वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा ——– गूढ निसर्गाचं… – डॉ. प्रफुल्ल देसाई

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
गूढ निसर्गाचं…
– डॉ. प्रफुल्ल देसाई
———————————

जीवनाचा हा प्रवास कितीही आखीव रेखीव आणि ठरवून करायचा म्हटलं तरी तो त्याप्रमाणे होतोच असं नाही. मानवी शक्तींच्या नियंत्रणा- पलिकडील काही अदृश्य शक्ती कोणाच्याही जीवनाला वेगळंच वळण देऊ शकतात. काही व्यक्ती-काही प्रसंग आपल्या प्रवासाचा मार्गच बदलवून टाकू शकतात. अशाच व्यक्तींमध्ये माझ्या आईचा समावेश करावा लागेल. केवळ तिच्या आग्रहास्तव इंजिनिअरिंगला जायचं सोडून मी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४५ च्या सुमारास, जेव्हा जंतुनाशकांचा शोधही लागला नव्हता, तेव्हा अत्यंत निष्णात शल्यक्रियाविशारद डॉ. जी. एम. फडके यांनी माझ्या वडलांचे प्राण वाचवले होते. मी माझ्यापुढे डॉ. फडके यांचाच आदर्श ठेवावा, अशी माझ्या आईची मनापासूनची इच्छा होती आणि ती गफलतीनं का होईना माझ्या हातून पूर्ण झाल्यानं तिला अत्यानंद झाला होता. माझ्या दृष्टीनं त्यालाच अधिक महत्त्व होतं. ही घटना १९५० मधली होती.

आणि आज १९९२ साली, आयुष्यातल्या चार दशकांच्या प्रवासाचा आढावा घेतल्यानंतर वाटतं, आज जर आई असती, तर मुलाला डॉक्टरच व्हायला लावल्याबद्दल तिला किती आनंद झाला असता. मी डॉक्टर झालो, म्हणून मला माझ्या व्यवसायाबद्दल विशेष आपुलकी वाटणं साहजिक आहे. विज्ञान, कला आणि चिरंतन मानवी मूल्यं यांचा मिलाफ दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसायात इतक्या सुरेलपणे झालेला असेल का? दुसऱ्या कोणत्याही क्षेत्रात सुखी होण्यासाठी बाहेर पडलेला मनुष्य समोरच्या व्यक्तीच्या इतक्या जवळ जात असेल का?

मानवी आयुष्य किती क्षणभंगूर आहे, ते तुम्हाला याच क्षेत्रात काम करायला लागल्यावर अगदी प्रकर्षानं जाणवतं. नेहमीच्या अनेक आजारांना स्वतःच्या अशा काही मर्यादा असतात आणि माणूस त्यातून आपोआप बरा होतो, हे जरी खरं असलं तरी जंतुनाशकं आणि संसर्ग प्रतिबंध या क्षेत्रात जर विज्ञानानं खास मजल मारली नसती, तर जगातले लक्षावधी निरपराध जीव केव्हाच आपल्याला सोडून गेले असते. सध्या आपल्या सभोवतालच्या जगातल्या नाना प्रकारच्या नवनव्या रोगांना आपण आळा घालू शकत नाही, तेव्हाच आपल्याला आधुनिक वैद्यक शास्त्राच्या मर्यादा खऱ्या अर्थानं लक्षात येतात. हृद्रोग, अस्थमा, कर्करोग, पारंपरिक संधिवात, ढासळत जाणारी मज्जासंस्था अशा अनेक रोगांवर, आज वैद्यकशास्त्र इतकं प्रगत झालेलं असतानाही आपण अद्याप मात करू शकलेलो नाही.

