संत कान्होपात्रा ….. प्राची गडकरी
संत कान्होपात्रा
(प्राची गडकरी)
लहानपणी राउळा बाहेरून अगदी लांबून चोरून देवाचे दर्शन घेणारी आणि खांबापाठी लपून छपून वेशीवर बुवांचे कीर्तन ऐकणारी कान्होपात्रा वयात आल्यावर आईला विचारते आपण चोरून का देवाला बघायच? इतर लोकांसारखे देवळात जाऊन का नाही कृष्णाचे दर्शन घेऊ शकत?त्यावर आई म्हणाली कारण आपण जातीने ‘पात्रा’ आहोत.पात्रा म्हणजे गणिका आणि गणिका ही उपेक्षित असते.आपल्यासाठी देऊळ भक्ती भजन कीर्तन नसतं !.आपण पायात चाळ बांधून केवळ लोकांच मनोरंजन करायचे.आईच्या अशा उत्तराने कान्होपात्राच्या बालमनावर खूप खोल आघात झाला.पात्रा ही आपली जात आहे हे तिला पहिल्यांदा कळले.अर्थात पूर्वी नावापुढे सहज जात लावली जायची. उदाहरणार्थ गोरा कुंभार,सावत्या माळी, सेना न्हावी, नामदेव शिंपी वगैरे!
कान्होपात्राचा निश्चिय मात्र पक्का होता.काही असो भले चोरून का होईना पण मी कृष्णाच दर्शन घेणारच. दिवसरात्र कृष्णाच्या भक्तीत तल्लीन रहाणारी महाराष्ट्रातील एक थोर स्त्री संत म्हणजे संत कान्होपात्रा!
जीवाचे जिवलगे
माझे कृष्णाई कान्हाई
सावळे डोळसे
करुणा येऊ दे काही
असे अगतिक होऊन म्हणणारी कान्होपात्रा ही मंगळवेढा येथील श्यामा नायिकिणीची अत्यंत देखणी मुलगी होती.आई तिला लाडाने कान्हू म्हणायची.संत नामदेवांनी कृष्णावर लिहिलेले अभंग मुखी ठेवून कृष्णाला आपला सखा मानणारी कान्होपात्रा कृष्णाला सोडून सहसा घराबाहेर जायचीच नाही.सकल संतगाथेत कान्होपात्रांचे २३ अभंग आहेत.तसेच महाराष्ट्र संत कवयित्री ग्रंथात चार अभंग अभ्यासक्रमात आहेत.
लहानपणापासून संत ज्ञानेश्वर,संत नामदेव आणि सोपानदेवांचे अभंग तन्मयतेने वाचणाऱ्या कान्होपात्रास विठ्ठला विषयी प्रचंड आकर्षण वाटत होते.परंतु आपल्याला देऊळ बंद असल्याने आपण कधीच ना विठ्ठल पाहू शकणार ना कृष्ण पाहू शकणार ही खंत सतत तीला टोचत होती.अखंड नामस्मरण हे एकच काम कान्होपात्रा करीत.अशात एका संध्याकाळी कृष्ण भक्तीत तल्लीन असताना कान्होपात्राला टाळ चिपळ्यांचा आवाज आला.नामस्मरणात कान्होचे लक्षच लागेना शेवटी तिने आपल्या दासीला बाहेर कसला आवाज येतोय हे पहायला पाठवले.दासी म्हणाली वारकरी चालले आहेत.वारकरी संप्रदायातील भजन गुणगुणाऱ्या कान्होपात्रास वारीची प्रचंड ओढ होती.ती धावत बाहेर गेली आणि तिने बुवांचे पाय पकडले.वारकऱ्यांनी मोठ्या प्रेमाने तिचे स्वागत केले.आणि वारीस येण्याची विनंती केली.मी गणिकेची मुलगी आहोत .मला वारीचा अधिकार नाही असे म्हणत ती दासीच्या कुशीत रडू लागली.तेव्हा वारकरी म्हणाले वारीत सगळ्यांची एकच जात असते ती म्हणजे वारकरी.देवाला सगळे समान असतात.जातपात गरीब श्रीमंत हा भेदभाव विठ्ठल कधीच करत नाही.ज्या देवाचे वारकरी इतके प्रेमळ आहेत.तर तो देव किती प्रेमळ असेल ह्या भावनेने कान्होपात्रास तळमळ लागली विठ्ठल भेटीची आणि तसा तिने हट्ट ही धरला आई जवळ की वारीला जायचयं!
वारी वरून आल्यावर मात्र मी सांगेन तसे वागायचे ह्या आईच्या वाक्याला होकार देऊन कान्होपात्रा पहिल्यांदा कृष्णाला सोडून वारी बरोबर पंढरपूरी गेली.
