पानगी’ ते ‘कियांती’ डॉ.वंदना बोकील –कुलकर्णी
पानगी’ ते ‘कियांती’
डॉ.वंदना बोकील –कुलकर्णी
लहानपणीच्या बाळ गाण्यांमधली ती ‘उ’ ची गोष्ट आठवते नं…
एक होती उ
तिला झाली टू
आणि मग पुढे ती बाजारातून भाजी आणते.
चिरते कशी…
शिजवते कशी…
खाते कशी.. वगैरे स्वयंपाकातल्या सगळ्या क्रियांची ओळख देणारी आणि गंमतीची गोष्ट.
किंवा ‘दत्त दत्त दत्ताची गाय…’ हे गाणंदेखील. दूध, दही, लोणी, तूप. बेरी… सगळा प्रवास उलगडत नेणारं… आज वाटतं, नुसते बडबडगीत होते ते की सोन्यासारख्या दुधाची अखेर माती होते पण त्यातून पुन्हा दत्त आकाराला येतोच… असं काही ते गाणं सांगू पाहत होतं का…
तसं तर लहानपणीच्या बडबडगाण्यातला धम्मक लाडू आणि चापट पोळी अधूनमधून मिळाली होती. ’पाडवा गोड झाला’ ह्या धड्यातली ताई शिळ्या भाकरीचा गूळ घालून लाडू करते आणि धाकट्या भावंडाना खाऊ घालते, आत्यंतिक गरिबीतही सणावाराला त्यांचे तोंड गोड करते, हा शिळ्या पोळीचा किंवा भाकरीचा लाडूही मध्यमवर्गीय घरातून मिळेच खायला.
शिवाय ‘मामाची बायको सुगरण… रोज रोज पोळी शिकरण’ यातला उपरोध काही समजला नसला तरी रोज शिकरण मिळण्याच्या कल्पनेतही आनंदच आनंद होता.
मुक्ताबाईनं ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजल्याची गोष्ट अद्भुत वाटली खरी पण त्या वयात मांडे हा काय पदार्थ असावा याचं कुतूहल अधिक होतं. शिवाय मनात मांडे खाणे… हा वाक्प्रचारही होताच कानावर पडलेला. आता सरसकट सगळे पदार्थ नाक्यावरच्या मिठाईच्या दुकानामध्ये मिळतात, त्यामुळे त्यांचं काही विशेष अप्रूप नाही. पण बेळगावी मांडे चाखेपर्यंत ते मनाच्या एका कोपऱ्यात होतंच जागा अडवून बसलेलं.
मग भोंडल्याच्या गाण्यात समजलेली सपीटाची करंजी आणि ‘अश्श्या करंज्या सुरेख बाई माहेरी धाडाव्या’ मधला टोमणा कळायचं वय नसलं तरी ‘तबकात शेल्यानं झाकलेल्या’ करंज्याचं भलतंच आकर्षण होतं.ते साहजिकच नव्हतं का? फक्त गौरीच्या सणाला आणि दिवाळीत करंजी करायचा काळ तो.
शिवाय ‘कारल्याचा वेल लाव ग सुने’ या गाण्यातली ती कारल्याची भाजी आणि ‘हरीच्या नैवेद्याला केलेली जिलबी कशी बिघडली’ नि त्या बिघडलेल्या जिलबीचे काय काय केले, ते गाणं म्हणता म्हणता पदार्थ बिघडण्याची मुभा असते, तेही वेळीच समजलं!
शाळेच्या भूगोलात अनेक ठिकाणचे लोक कोणता आहार घेतात, त्याची माहिती असायची. बदायुनी लोक वाळवंटात राहातात. त्यांच्या आहारात खजूर, दूध, शेळी-मेंढीचे मांस असते, हे शिकताना बालबुद्धीला वाटे जेवणाच्या ताटात खजूर घेऊन खात असावेत. किंवा कॅलीफोर्निया हा फळफळावळांचा प्रदेश, तिथल्या लोकांच्या आहारात भरपूर फळे असतात वगैरे. त्यामुळे हरतालिकेच्या उपासाला आम्ही फळफळावळांचा उपास म्हणत असू.
