#अँनिवर्सरी…
#अँनिवर्सरी…
*घरातला पसारा आवरता आवरता अनुचे घड्याळ्याकडे लक्ष गेले. “अगं बाई!५ वाजले सुद्धा..! ती स्वतःशीच उद्गारली..अभय ऑफीसमधून यायची वेळ झाली होती..तासाभरात तो येऊन हजर होईल आणि अनु अनु अशा हाका मारत सगळे घर डोक्यावर घेईल.. एका मुलाचा बाप झालाय पण अजून याचेच पोरपण संपले नाहीये..सगळ्या गोष्टींसाठी अनु समोर लागते ..सासूबाई कधीकधी चेष्टा करतात की लेकरु समजूतदार झालय पण त्याचा बाबा मात्र लहान होत चाललाय दिवसेंदिवस आणि हट्टीसुद्धा…. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस ..त्या दोघांना एकमेकांच्या बरोबर वेळ घालवता यावा म्हणून तिच्या सासूबाई सुजय ला म्हणजे तिच्या लेकाला घेऊन आपल्या लेकीकडे राहायला गेल्या होत्या.. दुपारीच त्या गेल्यामुळे घरात अगदी शांतता होती…
दरवाजाची बेल खणखणीत वाजली.त्या आवाजाने ती तंद्रीतून बाहेर आली..अभयच असणार..अशी बेल वाजवायची पद्धत त्याचीच….शांतपणा कसा तो माहीतच नाही याला असे मनाशी म्हणतच अनु दार उघडायला गेली..दार उघडेस्तोवर धीर नसल्यासारखे त्याने बेलवर बोट दाबून धरलेले..” काय हे अनु ? अग किती वेळ दार उघडायला?…! दार उघडताच त्याची सरबत्ती सुरु झाली..हातात चार पाच पिशव्या,ऑफीस बॅग,डब्याची पिशवी अश्या अवतारात अभय दारातून आत येत तिला म्हणाला ..! “अरे हो हो ! जरा श्वास घे..किती घायकुतीला येतोस..! येतच होते मी पण तुला अजिबात धीर नाही नं !..असे म्हणत त्याच्या हातातल्या पिशव्या घेत ती आत जायला वळली..
अभय फ्रेश होऊन येईपर्यंत तिने चहा तयार ठेवला..त्याला आवडतो तसा आलं घातलेला कडक वाफाळता…तो थेट किचन मधे येऊन खुर्ची ओढून डायनिंग टेबल जवळ बसला…बशीमधे बिस्कीटे काढून तिने त्याच्याकडे बशी सरकवली..चहाचा पहीला घोट पोटात जाताच तो सुखावला..”आहाहा !अनु संध्याकाळी दमून आल्यावर असा फक्कड चहा मिळाला की सगळा शीण नाहीसा होतो बघ!.. “क्या बात है बढिया!.. और एक कप हो जाए!.. त्याच्या कपात चहा ओतणार्या अनुकडे बारकाईने बघत त्याने तिला प्रश्न केला,”कसा गेला आजचा दिवस? काय काय केलस? आणि चिरंजीव दिसत नाहीयेत कुठे आजीबरोबर देवळात का?..! “अरे जरा चहा तरी शांतपणे घेशील का प्रश्न च विचारत बसशील?अनुने उत्तरा ऐवजी त्यालाच प्रश्न केला.. त्यावर त्याने नुसताच तिच्याकडे प्रश्नार्थक कटाक्ष टाकला..मग तिने आजी आणि नातू आत्याकडे गेलेत आणि दोन दिवसांनी येणार आहेत हे सांगितले त्याला..
