वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

जगन्नाथाची रथयात्रा आणि मी, आपण अन् सगळेच! ✍🏻 रवि वाळेकर :

🌺||श्री ॐ गणेशायनमः||🌺
🌺।।ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः।।🌺
जगन्नाथाची रथयात्रा आणि मी, आपण अन् सगळेच!

✍🏻 रवि वाळेकर :
ओडिशा मोठे लोभसवाणे राज्य आहे. इथल्या लोकांची श्रद्धा, भाविकता मोहून टाकते. महाराष्ट्राच्या कमीत कमी चौपट सण येथे साजरे होतात. महाराष्ट्रात साजरे होणारे बहुतांश सगळे सण तर इथे आहेतच, पण मराठी माणसाला माहितीही नसणारे बरेच हिंदू सण इथे बघायला मिळतात. नुकताच पार पडलेला ‘रोजोपर्बो’ सण त्यातलाच! शब्दांच्या पहिल्या अक्षराला ‘ओ’ लावायच्या तसेच ‘व’ चा उच्चार ‘ब’ असा करण्याच्या ओडिशी पद्धतीमुळे ‘रजपर्व’ या संस्कृत शब्दाचा उच्चार इथे ‘रोजोपर्बो’ असा होतो! (तसाच प्रकार माझ्या नावाबद्दलही होतो! सरळसाध्या ‘रवि’ या माझ्या नावाचा उच्चार इथे ‘रोबि’ असा करतात!)
रजपर्व म्हणजे पृथ्वीच्या मासिक पाळीचा (वार्षिक) सण! सारे ओडिशा या चार दिवसांत चक्क धरतीमातेच्या सेवेत खपते. या कालावधीत खणणे, नांगरणे, खुरपणे इतकेच काय जमीनीला साधे ओरखडणे सुद्धा मंजूर नसते. या चार दिवसांच्या काळात लोक धरतीमातेची इतकी काळजी घेतात की तिला त्रास होऊ नये म्हणून हे चार दिवस शेतात (नाईलाजाने जावेच लागले तर) अनवाणी जातात!
मराठी लोकांसाठी इथला असाच एक अनोळखी सण म्हणजे ‘बालीजात्रा’. दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेस हा सण सुरू होतो. हजारो लोक समुद्रकिनारी, नदीकाठी, तळ्यांजवळ जमतात आणि अक्षरशः लाखो कागदी होड्या पाण्यात सोडतात! बऱ्याचदा या होड्या लाकडी (आजकाल थर्माकोलच्या) असतात, त्यात दिवे पेटवून ठेवलेले असतात. जवळपास दोन सहस्रकांचा इतिहास आहे या उत्सवाला! मागच्या वर्षी कटक येथील शाळकरी मुलांनी एक नवाच इतिहास घडवला आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले. २२ शाळांच्या २२०० विद्यार्थ्यांनी ३५ मिनिटांत २२,००० कागदी होड्या इथल्या महानदीत सोडल्या! या सणाच्या नावातील ‘बाली’ या शब्दात खरोखरच्या ‘बाली’ या इंडोनेशियातील राज्याचाच उल्लेख आहे! एकेकाळी इथल्या लोकांचे आजच्या इंडोनेशियाशी (तेव्हाच्या ‘यवद्विप’शी) व्यापारी संबंध होते आणि याच दिवशी ते ओडिशातील (तेव्हाच्या ‘कलिंग’ राष्ट्रातील) पाराद्विप या बंदरावरून बालीकडे कूच करायचे! या व्यापारांचा समुद्रावरचा प्रवास निर्विघ्न व्हावा आणि ते यशस्वी होऊन सुखरूप परत यावे, या साठी त्यांचे कुटुंबीय जगन्नाथाची करूणा भाकायचे. तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली! ज्या स्त्रियांना अशी होडी बनवून प्रत्यक्ष नदीत वा समुद्रात सोडणे शक्य होत नाही, त्या या काळात अंगणात होडीची रांगोळी काढतात, आणि त्यात जगन्नाथाचे चित्र रेखाटतात!
