मंथन (विचार)मनोरंजन

जिव्हाळा

जिव्हाळा

आईला ऑपरेशनसाठी आत नेलं, तसा प्रसन्न बाहेर रिसेप्शन काउंटर जवळच्या सोफ्यावर येऊन बसला. विशाखा सासूबाईंची फाईल घऊन तिथेच बसली होती.
आज पहाटे साडेपाचला आई बाथरुमला जायला म्हणून उठली आणि चादरीत पाय अडकून पडली. कमरेचं हाड मोडलं होतं. प्रसन्न आणि विशाखा तिला घेऊन करूणा आर्थोपेडिक हाॅस्पिटलमध्ये घेऊन आले. एक्स-रे बघून ऑपरेशन शिवाय गत्यंतर नाही असं डाॅक्टर म्हणाले, तेही लगेच करायला हवं होतं. सुदैवाने आईला इतर काही व्याधी नसल्याने बाकी रिपोर्ट्स चांगले आले आणि आता नऊ वाजता ऑपरेशन सुरू झालं होतं. या सगळ्या गोंधळात दोघांना चहा घ्यायला देखील सवड मिळाली नव्हती.
हाॅस्पिटलच्या कँटिनचा मुलगा चहा घेऊन आला, तसं प्रसन्न आणि विशाखा, दोघांनी चहा घेतला. चहा पिऊन प्रसन्नाने त्याच्या बाॅसला फोन करून आज ऑफिसला येऊ शकत नसल्याचं कळवलं. विशाखानं तीन दिवस रजाच टाकलेली होती. उद्या तिच्या भावाच्या मुलीचं लग्न होतं, बोरीवलीला. आज घरातलं आवरून दुपारी ती आणि सई, तिची लेक, तिच्या माहेरी मालाडला जाणार होत्या. आणि आज सकाळी हे सगळं झालं होतं. तिनं ठाण्यातच राहणाऱ्या तिच्या मोठ्या जाऊबाईंना फोन लावला. सासूबाईंबद्दल कळवलं. ती पुढे काही बोलायच्या आधीच त्या म्हणाल्या, ‘अरे देवा! अग आम्ही आलो असतो ग, पण काल घरी येताना हे पावसात भिजले ना, त्यांना रात्री थंडी वाजून ताप भरलाय. रात्री १०३ होता, अजूनही पूर्ण उतरलेला नाही. बघते दुपारी उतरला ताप तर संध्याकाळी मी येऊन जाईन’. यांच्या तब्येतीच्या तक्रारी म्हणजे गोड बोलून नाही म्हणणं आहे. इकडे तिकडे भटकताना बरे टुणटुणीत असतात. कायम कुठल्या न कुठल्या टूरवर जात असतात आठ-पंधरा दिवस!’ विशाखा मनात म्हणाली.
‘अहो, राजू भावजींना फोन करायला हवा ना’ ? तिनं प्रसन्नला विचारलं. राजू म्हणजे प्रसन्नचा दोन नंबरचा भाऊ! प्रसन्न सगळ्यात धाकटा.’ करू सावकाश ऑपरेशन झाल्यावर! तो आणि त्याची बायको काही इथे यायचे नाहीत. नुसत्या उंटावरून शेळ्या हाकतील. शंभर चौकश्या करतील. असं कसं झालं? तुम्ही काळजी घ्यायला हवी होती. यांव करा, नी त्यांव ! तू आणि सई ठरल्याप्रमाणे जा बोरीवलीला, मी करतो मॅनेज इथे. तसंही पेशंटचं जेवणखाण इथेच मिळणार आहे. ‘
‘अहो, तुम्ही एकटे कसं कराल? मी आज काही जात नाही. उद्याचं उद्या बघू. आईंना असं ठेवून जाऊन माझं काही तिथे लक्ष लागणार नाही. मीराताईंना विचारायचं का? पण नकोच, त्यांच्या घरी आधीच एवढं खटलं आहे. तरी त्या बिचार्‍या येतात धावून मदतीला!’ मीरा प्रसन्नची बहिण, लांबच्या नात्यातली. ती मुलुंडला राहायला होती. तिच्या घरी तिचे सासू-सासरे दोघंही ऐंशीच्या पुढचे. त्यामुळे विशाखाला तिची मदत मागायला संकोच वाटायचा.
असाच थोडा वेळ गेला आणि ऑपरेशन थिएटरमधून त्यांना बोलावणं आलं. ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचं सांगून डाॅक्टर गेले.पाच-सहा दिवस तरी आईला हाॅस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. तिला सेमी डिलक्स रूममध्ये हलवण्यात आलं. एका रूममध्ये दोन पेशंट असणार होते. आईला रूममध्ये ठेवून वाॅर्डबाॅय बाहेर गेल्यावर प्रसन्न आणि विशाखा आत गेले. आई अजून जरा गुंगीतच होती. रूम तशी बऱ्यापैकी मोठी होती. बाजूच्या काॅटवर एक साधारण साठीच्या बाई झोपल्या होत्या. त्यांच्याही पायाचंऑपरेशन झालेलं दिसत होतं. त्यांच्या बाजूला बहुतेक त्यांचा नातू बसलेला होता. पण तो आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. त्याने फक्त कोण आहे ते बघण्यासाठी एकदा मान वर करून बाजूला बघितलं आणि पुन्हा मोबाईलकडे नजर वळवली.