माझ्या आयुष्यातला साडेतीन दशकांचा सर्वोत्तम असा कालखंड मी कर्करोगाचं निदान आणि त्यावरील उपचार यांच्यात व्यतीत केला. त्यामुळे मी निराशावादी असणार, असा कोणाचाही समज होणं अगदी सहज शक्य आहे. पण प्रत्यक्षात अगदी उलट आहे. माझ्या व्यावसायिक भूमिकेत गेलो, की मी अगदी आशावादी असतो. माझ्या डॉक्टरकीच्या व्यवसायात मला अनेक अपयशांना जरूर सामोरं जावं लागलं. पण त्यामुळेच अपयशावर मात करण्याची जिद्द माझ्यात आधिकाधिक जोमानं बळावत गेली आणि मी आशावादी बनलो. अनेकदा अगदी नाट्यपूर्ण रितीनं माझ्या हाताला यश येत गेलं आणि त्यामुळे कर्करोगाविरुद्धचा माझा लढा अधिक जोमानं पुढं चालू ठेवण्याची प्रेरणा मला मिळत गेली.

हाताला यश आलेल्या कहाण्याच सांगण्याचा कितीही मोह होत असला, तरी आज मी सुख आणि दुःख याचं संमिश्र दर्शन घडवणारेच काही प्रसंग सांगणार आहे. या अशा घटनांमधूनच मला खूप शिकायला मिळालं. प्रत्येक नवा पेशंट हा समृद्ध करून सोडणारं नवं अनुभवविश्वच बरोबर घेऊन येत असतो. कर्करोगाचं सावट घेऊन माझ्‌याकडे रोगी येत असतो आणि एक तर मी ते सावट दूर करावं किंवा त्यावर शिक्कामोर्तब करावं, एवढीच त्याची अपेक्षा असते… आणि रोग्याला केवळ व्यावसायिक सल्लेच डॉक्टरकडून हवे असतात, असं नाही.
मनाला धीर देणारे चार शब्दही त्याला डॉक्टरकडून ऐकायचे असतात. या दोहोची जो उत्तमरित्या सांगड घालू शकतो तोच चांगला डॉक्टर बनू शकतो.

के. इ. एम. इस्पितळ आणि जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय येथे मला माझ्या वैद्यकीय शिक्षणाचे धडे गिरवायला मिळाले, हे मी माझं भाग्यच समजतो. त्यानंतर, या दोन संस्थांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्करोगाच्या ‘टाटा मेमोरियल सेंटर ‘मध्ये माझ्या वैद्यकीय अनुभवविश्वात भरच पडत गेली. आणि पुन्हा हेही काही ठरवून झालं नाही, तर तोही एक योगायोगच होता. शस्त्रक्रियेच्या कौशल्यातील अधिकाधिक बारकावे लक्षात यावेत म्हणून १९५६ च्या डिसेंबरमधील एका गारठलेल्या संध्याकाळी मी ‘टाटा मेमोरियल सेंटर ‘मध्ये सर्वात शेवटच्या स्तरावरील निवासी डॉक्टर म्हणून प्रवेश केला… आणि आज ३४ वर्ष उलटून गेली, तरी तेथेच काम करीत आहे. कर्करोगाचं इस्पितळ म्हटलं की बहुतेक वेळा मृत्यूच सोबतीला असतो, तरीही आशेची चंदेरी किनार लाभलेल्या काही आठवणी मी माझ्या स्मृतिमंजुषेत जपून ठेवल्या आहेत.

दहा वर्षांच्या एका अत्यंत चमकदार आणि चाणाक्ष मुलाला घेऊन त्याचे वडील माझ्याकडे आले होते. तो मुलगा म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. ते क्षणभरही त्याला दूर करायला तयार नव्हते. आपण त्या मुलाचं नाव राहूल ठेवू या. १९७० मध्ये जितक्या प्रकारे शक्य होतं, तेवढ्या तपासण्या करून आणि त्यांचे अहवाल घेऊनच ते इस्पितळात आले होते. क्ष-किरण, रक्त, मूत्र या साऱ्या तपासण्या झालेल्या होत्या, राहूलला तातडीनं मदत मिळणं आवश्यक होतं.

