पाय वापरायला शिका :
पाय वापरायला शिका :
खालील घटना मी कुठे वाचली आठवत नाही. तसेच ती कोणी लिहिली हे पण ठाऊक नाही. पण मला ही घटना भावली आणि आवडली म्हणुन आपल्याबरोबर शेअर करत आहे. ज्याने ही घटना लिहिली त्याच्याच शब्दात ती देत आहे.
शेवटी एकदाचा मला इंटरव्ह्युचा कॉल आला आणि जीव भांड्यात पडला. एम.कॉम झाल्यावर गेले वर्षभर माझे जॉबसाठी प्रयत्न चालू होते पण यश येत नव्हते. कुठे कुठे ऍप्लिकेशन्स पाठवले होते पण त्याचा काही उपयोग होत नव्हता. बाजारात मंदी असल्यामूळे सगळीकडची रिक्रुटमेन्ट जवळ जवळ थांबली आहे. त्यामूळे जॉब मिळणे कठीण आहे असे सतत कानावर येत होते. तसे मला दोन एक ठिकाणी इंटरव्ह्युला बोलावणे आले होते पण ते सगळे फालतुच निघाले होते. आमच्या शहरातील एका मोठ्या आणि प्रतिष्ठीत बँकेची मध्ये ‘ऑफिसर्स पाहिजेत’ म्हणुन जाहीरात आली होती. त्याला पण अर्ज पाठवून झाला होता. त्याला पण आता सहा महिने होत आले होते. आता मला याच बँकेकडून इंटरव्ह्युचे बोलावणे आले होते. इंटरव्ह्यु आमच्या शहरातील बँकेच्या मुख्य शाखेत होणार होते. वेळ सकाळी १० ची होती. इंटरव्ह्युसाठी वेळेवर हजर व्हा, जे उशीरा येतील त्यांचा विचार केला जाणार नाही अशी धमकीवजा सूचना पण होती. त्यासाठी वेळेवर पोचणे आवश्यक होते.
ज्या ठिकाणी इंटरव्ह्यु होणार होते ते ठिकाण माझ्या घरापासून कमीत कमी ७ कि. मी. तरी दूर होते. माझ्या घरापासून तेथे जायला बस होती म्हणून बरे होते. मी या इंटरव्ह्युचे फारच मनावर घेतले होते. कसून तयारी केली होती. इंटरव्ह्युच्या दिवशी कधी लवकर न उठणारा मी, लवकर उठून, घोटून घोटून दाढी करून, स्वच्छ आंघोळ करून, कडक इस्त्रीचे कपडे घालून, टाय लावून, चकचकीत पॉलिश केलेले बूट पायात घालून साकाळी साडेआठवाजताच तयार होऊन बसलो होतो. चेहेऱ्यावर छान क्रिम लाऊन पावडर लावली होती, व्यवस्थीत भांग पाडला होता. पर्सनॅलिटी इंप्रेसिव्ह दिसते की नाही याची पुन्हा पुन्हा आरशात बघून खात्री करून घेत होतो. आईच्या पाया पडलो. आइने दिलेला डबा आणि पाण्याची बाटली सॅकमध्ये टाकली. इंटरव्ह्युला उपयोगी पडतील म्हणुन दोन पुस्तके पण सॅकमध्ये कोंबली आणि घरातून बाहेर पडलो. विचार होता की इंटरव्ह्यु सुरु व्हायच्या कमीत कमी अर्धा तास तरी आधी पोचावे.
बसस्टॉपवर येऊ उभा राहीलो खरा, पण बस काही येत नव्हती. टॅक्सी किंवा रिक्षा पण दिसत नव्हती. नेहमी बससटॉपवर गर्दी असते पण आज कोणीच नव्हते. पंधरा मिनीटे झाली. नऊची वेळ जवळ येत चालली पण बस काही येत नव्हती. धाकधूक वाढत चालली होती. ७ कि.मी. अंतर जायचे होते, ते सुद्धा सकाळच्या ट्रॅफिकमध्ये. कसे जमणार याची काळजी वाटत होती.
जवळ एक पानाची टपरी होती. त्या टपरीतील पानवाला बराच वेळ माझ्याकडे बघत होता. शेवटी त्याला काय वाटले कोणास ठाऊक. त्याने मला जवळ बोलावले आणि म्हणाला ‘आज बसचा संप आहे साहेब ! आज बस, टॅक्सी, रिक्षा सगळे बंद आहे ! तुम्ही पेपर वाचत नाही का ?’
‘बाप रे !’ माझ्या उरात तर धडकीच भरली. संप असल्याचे मला कसे नाही ठाऊक ? इंटरव्ह्युला तर पोचायलाच हवे. लगेच रस्त्यावर उभे राहून आणि अंगठा वर करून लिफ्ट मागायचा प्रयत्न करून पाहीला पण कोणी थांबेल तर शपथ. माझ्या चेहेऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसू लागली होती.
‘काय झाले साहेब ?’ त्या पानवाल्याने विचारले.
