डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा ——— प्रेमात खरोखर जग जगते… – डॉ. एस. एन. भगवती
डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा
———————————
प्रेमात खरोखर जग जगते…
– डॉ. एस. एन. भगवती
———————————
गीता ही एक अगदी प्रसन्न आणि कायम चैतन्यानं रसरसलेली युवती होती. घरात बसून रहायला तिला कधीच आवडायचं नाही. कॉलेजला ती जायचीच. पण वर्गात बसण्याएवजी बाहेर हुंदडण्यातच तिचा सारा दिवस जायचा. क्रीडा हा तिचा आवडता विषय आणि अश्वारोहणातही पटाईत असल्यानं ती कायम ‘अॅमॅच्यूअर रायडर्स क्लब ‘मध्ये पडलेली असायची. वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी तिनं अश्वारोहणातील अनेक पदकं पटकवलेली होती.
एके दिवशी सकाळीच ती मुंबईच्या पार दुसऱ्या टोकाला असलेल्या युनायटेड सर्व्हिसेस क्लबमध्ये आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सहलीला गेली होती. हिवाळ्यातील ती एक सुखद सकाळ होती. उन्हाची तिरीप अद्याप जाणवायला लागली नव्हती, अशा वेळी जलतरण तलावात उतरावं, असा विचार तिच्या मनात आला. लगेच तिने कपडे बदलले आणि तलावात उडी घेतली…
तलावात पाणी अगदी कमी असल्याचा अंदाज तिला आला नव्हता. तिनं पाण्यात सूर मारला होता आणि तिचं डोकं थेट तलावाच्या तळाला असलेल्या सिमेंटच्या स्लॅबवर जाऊन आपटलं होतं. तिची मान मोडली होती. तिच्या मित्रांनी तिला कसंबसं वर काढलं तेव्हा ती पूर्णपणे बेशुद्धावस्थेत होती… कृत्रिम श्वासोच्छ्वासानं ती शुद्धीवर आली खरी, पण तिने डोळे उघडले तेव्हा तिचे दोन्ही हात आणि पाय पूर्णपणे लुळे पडले होते. तिला तातडीनं ब्रीच कॅन्डी इस्पितळात हलविण्यात आलं. मानेजवळचा पाठीचा मणका (सी-६) फॅक्चर झाला होता. तिला तातडीनं ट्रॅक्शन लावण्यात आलं; अन्य औषधांबरोबरच फिजिओथेरपीही सुरू करण्यात आली.
मानेखालच्या संपूर्ण शरीराची ती नुसती शक्तीच गमावून बसली नव्हती, तर तिच्या साऱ्या संवेदनाही नष्ट झाल्या होत्या. ४-८ दिवसांत तिच्या खांद्यापर्यंतच्या भागात थोडीफार शक्ती आली आणि ती आपल्या हातांची जराशी हालचाल करू लागली. दररोज तिला भेटायचं, तिच्याशी गप्पा मारायच्या आणि तिचं मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करायचे, असं आम्ही कितीतरी दिवस करीत होतो. पण तिच्यात काही फारशी सुधारणा होईना…
साधारणपणे दीड महिन्यानंतर तिचं ट्रॅक्शन आम्ही काढून टाकलं आणि तिला ‘कॉलर’ वापरायला दिली. हळूहळू एक विशिष्ट प्रकारची कॉट (फाऊलर्स बेड) घेऊन आम्ही तिला थोडंथोडं उठवून बसवायला सुरवात केली. ती कॉटला लागूनच असलेल्या टेबलावरचा चहा स्वतःच्या हातानं घ्यायला लागली होती… दरम्यान मल-मूत्र विसर्जनासारख्या क्रियांवरचं गमावलेलं नियंत्रणही तिला परत मिळविता आलं आणि आम्ही तिला घरी पाठवायचा निर्णय घेतला.