त्याच्या छातीत ‘नर्व्ह ट्यूमर’ होता आणि त्यामुळे फुफ्फुसांवर दबाव आला होता. केवळ औषधोपचार किंवा रेडिओथेरपी यामुळे हा विकार बरा होणारा नव्हता. त्यासाठी शस्त्रक्रियेचीच गरज होती आणि ट्यूमरचा वाढलेला आकार लक्षात घेता राहुलच्या जिवालाच धोका होता. अनेकदा काय होतं की, रुग्णाच्या नातेवाइकांच्या लक्षात सारी गुंतागुंत येऊ शकत नाही आणि प्रगत वैद्यशास्त्राच्या भरोशावर ते सारं काही चांगलंच होईल, अशी अपेक्षा धरून बसतात. राहुलच्या वडलांपुढे आम्ही ही सारी दाहक वास्तवता ठेवताच त्यांना जबर धक्का बसला. अवघ्या दहा वर्षांच्या आणि नेमक्या राहूललाच या संकटाला का तोंड द्यावं लागत आहे, असा त्यांचा सवाल होता आणि आमच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. पण अखेर त्यांनी शस्त्रक्रियेला संमती दिली.
अखेर, १९७० च्या जानेवारीत आम्ही शस्त्रक्रियेला सुरवात केली. बधिरीकरण तज्ज्ञानं अत्यंत कौशल्यानं आपलं काम सुरू केलं. राहुलच्या हृदयाची स्पंदनं १६० वर जाऊन पोहोचली होती. नेहमीपेक्षा ही गती दुप्पट होती आणि अशा वेळी खरं म्हणजे कोणावरही शस्त्रक्रिया करणं अशक्य असतं. पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले. रक्तवाहिन्यांचा ट्यूमर आणि तोही छातीमध्ये. फुफ्फुसांच्या नियमित कार्यपद्धतीत अडथळा येतोय आणि हृदया- वरही त्याचा दाब आलाय… अशा वेळी खरं म्हणजे एकच गोष्ट शक्य असते. शस्त्रक्रिया थांबवणं. चिरफाड केलेला भाग पुन्हा शिवून टाकणं आणि परमेश्वरावर सारी भिस्त ठेवून स्वस्थ बसणं. पण आम्ही तसं न करायचं ठरवलं…

त्यात धोका तर मोठाच होता. रक्तवाहिन्यांच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करताना, रक्त बरंच जाण्याची शक्यता असते. आम्ही रक्तपेढीला सूचना दिल्या. रक्ताच्या बाटल्या ऑपरेशन थिएटरमध्ये आणल्या गेल्या. साडेतीन तासांच्या कठोर परिश्रमानंतर आणि सहा बाटल्या रक्त राहुलच्या शरीरात गेल्यावर शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. राहूलच्या दोन फासळ्यांसह तो ट्यूमर आम्ही अखेर बाहेर काढला होता. शस्त्रक्रिया संपली तेव्हा तर राहूलच्या हृदयाची गती १८०-१९० पर्यंत जाऊन पोचली होती.

पाच तासांनी आम्ही ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलो आणि त्याच्या आई-वडलांना सारी कहाणी ऐकवली. त्या पाच तासांत दहा वर्षांनी म्हातारे झाल्यासारखे दिसत होते. त्यांच्याशी बोलतानाही मला अगदी स्पष्टपणे जाणवत होतं, की प्रारंभीचा हल्ला आम्ही परतवून लावला असला तरी खरी लढाई अजून सुरूच व्हायची होती. पुढं काय होईल, ते कोणीच सांगू शकत नव्हतं. राहुलची अगदी काटेकोरपणे काळजी घेणं, एवढंच आमच्या हाती होतं…