‘काय सांगू तुला. ? आज मला इंटरव्ह्युला जायचे आहे. दहा वाजेपर्यंत पोचायचे आहे. अंतर चांगले सात किलोमिटर्स आहे. आता मी कसा पोचणार ?’ मी खिन्नपणे त्या पानवाल्याला म्हणालो.
‘तुम्हाला देवाने पाय दिले आहेत ना साहेब ?’ तो पानवाला म्हणाला.
‘बरं मग ?’ मी काहिश्या घुश्यातच म्हणालो.
‘त्याचा उपयोग करा की साहेब ! चक्क चालत जा ! कोणाच्या नादी लागू नका. चालतच तुम्ही वेळेवर पोहोचाल बघा !’ तो पानवाला म्हणाला.
‘काय ? चक्क सात किलोमिटर्स चालत जायचे ?’ मी किंचाळलोच. एक किलोमिटर सुद्धा धडपणे पायी न चालणारा मी, सात किलोमिटर कसला पायी जातोय डोंबलाचे.
‘विचार करत बसू नका साहेब. चालायला लागा नाहीतर हा इंटरव्ह्यु विसरून जा. चॉईस तुमचा आहे.’ तो पानवाला म्हणाला.
मी क्षणभर विचार केला आणि भरभर चालायला सुरवात केली. वेळेवर इंटरव्ह्युला पोहोचणे हे एकमेव ध्येय समोर ठेवले होते. आधी चालताना बराच त्रास होत होता. अनेक अडथळे येत होते. रस्ते क्रॉस करताना भंबेरी उडत होती. पण मग पुढे सवय झाली. भरभर चालत तर कधी कधी चक्क पळत पळत एकदाचे मी इंटरव्ह्युचे ठिकाण गाठले खरे,ं पण या प्रयत्नात माझी अवस्था पहाण्यासाखी झाली होती. माझा पांढरा शर्ट चक्क घामाने भिजला होता, मळला होता आणि पँटमधून अर्धवट बाहेर डोकावत होता. गळ्याभोवती असलेल्या टायची पार वाट लागली होती. चेहेरा घामाने भिजलेला होता आणि केस विसकटलेले होते. चकचकीत पॉलीश केलेल्या बुटांवर चक्क धुळीचे थरच्या थर साचले होते. कशीबशी माझी जड सॅक खांद्यावर अडकवून मी इंटरव्हुच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा मला चांगलाच दम लागला होता आणि पाय चक्क ठणकत होते. उभे रहाणे अशक्य होते.
विचार करत होतो की वॉशरुममध्ये जाऊन कपडे ठाकठीक करावेत. बाहेर लोंबणारा शर्ट पँटच्या आत खोचावा. चेहेरा धुवून फ्रेश व्हावे. कंगवा फिरवून केस ठिकठाक करावेत. पण कसचे काय.? पहिल्यांदा माझ्याच नावाचा पुकारा झाला. मी सहज हॉलमध्ये नजर टाकली. माझ्यापेक्षा कितीतरी स्मार्ट लोक बसले होते. यात काही मुली पण होत्या. त्यांच्यापुढे मी म्हणजे अगदीच बावळत दिसत होतो. त्यातुनही मला लगेच बोलावणे आले होते. आवरायला पण वेळ नव्हता. आता आपल्याला हा जॉब काही मिळत नाही. असे म्हणुन मी काहीश्या अनिच्छेनेच इंटरव्ह्युच्या केबीनमध्ये आलो.
केबीनमधील टेबल्याच्या मागे सुटाबुटातील तीन मध्यमवयीन व्यक्ती बसल्या होत्या. त्यातील मधले हे बँकेचे चेअरमन होते.
‘मी थोड्या वेळाने इंटरव्यु द्यायला आलो तर चालेल का ?’ मी नम्रपणे विचारले.
‘का ं?’ मधल्या माणसाने म्हणजेच चेअरमन साहेबांनी विचारले.
‘सर आज बस, टॅक्सी आणि रिक्षाचा संप आहे हे मला माहीत नव्हते. त्यामूळे मी सात किलोमिटर अंतर पायी चालत आलो आहे. लगेच मला बोलावणे आले. मला वॉशरुममध्ये जायला पण वेळ मिळाला नाही. त्यामूळे मी आत्तातरी इंटरव्हु देण्याच्या परिस्थतीत नाही !’ मी प्रामाणीकपणे सांगीतले.
‘म्हणजे तुम्ही इंटरव्यु देण्यासाठी चक्क सात किलोमिटर्स पायी चालून आलात ?’ चेअरमन साहेबांनी विचारले तेव्हा त्यांच्या चेहेऱ्यावरचे आश्चर्याबरोबरच कौतुकाचे भाव मला स्पष्ट दिसत होते.
‘का ?’ तिथे बसलेल्या दुसऱ्या माणसाने विचारले.
‘कारण तुमच्या बँकेत काम करण्याची माझी इच्छा आहे. मी तुमच्या बँकेबद्धल बरेच काही चांगले ऐकून आहे. मला येथे खुप काही शिकायला मिळेल असे मला वाटते.’ मी उत्तर दिले.