सईचा फोन आला होता, मी येऊ का आजीजवळ बसायला? उद्या लग्नाला कसं जायचं आपण, या विचाराने थोडी नाराजही झाली होती ती! पण विशाखानं तिला घरीच थांब म्हटलं. कामवाली यायची होती. शिवाय कुकर लावून, बाहेरून पोळी-भाजी आणून /मागवून ठेवायलाही सांगितलं. मग तिनं प्रसन्नला घरी पाठवलं. तो स्वतःचं आवरून आणि जेवून आला की विशाखा घरी जाणार होती.
विशाखा सासूबाईंच्या काॅटजवळ येऊन बसली आणि तिचा फोन वाजला. ‘ जिव्हाळा’ च्या कुलकर्णी काकू बोलत होत्या. ‘अग, सुधाताईंचं ‘ सुप्रभात ‘, आलं नाही ग्रुपवर सकाळी, म्हणून मी फोन केला, तर तो पण उचलला नाही त्यांनी. म्हणून मी आणि सानेबाई तुमच्या घरी गेलो. सईकडून हा सगळा प्रकार कळला. झालं का सुधाताईंचं ऑपरेशन?’
‘हो, काकू ऑपरेशन झालं व्यवस्थित. अजून एक-दीड तासानी त्या शुद्धीवर येतील, म्हणाले डॉक्टर. ‘
‘ बरं, तुला आज बोरिवलीला जायचंय ना भाचीच्या लग्नासाठी?ते तू ठरल्याप्रमाणे जा. सई बोलली मला, मग ग्रुपवर कळवलं मी! आम्ही सगळी जबाबदारी वाटून घेतली आहे दोन दिवसांसाठी. रात्री माटेवहिनी येणार आहेत सुधाताईंजवळ झोपायला. त्यांना सकाळचा चहा नाश्ता आमची सुरभी देईल, ऑफिसला जाता जाता! मग काळेबाई, निशा, देशपांडे काकू आणि मी उद्याचा दिवसभर आळीपाळीने थांबू. रात्री सरोजाताई येतील झोपायला. त्यामुळे प्रसन्नलाही लग्न अटेंड करता येईल उद्या. बाकी काही मदत लागली तर शहाणे, कुलकर्णी वगैरे पुरूष मंडळी आहेतच. ‘ असं म्हणून काकूंनी फोन ठेवला सुद्धा!
‘ जिव्हाळा ‘, हा खरं तर सासऱ्यांच्या पेंशनर्स मित्रांचा ग्रुप. ठाण्यात राहणाऱ्या या पंधरा जणांनी हा ‘ जिव्हाळा ‘, ग्रुप बनवला होता. या ग्रुपपैकी कोणाच्याही घरी काही अडचण असेल तर, बाकीचे जाऊन शक्य ती सगळी मदत करायचे. मग ती मदत आर्थिक असो, सोबत करण्याची असो की इतर काही. कोणाची मुलं परदेशी, कोणाची असून नसल्यासारखी. तर कोणी एकेकटेच.शिवाय नोकरी व्यवसायामुळेही मुलं-सुना दिवसभर बाहेर असायची. वेळ – प्रसंग काही सांगून येत नाही. पण अडचणीवर मात करण्यासाठी या सगळ्यांनी हा सोपा मार्ग शोधला होता. विशाखाचे सासरे गेले तेव्हा या मदतीचा अनुभव त्यांनी घेतला होता.सासऱ्यांनंतर सासूबाई आता या ग्रुपवर होत्या. प्रत्येकाने सकाळी ‘सुप्रभात’, चा मेसेज टाकला म्हणजे, ‘ All is well’, समजायचं. इतर वेळी फोन, मेसेज करायचाच गरज असेल तर. त्यानंतर विशाखा, प्रसन्न आणि इतर काही जणांची मुलं-सुनादेखील या ग्रुपला मदत करण्यात सामील होऊ लागले होते.
विशाखाला अगदी भरून आलं होतं. इथे रक्ताच्या नात्याची माणसं सबबी सांगत होती आणि ही जिव्हाळ्यानं जोडलेली माणसं मात्र खंबीरपणे पाठिशी उभी राहिली होती. आता ती निश्चिंत मनाने भाचीच्या लग्नाला जाऊ शकणार होती.

कोणत्याही ग्रूपवर आपल्यासोबत असे “जिव्हाळा” ग्रुप करून अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ !🙏🏻🤝🌹

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}