आपले आई-वडील आणि मोठी बहीण यांच्यासमवेत रहायला मिळाल्यानं पुन्हा तिच्या चेहऱ्यावर थोडं थोडं हासू फुटू लागलं होतं. हाजी अलीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसीनमध्ये जाऊनही ती उपचार घेऊ लागली. हळूहळू कशाचाही आधार न घेता तिला बसताही यायला लागलं. याच काळात आश्वारोहणाची तिला असलेली आवड लक्षात घेऊन तिचे आई-वडील तिला अधूनमधून अॅमॅच्यूर रायडर्स क्लबवर घेऊन जायला लागले. किमान तिचं मानसिक पुनर्वसन तरी व्हावं, या हेतूनं तिला तिथं पाहिजे तेवढा वेळ ते थांबायचे. एकदा तर तिला चक्क घोड्याच्या पाठीवर बसवून चक्करही मारून आणण्यात आली. हा खरोखरच एक चमत्कार होता ! – या एकाच घटनेमुळे तिच्या जीवनातलं हरवलेलं चैतन्य तिला परत मिळालं आणि तिच्या डोळ्यांतही ती पूर्वीची चमक दिसू लागली…
हळुहळू तिनं नवशिक्यांना अश्वारोहणाच्या कलेचं प्रशिक्षण द्यायला सुरवात केली. नव्यानं सुरू झालेल्या तिच्या जीवनातला हा एक मोठाच टप्पा होता. त्याच वेळी ऑल इंडिया इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ती ‘फिजिओथेरपी ‘ही करीत होतीच. तिथंच तिला नौदलातला एक जवान भेटला… पूर्णपणे विकलांग झालेली एक युवती इतकी उत्साही, आनंदी अन् प्रसन्न राहू शकते, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता… तो तिला वारंवार भेटू लागला आणि सहवासातनं प्रेमाच्या पाकळ्या उमलू लागल्या.
-आणि अखेर ती आयुष्यभर अपंगच राहणार, हे लक्षात आल्यावरही
त्यानं तिच्यापुढं विवाहाचा प्रस्ताव मांडला. थोड्याच दिवसांत गीता लग्नाच्या बोहोल्यावर चढलीही. आणि त्याच्या सुखी संसाराला लवकरच बहर येण्याचीही चिन्हं दिसू लागली. पण अपंगत्वामुळे तिची प्रसूती नैसर्गिक रित्या होणं शक्यच नव्हतं… त्यामुळे तिचे दिवस भरल्यावर सिझेरीन करण्यात आलं. कमरेच्या भागात तिला कोणतीही संवेदना नसल्यानं, त्यासाठी बधिरीकरण तंत्राचाही वापर करावा लागला नाही. आपलीच प्रसूती पूर्णपणे शुद्धीवर राहून, पण कोणताही त्रास न होता ती बघत होती… गीताला मुलगा झाला होता आणि कोणत्याही सर्वसामान्य स्त्रीप्रमाणं ती त्याला पाजूही शकत होती. गीताचा नवरा आणि आई-वडील त्या सानुल्याची बाकी काळजी घ्यायला समर्थ होते. तो मोठा होत होता आणि गीताच्या जीवनातला आनंदही वाढत होता. दिवसभर ती आपल्याच बाळाच्या मागे असायची. त्यातून मोकळा वेळ मिळाला की ती क्लबवर चक्कर मारायची… गीताची बहीण आणि आई-वडील यांनाही आता आपली कामं करायला वेळ मिळू लागला होता.
