मंथन (विचार)

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा — मनानं खंबीर, तर नशीबही साथीदार ! – डॉ. सुभाष दलाल

डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
मनानं खंबीर, तर नशीबही साथीदार !
– डॉ. सुभाष दलाल
———————————

ही एका बोहरी दांपत्याची कहाणी आहे. एकामागोमाग एक संकटांची मालिका सामोरी आली, अतर्क्य म्हणाव्यात असे अडचणींचे डोंगर समोर उभे ठाकले, तरीही या दांपत्यानं ना आपल्या मनाचा तोल ढळू दिला, ना कधी धीर सोडला. त्यांच्या अब्बास या चार वर्षांच्या मुलाला एकाच वेळी जबरदस्त पोटदुखी झाली होती अन् जोरदार तापही चढला होता. तापामुळे त्याला वातही झाला होता. अॅपेंडिक्सचं निदान झालं आणि अत्याधुनिक उपचारांसाठी मध्यरात्र उलटून गेलेली असतानाही मला अब्बासला ब्रीच कॅण्डी इस्पितळात हलवणं भाग पडलं. शस्त्रक्रिया पार पडली, पण त्याचा ताप मागे हटायला तयार नव्हता. थर्मामीटर सारखा १०६ अंश फॅरनहाइट असेच आकडे दाखवीत होता. अखेरीस तर त्याला फिट्स…
[00:28, 4/6/2024] +91 82087 17414: डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
‘दंत’ कथा
– डॉ. एच. एल. चुलानी
———————————

आपण आपल्या मुखावाटे जे अन्नग्रहण करतो, ते पुढे पचनेंद्रियात जातं आणि न पचलेला भाग मोठ्या आतड्यात जाऊन मलाशयामार्गे गुदद्वारातून बाहेर पडतो. मी शरीराच्या या भागाचा डॉक्टर आहे. तिथं काही झालं की लोक शस्त्रक्रिया करण्यासाठी माझ्याकडे येतात… पण त्याबाबतचे काही प्रसंग सांगण्यापूर्वी मला प्रथम एक समज दूर करायचा आहे. शरीराच्या कोणत्याही भागावर शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे शल्यक्रियाविशारद, हा समज बव्हंशी खरा असला, तरी शल्याविशारदही औषधानं रोग बरा होणार असेल तर शस्त्रक्रिया करण्याचं टाळतोच. वैद्यकीय क्षेत्रात तर अशी एक म्हणच आहे : शस्त्रक्रिया केव्हा करू नये हे ज्याला ठाऊक असतं तोच चांगला शल्यविशारद होऊ शकतो!

आपल्या समाजात एक आणखी गैरसमज असा आहे की, डॉक्टर हा जणू काही देवच आहे. आपण सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं, की मानवी शरीररचना आणि मनुष्याचं मन यावरील उपचारशास्त्राचं शिक्षण घेतलं असलं तरी, डॉक्टर हा देखील अखेर मनुष्यच आहे! मध्ययुगात डॉक्टरला जे देवत्व प्राप्त करून देण्यात आलं होतं, त्याच दृष्टिकोनातून आता या आधुनिक युगात डॉक्टर
मंडळीकडे बघून चालणार नाही.
त्यामुळेच एखाद्या डॉक्टरनं अनुमान काढलं, तरी स्वतःच्याच प्रकृतीच्या हिताच्या दृष्टीनं रुग्णांनी दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यकच असतं… कारण विश्वास बसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशात अनावश्यक शस्त्रक्रिया होत असतात.

एक आणखी समज असा आहे की, डॉक्टर मंडळीचं आयुष्य हे अगदी कंटाळवाणं आणि नीरस असं असतं. पण हा समज अगदी चुकीचा आहे. आता हाच प्रसंग बघा ना…

श्री.अश्विनी माझ्याकडे तपासणीसाठी आले होते. मलविसर्जनाच्या वेळी त्यांना अगदी असह्य अशा वेदना होत होत्या. आपण कोणतीही एखादी कठीण वस्तू चुकून गिळल्याचं ते कबूल करायला तयार नव्हते. तपासणीअंती त्यांच्या मलाशयात काहीतरी कठीण वस्तू अडकली असावी, असा मला संशय आला. मी त्यांना घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गेलो आणि भूल देऊन त्यांच्या गुदद्वाराचं तोंड उघडलं… मला तिथं काय सापडलं माहीत आहे? दोन खोटे दात माझ्याकडे बघून विचकट हास्य करीत होते !

