मनोरंजन

गुलमोहर ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★गुलमोहर★

टेबलावरचा मोबाईल उचलून समीर खिशात टाकणार इतक्यात त्याला कॉल आला.
“व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज प्रदीप. किती दिवसांनी! बोल, काय म्हणतोस? कसा आहेस?”
“मी एकदम मजेत! विशाल आठवतोय ना? आपला बॅचमेट?”
“म्हणजे काय! त्याला कोण विसरणार? अतिशय महत्वाकांक्षी विद्यार्थी होता. पण त्याचं काय?”
“तो अमेरिकेहून भारतात सेटल होऊन बरेच दिवस झाले पण आपल्याला काहीच कळलं नाही. परवा एका लग्नाला भेटला. मी तर ओळखलंच नाही. फारच लठ्ठ झाला आहे. तो स्वतः माझ्याशी बोलायला आला आणि त्याला आता सगळ्यांना भेटायचं आहे.”
विशाल तुझ्याशी स्वतःहून बोलला? कॉलेजमध्ये कसली ऍटीट्युड होती त्याला! हुषारीचा गर्व!
“त्याचा ऍटीट्युड अजूनही तसाच आहे. ह्या शनिवारी मी एका रिसॉर्ट वर आपलं गेटटुगेदर प्लॅन करतोय. तुला डिटेल्स कळवतो. सी यु.”

समीरने फोन बंद केला. अचानक विशाल डोळ्यासमोर आला. पहिल्या वर्षांपासून विशाल बऱ्यापैकी सिंसीअर होता पण त्याच्याशी त्यावेळीही समीरची पटकन मैत्री झाली नव्हती. त्याच्या भावी आयुष्याचा बढाया ऐकण्यात समीरला अजिबात रस नव्हता. समीर मुळातच अतिशय ब्रिलीअंट होता. कधी कधी तर विशाल समीरकडे डिफीकल्टी घेऊन यायचा.

“समीर,आज मला यायला जरा उशीर होईल. कॉन्फरन्स कॉल आहे. मला उशीर झाला तर तू जेवून घे.” तन्वी घाईने पर्स घेत म्हणाली.

“तन्वी,प्रदीपचा फोन आला होता. ह्या शनिवारी आम्ही इंजिनिअरिंगचे बॅचमेट्स भेटतोय. आपला दुसरा काही प्रोग्राम नाही ना?” समीरने विचारलं.
“काहीही प्रोग्राम नाही. तू एन्जॉय करून ये. निघते मी.” तन्वी बाहेर पडली.

समीरने तन्वीशी प्रेमविवाह केला होता. समीर हुशार असला तरी कधीतरी त्याला खूप डिप्रेशन यायचं. आपल्या हुषारीचं चीज झालं नाही असं अनेकदा वाटायचं. खरं तर पुण्यापासून थोडं लांब पाषाणला त्यांचा टुमदार बंगला होता. प्लॉट वडिलांनी घेतलेला होता पण समीरने स्वकष्टाने त्यावर वास्तू बांधली होती. समोर छान बाग फुलवली होती. सगळं सुख होतं पण कधीतरी वाटायचं,हवा तेवढा पैसा कमावलं नाही. पण तन्वीचा स्वभाव अगदी विरुद्ध! ती आयुष्य भरभरून जगणारी! जे आहे त्यात सुख मानणारी,त्याचा आनंद घेणारी! समीर कधी डिप्रेस झाला की तन्वी त्याला त्यातून बाहेर काढायची. तिची फिलॉसॉफी, तिचं लॉजिक समीर ऐकायचा आणि एक पॉझिटिव्ह लूक परत यायचा.

हॉटेल सयाजीच्या आत समीरने गाडी घेतली. गाडी पार्क करून गाडीतून उतरताना त्याला समोरून एक बीएमडब्ल्यू येताना दिसली. ही गाडी म्हणजे समीरचे स्वप्न होते पण ते पूर्ण करणं त्याला कदापिही शक्य नव्हतं. त्याने गाडी लॉक केली आणि हॉटेलच्या आत शिरणार इतक्यात बीएमडब्ल्यू मधून एक अतिशय स्थूल व्यक्ती उतरली. तो विशालच आहे ही समीरची खात्री पटली. तो विशालजवळ गेला आणि त्याला शेकहॅन्ड करत म्हणाला,”विशाल,मी समीर! ओळखलं ना?”
“अरे न ओळखायला काय झालं?”
विशालच्या बोलण्यातला तो गर्विष्ठपणा का कुणास ठाऊक समीरला तसाच वाटला.
“हॉटेल बरं दिसतंय! मी नेहमी ताज,मेरेडिअन अशाच ठिकाणी जातो.”
‘सयाजी’ पुण्यातील एक हायक्लास हॉटेल आणि विशाल त्याला बरं म्हणत होता. समीर मनातून चिडलाच.
“मी मुंबईला कामानिमित्ताने गेलो होतो. पाच वाजता निघालो. शार्प साडेसातला इथे पोहोचलो. आफ्टर ऑल इट्स बीएमडब्ल्यू.”
विशालचा ऐटीट्युड बघून समीरला तिथूनच घरी परत जावं असं वाटलं. प्रदीप येताना दिसला आणि त्याला हायसं वाटलं. प्रदीप पाठोपाठ कुणाल आणि प्रशांत पण आले.

