डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा ————– आचार्य देवो नमः – डॉ. वाय. जी. भोजराज
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
आचार्य देवो नमः
– डॉ. वाय. जी. भोजराज
———————————
पाच दशकांच्या माझ्या वैद्यकीय कारकिर्दीत १९४० ते ४७ हा काळ अगदी रोमहर्षक होता. दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याची पडझडही दृष्टोत्पत्तीस येऊ लागली होती. स्वातंत्र्यसूर्य केव्हा उगवतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते… देशातील सारे राजकीय वातावरण चैतन्यानं फुलून गेलेलं होतं. आमचं जी. एस. मेडिकल कॉलेजही त्यास अपवाद ठरणं शक्यच नव्हतं.
मी या कॉलेजात प्रवेश घेतला तेव्हा डॉ. जीवराज मेहता तिथं डीन होते. जी. एस. मेडिकल कॉलेज आणि के. इ. एम्. इस्पितळ या दोन संस्था म्हणजे जणू काही जुळी भावंडंच. डॉ. मेहता हे अगदी खऱ्या अर्थानं त्यांचे पितामह शोभले असते. फिजिशियन म्हणून तर डॉ. मेहता ख्यातनाम होतेच. पण इंग्लंडहून परतल्यावर त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेऊन लक्षणीय स्वरूपाची कामगिरी केली. काँग्रेसमध्येही त्यांचं स्थान मोठं होतं. पुढे महात्मा गांधींचे वैयक्तिक डॉक्टर म्हणूनही त्यांनी बरीच वर्षं काम केलं.
त्या काळात सरकारी वैद्यकीय संस्थांमध्ये भारतीय डॉक्टरांवर किती अन्याय होतो, ते डॉक्टर मेहता यांच्या लक्षात आलं होतं. अत्यंत कुशल आणि बुद्धिमान भारतीय डॉक्टरांना सुमार दर्जाच्या ब्रिटिश डॉक्टरांच्या हाताखाली काम करावं लागे. त्यामुळे या दोन संस्थांचे डीन म्हणून नियुक्ती होताच त्यांनी नेटानं काम करायला सुरवात केली. केवळ प्रख्यात असे भारतीय डॉक्टरच या दोन संस्थांमध्ये काम करीत असावेत, या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले होते. वैद्यकीय महाविद्यालय आणि एक मोठं इस्पितळ आम्ही ब्रिटिशांपेक्षा अधिक उत्तम रीतीनं चालवू शकतो, हे डॉ. मेहता यांना साऱ्या जगाला दाखवून द्यायचं होतं. के. इ. एम्. इस्पितळात आपापल्या क्षेत्रातील मान्यवर डॉक्टर मंडळींना ‘मानद’ (ऑनररी) तत्त्वावर बोलविण्याची प्रथाही डॉ. मेहता यांनीच सुरू केली. बाहेर खोऱ्यानं पैसा ओढणारे हे अग्रगण्य डॉक्टर अवघे १०० रुपये घेऊन तिथं ८-८ तास काम करीत. केवळ वैद्यकीय सेवाच नव्हे तर जी. एस. मेडिकल कॉलेजातील विद्यार्थ्यांना शिकवणं आणि संशोधन करणं यामध्येही ही डॉक्टर मंडळी रस घेत. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांना मी के. इ. एम्. मध्ये याच काळात बघितलं. पुढं १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्याबद्दल डॉ. मेहता यांना अटक झाली आणि त्यांनी डीन म्हणून निवृत्ती स्वीकारली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणात सहभागी झाले आणि पुढे गुजरातचे मुख्यमंत्रीही बनले. पण या दोन संस्थांवरचं त्यांचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. डॉ. मेहता यांच्याबद्दलच्याच या काही आठवणी.