नंतर मात्र श्री.अश्विनी यांनी माझ्याकडे कबूल केलं, की आठवडाभरापूर्वीच चुकून त्यांचे पुढचे दोन खोटे दात त्यांनी गिळले होते… या छोटेखानी कवळीनं संपूर्ण अन्ननलिकेतून आणि पचनेंद्रियातून प्रवास करून त्यांच्या गुदद्वारात जाऊन ठाण मांडलं होतं… ती दोन दातांची कवळी मी त्यांना साभार भेट म्हणून देऊन टाकली !

@@@@@

हैदराबादचे श्री. शेख माझ्याकडे आले ते ‘फिस्टुला ‘च्या असह्य वेदनांनी हैराण होऊन, फिस्टुला म्हणजे गुदद्वाराशी उगवलेला आडवा कोंब, त्यातून कधी रक्त, कधी पू तर कधी शेंबडासारखा चिकट पदार्थ बाहेर येतो आणि रुग्णाला अनन्वित वेदनांनी छळत राहतो. हा कोंब छाटून टाकण्याचा प्रयत्न श्री. शेख यांनी हैदराबादेतच सात वेळा शस्त्रक्रिया करून केला होता… पण तरी ते जमलं नव्हतं. अखेर श्री. शेख माझ्याकडे मुंबईला आले. मी त्यांच्यावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि मुंबईच्या डॉक्टरांबद्दल आदराची भावना व्यक्त करीत श्री. शेख हैदराबादला परतले.

विविध औषधोपचारांनंतरही प्रकृतीत उतार पडला नाही की, मग रुग्ण नियतीला तरी बोल लावतात नाही तर डॉक्टरच्या डोक्यावर खापर फोडून मोकळे होतात. एकदा एका रुग्णावर मी गुदद्वाराच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया केली होती, कधी कधी अशा शस्त्रक्रियेनंतर पोटाच्या खालच्या भागाचा पडदा फाडून मलविसर्जनासाठी काही अन्य व्यवस्था करावी लागते. त्यात मग काही विशेष अडचणीही येत नाहीत. त्यास ‘कोलोस्टमी’ असं म्हणतात. पण सहा महिन्यांतच हा रोगी पुन्हा इस्पितळात परतला. कर्करोगानं त्याला घातलेला विळखा अधिकाधिक मजबूत होत चालला होता. त्याला असह्य वेदना होत होत्या आणि कृत्रिमरित्या तयार केलेल्या गुदद्वारातून तो मलविसर्जन करू शकत नव्हता. त्याच्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया करावी लागली.

पण या साऱ्या काळात ना त्यानं कधी आपल्या नशिबाला बोल लावला ना डॉक्टरच्या नावाने खडे फोडले. खरं म्हणजे अत्यंत चंचल आणि अस्थिर असा स्वभाव असूनही त्याचं हे वागणं अगदी कौतुकास्पद असंच होतं.

@@@@@

डॉक्टरी पेशातल्या शोकांतिकांबाबतचे हे किस्से एवढ्यावरच थांबवलेले बरे, कारण या क्षेत्रातही हास्याचे फवारे उडतील अशा काही घटना घडत असतातच. एकदा ज्युलियस नावाचा एक खलाशी माझ्याकडे आला. बोटीवर असताना त्याला एक घड्याळ ‘स्मगल’ करायचं होतं. पण बंदरात उतरताना तपासणी होते, हे कळल्यावर त्याला ते कुठं लपवावं, असा प्रश्न पडला… अखेर त्यानं ते आपल्या गुदद्वारातून आत घुसवलं. देवाकडे त्यानं केलेली प्रार्थना यशस्वी ठरली होती आणि तपासणीतून तो सहीसलामत बाहेर पडला होता ! – पण आता त्याच्यापुढं दुसरंच संकट उभं होतं. त्याला ते घड्याळ बाहेरच काढता येत नव्हतं. मी त्याच्या गुदद्वारातून ‘सिग्मॉयडोस्कोप’ नावाचं यंत्र आत घातलं… गुदद्वाराच्या आत काय आहे, ते बघण्यासाठी या यंत्राचा उपयोग करतात. मी त्या यंत्राला डोळा लावला, तो मला काय दिसावं ? त्या क्षणाला किती वाजले आहेत, ते मला अगदी ठळकपणे दिसत होतं! किती वाजले आहेत, या प्रश्नाच्या उत्तरासाठी एखाद्याच्या गुदद्वरात डोकावून बघण्याची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ! ते घड्याळ अगदी विनासायासपणे बाहेर काढण्यात आलं आणि ज्युलियस हसत हसत घरी गेला…

