सम – विषम भाग २ मकरंद कापरे ,पुणे ४११०४१
सम – विषम
भाग २
गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तुळजा भवानी माता, अक्कलकोट आणि महालक्ष्मी दर्शन केल्यावर श्रेयस आणि कुटुंब सुखावले होते.
सकाळी रेखा प्रवासाचा शिण विसरून नवीन उत्साहाने कामाला लागली. “श्रेयस, चल आवर लवकर, छान पोहे केलेत बघ” श्रेयस ला हाक मारून रेखा परत तिच्या कामात व्यस्त झाली. आंघोळ करून श्रेयस पण आला आणि आईही सकाळचे चालणे करून घरी पोहचल्या. “आई, पोहे केलेत, खाऊन घ्या आमच्या बरोबर, मग आवरा बाकीचे” रेखा डिश टेबलवर ठेवत म्हणाली. “हो, आलेच, हात धुवून”. रेखाच्या हाताला चव होती, तिने केलेला प्रत्येक पदार्थ म्हणजे खाणाऱ्यासाठी मेजवानीच.
“श्रेयस, हे घे तुझ्या आवडीचे पोहे आणि वरती ओल्या नारळाचा कीस”. ” वा, वा क्या बात है… झकास” श्रेयस डिश मधून एक चमचा पोहे तोंडात टाकत म्हणाला. “छान झाली आपली ट्रीप, दोन्ही देवींचे ओटी भरून मन प्रसन्न झाले” आई म्हणाली.
“हो, ना, मला तर स्वामींचे दर्शन घेताना खूपच रडू येत होते”, रेखा म्हणाली. ” खूप प्रसन्न वाटले मला पण, स्वामी माझ्या कडे पाहून स्मित हास्य करत आहेत, असेच वाटत होते मला” श्रेयस म्हणाला.
” तुझा, फोन वाजतोय श्रेयस” रेखा म्हणाली. श्रेयस बेडरूम मध्ये जाऊन मोबाईल घेतो. “बोल ना, ओके.. अच्छा… कुठे आहे त्यांचे प्रोडक्शन… ओके… हो… चालेल” आणि त्याने फोन ठेवला. “कुणाचा होता रे… ” आई ने विचारले. “अशोक चा होता…त्याच्या ओळखीत एके ठिकाणी जॉब आहे…विचारत होता कधी भेटता येईल.” “अरे वा, मग ये भेटून, कोणती कंपनी आहे?” रेखाने विचारले, “वेरॉन स्टील म्हणून आहे, तळेगांव ला” श्रेयस म्हणाला. “आजच बघतो जाता आले तर”
आणि अशोक च्या प्रयत्नाने त्याच दिवशी ४ वाजता इंटरव्ह्यू झाला. संध्याकाळी चहा घेताना रेखाने विचारले,”कसा झाला इंटरव्ह्यू?” “छान झाला, ” श्रेयस म्हणाला. “काय विचारले?” रेखा म्हणाली,” हेच, आधीचा जॉब का सोडला, वगैरे नेहमीचे प्रश्न”.
“बर..बर.. कधी सांगतो म्हणाले?” “एम. डी सध्या बाहेर आहेत, पुढच्या आठवड्यात परत बोलावतील…” श्रेयस म्हणाला.
श्रेयस, त्याचा सकाळच्या वेळात १० वाजेपर्यंत पी वाय सी जिमखाना येथे टेनिस कोच म्हणून काम करत होता. त्याची टेनिस ची आवड आणि त्याने मिळविलेले विविध स्पर्धांचे जेतेपद त्याला या कामी उपयोगी पडले. त्यात त्याचा महिन्याचा खर्च भागत होता, आणि आधीचे बचत केलेले पैसे सध्या कामी येत होते.
पुढच्या आठवड्यात वेरॉन कंपनीकडून परत बोलावणे आले इंटरव्ह्यू साठी. दुपारी चार वाजता वेळेवर श्रेयस कंपनीत पोचला, क्रीम कलर चा फुल स्लिव शर्ट आणि ब्राऊन कलरची पँट, कोरलेली दाढी, रे बान गॉगल घातलेला सहा फूट दणकट बांध्याचा श्रेयस पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेत होता. रिसेप्शन वर अपॉइंटमेंट बद्दल सांगितल्या वर “हो, सर आलेले आहेत, बसा ना, मी त्यांना सांगते”
श्रेयस, समोरच्या सोफ्यावर बसला, दहा मिनिटांनी त्याला बोलावणे आले,”मिस्टर श्रेयस, तुम्हाला बोलावले आहे सरांनी, या माझ्याबरोबर” पहिल्या मजल्यावर, तिने दाखवलेल्या केबिन मध्ये, दरवाजावर टक टक करून त्याने दार उघडले, “सर, मी श्रेयस भारद्वाज” “प्लीज, या, बसा” समोरच्या खुर्ची कडे हात करून, वेरॉन कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष दिनकर पोटे म्हणाले.
