि उत्तम बधिरीकरण तज्ज्ञ हो !
डॉ. जॉन यांच्या या प्रोत्साहनानं मला बराच दिलासा मिळाला. आपल्या हाताखालच्या अननुभवी डॉक्टरांना काहीही अडचण आली, की त्यांच्या मदतीला धावून जाताना मला कायम हा प्रसंग आठवत असतो.
माझे काकाही डॉक्टर होते. त्यांच्या मोठ्या मुलीला गर्भाशयाचा विकार होता. तपासणीअंती तिथं अगदी मामुली स्वरूपाचा ट्यूमर असल्याचं निष्पन्न झालं आणि शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला तिला देण्यात आला. पण त्यात निकड अशी फारशी नसल्यानं दिवाळीनंतरची तारीख शस्त्रक्रियेसाठी मुक्रर केली. एका खाजगी इस्पितळात तिनं ही शस्त्रक्रिया करून घेण्याचं ठरवलं होतं. मुंबईतले एक प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ तिथं काम करीत. माझ्या काकांचे ते वर्गमित्र तर होतेच, शिवाय त्यांची घनिष्ठ दोस्तीही होती.
मी तेव्हा नुकताच एम. बी. बी. एस. परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. शस्त्रक्रिया सुरू झाली तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होतो. तिला मज्जारज्जूतनं भूल देण्यात आली आणि पोट कापून त्या ट्यूमरचं दर्शन होताच, तो स्त्रीरोगतज्ज एकदम गंभीर झाला. या ट्यूमरला कर्करोगाचा संसर्ग झालेला दिसतो, मला त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येणं अशक्य आहे, असं सांगून त्यानं फक्त बायोप्सीसाठी आवश्यक तेवढा त्या ट्यूमरचा भाग कापून घेतला आणि पुन्हा टाके घालून टाकले. ऑपरेशन थिएटरमध्ये सन्नाटा निर्माण झाला होता.
बाहेर येताच त्यानं माझ्या काकांच्या कानावर खरी परिस्थिती घालून टाकली आणि स्वतः या संबंधात डॉ. बोर्जेस यांच्याशी बोलण्याची तयारी दर्शवली. डॉ. बोर्जेस हे त्या काळातले फार मोठे कर्करोगतज्ज्ञ होते. मी तरुण तर होतोच आणि फारसा अनुभवही माझ्या पाठीशी नव्हता. तरीही मला मात्र सारखं असंच वाटत होतं की, परिस्थिती काही पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नाही आणि माझी बहीण यातून सहज बाहेर पडू शकेल.
पण दुसऱ्याच दिवशी तिला जबरदस्त डोकेदुखी सुरू झाली आणि कोणत्याच वेदनाशामक औषधांचा तिच्यावर परिणाम होईना. तिसरा दिवस उजाडला. आम्हाला काळजीचं असं विशेष काहीच कारण दिसत नव्हतं. तेवढ्यात तिच्या चेहऱ्यावरून वारं गेल्यासारखी तिची अवस्था झाली. ती डोळेही तिरळे करायला लागली. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं तिला मेनिंजायटीस झाल्याचं निदानं केल होतं. शस्त्रक्रिया करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञालाही पाचारण करण्यात आलं आणि विचारांती असं लक्षात आलं, की तिला
हा संसर्ग पाठीच्या कण्यातून बधिरीकरणाचं इंजक्शन देताना झाला असावा. पाठीच्या कण्याचं पुन्हा ‘पंक्चर’ करण्यात आलं, तो त्यातून पू बाहेर आला. त्यात सापडलेल्या एका तीव्र प्रतिकारशक्तीच्या जंतूंमुळेच हा संसर्ग झाल्याचंही निदान करण्यात आलं. त्यावर योग्य असं कोणतंच औषध भारतात नव्हतं. आम्ही तातडीनं लंडन येथील एका नातेवाइकाशी संपर्क साधला. विमानाने २४ तासांत हवं ते औषध मुंबईत येऊन पोहोचलंही. हे इंजक्शनही पाठीच्या कण्यातूनच द्यायचं होतं. पण दरवेळी हे इंजक्शन दिलं, की तिला फेफरं भरून आकडी लागे आणि तिचा चेहराही हिरवानिळा होई. आणखी एखादंही इंजक्शन सहन करून घेण्याची ताकद तिच्यात उरलेली नाही, असंच मला वाटायचं. पण प्रत्यक्षात सहा इंजक्शनं झाल्यावर परिस्थितीत बराच उतार पडला.