काळ कुणासाठी थांबत नाही. दिवसांमागून दिवस गेले आणि वर्षांमागून वर्ष. २१ वर्ष उलटली आणि एके दिवशी माझ्या टेबलावर एक आमंत्रणपत्रिका येऊन पडली. एका तरुण स्त्री-रोग तज्ज्ञाच्या दवाखान्याच्या उद्घाटनाचं ते निमंत्रण होतं आणि त्यावर नाव होतं “राहूल, एस. एम. डी. डी. जी. ओ.” हे नाव मी कधीच विसरू शकणार नव्हतो. कर्करोगाच्या त्या जिवघेण्या विळख्यातून बाहेर पडल्यावर राहूल नियमितपणे आमच्याकडे तपासणीसाठी येत होता. सुदैवानं त्याच्या शरीरात त्या ट्यूमरचा प्रादुर्भाव पुन्हा झाला नव्हता. वयाच्या १६ व्या वर्षी राहूल माझ्‌याकडे आला. तेव्हा मी अगदी सहज त्याला विचारलं : पुढे काय करणार? त्यानं सांगितलेलं उत्तर एकून मला माझ्याच जीवनातला प्रसंग आठवला राहूलला डॉक्टर व्हायचं होतं आणि त्याच्या आई-वडलांचीही तीच इच्छा होती. ती त्यानं पूर्ण केली होती.
आज २३-२४ वर्ष झाली तरी लहानग्या राहूलला आपल्या कडेवर घेऊन त्याचे आई-वडील माझ्‌याकडे कसे आले होते, ते मी विसरू शकलेलो नाही. त्यांचे डोळे खोल गेलेले होते, पण त्यांतली चमक कमी झालेली नव्हती आज राहूल स्वतःच एक डॉक्टर झाला होता. नियतीच्या करामतींवर त्यानं मात केली होती. अभिमान बाळगावा अशीच ही घटना होती. …

ऑक्टोबर १९६८. कडाक्याच्या उन्हामुळं साऱ्यांनाच अस्वस्थ करणारी संध्याकाळ. तपासणीसाठी आलेले सारे रुग्ण मी नुकतेच हातावेगळे केलेले अशा वेळी अचानकपणे तीन भाऊ आपल्या आईला घेऊन माझ्या दवाखान्यात प्रवेश करतात. माझा सेक्रेटरी त्यांना परतवून लावण्याचा प्रयत्न करतोय… डॉक्टरांवर कामाचा फार ताण येऊ नये, हे बघण्याची जबाबदारीही त्याच्यावरच असते ना ! त्यांचं बोलणं आतमध्ये माझ्या कानावर येतंय त्या तीन भावांची आर्जवं वाढत चाललेली. अखेर मीच माझ्या दालनातून बाहेर येतो.

विशी-पंचविशीतले ते तिघे भाऊ आणि पलिकडल्या सोफ्यावर बसलेली त्यांची आई. तिची चर्या प्रफुल्लित आणि प्रकृती दुरून बघताना तरी उत्तम वाटणारी. हे काही तातडीचं प्रकरण दिसत नाही, असं वाटल्यानं मीच माझ्या सेक्रेटरीच्या मदतीला धावतो … आणि दुसऱ्या दिवशी त्यांना यायला सुचवतो. पण त्या तिघा भावंडांतला धाकटा ठामपणे मला ‘नाही’ म्हणून सुनावतो. त्यांच्याकडे माझ्यासाठी एक पत्र असतं. डॉक्टरांनी ही अगदी आणीबाणीची वेळ आहे, असं त्यांना सांगितलेलं असतं. आईला तुम्ही आत्ताच तपासलं पाहिजे त्यांची विनंती मला आदेशाप्रमाणे भासते. आपल्या आईविषयी वाटणाऱ्या मनापासूनच्या काळजीतूनच हे उद्‌गार निघालेले … मी माझ्या सेक्रेटरीला घरी जायला सांगतो आणि त्या सर्वांना आत बोलावतो. माझ्या वैद्यकीय व्यवसायातला एक अत्यंत अनोखा अनुभव माझ्यापुढे उभा ठाकणार असतो