‘गोधूम वर्ण तिचा हरिणाच्या पाडसापारी डोळे’… असं वर्णन असणारी कवी चंद्रशेखर यांची ‘जिऊ’ नावाची एक कविता शाळेत होती. त्या कवितेत तिच्या पाककौशल्याचं वर्णन मोठं बहारदार होतं.
कातीव सूत ऐशा येत तिला शेवया वळायाला,
ह्या फेण्या! म्हणुनि तिच्या लोकभ्रम कुर्डयांवरी झाला.
लावोनी गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार
ऐसे की ते सेवुनी हुशार व्हावा मनुष्य बेजार.
वर्षातून कमीतकमी तीन वेळा घरी मऊसुत पुरणपोळ्या होत होत्या तेव्हा. श्रावणात, नवरात्रीत आणि होळीला. पण ‘हुशार व्हावा मनुष्य बेजार’ ही गंमत मात्र बरीच उशिरा समजली.
पुढे ‘हद्दपार’ ही श्री. ना. पेंडसे यांची कादंबरी कॉलेजात अभ्यासाला नेमलेली होती. त्यातले राजेमास्तर अर्थातच आठवतात. त्यांची ती मुलांना शाळेत घेऊन जाण्याची अनोखी पद्धत आठवते. त्यांचा स्वाभिमानी पीळ, त्यांचं पुरोगामित्त्व हेही लक्षात आहे. पण पुरुष लेखकाच्या साहित्यात प्रथमच खाद्यपदार्थाचं वर्णन वाचलं ते यात! विशेषतः पानगी ! ती पानगी इतकी काही डोक्यात बसली की कधी ती जिभेवर उतरते असं झालं आणि योगायोग म्हणा की जबरदस्त इच्छाशक्ती म्हणा त्या वर्षीच्या दिवाळीच्या सुट्टीत कोकणात जायला मिळालं. आणि ती पानगी खाल्लीही. तर पुस्तकातून जिभेवर आलेला हा पहिला पदार्थ. म्हणजे आठवणीतला पहिला.
पुढे स्वयंपाक आणि त्यात प्रयोग करायचं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा करूनही पाहिली ही पानगी. शहरात राहून अट्टाहासानं केळीची पानं पैदा करुन केली.
आशा बगे यांच्या लेखनातली आलं घालून केलेली कॉफी, फुलके आणि कोबीचा रस्सा, ‘महावस्त्र’ कथेतला अख्ख्या बटाट्याचा रस्सा, रोहिणी कुलकर्णी यांच्या कथेत येणारं ते मुगाचं बिरडं, सामिष पदार्थ, ‘बटाट्याच्या चाळी’ मधल्या त्रिलोकेकरांच्या मांडीला झोंबणारा गोडी बटाटीचा रस्सा… जीभ चाळवणारी ही वर्णनं वाचत असताना कधीतरी ते पदार्थ करुन पाहण्याची इच्छा मनात असे. पुढे मग त्यातलं बरंचसं केलंही!
‘रुचिरा’च्या आधी त्यांची ओळख झाली ती मात्र मराठी साहित्यातून.
थोडं पुढच्या वयात कवितेतही भेटले कितीतरी पदार्थ.
अनुराधा पोतदारांच्या एका कवितेत ‘वरणाला फोडणी खमंग पडली…’ म्हणून खुशालून जाणारा ‘तो’ आहे. कुणाचं मन जिंकायच्या या युक्त्या पुढे फोल वाटल्या तरी त्या आहेत अजूनही अनेकांच्या मनात.
‘द्रोण’ या अरुण कोलटकरांच्या कवितेत रावणावर विजय मिळवल्यावर रामानं दिलेल्या जंगी पार्टीतले एकेक नामी पदार्थ नुसत्या वर्णनानेही आवंढे गिळायला लावतात.