“व्वा! म्हणजे आपण दोघच आहोत घरी य्येस्स!!..खुर्चीतून पटकन उठून उभे राहात तो उद्गारला..”चल चल उठ पटकन् राणी तयार हो,आपण बाहेर जाऊया आणि मस्तपैकी भटकून आईस्क्रीम खाऊन परत येऊया चालेल??…! त्याच्या त्या ओसंडून वाहणार्या उत्साहाकडे अनु पाहातच राहीली..हा तस्साच आहे अगदी लग्नाआधी होता तसा आणि आता लग्न होऊन सहा वर्षे झाली तरीही..आणि आपण ..आपण मात्र खूप खूप बदललो या जाणार्या दिवसांगणिक..गेल्या वर्ष भरात तर जास्तच..का सगळ्याच स्त्रीयांसाठी संसारात पडल्यावर बदल अपरीहार्य असतो?..! लग्नाआधीच्या त्याच व्यक्ती लग्नानंतर किती बदलत जातात..पुरुष फारसे बदलत नाहीत पण स्त्री ला मात्र लग्नानंतर अनेक बदल स्विकारावेच लागतात..नविन जबाबदार्या त्यांचे गांभिर्य,नवी नाती त्यांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षा ,संसारासाठी केलेले कष्ट,आला गेला पैपाहूणा,सणवार या सगळ्या चक्रात गरगरायला होतं ..स्वतःकडे लक्षद्यायला फुरसतच नसते..स्वतःसाठी जगणे किंवा स्वतःच्या आनंदासाठी काही करणे विसरुनच जाते स्त्री ..आणि जेव्हा जाणीव होते तेव्हा वेळ निघून गेलेली असते..
“अहो मॅडम कुठे हरवलात? मी तुम्हाला केव्हापासून हाका मारतोय ..! तिच्यापुढे टिचक्या वाजवत अभय तिला हलवत विचारत होता….विचारांच्या आवर्तातून बाहेर येत ती त्याच्याकडे पाहून क्षिणपणे हसली..”अग होतेस ना तयार?जायचं नं ?..!त्याने परत विचारले…”अं नको रे नको जाऊया!.. इथेच घरीच आपल्या बागेत बसुया निवांत..बाहेरची गर्दीगोंगाट नको वाटतो..त्या पेक्षा इथे शांततेत बसुया चालेल प्लीज?..! तिने आर्जवी नजरेने त्याच्या कडे बघत विचारले.. तिच्या चेहर्याकडे शोधक नजरेने पाहात त्याने होकारार्थी मान डोलावली..”चालेल पण माझी एक अट कबुल करावी लागेल तुला..! तो म्हणाला ..”आता कसली अट?..!”अट ही आहे की तु आत्ता आपल्या लग्नातला शालू नेसून सगळे दागीने घालून तयार व्हायचस आणि मी बोलावल्यावरच बागेत यायचं झोपाळ्याजवळ ..तो पर्यंत डोकवायच पण नाही बाहेर कबुल??..! त्याचे बोलणे संपवून उत्तरासाठी तो तिच्याकडे बघु लागला..”अरे पण आत्ता?..तिने विचारले. “आत्ता काय गरज आहे त्याची?…! “प्लीज ना अनु .माझी ईच्छा माझा हट्ट समज हवं तर..! पण प्लीज हो ना तयार तेव्हासारखी…मला तुला बघायचय तसच परत!..होशील ना राणू तयार माझ्या साठी प्लीज…! त्याच्या आनुनयापुढे तिचा नकार टिकलाच नाही..पाण्यात पडलेल्या बर्फाच्या खड्यागत विरघळून गेला.. त्याला होकार देत ती तयार होण्यासाठी बेडरुम मधे गेली..