“धन्यवाद सर” श्रेयस खुर्चीत बसत म्हणाला. “काय घेणार तुम्ही, चहा की कॉफी” पोटे साहेब म्हणाले. “नाही सर, मला काही नको,” श्रेयस म्हणाला. “अरे, असे कसे, चहाची वेळ झाली आहे, मग चहा नको” टेबलावरची बेल वाजवून त्यांनी शिपायाला बोलावले,”चंदू, चहा आणि बिस्कीट घेऊन ये ” “कुठून आलात तुम्ही?” “चांदणी चौक” श्रेयस म्हणाला. “बाप रे, जाम ट्रॅफिक असते तिकडून यायचे म्हणजे” पोटे, चष्मा पुसत म्हणाले. “हो, ना, खूपच” तेव्हड्यात चहा आला, “घ्या चहा, आता निवांत बोलू या, मला पण मीटिंग नाही कुठली” पोटे चहा चा फुर करत घोट घेत म्हणाले. “कोण असते तुमच्या घरी” पोटे साहेब म्हणाले. “मी, आई आणि माझी पत्नी” श्रेयस, “ओके, छान, तुमचे शिक्षण आणि आतापर्यंत च्या करिअर बद्दल पण सांगा, मी तुमचा इंटरव्ह्यू मराठीतच घेईन बर का, कारण माझे इंग्रजी थातुर मातुर आहे,” पोटे साहेब हसत म्हणाले.
“माझा जन्म जयपुरचा आहे सर, वडील लेफ्टनंट कर्नल होते, माझ्या जन्माच्या वेळी त्यांची पोस्टिंग जयपूर ला होती, माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी आम्ही पुण्यात आलो, आणि माझे नंतरचे एम ई पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. मी माझ्या २३ व्या वर्षी म्हणजे २०१५ ला एम ई मेटॉलर्जी COEP तून पूर्ण केले, आणि बरोबरच GRE आणि TOEFL पण पूर्ण केले. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये माझे सेलेक्शन USA च्या Victor स्टील मध्ये झाले, तिथे मी ३ वर्षे पूर्ण केली पण पुढे काही कारणाने विसा एक्स्टेंड झाला नाही, आणि माझे लग्न पण ठरले होते, त्यामुळे मी सप्टेंबर २०१९ ला पुण्यात आलो. २०१९ ते डिसेंबर २०२३ मी वलसाड ला होतो…,” “तुमचे करिअरची सुरवात अमेरिकेत झाली, वा.. अमेरिकेच्या आणि आपल्या वर्किंग मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला” पोटे साहेबांनी त्याला मध्येच थांबवत विचारले. “तिथे, नोर्मस आणि प्रोसिजर खूप कडकपणे पाळले जाते, पर्यावरणाला खूप महत्त्व आहे…” “हे मात्र खरे आहे, तुम्ही वलसाड चा जॉब का सोडला” पोटे साहेबांनी विचारले. “प्रदूषण खूप आहे सर तिकडे, त्यामुळे आईला त्रास होत होता, आणि मला पण थोडा ब्रेक घ्यायचा होता, त्यामुळे मी पण या सहा महिन्यात कुठे नोकरीसाठी अर्ज केला नाही”
“ओके, ब्रेक नंतर कुठे नोकरी मिळाली नाही तर, असा प्रश्न नाही पडला का?” पोटे म्हणाले.
“नाही, जॉब खूप आहेत सर, आणि काम करणाऱ्याला कधी रिकामे राहावे लागत नाही. “तुम्ही एक काम करता का, आमची शॉप फ्लोअर पाहून या ना, मग परत बोलू आपण” आणि पोटेनी इंटर कॉम वर कुणाला तरी बोलावले,”शहाजी, हे श्रेयस भारद्वाज, यांना आपली शॉप फ्लोअर दाखवून आणा ..” आणि श्रेयस त्यांच्याबरोबर शॉप फ्लोअर पाहायला गेला.