आपल्या गुदद्वारातून नाना प्रकारच्या वस्तू आत घुसवण्याचा अनेकांना नाद असतो. केवळ लैंगिक सुख मिळविण्याच्या हेतूनंच हे केलं जातं. असाच एक इसम एकदा इस्पितळात आला … त्याच्या गुदद्वारातून रक्तस्राव होऊ लागला होता. आम्ही तातडीनं त्याची क्ष-किरण तपासणी केली तो त्यातून काय निघावं ? त्याच्या मलाशयात चक्क विळ्यासारखं एक अणकुचीदार हत्यार होतं ! आम्ही शस्त्रक्रियेचीही तयारी केली. तेवढ्यात त्याला शौचाला जाण्याची उबळ आली… नशीब ! शौचाला बसला असताना, ते हत्यारच त्याच्या गुदद्वारातून बाहेर आलं…

@@@@@

कोणत्याही ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणाऱ्यांची एक ‘ अनौपचारिक’ ज्येष्ठता सूची असतेच. चीफ सर्जन हा त्या यादीत सर्वोच्च स्थानावर येतो. नंतर बधिरीकरण तज्ज्ञ, सहाय्यक शल्यक्रियाविशारद, ऑपरेशन थिएटरमधील प्रमुख परिचारिका, ज्येष्ठ निवासी डॉक्टर, कनिष्ठ निवासी डॉक्टर, आत- बाहेर करणारी (सर्क्युलेटिंग) परिचारिका, कनिष्ठ परिचारिका आणि नंतर ऑपरेशन थिएटरची देखभाल करणारा चपराशी, हा साधारण क्रम असतो… मला माझी कनिष्ठ निवासी डॉक्टरपदाची कारकीर्द आठवतेय. तेव्हा सगळी ‘घाणेरडी’ कामं माझ्यावर सोपविली जात. (मी ‘घाणेरडी’ शब्द वापरतोय, पण मला ‘अस्वच्छ’ असं म्हणायचं नाहीये. तर मला नोकराचाकराला दिली जाणारी कामं, असं सूचित करायचंय…) शस्त्रक्रियेचा मुख्य भाग सोडून कुठं मलमपट्टीच कर तर कुठं प्लॅस्टर ऑफ पॅरिसच लावत बस, अशी कामं माझ्यावर सोपवली जात.