मात्र तिच्या कमरेखालचं सारं शरीर अर्धांगवायूमुळे पार दुर्बल होऊन गेले होतं. तिला आपल्या पायांची हालचाल करता येत नसेच. शिवाय तिच्या डोळ्यांतही तिरळेपण जाणवू लागलं होतं. कुणीतरी तिच्यावर जादूटोणा केल्यासारखं तिचं रूप विद्रूप होऊन गेलं होतं… ‘डॉक्टर, हे असं कसं झालं हो?’ या तिच्या नुसत्या प्रश्नानंच त्या स्त्रीरोगतज्ज्ञाच्या डोळ्यांत आसवं उभी राहिली. ‘हा फक्त तुझ्या आणि माझ्या नशिबाचा खेळ आहे…’ यापलीकडे त्यांच्या तोंडून शब्दही निघेना.
पक्षाघाताचा झटका येऊन जवळजवळ तीन आठवडे झाले होते.पण गर्भाशयाच्या कर्करोगावरचे उपचार तर पुढे सुरू करणं भागच होतं. पूर्वी ठरल्याप्रमाणे आम्ही डॉ. बोर्जेस यांच्याशी संपर्क साधला आणि टाटा इस्पितळात गेलो. आपल्या मुलीच्या नशिबातील हे भोग बघून माझे काका तर पूर्णपणे खचून गेले होते. डॉ. बोर्जेस यांनी त्यांच्याशी हास्यविनोद करायला सुरवात केली. त्यांनी अगदीच निराश होऊन जाऊ नये, म्हणूनच डॉ. बोर्जेस यांचे हे प्रयत्न होते.
अखेर शस्त्रक्रियेचा दिवस उजाडला. माझ्या काकांनी ऑपरेशन थिएटरमध्ये येण्यासही नकार दिला होता. तिचा ट्यूमर काढून टाकण्यातच आपण फार मोठा धोका पत्करत आहोत, असं डॉ. बोर्जेस यांचंही मत होतं. मला तसं वाटत नव्हतं. पण अखेरीस शस्त्रक्रिया पार पडली. तो ट्यूमर काढून टाकण्यापुरतं यश डॉ. बोर्जेस यांना मिळालं होतं. शस्त्रक्रियेच्या वेळी माझ्या बहिणीला बरंच रक्तही द्यावं लागलं होतं. पण ती तरुण होती आणि तिच्या प्रकृतीत जरा वेगानंच सुधारणा होऊ लागली होती. तरीही रेडीओथेरपी आणि अन्य उपचारांसाठी नियमितपणे टाटा इस्पितळात येणं, तिच्या दृष्टीने फार त्रासाचं होत होतं. तिला होणाऱ्या वेदना आणि आम्हा सर्वांना भोगाव्या लागणाऱ्या मानसिक यातना बघून अखेर डॉ. बोर्जेस यांनी यापुढचे सारे उपचार आमच्या घरीच येऊन करायचे ठरवले… त्याचा मोबदला म्हणून आम्ही त्यांना दरवेळी फक्त एक कप चहा द्यावा, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती!
आपल्या स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी देखील आपल्या कामातून क्षणाचीही फुरसत न घेणाऱ्या डॉ. बोर्जेस यांच्या या सौजन्यामुळे आम्ही तर भारावूनच गेलो होतो. आणि आमच्या बहिणीचं करावं तेवढं कौतुक थोडचं होतं… आपल्याला कर्करोग झाला आहे काय, हा प्रश्न देखील तिनं कुणाला विचारला नव्हता. फक्त आपल्या चार वर्षांच्या मुलाला ती अधूनमधून जवळ घेऊन बसत असे. पण तिनं आपल्या डोळ्यांतून कधी पाण्याचा थेंबदेखील येऊ दिला नाही.