@@@@@
ते स्वातंत्र्यापूर्वीचे दिवस होते. दुसरं महायुद्ध सुरू झालेलं होतं आणि मुंबईत इंग्रजविरोधी निदर्शनांचा जोर वाढला होता. अशीच निदर्शनं सुरू असताना, लोकांनी जी. एस. मेडिकलच्या समोरच पोलिसांची एक गाडी पेटवून दिली आणि दगडफेकही सुरू केली. तातडीनं तिथं लष्कराचे जवान अवतीर्ण झाले आणि त्यांनी आमच्या इमारतीचा आसरा घेऊन अडथळे उभारावयास प्रारंभ केला. हे कळताच डॉ. मेहता तातडीनं बाहेर आले. लष्कराच्या त्या तुकडीच्या प्रमुखास त्यांनी बोलावून घेतलं आणि आपल्या परवानगीशिवाय इस्पितळात प्रवेश केल्याबद्दल त्यांची अगदी कडक शब्दांत कानउघाडणी केली. आपापली शस्त्रं गोळा करून अन् खाली मान घालून ते सारे जवान इस्पितळाच्या आवारातून लगेच निघून गेले. आमच्या डीनबद्दल वाटणाऱ्या अभिमानानं त्या दिवशी माझा ऊर भरून आला होता.
त्यानंतरच्या काही दिवसांतलीच ही आणखी एक घटना. इंग्रज सैनिकांनी केलेल्या गोळीबारात मांडीत गोळी शिरून घायाळ झालेला एक युवक के. इ. एम्. इस्पितळासमोरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. इस्पितळापासून हाकेच्या
अंतरावर असलेल्या कामगार मैदानावर तर तुफानी गोळीबार सुरू होता.
कॉलेजमधील एका विद्यार्थ्यानं त्या युवकास इस्पितळात आणलं. डॉ. मेहता तेव्हा आपल्या कार्यालयात बसले होते. ते लगेच उठून बाहेर आले आणि त्यांनी सैनिकांना गोळीबार बंद करायला सांगितलं. तिथून चालतच ते कामगार मैदानावर गेले. तेथील सैनिकांच्या प्रमुखास आपल्याबरोबर घेऊन ते इस्पितळाच्या ‘कॅज्युअल्टी’ विभागात आले. रक्तबंबाळ अवस्थेतील त्या युवकाकडे अंगुलिनिर्देश करून त्यांनी सवाल केलाः तुम्ही कोणतंही तारतम्य न दाखवता केलेल्या गोळीबारात या अशा रीतीनं जखमी झालेल्यांवर उपचार कोण करणार? किमान त्यांना इस्पितळात आणून सोडण्याची तरी तुमची जबाबदारी नाही काय ? त्या अधिकाऱ्यानं अगदी गुळमुळीतपणानंच ती जबाबदारी स्वीकारली. जी. एस. मेडिकल कॉलेजच्या एका विद्यार्थ्यानं गोळीबार चालू असतानाही, स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्या जखमी युवकास इस्पितळात कसं आणलं, तेही डॉ. मेहतांनी त्या अधिकाऱ्यास ऐकवलं. संध्याकाळी त्यांनी लष्कराच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी केली… आणि इस्पितळाच्या वतीनं एक डॉक्टर आणि काही विद्यार्थी यांच्यासह एक रुग्णवाहिका त्यांना देऊ केली. त्या निवडक विद्यार्थ्यांमध्ये माझा समावेश होता… स्वातंत्र्य आंदोलनात जखमी झालेल्या अनेकांचे प्राण नंतर आमच्या या रुग्णवाहिकेमुळे वाचू शकले होते.
@@@@@
मुंबईतील शल्यक्रियाविशारदांच्या क्षेत्रात जवळजवळ दहा वर्ष जी. एम्. फडके, ए. व्ही. बालिगा आणि शांतीलाल मेहता ही मंडळी सम्राटपदावर होती. माझे या तिन्ही दिग्गजांशी अगदी वैयक्तिक स्वरूपाचे संबंध होते. त्यामुळेच अत्यंत रोमहर्षक असे शस्त्रक्रियेसंबंधातील त्यांचे पराक्रम मला अगदी जवळून बघायला मिळाले.
आपल्या रुग्णांबद्दल अत्यंत आपुलकी आणि जिव्हाळा असलेले फडके हे अत्यंत सहृदय डॉक्टर होते. शस्त्रक्रियेच्या अनेक नवनवीन पद्धती त्यांनीच के. इ. एम्. इस्पितळात सुरू केल्या. वंध्यत्व असलेल्या पुरुषांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्यात पुन्हा प्रजननशक्ती निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयोग हे संपूर्ण देशात अगदी मूलगामी स्वरूपाचे ठरतील, असेच होते. यासंबंधातील शस्त्रक्रियेचं त्यांचं तंत्र बघावयास मिळावे म्हणून संपूर्ण देशातून अनेक अग्रगण्य शल्यक्रियाविशारद मुंबईला येत.