जगन्नाथाचे आस्तित्व इथे सगळीकडे पदोपदी जाणवते. सकाळचा पहिला नमस्कारही ‘जय जगन्नाथ ‘ या जयघोषानेच होतो. आपल्यासारखे ‘हाय’, ‘हॅलो’,’गुड माॅर्निंग ‘,’नमस्कार’, ‘नमस्ते’ ऐवजी सर्वसामान्य ओडिया व्यक्ती ‘जय जगन्नाथ’ म्हणने पसंत करतात. कृष्णभगवान जगन्नाथाच्या रूपात ‘जगन्नाथ पुरी’ येथे वास्तव्य करतात, याची प्रचंड श्रद्धा आहे, नव्हे तसा विश्वासच आहे. ही श्रद्धा, हा विश्वास पुरीच्या मंदिरात तसा वर्षभर दिसतोच, पण त्याचा मोठा आविष्कार होतो तो आजच्या दिवशी! आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीयेला! या दिवशी महाप्रभू (जगन्नाथाचे इथले लाडके नाव) प्रत्यक्ष मंदिराबाहेर पडून भक्तांना दर्शन देतात! सोबतीला मोठे बंधू बलभद्र आणि धाकटी बहीण सुभद्रा हे ही असतात.

भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी जगन्नाथ पुरी येथे ओडिशातील , देशभरातील लाखो भाविक जमतात. गेल्या काही वर्षांपासून परदेशी भाविकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी दहा लाखांवर भाविक दर्शनासाठी पुरी येथे येतील, असा अंदाज आहे. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुरी शहराच्या चार किलोमीटर दुरूनच वाहनांना बंदी घातली जाते. एवढ्या गर्दीत आणि एवढी पायपीट करूनही लाखो लोक रथयात्रा मार्गाच्या दुतर्फा भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी दोन दोन दिवस आधीपासून ठाण मांडून बसतात! भगवंतांचा थाट असतोच बघण्यासारखा, आयुष्यभर मनाच्या कुपीत जपून ठेवण्यासारखा!
तिघांचे तिन वेगवेगळे रथ! हे रथ भव्यदिव्य असतात. या रथांच्या भव्यतेचे वर्णन काय करावे? भगवान जगन्नाथाच्या रथाची उंची असते ४४.२ फुट! जवळपास चार ते पाच मजले उंच! हे रथ संपूर्ण लाकडाचे असतात आणि दरवर्षी नवे बनवले जातात. या रथांच्या बांधणीत कधीच खिळे वा कुठलाही धातू वापरत नाही. संपूर्ण लाकडी बांधणी. रथ बांधण्याचे काम बरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशीच सुरू होते. शतकानुशतकांच्या परंपरा बदलायचा अधिकार कोणासही नाही. निरनिराळ्या आकारांच्या ८३२ लाकडी तुकड्यांना जोडून हा रथ बनवला जातो. जगन्नाथाच्या रथाला १६ चाके असतात, बलभद्राच्या रथाला १४ तर सुभद्रेच्या रथाला १२. या तिन्ही रथांना रंगीत कपड्यांचे आवरण असते. तिनही कपड्यांची रंगसंगतीही ठरलेली असते. सुभद्रेच्या रथासाठी लाल आणि काळा रंग, बलभद्राच्या रथासाठी लाल आणि निळसर हिरवा, तर जगन्नाथाच्या रथासाठी लाल आणि पिवळा. १२०० मिटर कपडा या आच्छादनासाठी वापरला जातो! या रथांना पुढे प्रतिकात्मक स्वरूपात चार लाकडी घोडे जुंपलेले असतात, पण हे रथ मात्र भाविकच ओढून नेतात! जगन्नाथाच्या रथाला ओढण्याचा मान मिळणे म्हणजे पुर्वजन्माचे पुण्यच! रथ ओढणे तर सोडाच पण रथ ओढण्यासाठी जोडलेल्या दोरखंडाला स्पर्श करण्यासाठीही झुंबड उडते!
स्कंद पुराणात, पद्म पुराणात आणि ब्रम्हपुराणातही उल्लेख असलेली रथयात्रा ‘याची देही याची डोळा’बघायला मिळणेच खूप. त्यात भगवंताच्या रथाला वा रथाच्या दोरखंडाला स्पर्श करायला मिळणे, हेच कित्येक भाविकांसाठी सुखाची अनुभूती असते! सर्वत्र जयघोष चालू असतात, चारही दिशांनी ‘जय जगन्नाथ’, ‘जय जगन्नाथ’ अशा घोषणा ऐकू येत असतात, ढोल नगारे वाजत असतात, मार्गावर लोक फुलांची उधळण करत नाचत असतात, वातावरण भाविकतेने भारून गेलेले असते. पुरीचा राजा (आता, राजसाहेबांचे या पिढीतील वंशज) सोन्याच्या झाडूने रथ आणि भगवान येणार तो मार्ग झाडतात. विधीवत पुजा आटोपून मंत्रोच्चारांच्या घोषात मंदिराच्या सिंहद्वारातून भगवान बाहेर येतात….