@@@@@

ही कहाणी मलाशयात जॅमची बाटली जाऊन बसलेल्या एका रुग्णाची (अर्थात ती बाटली रेक्सची होती का किसानची, ते आता मात्र आठवत नाही) ! शौचाला झालं की त्याच्या गुदद्वारातून जवळजवळ सगळा मलाशय बाहेर यायचा. मग तो जॅमच्या बाटलीच्या बुडावर बसायचा आणि हळूहळू सगळा मलाशय आत ढकलायचा. एकदा असाच प्रकार सुरू असताना ती जॅमची बाटलीच आत गेली होती आणि पेशंटला माझ्याकडे यावं लागलं होतं. त्याला तातडीनं ऑपरेशन टेबलवर घेण्यात आलं. आमच्यापुढे प्रश्न एवढाच होता, त्याच्या गुदद्वारातून ती बाटली ओढून काढायची का, त्याचे पोट उघडून तेथून ती बाहेर काढायची ? अवघड आणि कठीण प्रसूतीच्या वेळी वापरले जाणारे ऑब्रस्टेरिक फोरसेप्स लावून ती बाटली बाहेर ओढून काढावी, अशी एक सूचना पुढे आली होती. पण तसं करताना बाटली आतल्या आत फुटली तर किती भयंकर त्रास होईल, या कल्पनेनं तो विचार सोडून देण्यात आला… आता काय करावं, असा आमचा विचार चालू असताना थिएटर अटेण्डण्ट पुढं आला. सुदैवानं त्या बाटलीचं तोंड गुदद्वाराच्या बाजूनं उघडं होतं. तेव्हा प्लॅस्टर ऑफ पॅरीसमध्ये भिजवलेल्या बॅण्डेजेसनी ती बाटली आपण पूर्णपणे भरून टाकू या, असं त्यानं सुचवलं, प्लॅस्टर ऑफ पॅरीस वाळून कडक झालं की बाटली सहज चिमट्यानं खाली ओढता येईल, असा त्याचा दावा होता. आम्ही अगदी त्याच्या म्हणण्याप्रमाणेच कृती केली आणि गुदद्वाराला कोणतीही इजा न होऊ देता वा त्याचं पोटही न फाडता ती बाटली बाहेर काढली. त्या थिएटर अटेण्डण्टचा तीस वर्षांचा अनुभव आमच्या उपयोगी पडला होता… केवळ ‘पुस्तकी’ शिक्षणानं मिळविलेल्या ज्ञानापेक्षा रोजच्या व्यवहारातील अनुभव किती महत्त्वाचा असतो, तेच आम्हाला या प्रसंगातून शिकायला मिळालं होतं. अनुभवी थिएटर अटेण्डण्टकडून प्रत्येक सर्जननं आपल्या प्रशिक्षणाच्या काळात अनेक बाबी ज्ञात करून घेतलेल्या असतात !

@@@@@

डॉक्टरी पेशात बरीच वर्षं काढली की, आजाऱ्यांचे रोग आणि त्यांची विद्रूप रूपं यांचं त्यांना काहीच वाटेनासं होतं. तरीही माझ्या आठवणीतले दोन प्रसंग अद्याप माझ्या अंगावर शहारे आणतात. माझी स्मृती जर मला दगा देत नसेल, तर त्यापैकी एक प्रसंग १९६२ मधील आहे. पुण्याजवळ ‘अलितालिया’ कंपनीचं एक विमान कोसळलं होतं. मी तेव्हा वैद्यकीय महाविद्यालयात शिकत होतो. या अपघातातले मृतदेह तेव्हा कुजलेल्या अवस्थेत इस्पितळात आणले जात होते. छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांचं ते दर्शन अगदी उबग आणणारं होतं. कुणाचं शीरच धडापासून वेगळं झालेलं, तर कुणाचे हातपायच तुटलेले… अर्धवट अवस्थेतले ते मृतदेह ओळखण्याचं अत्यंत करुण काम त्या दुर्दैवी जिवांच्या नातेवाइकांवर येऊन पडलं होतं… ते दृश्य मी अजूनही विसरू शकलेलो नाही.

दुसरा प्रसंग. पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एक महिला खाली कोसळली होती. ती चाळीत रहात होती. चाळीचा नळ हा दुर्दैवानं बरोबर तिच्या गॅलरीच्या खालीच होता आणि ती कोसळलीही होती, त्या नळावरच. तो नळ तिच्या गुदद्वारातून आत घुसून थेट पोटापर्यंत शिरला होता… आणि तो बाहेर काढणं कठीण झाल्यानं पाण्याचा पाईप कापून तशाच अवस्थेत तिला इस्पितळात आणलं गेलं होतं. तिच्या पोटावर शस्त्रक्रिया करून तो पाईप आणि नळ बाहेर काढण्यात आला. सुदैवानं या सर्व प्रकारात तिच्या गुदद्वारालाच जखम झाली होती. त्यामुळे ती वाचू शकली.

एक डॉक्टर म्हणून वीस वर्षांच्या काळात मला भेटलेली असंख्य माणसं आणि आलेले नानाविध अनुभव यांचे हे काही नमुने… माझ्या या व्यवसायामुळं कधी ना कधी मला नैराश्य जरूर आलं असेल, पण त्यावर सहजासहजी मात करता येतील असे सुखद क्षणही याच व्यवसायानं मला अनेकदा मिळवून दिले आहेत.

समाप्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}