आणि खाद्यपदार्थांची रेलचेल
तर काय तिथं म्हणजे
विचारूच नका.
जिभेचे चोचले पुरवायचे
जेवढे म्हणून पदार्थ आहेत जगात,
भक्ष्य, भोज्य, लेह्य, चोष्य,
म्हणजे चाखायचे, चाटायचे, चोखायचे
चावायचे, चघळायचे,
कुरतडायचे, गिळायचे, ओरपायचे,
भुरके मारायचे म्हणा
किंवा तोंडात आपोआप विरघळणारे,
ते सगळे होते तिथं.
आणि पुढे कोलटकर त्या पदार्थांची जी काय जंत्री सदर करतात ना… कमाल वाटते, त्यांच्या अभ्यासाची आणि कल्पनाशक्तीचीही.
साधं पाणी ते काय… पण आपल्याकडे ते पाणी किती प्रकारचं प्यायलं जाई ते पाहिलं म्हणजे माणसाच्या जिव्हालौल्याविषयी आदर वाटू लागतो. याच द्रोण कवितेत पहा-
शृंगवेरांबू,
म्हणजे आपलं सुंठीचं पाणी,
वाळ्याचं पाणी, नागरमोथ्याचं पाणी,
कोऱ्या मडक्यात रात्रभर
चांदण्यात ठेऊन थंडगार केलेलं
कर्पूर सुगंधित पाणी
कसं निवांत आणि स्वस्थ आयुष्य असेल आपल्या पूर्वजांचं असं वाटतं हे वाचून.
खाद्यपदार्थांमध्ये स्थळ,काळ, संस्कृती आणि सामाजिकता याचं प्रतिबिंब कसं स्पष्ट प्रकटतं ते पाहणंही जाणिवांच्या कक्षा रुंदावणारं आहे.
व्यंकटेश माडगूळकरांच्या कथांमधून त्यांची पात्रं काय खातात ते बघा. त्यांचा धर्मा रामोशी तांबड्या रंगाची भाकरी आणि उकडलेल्या पालेभाजीचा लगदा खातो… त्यांच्या एका कथेत पारधी लोक त्यांना गिधाड मारून देण्याची गळ घालतात. रानावनात फिरून वनविद्येत माहीर झालेल्या या लेखकाला प्रश्न पडतो की गिधाडाचं काय करणार हे लोक. मिठू शिपाई म्हणतो, “खाणार. तव्यावर उलिसं तेल टाकून मीठ मिरची टाकून भाजायचा. मस्त कोंबडीवाणी लागतो!” चितूर, पकुर्डया वगैरे पक्षी खाण्याचे उल्लेख या गिधाडापुढे मग अगदीच सपक वाटायला लागतात. त्यांच्या कितीतरी कथाकादंबऱ्यात सामिष पदार्थ त्यांच्या वासासह घमघमतात.
‘पाडस’मधलं बॅकस्टर कुटुंब हरणाचं, अस्वलाचं मांस, खारीचा पुलाव, अस्वलाच्या चरबीत तळलेलं बेकन असं काय काय खाताना दिसतं. शाकाहारी असून ह्या कुठल्याच पदार्थांनी कधीच शिसारी आली नाही हे विशेष. ही देखील साहित्याचीच देन.
हिरा बनसोडे यांच्या ‘सखी’ कवितेत मात्र जेवणाचं वर्णन आणि त्याचं अनुभव चटका लावणारा आहे…
कवितेतली मैत्रीण सवर्ण सखीला जेवायला घरी बोलावते. ‘माणसाला दुभंगणाऱ्या जातीच्या दऱ्या ओलांडून’ सखी जेवायला आली म्हणून ती हरखून जाते.
शबरीच्या भोळ्या भक्तीनेच
मी तुझं ताट सजवलं,
किती धन्य वाटलं मला!
