आजची सावित्री ….. ©® विद्या थोरात काळे “विजू” प्रस्तुतकर्ता: मधुकर सूर्यवंशी नासिक
आजची सावित्री …..
सकाळी सकाळी खिडकीत उभे राहून चहा घेत असलेल्या अजयला, तिला नटूनथटून नऊवारी साडीत, सायकलवरून घरी परत येताना पाहून थोडे आश्चर्यच वाटले.
तो आईला उद्देशून म्हणाला, “बघ, शेवटी सुशिक्षित बायको करूनही, सात जन्मासाठी मीच हवा आहे, म्हणून ती वडाची पूजा करून आली. काही म्हणा, बायका कितीही शिकल्या तरी अंधश्रद्धाळूच असतात.”
” हो, मलाही जरा आश्चर्यच वाटले. मी सकाळीच तिला जाताना बघितले. हि तिची पहिलीच वटपौर्णिमा. मला वाटले होते माहेरी जाईल साजरा करायला. खूप घाईत होती. नुसतेच बाय केले अन् निघून गेली. म्हणून काही विचारता आले नाही.”
” काल तिच्या आईचा फोन आला होता. यायला जमणार नाही सांगत होती. मीही कामाच्या व्यापात तिला कारण विचारायला विसरलो.”
” एरवी तिला सहावारी साडी नेसायला कंटाळा येतो. बघावे तेव्हा अर्ध्या चड्डीत फिरत असते. पण आज छान तयार होउन गेलेली पाहिले मी.”
” अग आई ….. काहीही काय बोलतेस. त्याला बर्मुडा म्हणतात.” अजय थोडासा चिडून म्हणाला.
” हो. तेच ते. तू काहीही म्हण. त्याने पूर्ण पाय झाकत नाहीत न? म्हणजे ती अर्धी चड्डीच.”
” बरं जाऊदे. आता तो विषय बंद कर. ती येईलच वर इतक्यात. लिफ्ट वर आल्याचा आवाज आला आहे. बघ बेल वाजलीच. मी उघडतो दरवाजा.” अजय चहाचा कप टेबलावर ठेवत म्हणाला.
” आहाह! क्या बात है! आज एकदम नऊवारी साडीत! एकदम झकास दिसतेस. तुझे हे रूप बघायला तरी, मला तुझ्यासोबत सात जन्म रहायला आवडेल.” तिला बघून अजयने न राहवून तिची स्तुती केली.
” हो का? त्यासाठी या जन्मी आधी तुला, माझा चांगला नवरा होऊन दाखवयाला लागेल. मग मला विचार करायला हरकत नाही, पुढच्या जन्मात तुझ्यासोबत रहायचे की नाही.” तिनेही हसत त्याच्या स्तुतीला लाडात उत्तर दिले.
” खरचं ग बेला! खूपच सुंदर दिसतेस तू! अगदी पेठे ज्वेलर्सच्या जाहिरात असते तशी दागिने घातलेली सुंदर नार! आज तुझी दृष्टचं काढायला हवी.”
” काहीही काय आई? जरा जास्तच कौतुक करत आहात.” तिला थोडे लाजल्यासारखे झाले.
” मला वाटले तू एवढी माॅडर्न आहेस तर, वटपौर्णिमाची पूजा करण्यात तुला अजिबात इंटरेस्ट नसेल. पण बरे वाटले तू पूजा करून आलीस ते.” आई समाधानाने म्हणाल्या.
” आई, तुम्ही मला सांगा, नास्त्याला काय केले आहे का? मला खूप भूक लागली आहे. भूक लागल्यावर मला काही सुचत नाही.” पोटावर हात ठेवत बेलाने आईंना विचारले.
” पोहे केलेत. अग पण आज सौभाग्यवतीने उपवास करायचा असतो.”
” नाही हं! मी हे असले काही मानत नाही. पूजा केली तेवढेच माझ्यासाठी पुरे झाले.”
” अग पण तू पूजेचे साहित्य आणि वाटण्यासाठी वाणाचे सामान कधी आणले होतेस? ”
” मला त्याची आवश्यकता नाही वाटली.” हाताने नाहीचा इशारा करत ती म्हणाली.