वंध्यत्व असलेल्या आपल्या एका रुग्णास बरेच वर्षांच्या वैद्यकीय उपचारानंतर आता पितृत्व मिळत असल्याची बातमी डॉ. फडके यांना समजली तेव्हा मी त्यांच्याबरोबरच होतो. डॉ. फडके यांनी त्या रुग्णावर केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली होती, हे सुखद वृत्त कानावर येताच त्यांचे डोळे आनंदाने लुकलुकले आणि मला ती बातमी सांगताना तर त्यांचा आवाज भरून आला होता. आपल्या बहुतेक सर्व पेशंटना, डॉ. फडके त्यांच्या पहिल्या नावाने ओळखायचे आणि त्यांना अगदी प्रेमाची वागणूक द्यायचे. रोग्यांची सुख-दुःखं, त्यांच्या आयुष्यातले दुर्दैवी प्रसंग या साऱ्यांशी ते अगदी एकरूपच होऊन जायचे. आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी कुटुंब नियोजनाच्या कामाला पूर्णपणे वाहून घेतलं होतं.
डॉ. फडके यांच्या दृष्टीने, त्यांच्या खाजगी शुश्रुषागृहातील रुग्णाइतकाच के. इ. एम्. इस्पितळातील पेशंटही महत्त्वाचा असायचा. एकदा पोटाचा कर्करोग असलेल्या एका रुग्णावर ते के. इ. एम्. इस्पितळात शस्त्रक्रिया करणार होते. बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून मी त्यांना साहाय्य करणार होतो. सकाळी आठ वाजता इस्पितळात हजर राहा, असा त्यांचा मला आदेश होता. डॉ. फडके यांची ख्याती अशी होती की, कोणत्याही ठिकाणी ते ठरलेल्या वेळेच्या १५ मिनिटं आधीचं उपस्थित राहात. इतरांनीही त्याप्रमाणेच वागावं, अशी त्यांची अपेक्षा असायची. योगायोगानं ते आणि मी बरोबरच ऑपरेशन थिएटरमध्ये शिरलो. तेवढ्यात इस्पितळाचा ‘हाऊस सर्जन’ धावतपळत आला आणि रक्त उपलब्ध नसल्यानं शस्त्रक्रिया पुढं ढकलावी लागेल, असं सांगू लागला. डॉ. फडके यांचा प्रचंड संताप झाला. पण थोड्याच वेळात ते शांत झाले. मी गाडीचा ड्रायव्हर घेऊन आलो आहे काय, अशा त्यांच्या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर मिळताच त्यांनी मला सांगितलं : तुमच्या ड्रायव्हरला तातडीनं माझ्या घरी पाठवा आणि मनूला इथं बोलावून घ्या. तिचा आणि या पेशंटचा रक्तगट एकच आहे…
मनू म्हणजे डॉ. फडके यांच्या पत्नी मनुताई. त्याही तातडीनं इस्पितळात आल्या आणि के. इ. एम्. मधील त्या गरीब रुग्णाला त्यांनी अगदी आनंदानं आपलं रक्त दिलं. शस्त्रक्रिया पार पडली. या घटनेचा आणि विशेषतः फडके दांपत्याच्या वर्तणुकीचा माझ्या मनावर अगदी खोलवर परिणाम झाला आहे.