वाटेत भजन कीर्तन फुगड्या स्वयंपाक आणि भक्तीमय वातावरणात कान्होपात्रास नवजीवन देऊन गेले. पांडुरंगास पहाता क्षणी तिच्या लक्षात आले की हाच आपला कृष्ण आहे.
माझे माहेर पंढरी
सुखे नांदू भीमातरी
येथे आहे मायबाप
हरे ताप दरूशने
निवारली तळमळ चिंता
गेली व्यथा अंतरीची
असे म्हणत कान्होपात्राने लोटांगण घालून आपली श्रद्धा व्यक्त केली.तोच हा पांडुरंग माझा धनी ज्याचा मी दिवसरात्र जप करतेय.चारीवेद ज्याचे गुणगान गाऊन थकले तोच हा पांडुरंग आहे.सारी पुराण भांबावून जातात ज्याच्यापुढे अशा विठ्ठलाचे मी दिवसभर नामस्मरण करते म्हणजे मी भाग्यवान आहे.उगाच मला गणिकेची लेक म्हणतात.मी ह्या पांडुरंगाची लेक आहे.माझे शरिर चिरून बघा ठायीठायी कृष्ण दिसेल तुम्हाला इतक असा आत्मविश्वास देत ती मंदिरात आत्मसंवाद करीत होती.
घ्या रे घ्या रे मुखी नाम
अंतरी धरोनिया प्रेम
माझा आहे भोळा बाप
घेतो हरोनी भवताप
ज्याप्रमाणे पिंगळा, वाल्या कोळी,अजामीळ, प्रल्हाद नामस्मरणाने पावन झाले.त्याप्रमाणे मी सुद्धा नामस्मरणाने पावन होईन.अशी जिद्द मनात ठेवून अखंड नामस्मरण कान्होपात्रा बुडून गेली.आजही नामस्मरण म्हणजे कान्होपात्रा असे उदाहरण संत गाथेत दिले जाते. नामस्मरण ही तिच्या भक्तीची रीत होती.
विठ्ठलाची कान्होपात्रा||
नामस्मरणाची मात्रा||
विठ्ठल कसा दिसतो ह्याचे रसग्रहण करताना कान्होपात्रा म्हणते विठ्ठल आरसा आहे.तुमच्या सारखाच विठ्ठल दिसतो.जो ज्या भावनेने बघेल ते रूप म्हणजे विठ्ठल.आपल प्रतिबिंब म्हणजे विठ्ठल आहे.म्हणुन आपण नीट वागल पाहिजे.माणुसकी सदैव जिवंत ठेवली पाहिजे.कारण आपण त्या विठ्ठलाचं रूप आहोत.त्याची मुलं आहोत.आपल्या वागण्याने त्या पांडुरंगास दुषण लागता कामा नये इतकी दखल जीवनात घेतली पाहिजे.आणि केवळ नामस्मरण हा एकच त्यावर उपाय आहे.आपल्या अभंगात माऊलींच्या आत्मशांतीचा मार्ग गुंफणारी तर कधी अभंगातून नामदेवांच्यात विठ्ठलाच्या खूणा पहाणारी कान्होपात्रा भक्तीचा अद्भुत चमत्कार आहे.
विठ्ठलावर विश्वास ठेवून, आपल्या श्रध्देवर विश्वास ठेवून वासनेने भरलेल्या बिदरच्या बादशहाच्या शिपायांबरोबर कान्होपात्रा जेव्हा निघाली तेव्हा तिने केवळ वाटेत विठ्ठल दर्शनाची अट शिपायांना घातली.मंगळवेढा ते पंढरपूर प्रवासात अखंड विठ्ठल नामाचा जयघोष करत तिने सरतेशेवटी जेव्हा विठ्ठलाच्या चरणावर जेव्हा डोकं ठेवले तेव्हा तिथेच तिचा श्वास थांबला.
पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवण्या आधी कान्होपात्रा विठ्ठलास म्हणाली
मोकलीन आस
जाहले मी उदास
घेई कान्होपात्रेस हृदयात
आणि खरच चिरशांती देऊन पांडुरंगांने तिला आपल्या हृदयात स्थान दिले.
नामे दोष जळती
नामे पापी उध्दरती
नामे अपार तारिले
नामे जीवन्मुक्त केले
कान्होपात्राने लहानपणी कीर्तन बुवांचे शब्द ऐकले होते की पतितांचा उध्दार करणे हे देवाचे ब्रीद आहे. शुध्द निर्मळ अंतःकरणातून मारलेली हाक देव नेहमी ऐकतो.हाच भाव ठेवून अखंड विठ्ठलाची भक्ती करणारी कान्होपात्राने संत साहित्याचे दालन आपल्या अभंगांचे समृद्ध केले आहे.
प्राची गडकरी
(डोंबिवली)