इतमामाने आणि आदरपूर्वक भगवंतांची प्रतिमा (मुर्ती) रथात विराजमान होते. भगवान जगन्नाथ ऊर्फ श्रीकृष्ण उर्फ विष्णू एका आठवड्यासाठी मंदिराबाहेर आलेले असतात. पुढचा एक आठवडा ते उत्तर दिशेला असलेल्या गुंडिचा मंदिरात मुक्काम करणार असतात!
जवळपास ३ किलोमीटर दूर असलेल्या गुंडिचा मंदिरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी रथाला पुर्ण दिवस लागतो! परततानाही तसेच. जायला यायला दोन दिवस आणि मुक्कामाचे ७ दिवस, असा ९ दिवसांचा हा सोहळा आहे.
मुळात भगवान मंदिर सोडून आठवडाभर बाहेर राहण्यासाठी का जातात? प्रश्न रास्त आहे आणि त्याची बरीच उत्तरे पण आहेत! काही तार्किक, काही मनोरंजक. मला आवडते ते एक गोंडस कारण. अतिशय श्रद्धा जाणवते त्या तर्कातून. होते असे की मे महिन्याच्या कडक उकाड्यामुळे मंदिराच्या आतमध्ये देवसुद्धा त्रस्त होतात. ते गार पाण्याने अंघोळ करण्याची इच्छा व्यक्त करतात. जेष्ठ महिन्यातील पौर्णिमेला या भावंडांना मंदिराच्या उत्तर-पुर्वेला असलेल्या ‘स्नानवेदी’वर १०८ कलश पाण्याने स्नान घातले जाते! बाहेर उघड्यावर आणि त्यातही थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे तिघे भावंडं आजारी पडतात! मग पुजारी गाभाऱ्यासमोर पडदा लावून वैद्यांकरवी उपचार सुरू करतात. पंधरा दिवसांनंतर तिघांनाही बरे वाटते! ( या १५ दिवसांत भाविकांना मंदिरात दर्शन व्यर्ज असते!). आता या कथेत पुढे दोन फाटे फुटतात. एक तर्क असा की आजारपणातून उठल्यामुळे भगवंतांना हवापालट करायचा असतो. दुसरा तर्क असा की आजारपणात तोंडाची चव गेलेली असल्याने तिघाही भावंडांना जवळच रहात असलेल्या त्यांच्या मावशीच्या हातचा ‘पोडा पिठा’ खायची इच्छा होते, म्हणून ते बाहेर पडतात!

मला फार आवडतात अशा आख्यायिका. व्यवहार वा खऱ्याखोट्याची कसोटी न लावता, अशा आख्यायिका ऐकाव्यात. त्यात मनस्वी निष्पापपणा भरलेला असतो. देवांना मानवासारखेच गरम होणे, त्यांना गार पाण्याने अंघोळ करावी वाटणे, ते माणसांसारखेच आजारी पडणे, त्यांना मावशीच्या हातचा खाऊ खाणे वाटणे, या सगळ्यात एक निरागसता आहे. देवांना त्यांचा पुर्ण मान देऊनही भक्त त्यांना मानवाच्या पातळीवर आणायचाही प्रयत्न करतात.

तिन रथांमध्ये तिघेही विराजमान होतात. सर्वात पुढे बलभद्राचा ‘तालध्वज’ रथ, मध्ये सुभद्रेचा ‘पद्मध्वज’ रथ आणि मागे जगन्नाथाचा ‘नंदिघोष’. भक्तांचा जयघोष आता आकाश फाटेल, एवढा वाढलेला असतो. समोर रथात प्रत्यक्ष भगवान दर्शन देत असल्याने शिगेला पोहोचलेला असतो. सगळे दोरखंडाला भिडतात आणि ताकदीने रथ खेचू लागतात, पण…
रथ तसुभरही सरकत नाही! कितीही अतिरिक्त कुमक मागवली, तरी रथ जागचा हलत नाही. वर्षानुवर्षे असे होते. कितीही ताकत लावा, रथ हलत नाही.
इथे समजते ती एक आगळीच आणि चमत्कारीक प्रथा. प्रयत्नांची शर्थ करूनही रथ हलत नाही म्हंटल्यानंतर दोर पकडणारे भक्त शिव्या देऊ लागतात! देवाचा रथ ओढणारे चक्क जाहिरपणे शिव्या देतात! धक्कादायक आहे ना? पण तसे आहे. धक्का जरा कमी बसतो, ते या शिव्या स्वतःलाच द्यायच्या असतात, हे समजल्यावर! काही जण ‘मी वेडा’,’मी हलकट’ पासून सुरूवात करून स्वतःला पार फुल्याफुल्यांच्या शिव्यांपर्यंत पोहोचतात, आणि रथाची चाके हलायला लागतात!