” म्हणजे नक्की वटपौर्णिमेचीच पूजा केली की अजून कसली?” आईने शंका विचारली.
“आई, प्लीज मी घामाने खूप पचपचले आहे. आधी मी हे सगळं उतरवते. फ्रेश होते. नाष्टा करते अन् मग तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते. चालेल.” बेलाने सौम्यपणे विचारले.
” हो चालेल. सवय नाही न तुला एवढे सगळे दागिने अन् कपडे घालायची त्यामुळे …”
” त्यामुळेच मला खूप इरीटेड झालंय आणि त्यात ही गर्मी. अगदीच हाॅरीबल.” आईचे बोलणे पूर्ण होण्याच्या आधीच बेलाने तिची अवस्था बोलून दाखवली आणि ती फ्रेश व्हायला तिच्या रूममध्ये निघून गेली.
” काय रे अजय! हिने पूजा कशी काय केली असेल? नक्की कशाची पूजा केली? काही पूजेचे सामान नाही. उपवास नाही.” तिची पाठ वळताच आईने मुलाला विचारले.
” अग आजकाल फॅड आहे. सणाच्या दिवशी ट्रेडिशनल अटायार मध्ये तयार होऊन फोटो काढायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे. तसेच काहीतरी असेल.” अजयने स्वतःचं अंदाज बांधून उत्तर दिले.
” असे काही नाही. आम्ही सुद्धा वटपौर्णिमाच साजरी केली पण आमच्या पद्धतीने.” अजयचे बोलणे तिच्या कानावर पडले तसे, नाकातली नथ काढता काढता तिने आतूनच आवाज दिला.
” ती सांगेल म्हणाली न तुला … तिला आधी पोहे दे. तिचा नाष्टा झाला की तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल.” त्याच्याकडे उत्तराच्या अपेक्षेने बघणाऱ्या आईला त्याने समजावले.
बेलाने फ्रेश होऊन पोह्यांवर मस्त ताव मारला नी मोबाईल घेऊन आरामात सोफ्यावर येऊन बसली.
” अग बेला, तू सांगणार होतीस न तुझ्या पुजेबद्दल?” न राहवून आईने पुन्हा उत्सुकतेपोटी विचारले.
” हो एकच मिनिटं आई. मी आधी हे फोटोज् ग्रूपवर शेअर करते अन् मग तुम्हाला सांगते.”
“बरं ”
“हं बोला आता. तुम्हाला काय विचारायचे होते ते?” निवांत होत बेलाने आईंना विचारले.
” तेच तू वडाची पूजा केली. पूजेचे सामान, वाण वैगरे काही न नेता कशी काय केलीस?”
” सांगते. त्या आधी मला सांगा, आज आपल्या कमलाने सुट्टी का घेतली?” बेलाने आईंच्या प्रश्नांलाच प्रश्न केला.
“आज तिला वडाची पूजा करायची होती म्हणून.”
” अन् मागच्या पंधरवड्यात सुद्धा तिने दोन दिवस सुट्टी घेतली होती. ती कशासाठी?”
” नेहमीचेच कारण. तिच्या नवऱ्याने दारु पिऊन तिला मारले होते. यावेळी डोळा सुजला होता म्हणून.”
” तरीही ती अशा नवऱ्यासाठी आज दिवसभर उपवास करून, तो सात जन्मासाठी मिळावा म्हणून वडाला फेरे मारणार. पटते का तुम्हाला?”
” खरंतर नाही पटतं. पण आपले सण, चालत आलेल्या परंपरा, रूढी आहेत, त्या जपल्या पाहिजेत असेही वाटते.”
” हो. त्या जपल्या पाहिजेत, परंतु डोळ्यावर पट्टी बांधून त्याचे अनुकरण करायलाच हवे का?”
” खरं सांगू का मलाही ह्या गोष्टी खटकतात. पण प्रत्येकाच्या श्रध्देचा किंवा सवयीचा भाग म्हणून कोणाला काही बोलता येत नाही.”
” आई तुम्हाला पुराणातली सत्यवान सावित्रीची कथा माहीत आहे नं?