जुलै १९६० मध्ये तिच्या ट्यूमरची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर सहाच महिन्यांत माझा इंग्लंडला जाण्याचा दिवस येऊन ठेपला. अगदी जड अंत:करणानंच मी तिला भेटायला गेलो. तो दिवस मला अजूनही आठवतो. तिच्या आजारपणात मला जेवढी मदत करता येणं शक्य आहे, तेवढी मी केली होती. तिच्या नवऱ्यानं एक हस्तिदंती दीप मला भेट म्हणून आणला होता. माझ्या बहिणीनंच ती भेट माझ्या हातात दिली. ‘सतीश, इंग्लंडमधील परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन परत ये. मी तुझ्या स्वागतासाठी विमानतळावर हजर असेन !’ असं तिनं मला सांगितलं खरं, पण मी भारतात परतण्यापूर्वीच काहीतरी विपरीत घडून गेलेलं असणार अशी शंका मला वाटत होती. मी कसेबसे माझे अश्रू आवरले…
मी इंग्लंडमध्ये पाच वर्षं होतो. तिकडूनच मी तिच्या प्रकृतीची नियमित चौकशी करायचो. ती फिजिओथेरपी घेतेय, पाण्यातले व्यायाम करतेय… असं मला समजत रहायचं. दोन वर्षातच ती हळूहळू चालायलाही लागली होती. १९६५ मध्ये मी भारतात परतलो तेव्हा तर ती चक्क मोटारही चालवू लागली होती… आणि माझ्या स्वागतासाठी ती खरोखरच विमानतळावर उपस्थित होती! हे सारं कसं झालं, ते मला सांगताच येणं शक्य नाही. पण केवळ तिची जिद्द आणि मनाची उभारी यामुळेच ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकली होती… आणि डॉ. बोर्जेस यांना कर्करोगानंच मृत्यू आल्यानंतरही ती ढसाढसा रडली होती. तिची प्रकृती अजूनही चांगली आहे आणि तिचा साठावा वाढदिवसही, तिच्या नक्ऱ्यानं अगदी वाजतगाजत साजरा केला… याला जीवन ऐसे नाव !
इग्लंडमधील माझ्या वास्तव्यातला एक प्रसंग मला अजूनही आठवतो. पहिल्याच प्रसूतीसाठी इस्पितळात आलेल्या एका महिलेला सिझेरियन करून घ्यावं लागणार होतं आणि त्यापूर्वी तिला भूल देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. मी तिला इंजेक्शन देणार, तेवढ्यात माझा हात हातात धरून ती एकदम उद्गारली ‘किती सुंदर मर्दानी हात आहेत रे तुझे!’ मी तर एकदम गडबडूनच गेलो. पाश्चात्त्यांचा स्वभाव अगदी मोकळा ढाकळा असतो, हे जरी खरं असलं तरी माझा हात हातात घेऊन, तो कुरवाळण्यानंच तिला अगदी गुदगुदल्या होत होत्या. आपल्या पहिल्या पहिल्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी सिझेरियनला तोंड द्यावं लागत असताना त्या महिलेच्या मनात हे असे विचार येऊ शकत होते… अशा प्रसंगातून जावं लागताना कोणत्याही भारतीय स्त्रीच्या मनात असे विचार येणंच शक्य नाही, याची मला पूर्णपणे खात्री आहे. पण अशा नाना रंगाढंगाच्या लोकांचं मिळूनच हे सारं विश्व बनलेलं असतं ना…
माझ्या आठवणीतला आणखी एक प्रसंग हा बॉम्बे इस्पितळातला आहे. त्या दिवशी आम्हाला बऱ्याच शस्त्रक्रिया करायच्या होत्या. एक शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर, इस्पितळाच्या अवाढव्य पसाऱ्यातून रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये आणला जाईपर्यंतचा वेळ वाया जाऊ नये, म्हणून नंतरच्या रोग्याला आधीच आणून बाहेरच्या दालनात त्याची व्यवस्था केली जाई. एके दिवशी अशीच आपल्यावरील शस्त्रक्रियेसाठी थांबून राहण्याची वेळ एका चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण घेतलेल्या गृहस्थांवर आली होती… आतमध्ये आधीच्या शस्त्रक्रियेला जरा जास्तच वेळ लागत होता. आमच्या एका सहकाऱ्याला तेव्हा जरा भगवद्गीता – पुराण यांच्यात बराच रस होता. त्या काळात गीता पाठ करायचं त्यानं मनावर घेतलं होतं. वेळ मिळेल तेव्हा खिशातून पुस्तक काढून तो गीतेतले श्लोक गुणगुणू लागायचा. त्या दिवशीही तो असाच श्लोक गुणगुणत होता. पुढं त्या रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पारही पाडली.