खूप दिवसांनी मित्र भेटल्यामुळे समीर परत खुलला. टेबलवर गप्पा रंगल्या. सगळेच मित्र आपापल्याला परीने यशस्वी झाले होते. पण विशालने प्रचंड पैसा कमावला होता. त्याच्या बोलण्यातून ते सतत जाणवत होतं.

“विशाल, युएस वरून तू परत भारतात येण्याचा निर्णय कसा काय घेतला? तिथे तर प्रचंड पैसा मिळतो.” प्रदीपने विचारलं.
“खूप कमावलं रे! आता पुण्यात माझी स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करतोय. मी फक्त अनाऊन्स केलं आणि सगळ्यांनी मदतीसाठी डॉलर्स ओतले. माझं एक स्टेटस मी कमावलं आहे. आय ऑल्वेज वॉन्टेड टु बी ऑन द टॉप अँड आय एम देअर! अजून खूप कमवायचं आहे.”

समीरने आश्चर्याने विशालकडे बघितलं. दाराशी बीएमडब्ल्यू, दोन मर्सिडीज, बाणेर-रोडला बंगला,घरात नोकर-चाकर! आणखी ह्याला काय हवं होतं? त्याचा न्यूनगंड परत उफाळून आला. एक हुशार विद्यार्थी असून सुद्धा मी कुठे कमी पडलो? हे राहून राहून त्याच्या मनात यायला लागलं. ह्या सगळ्या मित्रांमध्ये मीच कमी आहे. हुशारीचा आणि संपत्तीचा काहीही संबंध नसतो,हे त्याला कळून चुकलं.

गप्पा अगदी रंगात आल्या असताना विशालला अचानक दरदरून घाम फुटला. अस्वस्थ वाटायला लागलं. समीर ताडकन उठला आणि त्याच्याजवळ विशालजवळ गेला.
“विशाल, काय होतंय?”
समीरच्या पाठोपाठ प्रदीप,कुणाल आणि प्रशांत खुर्चीतून उठले. विशाल अचानक थोडावेळ बेशुद्धावस्थेत गेला. समीर त्याचे तळहात चोळू लागला. दहा मिनिटांनी विशाल नॉर्मल झाला.
“सो सॉरी! माझ्यामुळे पार्टीचा विचका झाला.” विशाल म्हणाला.
“हे काय विशाल? पार्टी परत कधीही करता येईल.” प्रदीप त्याला उठवत म्हणाला. विशालच्या ड्रायव्हरला समीरने बोलावले.
“विशाल,तू जाऊ शकशील ना घरी? का मी येऊ?”
“थँक्स समीर! मी जाईन. आय एम ओके नाऊ.”
ड्रायव्हर विशालला गाडीकडे घेऊन गेला.

सकाळी समीरला उशिराच जाग आली. तन्वीने ब्रेकफास्टला बोलावल्यावर तो उठला. डोक्यात विशालचेच विचार होते,त्याची बीएमडब्ल्यू, त्याचा बंगला,त्याचा बँक बॅलन्स, त्याचा स्टार्ट अप! आपलं ह्यातलं ह्यातलं काहीच करू शकलो नाही ही खंत परत उफाळून आली. फ्रेश होऊन तो टेबलजवळ आला.
“कशी झाली तुमची कालची पार्टी?”
तन्वी डिशमध्ये पोहे देत म्हणाली.
“छान झाली. त्या विशालचे ऐश्वर्य बघून तर डोळेच दिपले माझे! हाऊ कॅन पीपल अचिव्ह सो मच तन्वी? मला आश्चर्यच वाटतं. मी काही कमी कष्ट करत नाही पण म्हणावं तसं यश मिळतच नाही.”
“तुझ्या यशाची कल्पना बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, अनेक घरं ही असेल तर तू कधीच आनंदी राहू शकत नाहीस. आज पुण्यासारख्या शहरात आपला बंगला आहे,गाडी आहे,छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय आहे. हे तरी किती जणांना मिळतं रे? तुझी दृष्टी,विचार बदलले तरच तू खुश राहशील.”
“हं! तुझं नेहमीचं कौन्सिलिंग सुरू झालं.” समीर हसत म्हणाला.
“तरी पण तुझ्या डोक्यात मधूनच कधीतरी हे येतच ना! आज सिनेमा बघूया. बऱ्याच दिवसात बघितला नाही आपण!” तन्वी म्हणाली.
“डन! मी तिकिटं बुक करतो.” समीर खुर्चीतून उठणार इतक्यात प्रदीपचा फोन आला.
“समीर, काल विशालला माईल्ड हार्ट अटॅक आलाय. तुला जमेल तसं त्याला भेटून ये.”
“काय सांगतोस?”
“हो,काल हॉटेलमध्ये त्याला जो त्रास झाला ती लक्षणं त्याचीच होती. मी भेटून आलोय. काळजीचे कारण नाही. बोलतोय तो! स्ट्रेस घेतला असेल कशाचा तरी!”
“ओके,मी जाऊन भेटून येतो.” समीर म्हणाला.