कोणी काही बोलायला सुरवात करण्याच्या आधीच त्यांची आई मला सांगून टाकते… डॉक्टर, मला काहीच झालेलं नाही. मला कसलाच त्रास होत नाहीये. तिचं नाव असतं मिरीयम आणि वय ५८. यापूर्वी तिनं कधी डॉक्टरचं तोंडही बघितलेलं नसतं. तिच्या बोलण्यावागण्यात ग्रामीण ढंग असतो आणि भारतातल्या एका खेड्यातच सारं आयुष्य गेलेलं असल्यानं टाटा कॅन्सर इस्पितळाचं नावही तिनं कधी ऐकलेलं नसतं. अशी घटना खरं म्हणजे अगदी दुर्मिळ असते … पण त्यामुळेच मिरीयमबाईच्या मनावर चिंतेचं जराही सावट नसतं. डॉक्टर आणि रुग्ण या दोघाच्याही दृष्टीनं ही एक चांगलीच बाब असते.
आईला गेल्या आठवड्यात खोकला सुरू झाला आणि घशातून घरघरही लागायला सुरवात झाली. त्यामुळे डॉक्टरांनी तातडीनं आम्हाला क्ष-किरण छायाचित्रं काढून घ्यायला सांगितलं. ते तिन्ही भाऊ मला सांगत असतात. दोन-तीन दिवसांपासूनच सुरू झालेल्या या खोकल्याचं आणि घरघरीचं प्रमाणही अगदी अल्प असतं आणि तिला बाकी ताप वगैरे काहीही विकार नसतो.

मी त्यांच्याकडून क्ष-किरण छायाचित्र घेऊन पाहणी सुरू करतो मिरीयमच्या दोन्ही फुफ्फुसांत ०.५ ते ३ सें. मी. आकाराच्या कर्करोगाच्या गाठी उद्भवलेल्या मला अगदी स्पष्टपणे दिसत असतात. खरा अनुभवी डॉक्टर तोच की जो निदान झाल्यावरही उतावीळपणे पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासमोर आपल्या जिभेवर ताबा ठेवतो. आज या व्यवसायात ३४ वर्ष घालवल्यावर मी अभिमानानं सांगू शकतो की, मी कितीही कठीण प्रसंग असला तरी माझ्या पेशंटचा स्वतः वरील विश्वास ढळू देत नाही पण मिरीयमचा एक्स-रे माझ्या हातात आला, तेव्हा मी २५ वर्षांनी तरुण होतो … पण तरीही मी माझ्या भावना व्यक्त केल्या नाहीत. अत्यंत अलिप्त आणि निर्विकार चेहरा करून मी तिचे इतर तपासणी अहवाल बघत राहिलो… आणि अखेर मी त्यांच्याशी बोलणं सुरू केलं.

अशा वेळी पेशंट नाणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी काय बोलायचं, याची एक पद्धत मी ठरवून ठेवली आहे. अत्यंत मोजके शब्द. कोणतीही विशेषणं लावायची नाहीत. फापटपसारा नाही. सत्यच सांगायचं. कदाचित ते संपूर्ण सत्य नसेलही. पण खोटी आशा लावायची नाही. वस्तुस्थिती विशद करायची. पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांना ती जाणून घेण्याचा हक्कच असतो… माझा असा अनुभव आहे की, पेशंट आणि त्यांचे नातेवाईक यांना साधारणपणे माझी ही पद्धत पसंत असते, आणि म्हणूनच ते पुढे अधिक कठीण परिस्थितीतही डॉक्टरला हवं ते सारं सहकार्य शांतपणे देत राहतात…

तुमच्या आईचा एक्स-रे जरासा वेगळाच दिसतोय… मी बोलायला सुरवात केली… त्याच्यात काही काळसर ठिपके दिसताहेत. ती कदाचित क्षयरोगाची सुरवात असेल किंवा ‘इओसिनोफिलीया ‘सारखा रक्ताला झालेला संसर्ग असू शकेल … कदाचित ही कर्करोगाची पावलंही असू शकतील. पण इथं आईंची प्रकृती तुमच्या-आमच्यासारखीच ठणठणीत असल्यानं काळजीचं फारसं कारण मला तरी दिसत नाही. त्यामुळे कोणतंही ठाम निदान करण्यापूर्वी मला तुमच्या आईची संपूर्ण तपासणी करायला हवी.