लग्नातली हिरव्यागर्द रंगाची पैठणी नेसून ती आरशापुढे दागिने घालायला बसली..एक एक दागिना म्हणजे एक एक आठवणींचा कोषच जणू..ही मोहनमाळ आजीची,आईने केलेला लक्ष्मीहार, सासूबाईंनी घातलेले बिल्वर ,तोडे, लग्नातल घसघशीत मंगळसुत्र, वाक,झुबे अगदी सालंकृत सजली ती..आजेसासूबाईंनी दिलेली सोन्याची वेणी आणि अग्रफुल ते मात्र तिने हातात घेऊन नुसतेच बघून ठेवून दिले पण त्यांनी दिलेली नथ मात्र आवर्जून घातली..तयार होऊन सौभाग्यलंकार लेवून ती देवापुढे नमस्कारा साठी वाकली..सांजवात करुन निरांजन उजळलन..उदबत्ती लावून ओवाळत असतानाच अभय तिला शोधत तिथे आला तिला पाहताच श्वास रोखल्यासारखा स्तब्ध होऊन मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्याकडे बघू लागला..त्याच्या तश्या बघण्याने अनु लाजली,मोहरली..लाजून चूरचूर झाली..आपसुकच दृष्टी खाली वळली तिची… भानावर येऊन अभय ने तिच्याजवळ येत तिचा सलज्ज चेहरा ओंजळीत धरला आणि तिच्या कपाळावर हलकेच ओठ टेकले..मग जोडीने देवाला नमस्कार करुन एकमेकांसाठी दिर्घायुष्याची कामना केली..अनुला त्याने डोळे बंद करुन हात धरुन बागेत आणले..झोपाळ्याजवळ येईपर्यंत डोळे न उघडण्याची सक्त ताकीद दिली….
अनुने डोळे उघडताच सरप्राईज असे म्हणत त्याने तिला झोपाळ्यासमोर आणले..अनु नादावून बघतच राहीली..झोपाळ्याच्या कडांना पूर्ण मोगर्याचे गजरे बांधले होते..वरच्या बाजूला एक आडवी दोरी बांधून त्यालाही पूर्ण गजरे बांधून मधेमधे गजरे खाली सोडलेले होते..गुलाबाच्या पाकळ्यांमधे मोगर्याची फुले मिसळून झोपाळ्याच्या बैठकीवर त्यांची पखरण केलेली होती…समोर ठेवलेल्या टिपायवर तिची अत्यंत आवडती आंबाबर्फी आणि कोथिंबीर वडी नजाकतीने प्लेटमधून मांडलेली होती..बाजूला कॅसेटप्लेअर वर हरीप्रसादजींची बासरीची धून वाजत होती…मोगरा आणि बासरी तिचे विकपाईंट..तिला दाटून आल अगदी..इतकी सुगंधी सुरेल अविस्मरणीय संध्याकाळ तिला आयुष्यभर लक्षात राहणार होती..”कस वाटलं सरप्राईज? अभय ने विचारताच डोळ्यातले दाटून आलेले आनंदाश्रू पुसत तिने मस्त अशी खूण करत खुशीची पावती दिली..
अभय ने हात धरुन तिला झोपाळ्यावर बसवले..तिच्या मांडीवर डोके ठेऊन तो पहूडला..अनु निःशब्दपणे त्याच्या केसांतुन आपला हात फिरवू लागली.. पौर्णिमा जवळ आल्याने छान चांदणे पडले होते..हवा आल्हाददायक होती..चित्तवृत्ती फुलवणारी..अभय ने अनुला आग्रह केला गाणे म्हणण्याचा..”अनु तु किती छान गायचीस ग! आवाज गोड आहे तुझा..ते आपल्या दोघांचेही आवडते गाणे ते म्हण ना !! लग जा गले ते…तुला आठवतेय अनु किती वेळा मी असा तुझ्या मांडीवर डोके ठेऊन पहूडायचो डोळे मिटून!.. आणि तु अशीच माझ्या केसात हात फीरवत ते गाणे म्हणायचीस!…आठवतय? “हो न आठवायला काय झालय? ..!माझे सगळे केस मोकळे करुन तु असे चेहर्यावर ओढून घ्यायचास!..”हो ग ! तुझ्या त्या लांबसडक दाट केसांवरच तर भाळलो ना मी! तुला जेव्हा मामाकडे आल्यावर शेजारघरी न्हाऊन केसांचा पिसारा पाठीवर मोकळा टाकून प्राजक्ताची फुले वेचतांना प्रथम बघितली तेव्हाच विकेट पडली माझी!.. मनातच भरलीस माझ्या तु…! निश्चय केला लग्न करीन तर हीच्याशीच…काय छान काळ होता ग तो!..आठवणीत हरवलेला अभय चेहर्यावर पडणार्या अनुच्या अश्रुंनी वर्तमानात आला..”हं हं अनु रडतेस कशाला? आपलं ठरलय ना रडायच नाही म्हणून !..मग वेडाबाई पुस ते डोळे.. आणि म्हण ना गाण प्लीज!अभय चा हीरमोड होऊ नये ..आपल्याला आनंदी ठेवायला तो किती धडपडतो..केवळ त्याला बर वाटाव म्हणून कातर आवाजात अनुने गायला सुरवात केली..