असेच दिवस जात होते. पण तीन वर्षांनतंर गीताच्या किडनींना संसर्ग झाल्याचं आमच्या लक्षात आलं. तिला वाचविण्याचे आमचे सारे प्रयत्न अपयशी ठरले… आणि एक दिवस ती हे जग सोडून गेली. अपंगत्वावर मात करून जगण्याची दुर्दम्य उमेद असलेलं एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड निघून गेलं होतं…
@@@@@
जनरल सर्जरी या विषयात विशेष प्रशिक्षण घेऊन रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स इन इंग्लंडची फेलोशिप (एफ आर सी एस) संपादन करून डॉ. रामदास नुकतेच भारतात परतले होते. शालेय जीवनात डॉ. रामदास हे एक अत्यंत हुषार विद्यार्थी म्हणून चमकले. इंग्लंडला जाण्यापूर्वी नागपूर विद्यापीठातून मास्टर ऑफ सर्जरी ही परीक्षाही ते फार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. इंग्लंडहून भारतात परतल्यावर तर त्यांच्या अंगात नुसता उत्साह संचारला होता. आपली खाजगी प्रॅक्टीस सुरू करण्यात तर ते उत्सुक होतेच. शिवाय शिक्षकी पेशाची आवड असल्यानं त्यांनी मेडिकल कॉलेजात प्राध्यापकीही स्वीकारली होती. इंग्लंडला जाण्यापूर्वी एकदा त्यांच्या उजव्या हाताला मुंग्या येऊन तिथल्या संवेदना नष्ट झाल्यासारख्या त्यांना जाणवलं होत. त्यांनी न्यूरॉलॉजिस्टकडून तपासणी करून घेतली होती. पण फारसं विशेष काही आढळलं नव्हतं. इंग्लंडहून परतल्यावर मात्र हा भास त्यांना अगदी प्रकर्षानं जाणवू लागला. उजव्या हातानं लिहिताना त्यांना त्रास होऊ लागला. काही बोटांच्या संवेदना गेल्यासारखंही त्यांना जाणवू लागलं. पाठीच्या कण्याचे एक्स-रे काढले तर त्यांत विशेष काहीच नसल्याचं आढळून आलं. पण मायलोग्रम काढल्यावर मात्र पाठीच्या चौथ्या मणक्यात काही जखम झाल्याचं दृष्टोत्पत्तीस आलं. त्यातही खूपच गुंतागुंत होती.
थोडक्यात काय तर, डॉ. रामदास यांच्या पाठीच्या कण्यास फार मोठा विकार झालेला होता. पण दृश्य स्वरूपात मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला तेव्हा जाणवत नव्हतं.
डॉ. रामदास आपल्याच एका देखण्या विद्यार्थिनीशी विवाहबद्ध झाले होते. तिचे आई-वडील खूपच श्रीमंत होते आणि आपल्या जावयाला जगातली सर्वश्रेष्ठ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून द्यायची त्यांची तयारी होती. डॉ. रामदास यांना आपल्याला काय झालंय ते पूर्णपणे कळून चुकलं होतं… त्यांच्या पत्नीलाही त्याची हळुवारपणे कल्पना देण्यात आली. डॉ. रामदास यांचे वैद्यकीय अहवाल आणि मायलोग्रॅम तपासणीसाठी स्वित्झर्लंडमधील एका प्रख्यात न्यूरोसर्जनकडे पाठविण्यात आले… शस्त्रक्रियेनंतर दोन्ही हात आणि पाय पूर्णपणे विकलांग होण्याची शक्यता असल्यानं, त्या सर्जननं या शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वीकारण्यात जराशी नाराजीच दाखविली. अर्थात, स्वित्झर्लंडला जाऊन शस्त्रक्रिया करण्यास खर्चही खूपच आला असता.
अखेर, ही शस्त्रक्रिया भारतातच आणि दोन किंवा अधिक टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रथम पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रिया करण्यात आली. चौथ्या मणक्याच्या वरच्या भागातील ट्यूमरचा भाग आम्ही काढून टाकला. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या हातापायांमध्ये अशक्तपणा जरूर जाणवत होता. पण डॉ. रामदास त्यांची हालचाल करू शकत होते. आमच्या दृष्टीनं हेही खूप होतं. ही शस्त्रक्रिया आठ तास चालली होती.