जेवढ्या भाविकांनी काही वेळापूर्वी रथ हलवायचा अयशस्वी प्रयत्न केलेला असतो, तेवढेच भाविक – हो, तेवढेच – शिव्या दिल्यानंतर मात्र रथ लिलया ओढतात! चमत्कारीक आहे हे. याचे शास्त्रीय कारण काय हे मला माहिती नाही आणि ही प्रथा कधी सुरू झाली, हे माझ्या ओडिया मित्रांना माहिती नाही!
याहुन जास्त आश्चर्य पुढे वाटते. रथयात्रा चालू झालेली असते, लोक जोशात तो अवजड रथ ओढत असतात (देवाच्या प्रतिमेव्यतिरीक्त शंभर एक लोक असतात रथांमध्ये!) चांगली चालू असलेली रथयात्रा एका ठिकाणी आवर्जून थांबते.
रथयात्रा काही वेळ थांबते ती एका मुस्लिम व्यक्तीच्या कबरीपाशी!
सालाबेगच्या कबरीपाशी! (इथले मुस्लिमही कबर न म्हणता ‘सालाबेगची समाधी’ असा शब्दप्रयोग करतात)
एका मुस्लिम व्यक्तीच्या कबरीपाशी चक्क भगवान जगन्नाथ दर्शन देण्यासाठी थांबतात!
एका मुस्लिम सुभेदाराच्या पोटी जन्माला आलेला हा मुस्लिम मुलगा जगन्नाथाच्या भक्तीत लीन झाला. त्याने जगन्नाथावर बरेच अभंग रचले, त्यातले कित्येक आजही ऐकिवात येतात. महाप्रभूंच्या दर्शनासाठी कासावीस होऊन हा भक्त पुरीला येतो, पण मुस्लिम असल्याने त्याला मंदिरात प्रवेश नाकारला जातो! (पुरीला आजही हा नियम लागू आहे. फक्त रथयात्रेच्या काळात हिंदूंव्यतिरीक्त इतर धर्मियांना मंदिरात प्रवेश आणि दर्शनाची परवानगी मिळते) नाराज झालेला सालाबेग कृष्णाच्या आराध्येसाठी पायी पायी वृंदावन गाठतो. तिथे हिंदू साधूंबरोबर कृष्णभक्तीत रमतो. काही दिवस सरतात. रथयात्रा जवळ आलेली असते. रथयात्रेत प्रभूंचे दर्शन शक्य! मग हा पायी वृंदावनहून पुरीला निघतो. रस्त्यात भयंकर आजारी पडतो. चालणेही अवघड. महाप्रभूंचे दर्शन परत वर्षभर टळणार! एक वर्ष खूप मोठा कलावधी. इथे मरण समोर दिसत होते! तो जगन्नाथाची करूणा भाकतो, ‘ हे जगन्नाथा, रथयात्रा सुरू असताना मी येऊ शकत नाहीये. मी प्रयत्न करतोय, पण कृपा कर आणि मी येईपर्यंत पुरीच्या मंदिरात परतू नकोस!’
कहाणी खरी खोटी माहिती नाही, पण १६३४-३५ च्या दरम्यान गुंडिचा मंदिर ते जगन्नाथ पुरी मंदिर या परतीच्या प्रवासात रथ थांबला. हजारो लोकांनी प्रयत्न करूनही रथ थांबला. हलेचना!
नंतर सालाबेगने याच स्थळावर बसून जगन्नाथावर अनेक अभंग, भक्तिगीते लिहिली आणि वारसांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर मला याच जागी पुरायचे आणि माझी समाधी याच जागी बांधायची! मृत्योपरांत काय होते माहिती नाही, पण माझा आत्मा टिकलाच, तर मला दरवर्षी जगन्नाथाचे दर्शन होईल!
या अशा भक्तासाठी जगन्नाथ दरवर्षी त्याच्या कबरीपाशी थोडा वेळ थांबून त्याला मनसोक्त दर्शन देतात!
गुंडिचा मंदिरात पोहोचोस्तर उशीर झालेला असतो, मग भगवान जगन्नाथ तिथे प्रवेश करत नाहीत. ते रात्री रथातच झोपतात आणि दुसऱ्या दिवशी गुंडिचा मंदिरात प्रवेश करतात.