ज्येष्ठ महिन्यातील दाहकतेमुळे मूर्च्छित पडलेल्या पती सत्यवानाला वाचवण्यासाठी, सावित्री पतीला वडाच्या झाडाखाली झोपवते आणि त्याचे प्राण वाचवते. कारण वडाचे झाड, इतर सर्व झाडात सर्वात जास्त ऑक्सीजन म्हणजे प्राणवायू सोडते. तसेच वडाचे झाड जास्तीत जास्त पाणी शोषत असल्यामुळे, या झाडाखाली गारवाही असतो म्हणून डेरेदार वडाच्या सावलीत दाहकता जाणवत नाही.
ही पुराणातील कथा जवळजवळ सर्व बायकांना माहीत असूनही, बायका आपल्या सोयीसाठी त्याच्या फांद्या तोडतात. ज्यामुळे पर्यावरणातील समतोलपणा बिघडतो. हे तरी तुम्हाला पटते का?
बरे आता सद्या सगळीकडेच ग्लोबल वॉर्मिगचे परिणाम आपण भोगतोय याचाही कोणी विचार करत नाहीत.” बेला सांगत कमी आणि प्रश्नच जास्त विचारत होती.
” खरं आहे ग बाई तुझं. वर्तमानपत्रामधल्या बातम्या वाचते ना मी. काही ठिकाणी किती उष्माघाताचे बळी जातायत ते.” आईनांही तिचे म्हणणे पटले.
” म्हणूनच आम्ही आजच्या दिवशी वृक्षरोपण करून वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली. अशा पुजेमुळे मला माहित नाही, नवरा सात जन्म मिळतो की नाही, परंतु पुढच्या सात पिढ्यांना तरी चांगल्या आणि निरोगी वातावरणाची सोय होईल हे नक्की.
” किती सुस्त्य उपक्रम होता तुमचा! परंतु तुम्ही एवढ्या भारी साड्या नेसून मातीत हात घातले? खरचं कौतुकचं आहे तुमचं!” आईंने नवल वाटून विचारले.
” नाही आई. ज्यांना इच्छा होती त्यांनीच मातीत हात घातले. पर्यावरणाची काळजी घेणाऱ्या एका स्थानिक ग्रूपची मदत घेऊन आम्ही वृक्षरोपण केले. त्यांच्याकडे काही कुशल माळी होते. त्यांनी जिथे रोपं लावायची होती तिथे आधीच खड्डे खणून ठेवले होते. आमच्या हातांनी ती रोपे आम्ही खड्यात लावली. त्यांनी त्यावर खत, माती, पाणी टाकले. ते वाहून जाऊन नये म्हणून एक गोल आळे सुद्धा त्यात ठेवले होते. त्याबद्दल मलाही माहित नव्हते. यामुळे रोपं कशी लावायची याची शास्त्रशुद्ध माहिती सुद्धा आम्हाला मिळाली.”
” पण बायका पूजा सोडून झाडे लावायच्या कार्यक्रमाला तयार कशा काय झाल्या? ”
” त्यासाठी आम्ही बऱ्याच व्हॉट्सॲप ग्रूपवर आयोजित केलेल्या कार्यक्रमाची रूपरेषा सविस्तरपणे पोस्ट केली होती. आम्ही स्त्रियांसाठी काही स्पर्धा ठेवल्या होत्या. त्यात बेस्ट ट्रेडिशनल कॉस्च्युमसाठी सुद्धा खास बक्षीस ठेवले होते.” बेला अगदी उत्साहात तिच्या उपक्रमाबद्दल माहिती सांगत होती.
” म्हणजे उपक्रमाच्या निमित्ताने बायकांनी त्यांची नटण्याची हौस तर भागवलीच आणि वेगळ्या पद्धतीने सण साजरा करून परंपराही चालू ठेवली. त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकले तर थोडीफार का होईना जनजागृती होईल अन् पुढच्या वेळेला फांद्या तोडून नेणाऱ्या बायकांची संख्या कमी होईल. असेच म्हणायचे आहे न तुला?” उपक्रमाचा मुख्य उद्देश कळल्याच्या आविर्भावात आईंनी बेलाला विचारले.