पण… पण ताट बघताच तुझं
चेहरा वेडावाकडा झाला,
कुत्सित हसून तू म्हणालीस,
”इश्श! चटण्या, कोशिंबिरी
या अशा वाढतात का?
अजून पान वाढायलाही
तुला येत नाही
खरंच, तुमची जात
कधीच सुधारणार नाही!”
‘आठवणींचे पक्षी’ या प्र. इ. सोनकांबळे यांच्या आत्मचरित्रात बिदवा –म्हणजे गुरांचे शेण गोळा करुन त्यातील धान्याचे कण वेचून, धुवून खाणारा, चड्डीच्या खिशात भाकरीचे तुकडे ठेवून पाण्याच्या घोटाबरोबर ते खाणारा लहानगा पल्या पोटात अक्षरशः कालवाकालव निर्माण करतो.
अशीच ‘भूक’ ही बागुलांची कथा. तापानं फणफणलेली आई आपल्या लहानग्यांच्या तोंडात अन्न पडावं म्हणून भर पावसात जाळं घेऊन समुद्रावर जाते. तिला जाळ्यात मोठासा मासा गवसतो. आनंदानं घरी येऊन मिणमिण उजेडात ती तो शिजवून मुलांना खाऊ घालते. दुसऱ्या दिवशी उजेडात पाहते, तो मासा नसून साप असल्याचं कळतं! भीतीनं आणि काळजीनं तिचा जीव उडून जातो. वाचताना अंगावर सरसरून काटा येतो, अशी ही कथा.
गावकुसाबाहेरच्या जगण्याचं भान ही साहित्यानं दिलं. तसं जगभरात रांधण्याचा मक्ता बाईकडेच आहे याचीही जाणीव साहित्यानंच आधी करुन दिली.
गौरी देशपांडे यांच्या लेखनात तर असंख्य देशी – परदेशी पदार्थ हजेरी लावतात. तिची ’रोजमेरी फॉर रिमेमब्रंस’ आठवते. ’एकेक पान गळावया’ तली राधा युगोस्लावियात एका म्हातारीकडून ब्रेड करायला शिकते. “ती विचारे, मग पीठ किती घेऊ, यीस्ट किती घालू नि तेल किती घेऊ. म्हातारी म्हणे, घे अंदाजानं. पिठाचं पोत बघून घे जास्तकमी. तिला काही उमजेना. म्हातारी शिकवायची पीठ कसं मळायचं ते. निष्णात तबलजीसारखा तिचा हात चाले. एका हातानं पीठ दुमडून गुद्दा लगावायचा, दुसऱ्या हातानं पीठ ओढून फटकन दुमडता दुमडता तीस अंशात वळवायचं. तिला चपात्यांची सवय, मुळीच जमेना. म्हातारी म्हणे, अगं, तालात करावं. बघ, एक- दोन –तीन- चार! म्हातारीला ताल जमे. शेजारच्या घरुन ऐकायला येई, म्हातारी ब्रेडचं पीठ बडवायला लागली की! अखेर तिला म्हणाली, हसत हसत, “तुझी ब्रेड कशी होईल मला माहितीय! देवाचं नाव घेऊन टाक भट्टीत. कधी फुगेल, कधी बसेल. फुगलीच तर खा. बसून दगड झाली तर धुणी बडव तिच्यावर!” आता ब्रेड हा भारतातला नेहमीचा पदार्थ झालाय,पण हे वाचलं तेव्हा वाटलं जगभर ब्रेड नाहीतर भाकरी… बायांचं काम काही सुटत नाही. इथे आता देशोदेशीचे पदार्थ सहज मिळू लागलेत. पण वेगवेगळे चीजचे प्रकार आधी चाखले गौरीच्या लेखनात.
‘मध्य लटपटीत’ मधली निर्मला भावासाठी लोणची मसाले बांधून देते ते असेच सगळे भन्नाट.