या मंदिरात प्रभूंचे जे दर्शन होते, त्याला अतिशय शुभ मानले जाते. याचे कारण प्रभू जगन्नाथ सहलीला आल्यामुळे अतिशय ‘रिलॅक्स’ आणि चांगल्या ‘मुड’ मध्ये असतात! इथले एक वैशिष्ट्य म्हणजे फक्त इथे आल्यानंतरच जगन्नाथाची पुजा अर्चना ब्राम्हणांकडून होते! जगन्नाथ पुरीतील पुजारी जातीने ब्राह्मण नसतात आणि नाहीत!
इथल्या मुक्कामातील प्रभूंची खरी मजा पुढे आहे!
जगन्नाथ म्हणजे कृष्ण. कृष्ण हा विष्णूचा अवतार. त्यामुळे जगन्नाथ पुरीच्या मंदिरात लक्ष्मी आहेच! या छोट्या ‘टुरवर’ निघताना जगन्नाथ पुजाऱ्यांना आदेश देतात की मी रथयात्रेला निघण्याआधी लक्ष्मीच्या गाभाऱ्याला कडी लावा. पुजारी भगवंतांचे ऐकतातच. इकडे भगवान भावाबहिणीबरोबर सहलीला निघालेत, आणि लक्ष्मीजींना पत्ताच नाही!
रथयात्रा सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी लक्ष्मीदेवीला याचा पत्ता लागतो! तिचा संशय की हा रासलीला करायला गेला!
रागारागाने देवी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी (रथयात्रा द्वितीयेला सुरु होते) झाडाझडती घ्यायला गुंडिचा मंदिरात पोहोचते!
इथले पुढचे फार सुंदर आहे! जगन्नाथाची मुर्ती बाहेर आणून नृत्यमंडपात ठेवली जाते. लक्ष्मीची मुर्ती तिथेच त्यांच्यासमोर. दोघेही भांडत आहेत! मुर्ती असल्याने जगन्नाथ/विष्णू तर्फे पुजारी त्याची बाजू मांडतात आणि लक्ष्मीतर्फे काही देवदासी!
त्या देवदासी त्या क्षणी खरोखरच लक्ष्मी वाटतात, हे विशेष!
आपल्यासारखेच त्यांचे होते. ‘चार पाच दिवसांत परततो’ असे विष्णू (जगन्नाथ) सांगतो. लक्ष्मी तत्क्षणी मान्य करते आणि परत निघते. गुंदिचा मंदिराबाहेर पडतानाही तिचा संताप कायम असतो (नवरा नणंदेबरोबर सहलीला गेलाय, ते ही न सांगता!)
ती बाहेर पडताना आपल्या एका सैनिकाला जगन्नाथाच्या रथाला इजा करायला सांगते. तो सैनिक जगन्नाथाच्या रथाचे एक चाक तोडतो! (या चाक तोडण्याचा मोठा समारंभ आजही होतो!) याचमुळे जगन्नाथाच्या रथाला निघताना १७ चाके असतात! (मी आधी १६ चाके असतात, असे लिहिलंय)
एक चाक तोडले, हे भगवंतांच्या लक्षात आले तर खैर नाही, म्हणून देवी लक्ष्मी गुपचूप गोंदिचा मंदिरातून जगन्नाथ पुरीच्या मंदिरात पोहोचते. थाटामाटात सहा तास मिरवणुकीत एक रथातून जगन्नाथा पुरीहून ‘गुंडिचा’ मंदिरापर्यंत आलेली लक्ष्मी माता परत जाताना एका ‘बोलेरे’तून गेलेली मी पाहिलीय! दहाव्या मिनिटाला घरी!
आठवडा संपतो. घरी परतायची देवांना/ भावंडांना ओढ लागते. रथ परत निघतो. भाविकच हा रथ पण ओढणार असतात. एका ठिकाणी थांबावे लागते. ‘माय मरो, मावशी जगो’ असे उगाचच नाही म्हणत आपल्याकडे. रस्त्यात ‘मौसी मा टेम्पल’ म्हणून एक जागा आहे. तिथे रथयात्रा आणि जगाचे नाथ येथे स्वतः चक्क ३ तास थांबतात!
मावशीकडून यथेच्छ ‘पोडा पिठा’ वर ताव मारतात (आपल्या अनारश्या सदृश पदार्थ) आणि जगन्नाथ पुरीच्या आपल्या घरी‌ परततात!
आयुष्य सुंदर आहे, आपल्याला साले असे सगळ्यांवर विश्वास ठेवणारे भाविक व्हायला जमले पाहिजे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}