डॉ. फडके यांच्या संबंधातील आणखी एक प्रसंग… मी मूळचा नागपूरचा आणि तिथलेच माझे एक मित्र मुंबईत एका अमेरिकन कंपनीत काम करीत होते. समजा, त्यांचं नाव सबनीस. दुर्दैवानं कंपनी बंद पडली आणि सबनीस बेकार झाले. कुटुंबाच्या उदारनिर्वाहासाठी त्यांच्या पत्नीला आता नोकरी शोधणं भाग होतं. पण त्यापूर्वी तिला महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करणं आवश्यक होतं. तिनं महाविद्यालयात प्रवेश मिळविला. एके दिवशी महाविद्यालयाच्या रस्त्यावर असताना, तिला खूपच अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून जवळच असलेल्या आपल्या फॅमिली डॉक्टरकडे ती गेली. हा फॅमिली डॉक्टर ‘आर’ देखील माझा मित्रच होता. नागपूरच्या त्या मित्राची या डॉक्टरशी मीच गाठ घालून दिली होती. डॉक्टर’ आर ‘नं तिच्या दंडावर एक इंजक्शन दिलं आणि घरी पाठवलं. पण घरी पोहोचेपर्यंत तिच्या दंडातून जोरदार कळा यायला लागल्या होत्या आणि तिला यातना अगदी सहन होत नव्हत्या. साहजिकच माझ्या मित्रानं मला पाचारण केलं. मी तातडीनं त्याच्या घरी गेलो. तोपर्यंत त्याच्या पत्नीच्या हातावर भाजल्यावर उठतात, तसे मोठेमोठे फोड आले होते. तिला चुकून भलतंच इंजक्शन दिलं गेलं होतं यात शंकाच नव्हती. मी डॉ. ‘आर ‘कडे वारंवार विचारणा करूनही आपण व्हिटॅमिन बी १२ चंच इंजक्शन दिल्यांच तो सांगू लागला… माझ्या मित्राच्या पत्नीच्या वेदना वाढू लागल्या. मी तिला आलेल्या फोडांवर थोडीफार मलमपट्टी करून बँडेज बांधलं… पण रात्रीपर्यंत तिचं दुखणं अधिकच बळावलं आणि मी तिला घेऊन डॉ. फडके यांच्याकडे आलो.
तिला डॉ. फडके यांच्या खाजगी शुश्रुषागृहात दाखल करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी भल्या सकाळीच डॉ. फडके तिथं येऊन हजर झाले. आम्ही तिच्या दंडावरचं बँडेज उघडलं, तो काय? तिथली कातडी, मांस आणि स्नायू पूर्णपणे कुजून गेले होते आणि ५ ते ६ इंचांचा भाग उघडा होऊन दंडाचं हाड अगदी स्पष्ट दिसत होतं… मांस जळून जाऊ शकेल, अशा प्रकारचं काहीतरी भलतंच द्रावण तिच्या दंडात टोचण्यात आलं होतं, याबद्दल शंका घ्यायलाच जागा नव्हती. संपूर्ण प्रकरणानं अगदी गंभीर वळण घेतलं होतं. संपूर्ण वैद्यकीय पेशालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे होत असलेल्या वेदना डॉ. फडके यांच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसत होत्या. डॉ. ‘आर’ यांना तातडीनं बोलावून घ्या, असं त्यांनी मला सांगितलं आणि स्वतः डॉ. चार्लस पिंटो यांना फोन लावला. डॉ. पिंटो हे फडक्यांचे विद्यार्थी होते आणि के. ई. एम्. इस्पितळाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख म्हणून ते त्या वेळी काम करीत होते.
डॉ. ‘आर’ इस्पितळात येताच, डॉ. फडके यांनी त्यांना बाजूला घेतलं आणि अत्यंत कडक शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. त्या दुर्दैवी महिलेच्या औषधांवर होणारा संपूर्ण खर्च तुम्हालाच द्यावा लागेल, असंही डॉ. फडके यांनी त्यांना बजावलं. झाल्या प्रकाराचा इतका तीव्र धक्का डॉ. ‘आर’ यांना बसला होता की, त्यांनी फडके यांचं हे म्हणणं लगेच मान्य केलं. डॉ. फडके यांनी श्रीमती सबनीस यांच्याकडून एक पैसाही घेतला नाही, शिवाय आपल्याच एका व्यवसायबंधूमुळे श्रीमती सबनीस यांच्यावर ही आपत्ती आल्याचं निदर्शनास आणून देऊन डॉ. पिंटो यांच्याही सेवा त्यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिल्या.
श्रीमती सबनीस चार महिन्यांहून अधिक काळ डॉ. फडके यांच्या शुश्रुषागृहात होत्या, त्या संपूर्ण काळात ते नित्यनेमाने त्यांच्या प्रकृतीची चौकशी करीत. आपल्या उपचारासाठी श्रीमती सबनीस यांना त्यांनी एक पैसाही खर्च करू दिला नाही. या संपूर्ण प्रसंगातून मला खूपच शिकायला मिळालं.
असाच हा आणखी एक प्रसंग.