“लग जा गले के फीर ये हँसी रात हो ना हो! शायद फीर इस जनम में मुलाकात हो न हो!!
हमको मिली हैं आज ये घडीयाँ नसिबसे!जी भरके देख लीजीए हमको करीबसे! फीर आपके नसिबमे ये रात हो न हो!!
या ओळीला मात्र तिचा संयम संपला आणि आतापर्यंत ओढून ताणून आणलेल चंद्रबळ संपून ती अभय च्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडायला लागली..”का का हे माझ्या च वाट्याला का आलय? मला जगायचय रे अजून अभय!.. तुझ्या सोबत आपल्या पिल्लासोबत.. ही जीवघेणी कॅन्सरची व्याधी माझ शरीर पोखरतेय रोज..मला माहीतेय लास्ट स्टेज चा आहे ! इतकी औषध झाली पण नाही रे नाहीच गुण आला..कुणाची दृष्ट लागली रे आपल्या सुखाला? आपलं पिल्लू कस होणार रे त्याच माझ्या शिवाय? मला खूश ठेवण्याची तुझी धडपड कळते मला! मला वाईट वाटू नये ,मी खचू नये म्हणून तु आणि आई नाॅर्मल असल्याच नाटक करता कळते रे मला .. सग्गळ कळतं…ज्या केसांनी तुला वेड केल ते नावाला पण उरले नाहीत..तरीही तु आज मला जेव्हा सगळं सजायला सांगितलस तेव्हा मला कमी जाणवली पण तु सहज घेतलस रे सगळं !..कुठून इतका शांतपणा सहजभाव कमावलास? बराच वेळ अनु रडत होती आणि अभय न बोलता तिला थोपटत होता..
“अनु राणी झालीस का शांत? आपल ठरलय ना आता या आजाराचा सकारात्मकतेने सामना करायचा म्हणून!.. मग मला वचन दे की परत असा तोल जाऊ देणार नाहीस.. आज आपली अँनिवर्सरी आहे ना? मग हे क्षण आपण आनंदात घालवायला हवेत हो नं!..आणि डाॅक्टरांनी काय सांगितलय आपल्याला..बी पाॅजीटिव्ह! मन सशक्त होऊ दे तुझे..आपण प्रयत्नात कमी पडतोय का नाहीना? मग त्याच्या वर विश्वास ठेवून त्याच्या चरणी लीन होऊया ना! श्रद्धा असली की चमत्कार पण होतात ग राणू… फक्त तु सकारात्मक विचार कर..! काय पटतय ना?..! यावर शांत झालेल्या अनुने होकारार्थी मान डोलावली…”मग झाल तर..या सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे आणि असेन कायम राणी खात्री बाळग!..आता हस बघू थोडी!! यावर अनु ने त्याच्या खांद्यावर डोके टेकले.डोळे बंद करुन पायाने हलकेच झोपाळ्याला रेटा दिला..झोपाळा मागेपुढे हलकेच झूलू लागला..निःशब्द रात्र चढत होती आणि मोगर्याच्या मंद आल्हाददायक सुवासात कॅसेटप्लेअर वरच्या गाण्याच्या लकेरी आसमंतात घुमत होत्या…
“जब कोई बात बिगड जाए जब कोई मुश्कील पड जाए तुम देना साथ मेरा ओ हमनवाज! ……….
समाप्त..
अज्ञात लेखकास सादर समर्पित