दोनतीन दिवसांनी आम्ही सारे त्या पेशंटची विचारपूस करण्यासाठी गेलो. तेव्हा आम्हा सर्वांना आणि विशेषतः शल्यक्रियाविशारदाला त्यानं मनःपूर्वक धन्यवाद दिले. पण नंतर त्यानं आम्हाला हळूच सांगितलं की, मी माझ्यावरच्या शस्त्रक्रियेची वेळ कधी येते, याची वाट बघत असताना माझ्या कानावर येत होतं ते गीतापठण, मला असं वाटायला लागलं की, इहलोकाची आपली यात्रा आता जवळजवळ आटोपतच आलीए आणि कुणीतरी जरा लवकरच गीतापाठ सुरू केला आहे! प्रतीक्षेच्या त्या जिवघेण्या ४५ मिनिटांच्या काळात आपलं मरण क्षणाक्षणाला जवळ येतंय, असंच मला वाटत होतं…
आमचे डोळे ताडकन उघडले. गीतापाठ वगैरे आमच्या सहकाऱ्याचे उद्योग आम्ही तत्परतेनं बंद केले. तेव्हापासून प्रतीक्षागृहातील रुग्णांच्या समोर मौठ्यानं बोलणं, विनोद करणं आणि गाणी गुणगुणणं मी एकदम बंद करून टाकलं आहे. ऑपरेशन थिएटरमधील संगीतदेखील विशिष्ट प्रकारचं म्हणजे शास्त्रीय किंवा भक्तीगीतांच्या स्वरूपाचंच असेल अशी मी दक्षता घेतो. कधी कधी फक्त शस्त्रक्रियेचा भागच बधीर करून, रुग्ण शुद्धीवर असताना शस्त्रक्रिया केली जाते, तेव्हा तर मला अधिकच काळजी घ्यावी लागते. अशाच प्रकारच्या शस्त्रक्रियेच्या वेळी माझ्या सहकाऱ्यानं लावलेल्या गीताचे शब्द होते : इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले ! ऑपरेशन टेबलावरील त्या रुग्णानं अगदी हताश होऊन ‘माझ्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि दुसऱ्याच क्षणी मी थिएटरमधला टेपरेकॉर्डर बंद करून टाकला !
जीवन आणि मृत्यू यांच्या अगदी सीमारेषेवर उभे राहून बधिरीकरण तज्ज्ञ आपले काम करीत असतो. वैद्यकशास्त्राच्या या शाखेत काम करणाऱ्या डॉक्टरला अनेकदा अगदी कठीण प्रसंगातून जावं लागतं. त्यामुळे तो अगदी नम्र तर बनतोच पण कमालीचा दक्षही. कितीही काळजी घेतली तरी काही वेळा रुग्ण मृत्युमुखी पडतोच… अशा वेळी आम्हा डॉक्टर मंडळींना कोणाचाच आधार नसतो. त्यामुळे दररोज इस्पितळात जायला निघण्यापूर्वी मी परमेश्वराची करुणा भाकतो… देवा, निदान माझ्या काही गफलतीमुळे तरी रुग्णावर अनवस्था प्रसंग येऊ देऊ नकोस… अनेकदा प्रयत्नांची शिकस्त करूनही विपरीत घडतंच… बधिरीकरण तज्ज्ञांच्या मनात त्या वेळी हमखास विचार येतो, ‘आपण या शाखेत काम करण्याचं ठरवलंय… पण हा निर्णय शहाणपणाचा आहे काय?’
समाप्त
छान अनुभव कथन