वंध्यत्व असलेल्या पुरुषांवर शस्त्रक्रिया करून त्यांच्यात प्रजनन- शक्ती निर्माण करण्याच्या शस्त्रक्रियेचं तंत्र डॉ. फडके यांनी विकसित केलं होतं. संपूर्ण देशातून या शस्त्रक्रियेसाठी डॉ. फडके यांच्याकडे लोक येत. ते करीत असलेल्या बहुतेक सर्व शस्त्रक्रियांच्या वेळी बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून मीच काम करीत असल्याने, मला या क्षेत्रात फार झपाट्याने होत असलेली त्यांची प्रगती अगदी जवळून बघायला मिळाली.
एकदा याच शस्त्रक्रियेसाठी दिल्लीहून एक श्रीमंत माणूस डॉ. फडके यांच्याकडे आला. तो इतका धनाढ्य होता, की मुंबईला येण्यासाठी त्याने एक विमानच भाड्यानं घेतलं होतं आणि त्यातून आपल्या साऱ्या कुटुंबीयांना घेऊन तो आला होता. लग्नानंतर दहा वर्षं झाली, तरी मूलबाळ न झाल्यानं तो अगदी अस्वस्थ होता.
डॉ. फडके यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली आणि नेहमीप्रमाणेच बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून मला मी केलेल्या कामाचा मोबदलाही मिळाला. पण त्या रकमेत नेहमीपेक्षा एक पैसाही जास्त नव्हता. मी जरा गोंधळूनच गेलो आणि डॉ. फडके यांच्याकडे पृच्छा केली. ‘हा माणूस किती धनवान आहे, ते तुम्हास ठाऊक नाही काय,’ असं मी विचारताच डॉ. फडके उद्गारले “ते सगळं मला ठाऊक आहे. पण याच पेशंटच्या शेजारच्या खोलीत असलेल्या एका सामान्य कारकुनावरही मी तीच शस्त्रक्रिया केली आहे. एकाकडून जास्त पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याकडून कमी, हे मला मान्यच होत नाही… आणि तसं जर मी केलं, तर जास्त पैसे देणाऱ्या पेशंटला मी विकलो गेलो आहे, असंच मला सतत वाटत राहील. माझ्या या शुश्रुषागृहात प्रत्येकाची – मग तो गरीब असो वा श्रीमंत सारखीच काळजी घेतली जाते आणि सर्वांना समान वागणूक मिळते.”
@@@@@
माझे अनेक गुरुजन, स्नेही आणि हितचिंतक यांनी माझ्याबद्दल अनेकदा दाखविलेल्या जिव्हाळ्यानं मी अगदी भारावून गेलो आहे. त्यांना मी कधीही विसरणं शक्य नाही. डॉ. ए. व्ही. बालिगा हे माझ्या अशाच काही सुहृदांपैकी एक.
एम्. बी. बी. एस. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी औषधशास्त्रात एम. डी. करीत असतानाची गोष्ट. त्या काळात मी वेगवेगळ्या दोन पदांवर काम केल्यानंतर के. इ. एम. इस्पितळाचे तेव्हाचे डीन डॉ. आर. जी. धायगुडे यांनी ‘कॅज्युअल्टी ऑफिसर’ म्हणून काम करणार का, अशी विचारणा माझ्याकडे केली. या पदावर काम करण्यासाठी अन्य कोणी जबाबदार व्यक्ती त्यांना डोळ्यांसमोर दिसत नसल्यानं त्यांनी माझी निवड केली. तेव्हा कॅज्युअल्टी ऑफिसरला बधिरीकरण तज्ज्ञ म्हणूनही काम करावं लागे. पुढे मी मेडिकल रजिस्ट्रार म्हणून काम करू लागलो आणि बधिरीकरण क्षेत्रातील माझ्या कामाची प्रशंसा होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. एके दिवशी डॉ. बालिगा यांनी मला बोलावून, बधिरीकरण विभागातच मी पुढं सर्व ‘करीअर’ करावी, अशी आपली अगदी मनापासूनची इच्छा असल्याचं सांगितलं. डॉ. बालिगा यांची इच्छा म्हणजे माझ्यासाठी आदेशच होता. एकदा असा आदेश दिला, की डॉ. बालिगा हेच पुढच्या साऱ्या ‘करिअर ‘कडे लक्ष ठेवतील हेही मला ठाऊक होतं. बधिरीकरण विभागातील माझे वरिष्ठ डॉ. जी. एस. आंबर्डेकर, माझे गुरू बी. एन. सरकार आणि प्रख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. एल. एच. आठल्ये या सर्वांच्या कारकिर्दीला डॉ. बालिगा यांनीच आकार दिल्याचं मला ठाऊक होतं. शल्यक्रियेतील आपल्या कौशल्यामुळे मुंबईचं नाव जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे डॉ. के. टी. ढोलकिया देखील आपण आपलं सध्याचं स्थान डॉ. बालिगा यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे प्राप्त करू शकलो, असं जाहीरपणे सांगत असतात. त्यामुळेच मी औषधशास्त्राचा नाद सोडून बधिरीकरण विभागात काम करावं, अशी सूचना डॉ. बालिगा यांनी करणं म्हणजेच पुढची सारी जबाबदारी त्यांनी स्वीकारल्यासारखंच होतं.