गोवा करी मसाला, डिंगऱ्याचं लोणचं, विंडालु चटणी, लसणीची चटणी, आंबोशीचं लोणचं. ही विंडालु चटणी काही मला अजून खायला मिळाली नाहीये. पण माईन मुळ्याचं लोणचं मात्र बेळगावी चाखायला मिळालं.
‘दुस्तर हा घाट’ मधले हरीभाई पितात तो कोरा चहा! ’जिभेवर जरा मिरमिरणारा, सुगंधी, किंचित मातकट –सांगताच यायचा नाही अशा स्वादाचा. आणि त्याचा तो रंग! तांबूस-तपकिरी आणि पारदर्शक. मधासारखा.’ आणि तो चहा तयार करण्याची त्यांची ती खास पद्धत, नमूसारखीच आपणही ती नवलाईनं पाहतो. “उकळी आलेल्या पाण्याने एक किटली विसळून घेऊन त्यांनी तिच्यात एकच चमचा लांब लांब पत्तीचा चहा टाकला. आणि वर भरपूर उकळते पाणी ओतून ती, दोन कप आणि खास नमूच्या सन्मानार्थ आणलेली खारी बिस्किटे.” या कोऱ्या चहाचं प्रस्थ आताशा किती बोकाळलं आहे. पण ८५-८६ साली नमूच्या मावशीला वाटलं तसं ते आम्हा वाचकांनाही चमत्कारिक वाटलं होतं खरं.
लेमन टी, भाज्यांचं सूप आणि ब्रेड! आतून मऊमऊ, फुललेली आणि बाहेरून खरपूस. तिळाची नक्षी असलेली. गौरीच्या लेखनातून अशा कितीतरी अनोख्या पदार्थांची ओळख झाली. आता सर्रास खातो त्या नुडल्स ‘एकेक पान गळावया’त प्रथम वाचल्या. ‘एकेक प्लेट शेवया घेऊन राधा आणि माधव फ्लॉरेन्समध्ये जेवतात…’ .तेव्हा कळलं नव्हतं हा काय पदार्थ असावा… नंतर कधीतरी नुडल्स समजल्या. म्हटलं हात्तिच्या.
‘रारंगढांग’ या प्रभाकर पेंढारकर यांच्या कादंबरीमध्ये हिमालयात, सैन्याच्या शिस्तीतून थोडासा उनाडपणा करुन ‘पुट्टू’ हा खास केरळी पदार्थ बनवला जातो… गुरुचरणसिंग या गॅरेजमध्ये मशिनरी दुरुस्त करणाऱ्या सहकाऱ्याला सांगून कॅ. मिनू खंबाटा त्याच्याकडून बांबूची नळकांडी तयार करुन घेतो. बिनधास्तपणे नारळही मशिनरीच्या यादीत टाकून रामपूरहून मागवून घेतो आणि मग एके दिवशी डिनरला कॅ. नायरच्या देखरेखीखाली हा ‘पुट्टू’ तयार होतो. “मिनूनं एक नळकांड आडवं धरलं आणि खालची गोल चकती पुढं ढकलून आतला पुट्टू प्लेटमध्ये काढला. तांदूळपीठ आणि नारळ यांची ती अफलातून चीज! त्या लांब ‘पुट्टू’चा एक तुकडा त्यानं तोंडात टाकला आणि त्या चवीनं तो खुश झाला.” मिनू या पात्राच्या जीवन रसरसून जगण्याच्या वृत्तीवर प्रकाश टाकणारा हा प्रसंग त्या ‘पुट्टू’नं अधिक चविष्ट झाला हे नक्की.
‘भात पिठल्याची गोष्ट’ असं नाव असलेली विजया राजाध्यक्ष यांची कथाय एक. खाण्यापिण्याचे अवाजवी लाड करुन बिघडलेल्या भीमाची गोष्ट आहे ती. कढीत काय घाला नि आमटीत काय नको… अमुक भाजी असेल तर तमुक तोंडीलावणे हवेच… असल्या सूचना पुरुष माणसांकडून ऐकायची सवय नसल्याने या भीमाची बायको नाराज होते. तिची नाराजी आता सहज समजू शकते.
