सत्संगाची आस आणि सुबत्तेचा फास ©सदानंद देशपांडे
सत्संगाची आस आणि सुबत्तेचा फास
मनुष्यजन्म हे मानवालाच पडलेले एक कोडे आहे.
सुबत्ता श्रेष्ठ की पुण्य श्रेष्ठ, श्रीमंती की मुक्ती या कोड्यात अडकलेल्या मानवी जीवनाला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात या ना त्या कारणाने हे सगळं हवंसं वाटतं. पुण्याच्या दारात पापे गळून पडतात आणि श्रीमंतीच्या दारात दारिद्र्य गळून पडते या सरळ साध्या समजात मानव पुरता अडकला आहे. जो गरीब आहे त्याला श्रीमंत व्हायचंय. जो श्रीमंत आहे त्याला आनंद हवा आहे. पण आनंदी कुणीच नाही. आपल्याला नक्की काय हवंय , स्थैर्य म्हणजे काय, सुख कशात आहे याचा शोध लागेपर्यंत म्रुत्यू आयुष्याचे दार ठोठावतो.
नुकत्याच घडलेल्या आणि काळजाला चरे पडतील अशा घटना वाचायला मिळाल्या. श्रीमंती घर उबवू लागली की माणसं सुख शोधायला बाहेर पडतात. खिसा गरम असतो पण आत्मीय आनंद मिळत नाही. शाश्वत सुख कशात आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. मग ते शोधायला माणसं बाहेर पडतात. कोणी धबधबे शोधतं तर कोणी निसर्गाच्या मुळाशी जाऊन बसतं.
पाणी आणि आग या दोन्ही नैसर्गिक अवस्थेत आहेत तोपर्यंत आकर्षक वाटतात. पण निसर्गावर मानव करत असलेले आघात तो कधी विसरत नाही आणि मग हीच नैसर्गिक अस्र घातक होतात.
लोणावळा, खंडाळा , ताम्हिणी येथे सुख शोधायला आलेल्यांना निसर्गाच्या रौद्र रूपाची कल्पना करता येत नाही आणि मग नद्यांमध्ये व डोंगरदऱ्यांमध्ये त्यांना त्यांचा अनुभव येतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
मित्रहो, ईश्वर ह्रदयात असतो पण त्याची उपासना करताना मानव सुखलोलुपतेकडे नकळत ओढला जातो. सत्संगांच्या रूपेरी कड्यांमध्ये बनावटीचा काळा ढग दिसेपर्यंत वेळ निघून गेलेला असते. अध्यात्म, उपासना, भक्ती या निरागस रूपामध्ये कधीकधी लबाडीचा काळा राक्षस दडलेला असतो.
परमपूज्य श्री. गोंदवलेकर महाराज, शेगावीचे श्री. गजानन महाराज, संत गाडगेबाबा या अलिकडच्या काळातल्या मानवरूपी देवांनी मन:शांतीकरता नामस्मरण, धारणा असा सोपा मार्ग भक्तांना दाखवला. पण समाजातल्या काही भोंदूबाबांनी समाजाचा हाच निरागस स्वभाव ओळखून आपली दुकाने थाटली व चांगल्या आयुष्याची स्वप्नं शोधणाऱ्या भोळ्या भक्तांना लुबाडायला सुरुवात केली. उत्तरप्रदेशातल्या हाथरस येथे कालच घडलेल्या घटनेने तरी आता निरागसतेचे डोळे उघडतील असे कोणाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे. ‘सत्संग’ करावा पण तो कोणाचा? नेकटाय आणि डोळ्यावर रंगीबेरंगी चष्मा लावून फिरणाऱ्या भोंदू बाबाचा? हजारो लोकांची गर्दी सत्संगाला येते काय आणि तिथल्या मंडपात शेकडो भक्तांचा, ज्यात महिला आणि मुले मोठ्या प्रमाणावर आहेत ते अडकून, चेंगरून त्यांचं बहुमूल्य आयुष्य संपतं काय. फारच विदारक ! सत्संग घडवून आणणारे त्या भोंदू बाबाचेे साहाय्यक आणि स्वत: तो नारायण साकार हरी नावाचा बाबा त्यानंतर गायब होतात व मोबाईल फोन बंद करून ठेवतात. अध्यात्म, पाप पुण्य, मुक्ती या शब्दांचा बाजार मांडून भक्तांचे आर्थिक तर कधीकधी महिलांचं लैंगिक शोषण करत स्वत:चं भोगवादी रूप लपवून बेमालूमपणे समाजात वावरत राहतात. राजकीय शक्तीही यांच्या पाठीशी असतेच. कधीकधी त्यांच्याकरता व्होटबँक बनून गडगंज होतात आणि गरीब जनता उज्ज्वल आयुष्याची आणि भविष्याची स्वप्नं पाहत स्वत:ची फरफट करून घेते आणि सरतेशेवटी हाती काहीच लागत नाही. मिळते फक्त निराशा, मनस्ताप आणि नशिबाचे भोग काही सुटत नाहीत.
©सदानंद देशपांडे
छान लिखाण सदानंद