मी जवळजवळ सहा वर्षं के. ई. एम. इस्पितळात ‘कॅज्युअल्टी ऑफिसर’ आणि ‘निवासी बधिरीकरण तज्ज्ञ’ म्हणून काम करीत होतो. मला त्याबद्दल दरमहा अवघे २१० रुपये मिळत असत आणि त्यात माझं आणि माझ्या कुटुंबीयांचं कसंबसं भागत होतं. १९५२ मध्ये नुकतंच नागपूर मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं आणि तिथल्या बधिरीकरण विभागात प्राध्यापकाच्या जागेसाठी मी अर्ज केला. मुलाखतीच्या वेळीच मी एक अट घातली होती. मला मूळ पगार (बेसिक) म्हणून किमान ५०० रुपये मिळालेच पाहिजेत, असं मी त्यांना सांगून टाकलं होतं. त्यांनी ही माझी अट मान्य केली नाही.
मी मुंबईला परतलो आणि माझ्या नित्याच्या उद्योगात गढून गेलो. एके दिवशी मी ऑपरेशन थिएटरमध्ये असताना नागपूरहून आलेली एक तार माझ्या हातात पडली. दोन जादा वाढी धरून मला जास्तीत जास्त ४५० रु. मूळ वेतन म्हणून देण्याची तयारी नागपूर मेडिकल कॉलेजने दर्शवली होती. ती तार खिशात ठेवून मी धावतच खाली आलो. डॉ. बालिगा गाडीत बसून इस्पितळातून बाहेर पडण्याच्या बेतात होते. मी नागपूरहून आलेली तार त्यांच्या हातात दिली. त्यांनी ती अत्यंत काळजीपूर्वक वाचली आणि नंतर त्यांनी जे काय केलं, ते मी आयुष्यात विसरू शकणार नाही. डॉ. बालिगा आपल्या मोटारीतून खाली उतरले. आपल्या खिशातून शंभराच्या नोटांचं एक बंडल काढून त्यांनी माझ्या हातात दिलं आणि ते म्हणाले : ‘हे बघ, हे दहा हजार रुपये आहेत. आता तू नागपूर-बिगपूर सगळं विसरून जा आणि थेट इंग्लंडला चालू लाग. या दहा हजारातून तुझा प्रवासखर्च तर भागेलच. शिवाय तिथं तुला कोणतीही परीक्षा देता येईल. परत आल्यावर तू माझ्याकडे ये. तुझी के. ई. एम. मध्ये ‘कन्सलटंट’ म्हणून नेमणूक होईल, ही माझी जबाबदारी.’ एवढं बोलून ते तत्काळ आपल्या गाडीत बसून निघून गेले. मी मूकस्तंभासारखा नुसताच उभा होतो आणि माझे हात कापत होते. इतके पैसे मी आयुष्यात पहिल्यांदाच बघितले होते.
बाकीची लंबी कहाणी थोडक्यात सांगायची झाली, तर मी जहाजानं लंडनला गेलो. बोटीचं तिकीट तेव्हा म्हणजे १९५३ मध्ये ७५० रुपये होतं, तर विमानाचं १२००! लंडनला मी डॉ. बालिगांच्या सूचनेप्रमाणे सारं काही केलं आणि सहा महिन्यांत मुंबईला परतलो. डॉ. बालिगा यांनी आश्वासन दिल्याप्रमाणं माझी के. ई. एम. मध्ये ‘कन्सलंटट’ म्हणून नेमणूक झाली होती. त्यांच्या एकाच शब्दानं माझं सारं भवितव्य बदलून गेलं होतं… त्यांच्या ऋणातून मी कधी तरी मुक्त होऊ शकणार होतो का?