‘चुलत सासूची सेवा..’ म्हणून मंगला गोडबोले यांचा अप्रतिम लेख आहे… चुलत सासू म्हणजे चूल. चुलीशी बाईचं असणारं नातं एक आदिम बंधच आहे! जन्म देणं आणि भरणपोषण करणं ह्या निसर्ग दत्त जबाबदाऱ्यांचा. तोच चूल आणि बाई यातही दिसतो. बारकाईनं विचार करणारीला आणि स्वयंपाक करण्याचा आनंद घेणारीला काय काय मिळू शकतं, याचा चविष्ट आलेखच त्या लेखात आहे.
‘किचन पोएम्स’ म्हणून एक कवितासंग्रहच आहे. धीरुबेन पटेल या गुजराती कवयित्रीच्या कवितांचे उषा मेहता यांनी केलेले हे भाषांतर म्हणजे स्वयंपाकघर केंद्राशी असलेल्या विविध भावनांचा गोफ आहे. स्त्री आणि स्वयंपाकघर यांची अतूट सांगड कोण जाणे कोणत्या काळात बसली. पण आजही ती तशी आहे. काही जणींना तो तुरुंग वाटू शकतो तर काहींना अपार आनंद देणारी स्वतःची जागा. काहींना इतर अनेक अपरिहार्य कामासारखी एक बाब. स्वतःचा अवकाश. प्रेम, निराशा, गुलामगिरी, तोचतोचपणा, कंटाळवाणेपणा अशा कितीतरी अनुभवाचं विश्व या १०० कवितांमधून उलगडत गेलं आहे. मुदपाकखान्यात शिजणारे विषप्रयोग, कारस्थानं ते तिथे मिळणारी अधिकाराची जाणीव, अभिमान इथपर्यंत सर्व काही त्यात आहे.
बंधमुक्त झालेल्या त्या स्त्रीला
नोकरी होती, मित्रमैत्रिणीही खूप
बँकेतली ‘जमा’ व्यवस्थित
आणि तिचं छोटंसंच स्वयंपाकघर
स्वच्छ, नीटनेटकं
आवडेल तेच करायचं
नाहीतर बाहेर खाऊन यायचं
परिपूर्ण वाटावं, असंच हे आयुष्य.
तरीही… एक दिवस रडू कोसळलं तिला…
आईच्या हातच्या स्वयंपाकाच्या आठवणींनी… आईच्या हातचा स्वयंपाक ही तर बहुधा सगळ्यांच्याच मनातली हळवी आठवण असते म्हणा.
केवढी मजा असायची तेव्हा…
स्वयंपाकघरात बसायचं
जमिनीवर मांडी ठोकून
हसायचं, खिदळायचं,
बडबड करायची
त्याचवेळी वाट पहायची उत्सुकतेनं
नेम धरुन फेकलेला
तो फुग्यासारखा टम्म फुलका
कसा पडतोय पानात एकेकाच्या
पाळीपाळीनं…
जेवण संपेपर्यंत चालत असायची ही धमाल…
धूसर होत चालल्या आहेत आठवणी …
तरीही लपेटून आहेत, आयुष्याला
तलम धाग्यांच्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या…
आईचं ते हसू
अजून रेंगाळत राहिलंय
त्या विरळ धाग्यांमध्ये…
कितीतरी जुन्या साहित्याकृतींमधून, कवितांमधून उल्लेख आलेले अनेक पदार्थ, वस्तू यांचे संदर्भ काळाच्या ओघात आता पुसट झाले आहेत. आणखी काही वर्षांनी ते अदृश्यच होतील.
दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट.