” अगदी बरोबर. ज्या बायकांना पूजा करायची होती, त्यांनी ती नुकत्याच लावलेल्या वडाच्या रोपट्याची नेहमीप्रमाणे पूजा केली. एकमेकांना हळदकुंकू लावून वाण वाटले. पण यावेळी सर्वांनी एक शप्पथ सुद्धा घेतली की यापुढे पर्यावरणाची हानी होईल असे कुठलेच काम करणार नाही आणि कोणाला करू देणार नाही. शिवाय आज बायकांनी वाण म्हणून आणलेले आंबे, जांभळे खाऊन झाल्यानंतर, त्यांच्या बिया सुद्धा जमा करून ठेवायला सांगितले आहे. त्याचाही उपयोग आम्ही रोपे तयार करण्यासाठी करणार आहोत. ”
” अरे व्वा! खूपच छान. म्हणजे निसर्गाचे देणं निसर्गाला पुन्हा अर्पण केले की निसर्गही आपल्याला भरभरुन देईल.”
” मग आहे की नाही आमची सुद्धा ही वडाची पूजा?” भुवया उडवत तिने अजयला आणि आईंना विचारले.
” हो ग बाई. ही खऱ्या अर्थाने वडाची पूजा म्हणायला हवी. खरचं प्रत्येक काळात त्या त्या काळानुसार बदल घडवायला सावित्री जन्माला येते. जशी एक सावित्री ज्योतिबा फुले, जी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणासाठी झटली. तशी तू ही आजच्या पिढीची सावित्री काळानुसार सणाचे स्वरूप बदलण्याची क्रांती घडवू पाहतेय.” आईंच्या डोळ्यात आपल्या सुनेबद्दल आभिमान दिसत होता.
” बेला खरचं तू माझी पत्नी आहेस याचा मला अभिमान वाटतो. तू येण्याआधी उगीच मी आईला, तूही अंधश्रद्धाळू आहेस असे म्हणालो. खरचं चुकलो मी. मला माफ कर.
पर्यावरणाचा विचार करून, शक्य असेल तिथे तू कार न नेता सायकल घेऊन जातेस. प्रत्येक वेळी बाहेर पडताना, प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळण्यासाठी कापडी पिशवी घ्यायला तू विसरत नाहीस. तुझ्या छोट्या छोट्या गोष्टीतून तू किती जागरूक नागरिक आहेस याची प्रचिती येते.” अजयने आपली चूक मोठ्या मनाने मान्य केली.
” अशी सावित्री प्रत्येक घरात जन्माला यावी आणि प्रत्येक सत्यवानाने ती मिळावी म्हणून व्रत करायला हवे असेच मी म्हणेल.” सासूने आपल्या सुनेची बाजू घेत मुलाला सुनावले.
” मला अगदीच मंजूर आहे आईसाहेब!” अजय हसत म्हणाला.
” अग मग बेस्ट ट्रेडिशनल कॉस्च्युमसाठी बक्षीस कोणाला मिळाले?”
“ओळखा पाहू कोणाला मिळाले असेल? मला तरी नक्की नाही कारण मी ऑर्गनाईज टीम मध्ये होते.”
” मग कोणाला मिळाले? ”
” अर्थात आपल्या कमलाला? थांबा मी तिचे फोटो दाखवते तुम्हाला.”
” काय सांगतेस, ती सुद्धा तुमच्या सोबत होती?” आईंने मोठा आ वासला.
” हो. आज तिने, नवरा या जन्मी सुधारला तरच पुढच्या सात जन्मी मिळू दे अशी प्रार्थना केली. लवकरच तिच्या नवऱ्याला आम्ही व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाणार आहे.”
” खरचं ग किती गुणाची तू! अशी सून मला सात जन्म मिळावी म्हणून मीही देवाकडे प्रार्थना करेन.” आईंने तिच्या गालावर हात फिरवत तिचे मनापासून कौतुक केले.
©® विद्या थोरात काळे “विजू”
प्रस्तुतकर्ता: मधुकर सूर्यवंशी नासिक