समीरने तन्वीला सांगितलं आणि तो हॉस्पिटलकडे निघाला. विशालच्या रूममध्ये त्याची बायको होती. घाबरलेली वाटतच होती. विशाल झोपला होता. समीर जरा वेळ थांबून तिथून निघाला. रस्त्यात त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरू झाले. इतकं सुख पायाशी लोळण घेत होत असताना विशालला कुठला स्ट्रेस असावा?

पंधरा दिवसांनी समीरने विशालला फोन केला,”विशाल,कसा आहेस? औषध नीट वेळेवर घे.”
“समीर,आता मी ठीक आहे. तू आज येऊ शकशील? बोलायचं आहे तुझ्याशी! तुझ्याजवळ मोकळं व्हावसं वाटतंय.”
“ओके! संध्याकाळी येतो.”

संध्याकाळी समीर विशालकडे गेला तर तो बाहेरच सोफ्यावर बसला होता.
“पेशंट ओके दिसतोय आता!” समीर हसत म्हणाला.
“माझ्या खोलीत गप्पा करू चल!” विशाल उठत म्हणाला.
“गप्पा कसल्या करतोस? तू हार्ट पेशंट आहेस.”
“नको रे तो शब्द! ऐकून कंटाळलोय मी!”

विशालने समीरला त्याच्या खोलीत नेलं. “समीर,आज तुला सगळं सांगावस वाटतंय. मी लहान असताना आमची आर्थिक स्थिती अगदीच सामान्य होती. मी हुशार होतो पण श्रीमंत नव्हतो. तो न्यूनगंड लपवायला मी खूप एटीट्युड दाखवायला लागलो आणि तो स्वभाव बनत गेला. मोठेपणी प्रचंड पैसा जमवायचा हेच एक ध्येय घेतलं होतं. त्यासाठी कष्ट केले,प्रयत्न केले. अमेरिकेला जाऊन अफाट संपत्ती मिळवली. आईबाबा माझ्या ह्या हव्यासापायी माझ्यापासून दुरावले. मुलाने दुसरं प्रोफेशन निवडलं. बायकोने फक्त अबोल साथ द्यायचं ठरवलं होतं. स्ट्रेसने माझं वजन वाढायला लागलं. डायबिटीस मागे लागला पण मी थांबतच नव्हतो. अजून हवं हे संपतच नव्हतं. पुण्यात सेटल व्हायचा निर्णय घेतला आणि स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं. शंभर हात मदतीला पुढे आले,जागा घेतली. सगळं जुळून आलं होतं पण मी घेतलेली जागा विवादास्पद जमीन होती. अचानक कोणीतरी मिठाचा खडा टाकावा तसं झालं. दारात सुख यावं आणि नशिबाने ते मागे ओढावं तसच झालं. नैराश्य आलं, वजन खूप वाढत होतं. शुगर वाढली आणि त्यादिवशी हॉटेलमध्ये त्रास झाला. काय चुकलं माझं? मी महत्वाकांक्षी आहे, हे?”

विशालला काय उत्तर द्यावे समीरला कळेना. “असं नको बोलूस! आता तू शांत हो. पूर्ण बरा झालास की माझ्या घरी ये. माझी बायको तन्वी तुला खूप छान समजावून सांगेल. शी इज द बेस्ट कौन्सिलर.”

विशालकडून समीर निघाला आणि तन्वीचे सगळे शब्द त्याला आठवले. आपला आनंद कशात आहे हे ज्याला कळलं तोच खरा सुखी! समीरला खात्री होती की तन्वी विशालला ह्यातून बाहेर काढेल. विशालची आणि तन्वीची भेट घडवून आणायची समीरने ठरवलं. मैत्रीखातर विशालसाठी तो इतकं नक्कीच करणार होता. समीरला तन्वीचा अभिमान वाटला. समीरने तन्वीला फोन लावला,
“तन्वी,आज बाहेर लॉंग ड्राइव्हला जाऊ आणि आल्यावर तुझ्या हातची गरम गरम दाल-खिचडी आणि पापड हा मेनू!”

विशाल जे काही बोलला ते सगळं ऐकून आज समीरला त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं. खरं सुख कशात आहे हे आज त्याला कळलं होतं. ‘आरोग्यम् धन संपदा’ हे उगाच नाही म्हणत! आज त्याची स्विफ्ट डिझायर त्याला बीएमडब्ल्यूसारखी वाटली. आणि वैशाख वणव्याच्या वाटेवर त्याला आता फक्त गुलमोहर दिसत होता. नकळत तो शिट्टी वाजवू लागला…
‘आज से पहले, आज से ज्यादा,खुशी आजतक नही मिली..’

**समाप्त**

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}