डॉ. बालिगा यांच्या जीवनाची सुरवात अगदी गरिबीतून झाली. आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभी त्यांना तीव्र संघर्ष करावा लागला होता. वैद्यकीय क्षेत्रात आता एक आख्यायिका बनलेल्या डॉ. गोपाळराव देशमुखांनी ऐन वेळी पुढे केलेल्या मदतीच्या हातामुळेच ते इंग्लंडला जाऊन एफ. आर. सी. एस. होऊ शकले होते. तिथून परतल्यावर त्यांची नियुक्ती मानद डॉक्टर म्हणून झाली होती. त्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न म्हणून त्यांनी मला मदत केली असावी.
आपल्या पेशंटशी अत्यंत सौजन्यानं वागणं, गरीब असो वा श्रीमंत-त्यांना अगदी समान वागणूक देणं, प्रसंगी स्वतःच्या पदराला झीज सोसून गरीब रुग्णांची अधिकाधिक काळजी घेणं, या स्वभाववैशिष्ट्यांमुळे डॉ. बालिगा यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्या वाढू लागली. शिवाय त्यांच्या चाहत्यांचाही एक मोठा वर्ग तयार झाला. राज कपूर यांच्यासारखे काही चित्रपट कलावंत आणि कृष्ण मेनन यांच्यासारखे काही राजकरणी यांचा त्या चाहत्यांमध्ये समावेश होता.
खरं म्हणजे डॉ. बालिगा यांना राजकरणाची आवडच होती. ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या काळात जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या भूमिगत नेत्यांना त्यांनी आसराही दिला होता. त्या काळात ते स्वतः खादी वापरायचे. पंडित नेहरू आणि रशिया-चीन यांचे नेते यांच्यात एक मध्यस्थाची भूमिकाही त्यांनी काही वेळा बजावल्याचं सांगितलं जातं. पण त्यांचं खरं प्रेम हे फक्त शल्यक्रियेवरच होतं… आणि त्या बाबतीत त्यांनी कधीही तडजोड केली नाही.
डॉ. बालिगा आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी किती प्रामाणिक होते, त्याचंच दर्शन घडविणारा हा एक प्रसंग. सकाळचे नऊ वाजले होते आणि डॉ, बालिगा एक बारा वर्षांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करत होते. एका गरीब माळ्याची ती मुलगी होती आणि एक पैसाही न घेता, त्या मुलीवर डॉ. बालिगा शस्त्रक्रिया करीत होते. ती अॅपेण्डिक्सची साधी शस्त्रक्रिया असल्यानं तासाभरात आपण मोकळे होऊ असं डॉ. बालिगा यांना वाटत होतं. शस्त्रक्रिया सुरू असतानाच शेजारच्या खोलीतला टेलिफोन घणघणला. डॉ. बालिगांच्या सेक्रेटरीनं माझ्याकडं येऊन, फोन दिल्लीचा असल्याचा निरोप दिला. मी जाऊन रिसिव्हर कानाला लावला, तर साक्षात पंतप्रधानांना डॉ. बालिगांशी बोलायचं होतं… मी धावतच ऑपरेशन थिएटरमध्ये आलो… पण डॉ. बालिगा यांनी अगदी शांतपणे मला सांगितलं की, आपण शस्त्रक्रिया करीत आहोत, असं पंतप्रधानांना सांगा आणि त्यांचा काही निरोप असल्यास घेऊन ठेवा.