मला जरा धीर आला होता. काही आठवडे उलटल्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करून पाठीच्या कण्यातील मज्जारज्जूवरील ट्यूमरचा उर्वरित भागही नष्ट करून टाकायचं आम्ही ठरवलं. ती शस्त्रक्रियाही पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर लगेचच डॉ. रामदास यांच्या पायातील शक्ती पूर्णपणे गेल्यासारखं दिसू लागलं. पण थोड्याच दिवसांत त्यात सुधारणा झाल्याचंही आढळून आलं. दुर्दैवानं, त्यांची जखम फुटली. ती सांधून पुन्हा टाके घालावे लागले… त्यानंतर मात्र आपल्या दोन्ही पायांवरील आणि मल-मूत्रविसर्जनाच्या क्रियेवरील सारं नियंत्रण डॉ. रामदास गमावून बसले.
आपली प्रकृती आता पूर्णपणे सुधारेल आणि आपण कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू शकू, ही कल्पनाच डॉ. रामदास यांनी सोडून दिली होती. त्यांनी आपल्या पत्नीचं मन वळवलं आणि तिला घटस्फोट घ्यायला लावला. त्या दोघांचा प्रेमविवाह होता आणि आपल्या पत्नीचं सारं आयुष्य दुःखात जाऊ नये, असं त्यांना वाटत होतं. त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट तर घ्यायला लावलाच, शिवाय ती पुन्हा विवाहबद्ध होईल याचीही त्यांनी अगदी जातीनं काळजी घेतली…
फिजिओथेरपीचे धडे परिश्रमपूर्वक गिरवल्यानंतर डॉ. रामदास यांना चाकाच्या खुर्चीतून हिंडता-फिरता यायला लागलं. पण त्यांना आपल्या बोटांचा मात्र फारसा उपयोग करता येत नव्हता… शस्त्रक्रिया त्यांना कधीही करता येणार नव्हती. निराशेच्या खोल गर्तेत एखाद्याला बुडून जायला एवढं कारण पुरेसं होतं. पण त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. आता त्यांनी पूर्णपणे शिक्षकी पेशाला वाहून घ्यायचं ठरवलं होतं. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे तास घ्यायलाही सुरवात केली. सर्जिकल वॉर्डच्या शेजारचीच एक खोली त्यांना इस्पितळानं देऊ केली होती. तेच आता त्यांचं नवं घर होतं… तिथेच ते आपला बहुतेक वेळ घालवीत… केवळ अंडरग्रॅज्युएटच नव्हे तर एम्. एस्. परीक्षांचे विद्यार्थीही त्यांच्याकडे येऊन बसत. चाकांच्या खुर्चीवरून हिंडणारा आपला हा शिक्षक, त्या वैद्यकीय महाविद्यालयातील सगळ्यांचाच लाडका बनला होता…
डॉ. रामदास यांचे सारे कुटुंब अगदी साधेभोळे, निरलस असे होते. त्या सर्वांनीच डॉ. रामदास यांची खूप काळजी घेतली आणि त्यांच्यावर जिवापाड मायाही केली.
आता डॉ. रामदास आपल्या बहिणीबरोबर इस्पितळाच्या क्वार्टर्समध्येच राहतात. ते आपला बहुतेक वेळ अंथरुणावर पडून तरी राहतात किंवा चाकाच्या खुर्चीत बसलेले असतात. त्यांच्या सभोवताली कायम लहान मुलं असतात. डॉ.रामदास यांना कधीही घरात एकटं वाटणार नाही, याची काळजी त्यांचे कुटुंबीय घेतात…. कधी कधी छोट्या मुलांबरोबर ते बागेत जाऊन बसतात… अपंगत्व आल्यानंतरही डॉ. रामदास यांनी दाखविलेली अथक जिद्द आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्याबद्दल दाखवलेला अपरंपार जिव्हाळा यांचं करावं तितके कौतुक थोडंच आहे.