मी तपासणी सुरू केली कर्करोगाचा प्रादुर्भाव शरीराच्या नेमक्या कोणत्या भागातून झालेला असेल, एवढाच माझ्यापुढील प्रश्न होता. सी. टी. स्कॅन, अल्ट्रासाऊण्ड, एम आर आय… यापैकी कोणतीही आधुनिक यंत्रणा तेव्हा उपलब्ध नव्हती आणि रुग्णाशी हळुवारपणे संभाषण सुरू ठेवून त्याच्या संपूर्ण शरीराची केवळ हस्तस्पर्शानं तपासणी करून आम्हाला हे रहस्य उलगडावं लागत असे. (ही कला आता जवळजवळ संपुष्टात तरी आली आहे किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे)… तपासणी सुरू असताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील एखादी रेषा जरी हलली तरी तुमच्या लक्षात यायचं की, अरे! यकृत वाढलंय… पण मी आता पुन्हा मूळ विषयाकडे येतो. मिरीयमचं पोट तपासत असताना, तिच्या
डाव्या मूत्रपिंडाचा आकार बराच वाढल्याचं माझ्या लक्षात आलं. माझं मन निदानाच्या दिशेनं धाव घेऊ लागलं. मूत्रपिंडाचा कर्करोग… संसर्ग फुफ्फुसांपर्यंत गेलेला. वैद्यकीय इतिहासात अगदी दुर्मिळ असणारी पण कधीतरी घडणारी घटना. पुढच्या दोन दिवसांत विविध तपासण्यांअंती निदानावर शिक्कामोर्तब झालं होतं. शरीराच्या अन्य भागात होऊ घातलेला संपर्क थांबवण्याचा एकमेव उपाय होता, मूत्रपिंड काढून टाकणं… पण त्या कुटुंबाला आणि विशेषतः मिरियमला हे काहीच मान्य होत नाही…

डॉक्टर, मला काहीच त्रास होत नाहीए. माझा खोकलाही आता थांबला आहे. आणि माझ्या घशातली घरघर तुम्ही माझ्या पोटावर शस्त्रक्रिया करून कशी बरी होणार आहे? – त्या दुर्दैवी जिवाचे सवाल. ती हुशार तर होतीच. पण हे अज्ञानातून आलेलं शहाणपण होतं. तुमच्या डाव्या मूत्रपिंडाला कर्करोगाची लागण झाली आहे आणि तो काढून टाकला की तुमच्या फुफ्फुसातल्या त्या कृष्णगाठीही बहुधा नाहीशाच होतील, हे त्यांना सांगणं मला कठीण नव्हे अशक्यच झालं होतं. कारण त्याची तरी शाश्वती कुठे होती? पाच हजारातल्या एखादया रोग्याच्या बाबतीत ते घडू शकत होतं… माझ्या निदानामुळे त्यांचं काहीच समाधान झालं नाही आणि त्यांनी माझ्या दवाखान्यातून घरची वाट धरली…

सात महिने उलटले. मिरियम आणि तिच्या कर्करोगाच्या साऱ्या आठवणी मी विसरायलाही लागलो होतो… अशातच एके दिवशी आपल्या आईला घेऊन ते तिन्ही भाऊ पुन्हा माझ्या दवाखान्यात आले. या वेळी त्यांनी माझ्या सेक्रेटरीकडे आधीच संपर्क साधून भेटीची वेळ ठरवून घेतली होती. आईची प्रकृती आता काहीशी सुधारलेलीच दिसत होती. काय झालं, ते जाणून घ्यायला मी तर अगदी उत्सुकच होतो. त्यांनी आपल्या आईचे नव्याने एक्स-रे काढून घेतले होते आणि ते दाखविण्यासाठी त्यांनी माझ्याकडे धाव घेतली होती.

मी अगदी घाईघाईनंच ते एक्स-रे हातात घेतले. तिच्या फुफ्फुसांना काहीच झालेलं नव्हतं. तुम्हा-आम्हा कोणत्याही सर्वसामान्य निरोगी माणसारखीच तिची फुफ्फुसं दिसत होती. सात महिन्यांपूर्वीच्या त्या क्ष-किरण छायाचित्रात ठळकपणे आढळलेल्या त्या गाठी आता नाहीशा झालेल्या होत्या. मला अत्यानंदाचा सुखद धक्का बसला होता. कर्करोगानं स्वयंस्फूर्तीनं माघार घेतल्याचं तर हे प्रकरण नव्हतं ना? दहा हजारात एखादे वेळी असं घडतंही… आपल्या शरीरातच असलेल्या संरक्षक यंत्रणेमुळे असा प्रकार क्वचित केव्हा तरी घडू शकतोच… मी पुन्हा पूर्वीप्रमाणेच हस्तस्पर्शानंच तिच्या मूत्रपिंडाची तपासणी करायचं ठरवलं. आता कर्करोगाच्या तिथल्या गाठीही नाहीशा झालेल्या असणं आवश्यक होतं… मला पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. आकारानं बराच कमी झालेला असला तरी तो ट्यूमर तिथं होताच… पण माझ्या या निदानाला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता. मूत्रपिंडातल्या त्या जीवघेण्या ट्यूमरचा आकार किमान ७५ टक्क्यांनी कमी झाला असला, तरी पुढे पुन्हा गंभीर स्वरूपाचा विकार उद्भवू नये, म्हणुन शस्त्रक्रिया करून घेणं आवश्यक आहे, असं मी त्यांना सांगितलं.

माझ्या सततच्या आग्रहामुळे त्या एकदाच्या शस्त्रक्रियेला तयार झाल्या… संपूर्ण तपासणीनंतर अखेर एकदाची शस्त्रक्रिया पार पडली आणि तो ट्यूमर बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं. सूक्ष्मदर्शक यंत्रातून तपासणी केल्यानंतर तो ट्यूमर ‘कर्करोगाचाच’ असल्याच्या माझ्या निदानावर शिक्कामोर्तबही झालं होतं. पुढे १४ वर्षे तिची प्रकृती ठणठणीत असल्याचं आम्हाला ठाऊक होतं. १९८२ मध्ये ते कुटुंब मुंबई सोडून गेलं… त्यानंतर त्याचा आणि आमचा संपर्क तुटला.

मरियमच्या फुफ्फुसातल्या त्या गाठी कर्करोगाच्याच होत्या, याबाबत कोणाताच प्रत्यक्ष पुरावा माझ्या हाती नाही… पण ते एक्स-रे अनेक डॉक्टरांनी नंतर बघितले. त्या सर्वांनी माझ्याच मताला पुष्टी दिली होती. पण शरीरात जन्मतःच तयार झालेल्या संरक्षक यंत्रणेनं कर्करोगाचा तो हल्ला परतवून लावला होता.

या प्रसंगातून खूपच शिकण्यासारखं आहे. मानवी शरीररचनेची अनेक रहस्यं अद्याप उलगडलेली नाहीत. ती सहजासहजी उलगडणंही शक्य नाही. पण ती जाणून घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना एक ना एक दिवस यश येईल आणि निसर्ग-जीवन-मृत्यू यांचं गूढ उकलेल, असा मला विश्वास आहे.

समाप्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}