घडविला जडविला चंदनाचा पाट
या कवितेत ‘दुधात हा कालविला जिरेसाळ भात’ असा उल्लेख आहे. आता हा तांदूळ जनजीवनातून हद्दपारच झालाय. पण हा एक विशिष्ट तांदूळ आपल्याकडे पिकत होता, या वस्तुस्थितीचं हे दस्त ऐवजीकरण समजावं का…
ज्ञानदेवांनी ‘दहीभाताची उंडी’ देऊ करुन शुभवर्तमान सांगणाऱ्या काऊचं ऋण व्यक्त केलंय, तो दहीभात तर अनेक गाण्यात भेटला, अनेक संदर्भात भेटला.
कोणत्या ऋूतूमध्ये काय खावं, याचे कितीतरी संकेत प्रत्येक समाजात असतात. स्वाभाविकपणेच ते साहित्यातही उतरले आहेत.
पावसाळी हवा म्हणजे आल्याच्या, गवती चहाचा उल्लेख येणारच. भजी, वडे हवेतच जोडीला. तसंच माळव्यातल्या थंड रात्री आणि कडक उन्हाळे यांची वर्णनं आली की हमखास वाळा घातलेल्या पाण्याचे किंवा कैरीच्या पन्ह्याचे उल्लेख येणार! आंबील येणार.
कसं, कुठे, कोणासह जेवण यांचेही किती रंजक तपशील आहेत. बाळ कृष्णानं गोपसख्यांसह रानात केलेलं वनभोजन, चोरलेलं दही, दूध, लोणी, गोपाळकाला यांची वर्णनं आहेत. वनवासात द्रौपदीला जेऊ घालावं लागलं त्या दुर्वासांची गोष्ट आहे आणि ती द्रौपदीची थाळी, ते सुदाम्याचे पोहे… शोध घेऊ पाहिलं तर बरंच काही हाती लागत जातं. हा शोध सुफळ संपूर्ण होतो तो मुखशुद्धीनं. म्हणजे विड्यानं.
तांबुल, विडा, पान, पानपट्टी… पदार्थ एकच. पण आशय कसा बदलतो पहा. त्रयोदश गुणी विडा म्हणजे कात, चुना, लवंग, वेलदोडा वगैरे तेरा पदार्थांनी युक्त असा विडा. ’कळीदार कपुरी पान…’ या लावणीत तो शृंगाराचा संकेत आहे, तर तांबुल म्हटलं की रामदास किंवा पेशवाईवरच्या ऐतिहासिक कादंबऱ्या आठवणारच. तिथे मग पैजेचे विडे आहेत, निरोपाचे विडे आहेत, स्नेहभावदर्शक विडे आहेत.
भाऊ पाध्ये आणि श्री. दा. पानवलकर यांनी ३४० आणि काय काय नंबरची पानं पण परिचयाची करुन दिली म्हणा. ते त्यांचा उल्लेख नुसता नंबराने करतात किंवा मग पट्टी!
जेवाणाजेवणातही किती प्रकार! बसायला पाट, ताट किंवा केळीच्या पानाखाली पाट, केळीच्या रसरशीत हिरव्या पानावर वाढलेलं भात वरण, साजूक तुपाची धार आणि भोवती इतर असंख्य पदार्थ. चांदीची ताटंवाट्या, उदबत्त्या, रांगोळ्या असा राजेशाही थाट. शिवाय आवळीभोजन, वनभोजन, सहभोजन, प्रीतीभोजन (हे राजकीय भोजन), डोहाळजेवण, उष्टावण, मातृभोजन, रुखवताचं,… किती प्रकार आणि अखेरचं तेराव्याचं जेवण. शिवाय पंगती आहेत. उभ्या उभ्या चार घास खाणं आहे. नाश्ता आहे, दुपारचं खाणं आहे. पुन्हा जोड्याही आहेतच. पिठलं – भाकरी आहे, भाजी – पोळी आहे. पुरणपोळी – कटाची आमटी आहे. लाडू – चिवडा आहे. चकली – करंजी आहे. श्रीखंड – पुरी, खीर – पुरी, शिरा – पुरी वगैरे कितीही मोठी होईल ही यादी.