@@@@@
डॉ. मोहन याला पुन्हा एकदा बोर्डाच्या परीक्षेला बसायचं होतं. या आधीचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे त्याच्या मनावर खूपच ताण आला होता. आम्ही सर्वांनीच त्याला धीर द्यायचा प्रयत्न केला. तोंडी परीक्षेच्या वेळी तो जरा जरी भरकटायला लागला की आमच्यापैकी कोणी तरी त्याला सांभाळून घ्यायचा आणि मूळ मुद्यावर आणायचा. त्याचा आत्मविश्वास कायम वाढत राहील म्हणून आम्ही प्रयत्न करायचो. ‘पॅथॉलॉजी ‘मध्ये त्याच्या काही चुका झाल्या पण एकूण त्याची तयारी बरी दिसत होती. रेडिओलॉजी विभागात तर त्यानं घेतलेला पाठ हा उत्कृष्टच होता. संपूर्ण तोंडी परीक्षा संपल्यावर त्याला उत्तीर्ण म्हणून जाहीर करायला हरकत नाही, असं आम्हा सर्वांचंच मत झालं. पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेला एक डॉक्टर म्हणून त्याला लोकप्रवाहात मोकळेपणानं वावरू द्यायचं का, एवढाच प्रश्न होता. ‘नॅशनल बोर्ड इन न्यूरोसर्जरी ‘चं प्रमाणपत्र त्याला मिळायला हरकत नाही, या मताशी अखेर आम्ही सारेच येऊन ठेपलो.
सर्वसाधारणपणे परीक्षा संपल्यावर उमेदवारांशी थोड्या अनौपचारिक गप्पा मारायचा आमचा प्रघात आहे. ‘न्यूरोसर्जरी ‘बद्दल काही मार्गदर्शनवजा सूचना करत करत भविष्यात तुम्ही काय करणार आहात, वगैरे प्रश्न आम्ही विचारतो. जे उमदेवार अपयशी ठरलेले आहेत, त्यांना तर आम्ही त्यांचं कुठे चुकलं ते स्पष्टच सांगून टाकतो. पुढच्या सहा महिन्यांत त्यांनी त्या चुकांचा विचार करावा आणि पुन्हा परीक्षेला बसावं, एवढाच आमचा त्यामागील हेतू असतो. पण या वेळी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्सकडून आम्हाला कडक सूचना मिळालेल्या होत्या. त्यामुळे आम्ही निकाल अनौपचारिक रित्या जाहीर करू शकत नव्हतो. आमच्या उमेदवारांच्या यादीत डॉ. मोहनचं नाव पहिलंच होतं. परीक्षेनंतरच्या गप्पांसाठी आम्ही त्याला बोलावलं. बोर्डानं आम्हाला दिलेल्या सूचनांची त्याला काहीच माहिती नव्हती. आम्ही त्याच्याशी त्याच्या वैद्यकीय कारकिर्दीबाबत सर्वसाधारण स्वरूपाच्या गप्पा मारायला सुरवात केली. याच विषयावरील एक चर्चासत्र नंतरच्या महिन्यात होणार होतं, म्हणून आम्ही त्याला एवढंच सांगितलं की, ‘पुन्हा भेटू या !’
डॉ. मोहननं मात्र त्याचा वेगळाच अर्थ लावला. त्याला तो उत्तीर्ण झाल्याचं माहीत नसल्यानं तो ताडकन उठला आणि उद्गारला नाही. सर, आता आपण कधीच या परीक्षेला पुन्हा बसायचं नाही, असं मी ठरवून टाकलंय….
आम्हाला हसू आवरत नव्हतं. पण आम्ही त्याला त्याचा निकाल सांगू शकलो नाही.
@@@@@
मुंबई इस्पितळाच्या अती दक्षता विभागात विलासला दाखल करण्यात आलं होतं. तो अवघा २६ वर्षांचा होता. त्यानं रसायनशास्त्रात डॉक्टरेट संपादन केली होती आणि एका मोठ्या कंपनीत तो मुलाखतीसाठी जात असताना भरधाव वेगानं धावणाऱ्या लोकल गाडीतून खाली पडल्यामुळे त्याच्या मेंदूला इजा झाली होती. खरं म्हणजे त्याला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जायचं होतं. त्याचा मोठा भाऊ तिथंच एका औषध निर्मितीसंबंधीच्या महाविद्यालयात प्राध्यापक होता. पण नियतीनं काही वेगळंच ताट त्याच्यापुढे वाढून ठेवलं होतं.