कृष्ण मेनन हे युनोच्या एका बैठकीत भाषण करीत असताना अचानक आजारी पडले होते आणि त्यांना भारतात आणण्यात येत होतं. डॉ. बालिगा त्यांना घेण्यासाठी ११ वाजता विमानतळावर जातील काय, असं खुद्द पंडित नेहरू फोनवरून विचारीत होते. मी निरोप घेऊन रिसीव्हर खाली ठेवला. पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये येऊन मी डॉ. बालिगा यांना पंतप्रधानाचा हा तातडीचा निरोप दिला. त्यांनी घड्याळ बघितलं आणि ठरलेल्या वेळी आपण विमानतळावर पोचू शकू, असं मला सांगितलं. त्यांच्या हातातली शस्त्रक्रिया पूर्ण झाली होती. आणखी काही गुंतागुंत तर राहिली नाही ना, म्हणून आपल्या नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी तपासणी केली तो काय, दोन तास त्यांना त्या ऑपरेशन थिएटरमध्येच अडकून पडावं लागेल असं दिसू लागलं… मनाचा तोल यत्किंचितही ढळू न देता डॉ. बालिगांनी पुढं काम सुरू केलं. १०-४५ च्या सुमारास, त्यांनी मला ‘एअरपोर्ट ऑफिसरला’ फोन करण्यास सांगितलं. योगायोगाने तो अधिकारी त्यांचा मित्रच होता. डॉ. बालिगा यांनी त्या अधिकाऱ्याला स्वतः जाऊन कृष्ण मेनन यांची व्यवस्था करायला सांगितलं आणि ते कुठं उतरणार आहेत, तेही विचारून ठेवायला सांगितलं.
माझ्या मनात नेहमी असा विचार येतो की, दिल्लीहून पंडित नेहरूंचा फोन आला आहे, असा निरोप आल्यावर दुसऱ्या एखाद्या शल्यक्रियाविशारदानं काय केलं असतं ? खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांचा निरोप आला, तेव्हा डॉ. बालिगा यांच्या हातातलं काम संपत आलं होतं. बाकी जबाबदारी आपल्या सहकाऱ्यावर सोपवून ते सहज विमाननतळावर जाऊ शकत होते… पण अशा वेळी देखील आणि एक पैसाही मिळवून न देणाऱ्या शस्त्रक्रियेतून डॉ. बालिगा बाहेर पडले नाहीत. व्यावसायिक नीतिमत्ता आणि जागृत सदसद्विवेकबुद्धी यांचाच हा विजय होता…
आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात तर डॉ. बालिगा यांनी शस्त्रक्रिये- बद्दल स्वतः पैसे घेण्याचंच थांबवलं. ते मला एवढंच सांगायचे : भोजराज, बधिरीकरण तज्ज्ञ म्हणून तुमचं काय बिल असेल, ते पाठवा. मी या पेशंटकडून पैसे घेणार नाहीए… जे पैसे आपण घेतले होते, ते एखाद्या उदात्त कामासाठी देणगी म्हणून द्यायला डॉ. बालिगा आपल्या श्रीमंत पेशंटना सांगतात, हे माझ्या लक्षात आलं होतं.
एकदा डॉ. बालिगा शस्त्रक्रिया करीत असताना आलेला फोन मी घेतला. लेडी मोदी बोलत होत्या. डॉ. बालिगा यांनी त्यांचे पती सर होमी मोदी यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. त्याचं बिल किती, अशी विचारणा करण्यासाठी हा फोन होता. डॉ. बालिगा यांनी पैसे घेण्यास नकार दिला. पण लेडी होमींचा आग्रह बघून अखेर डॉ. बालिगा यांनी त्यांना एका विशिष्ट संस्थेला ती रक्कम देणगी म्हणून देण्याचा सल्ला दिला आणि तो विषय तिथंच संपला.
पुढं काही वर्षांनी मी उत्तर कॅनरातल्या कुमटा या गावातल्या एका महाविद्यालयात गेलो होतो. डॉ. बालिगा हे आमच्या महाविद्यालयाचे आश्रयदाते आहेत, असं त्या प्राचार्यांनी मला अभिमानानं सागितलं. तिथंच देणगीदारांच्या नावाचा एक फलक होता… त्यात सर होमी मोदी यांच्या नावापुढे २५ हजाराचा आकडा दिमाखानं झळकतं होता…
अशी अनेक उदाहरणं मला ठाऊक आहेत. शेवटी शेवटी तर डॉ. बालिगा यांनी स्वतःसाठी एक पैसाही घेतला नाही आणि अनेक व्यक्ती व संस्थांना मदत केली. डॉ. बालिगा यांना माझा जाहीर सलाम.
समाप्त
डॉक्टर बालिगा यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व योग्य शब्दात सांगितले आहे, वाचताना हात नकळत जोडले गेले.