चेअरमन सहेबांनी त्या माणसाकडे बघीतले आणि म्हणाले ‘ठीक आहे. तुमची फाईल येथे ठेवून बाहेर जाऊन बसा. पण आम्ही सांगितल्याशिवाय घरी जाऊ नका.’
मी माझ्या मळक्या सॅकमधून माझी फाईल बाहेर काढून त्यांच्याकडे दिली आणि ‘हुश्श’ करत बाहेर आलो. आता काय इंटरव्ह्युचा निकाल लागलाच होता म्हणा. थांबायला का सांगीतले होते कळत नव्हते. मी बसलो होतो तेवढ्यात बँकेचा प्युन माझ्यासाठी ट्रेमधून कॉफी आणि पाण्याचा ग्लास पण घेऊन आला. ‘हे काय ?’ मी विचारले. ‘चेअरमन साहेबांनी सांगितले आहे’ तो म्हणाला. कारण इतरांना अशी कॉफी दिलेली निदान मी तरी पाहिली नाही.
इंटरव्ह्युला सुरवात झाली. भरभर एक एक कँडिडेट आत जात होते आणि बाहेर येत होते. सगळे कँडिटेट्स संपल्यावर मला आत बोलावण्यात आले.
‘खरे म्हणजे तुम्ही सकाळी जेव्हा आमच्याशी बोललात त्याच वेळी आम्ही तुमचे सिलेक्शन केले होते. पण फॉर्म्यलिटी म्हणून आलेल्या इतर कँडिडेट्सचे इंटरव्ह्यु घेणे भाग होते. तुम्ही इंटरवव्ह्यु देण्यासाठी बरेच अंतर चालत आलात ही गोष्ट आम्हाला फार भावली. यावरून तुम्हाला आमच्या बँकेविषयी किती प्रेम आणि आत्मियता आहे हे कळले. तसेच मेहेनत करायला तुम्ही कमी पडणार नाही याची खात्री पटली. अभिनंदन. तुमचे अपॉईंटमेन्ट लेटर तयार होते आहे ते घेऊनच बाहेर पडा. तुमची इच्छा असल्यास तुम्ही उद्यापासून सुद्धा जॉईन होऊ शकता.’ आता त्या तिघांमधले तिसरे गृहस्थ माझ्याशी बोलत होते. ते एच आर हेड होते. तिघांनीही माझ्याशी शेकहॅन्ड केला. मी बाहेर आलो तेव्हा स्वर्गात असल्यासारखे मला वाटत होते.
माझी अपॉईन्टमेन्ट झाल्याची खबर बाहेर पसरली असावी. कारण रिसेप्शनिस्टने माझे अभीनंदन केले आणि अपॉंईंटमेन्ट लेटर असलेले पाकीट माझ्या हातात ठेवले. अपॉईंटमेन्ट लेटर वाचून तर मी उडालोच. माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त पगार आणि फॅसिलिटिज मला दिल्या होत्या.
माझा परतीचा सात किलोमिटर्सचा प्रवास अक्षरशः हवेत तरंगतच झाला. पहिल्यांदा मला तो पानवाला दिसला. ही खुषखबर पहिल्यांदा त्याला सांगावी म्हणुन मी त्याच्या टपरीजवळ गोलो.
‘काय झाल साहेब ?’ त्याने उत्सुकतेने विचारले.
‘मला नोकरी मिळाली. हे बघ अपॉईंटमेन्ट लेटर. हे केवळ तुझ्यामूळे घडले.’ मी आनंदाने म्हणालो.
‘काहीतरीच साहेब ! पण तुमचे अभिनंदन आणि माझ्यातर्फे एक कोल्ड ड्रिंक’ असे म्हणत तो बाहेर ठेवलेल्या फ्रिजमधून कोल्ड ड्रिंकची बाटली काढायला म्हणून बाहेर आला आणि मी त्याच्याकडे पहातच राहीलो.
त्याला दोन्हीही पाय नव्हते. गुढग्याच्या खाली त्याचे दोन्ही पाय कापलेले होते. तो कुबडीच्या सहाय्याने चालत बाहेर आला होता.
‘बघा साहेब ! मला पाय नसूनही मी भक्कम पायावर उभा आहे. आणि तुम्ही लोक पाय असूनही पायांचा उपयोग करत नाही. आज जर तुम्ही तुमच्या पायांचा उपयोग केला नसता तर तुम्हाला ही नोकरी मिळाली असती का ? लोकांना देवाने पाय दिलेले असुनही लोक त्याचा का वापर करत नाहीत कळत नाही. लोक कशाला बस, टॅक्सी, रिक्षासाठी ताटकळत बसतात ? जवळचे अंतर जाण्यासाठी सुद्धा त्यांना स्कूटर किंवा बाईक का लागते ? समजत नाही.’ पानवाल्याची बडबड चालू होती पण माझे डोळे मात्र खाडकन उघडले होते.
खरंच आपण प्रत्येकाने आपल्या पायांचा उपयोग करायला सुरवात केली तर ? अर्थात असे करायचे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे.
तुम्हाला काय वाटते ?