सी. टी. स्कॅन आणि अन्य तपासण्या सुरू झाल्या. विलास बेशुद्धावस्थेतच होता. तो गाडीतून खाली कसा कोसळला, तेच कुणाला सांगता येत नव्हतं. आवश्यक ते सर्व उपचार सुरू झाले होते. विलासच्या संपूर्ण कुटुंबाला या घटनेचा मोठाच धक्का बसला होता. त्याची मोठी बहीण सुनंदा डॉक्टरच होती. तर भाऊ विद्युत हा अस्थिव्यंगशल्यविशारद होता. विलासची धाकटी बहीण बेबी नुकतीच डॉक्टरकीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. हे तिघेही काहीही न खाता-पिता ४२ तास इस्पितळात बसून होते… विलासच्या आई-वडलांना मात्र मी कसंबसं घरी पाठवलं होतं.
विलासच्या सर्वात मोठ्या भावाचा अमेरिकेहून दररोज फोन यायचा. परिस्थिती अगदीच हाताबाहेर गेली असेल, तरच तो मुंबईला येणार होता. अन्यथा अमेरिका सोडणं त्याला फारच कठीण होतं.
माझा दररोजचा बराच वेळ या सर्व भावंडांमध्ये जात होता आणि त्या कुटुंबाशी माझं अगदी जिव्हाळ्याचं नातं जडलं होतं. एके काळी पूर्ण निर्धनावस्थेत असलेल्या या कुटुंबाची प्रगती कशी होत गेली, याची माहितीही मला तेव्हाच समजली. मुंबईत ‘फार्मसी ‘ची पदवी मिळविल्यानंतर वसंतनं पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला जायला म्हणून पाच हजाराचं कर्ज काढलं होतं. त्यातूनच थोडे पैसे भावंडांच्या शिक्षणासाठी ठेवून तो अमेरिकेला गेला होता. तिथे मिळेल ती नोकरी करीत त्यानं आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतरही वसंतने आपल्या स्वतःच्या लग्नाचा विचारही मनात येऊ न देता अमेरिकतनं आपल्या भावंडांच्या शिक्षणासाठी पैसे पाठविले होते… रसायनशास्त्रात डॉक्टरेटची पदवी संपादन करणं, विलासला त्यामुळेच शक्य झालं होतं.
तीन आठवडे उलटले. आता विलासची अवस्था केवळ प्राण असलेल्या एखाद्या मांसाच्या गोळ्यासारखी झाली होती. दिवसाचे चोवीस तास त्याची देखभाल करण्यासाठी खाजगी परिचारिका नियुक्त करण्यात आली होती. तरीही त्याच्या भावंडापैकी कोणी ना कोणी सतत त्याच्या जवळ असे. या कुटुंबात एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, माया आणि जिव्हाळा बघून मी अगदी थक्क झालो होतो.
दरम्यान, वसंतही अमेरिकेहून येऊन गेला. तो स्वतःच फार्मसिस्ट असल्यानं त्यानंही विलासला बरं करण्यासाठी कुठं काही औषधोपचार उपलब्ध आहेत काय, ते शोधून काढण्याचा जिवापाड प्रयत्न केला… पण अखेर साऱ्यांचेच प्रयत्न अयशस्वी ठरले. विलासचा विकार बळावत गेला… आणि त्याचे प्राणोत्क्रमण झाले… त्या दुर्दैवी कुटुंबावरील नियतीचा हा घाला अगदी वर्णन करण्यापलिकडचा होता. चार-सहा महिन्यांच्या काळात मी त्यांच्या अगदी घरातलाच एक होऊन गेलो होतो. त्या कुटुंबाशी जडलेले माझे हे ऋणानुबंध अद्यापही कायम आहेत.
समाप्त