प्रदेशागणिक पसरत जाईल.
कितीतरी पदार्थ आपल्या भाषेत वेगळ्याच गोष्टी सूचित करण्यासाठी वापरले आहेत.
अर्ध्या हळकुंडानं पिवळं काय होतात, हळद पिऊन गोरे काय होतात, नाकानं कांदे सोलतात आणि मूग गिळून बसतात, तुरी देऊन निसटतात, ताकाला जाऊन भांडं लपवतात, टाळूवरचं लोणी खातात. साखर खाण्यासाठी मुंगी व्हायला सांगतात. भ्रमाचा भोपळा फुटतो आणि अंगाचा अगदी तिळपापड होतो.
निव्वळ खाद्य पदार्थांनी किती शब्द बहाल केलेत भाषेला. विविध प्रक्रिया, विविध प्रकारची, आकाराची भांडी आणि म्हणी, वाक्प्रचार, क्रियापदे. यादी करायला बसायचं तर खरेच दमछाक होईल.
खरं म्हणजे मी ‘फुडी’ म्हणतात तशी नाही. मग हे एवढे पदार्थ त्यांच्या नावपत्त्यासह कसे काय मुक्कामाला आले आठवणीत ? मजेचा भाग सोडून देऊ पण ’कशासाठी पोटासाठी’ हा नारा तर कानावर असतो. ज्या गोष्टी आपल्या जगण्याचा अत्यावश्यक घटक आहेत त्यांच्या उल्लेखाशिवाय कोणतंही व्यक्तीदर्शन समाजदर्शन अपूरंचं रहाणार. समग्र जीवनदर्शन घडवताना लेखकांना या चित्रणाची अपरिहार्यता जाणवली, म्हणूनच नं ते साहित्यात अवतरले? संस्कृतीचं महत्त्वाचं अंग म्हणूनच ते आपल्याही लक्षात राहिले असावेत. या संस्कृतीदर्शनाचा एक भाग म्हणून तर ती ‘कियांती’ ही लक्षात राहिली असावी जशी ती ‘पानगी’ राहिली.
विविध प्रकारची मद्य. फार प्राचीन काळापासून आहेत आपल्याकडे… नावं तरी किती बहारदार त्यांची! कादंबरी, वारुणी, सुरा, मदिरा, मैरेय, माधवी,… ही आपली प्राचीन मद्य विशेषांची यादी. आणि ‘अपेयपान’ या निर्देशाने ज्यांचे अस्तित्व ऐतिहासिक कादंबऱ्यातून सुचवलेले आढळते ती मद्यं नंतर मराठी साहित्यात सर्रास दिसू लागली. केवळ पुरुष लेखकांच्या नव्हे तर लेखिकांच्याही! वाइन, बियर, विस्की, रम पासून कोनॅक, काम्पारी पर्यंत अनेक. त्यातलीच ही कियांती. गौरीच्या ‘गोफ’ या कादंबरीत ही विशिष्ट इटालियन मद्याची बाटली वेताच्या वेष्टणात अवतरली.
इटलीच्या आमच्या सहलीत एका हॉटेलमध्ये अचानक ही बाटली दिसली आणि ‘ब्रेन वेव्ह’ यावी तशी मी पटकन म्हणून गेले, कियांती…! बरोबरचे सगळे अवाक! आणि मी ही! ही कशी माहिती आपल्याला?? अगदी मद्याचा शौक असावा तशी ही माहिती मेंदूत कधी आणि कुठून जमा झाली? तर बाख आणि मोत्झार्तसह गौरीनं बऱ्याच पाश्चात्य पदार्थांची, संगीताची, चालीरीतींची ओळख दिली करुन त्यातली ही कियांती! आणि हा साहित्यानं मला घडवलेला खाद्यप्रवास. पानगी ते कियांती!
डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी