सोनेरी दिवसांच्या सोनेरी आठवणी *** मुमताज, एक नखरा, एक अदा
सोनेरी दिवसांच्या सोनेरी आठवणी
***
मुमताज, एक नखरा, एक अदा
***
एका ७० च्या दशकातला चित्रपटाच्या सेट वर घडलेला हा प्रसंग आहे. नायिका चांगली एस्टॅब्लिश! नायक त्यामानाने नवखा, नायिकेची कोरी करकरीत मर्सिडिझ कार, त्याच वेळेस नायकाची त्या मानाने साध्या मेकची! सीन ओके झाल्यावर मधल्या ब्रेकमधे सगळे गप्पा मारताना जमिनीवर आलेला सिनेमाचा नायक म्हणतो, “यार वो दिन कब आएगा जब मेरी अपनी खुदकी ऐसी शानदार कार होगी”?
शूटिंग संपल्यावर सगळे जण आपआपल्या घरी जायला निघाले पण नायकाची कार काही दिसली नाही. चौकशी केल्यावर असे कळले कि त्याच्या ड्रायव्हरकडून चावी घेऊन नायिका त्याची जुनी कार घेऊन गेली आहे. आणि स्वतःच्या कारची चावी त्याचे करिता ठेऊन गेली . वर निरोप ही ठेवलाय कि ही मर्सिडीज कार आज तू ने आणि जितके दिवस तुला , वापरायची चालवायची तितके दिवस तुझ्याकडे ठेव. दोस्तहो, तो नायक होता अमिताभ बच्चन आणि ती सहदय नायिका होती “लाखों दिलोंकी धडकन, अपर्या नाकाची, गोड चेहेर्याची “मुमताज!
३१ जुलै १९४७ रोजी एका अत्यंत सर्वसाधारण मुस्लीम कुटुंबात मुमताजचा जन्म झाला. तिचे वडीलांचे सुक्या मेव्याचे छोटेसे दुकान होते. मुमताजच्या धाकट्या बहिणीच्या जन्मानंतर लगेचच तिचे आई वडिल वेगळे झाले. मुमताजची आई आणि मावशी या दोघी चित्रपटात नेहेमी एक्स्ट्रा म्हणूनच काम करायच्या. त्यामुळे घरच्या परिस्थितीमुळे मुमताज १२ वर्षांची असल्यापासून चित्रपटात तीने काम करायला सुरुवात केली. बालकलाकार म्हणून “सोनेकी चिडीया” ह्या चित्रपटात काम केल्यानंतर हळूहळू “वल्लाह क्या बात है”, “स्री” “सेहरा” अशा अनेक चित्रपटात तिनेही एक्स्ट्रा म्हणून काम केले. “सूरज” चित्रपटातही तिने वैजयंतीमालाच्या दासीचे ही काम केले होते.
“ओ पी रल्हन यांच्या “गहरा दाग” मधे तिला राजेंद्र कुमारच्या बहिणीचा रोल मिळाला. तसेच “मुझे जीने दो” मधेही तिची छोटिशी भूमिका होती. मुमताजची समकालीन शर्मिला! तिच्या ये रात फिर न आएगी, सावनकी घटा मेरे हमदम मेरे दोस्त! या सर्व चित्रपटात छोट्या रोल मधे मुमताज होती. “मेरे हमदम मेरे दोस्त” मधलं “अल्ला ये अदा कैसी है इन हसीनोंकी…हे गाणं आणि त्यावरचं मुमताजचं नृत्य केवळ लाजवाब आहेच!
हिंदी सिनेसृष्टीत हे असे मुमताजचं स्ट्रगल चालूच होतं. त्यावेळीच दारासिंगना स्टंटपटात योग्य नायिका मिळत नव्हती. तेव्हा कुणीतरी मुमताजला विचारणा केली आणि स्टंटपट का होईना पण मुख्य भुमिका आहे म्हणून ती लगेच ती तयार झाली. थोडेथोडके नाही तर तिने दारासिंग बरोबरच सोळा हीट स्टंटपट,C ग्रेड चे केले. त्यातला एक होता “सिकंदर-ए-आझम”! त्यातील “जहां डाल डालपर सोनेकी चिडियां करती है बसेरा वो भारत देश है मेरा… हे सुप्रसिध्द गीत त्याच चित्रपटात होतं. प्रेमनाथ वर ते चित्रित झाले होते.
त्याकाळी दारासिंगना साडेचार लाख मानधन होते तर मुमताजला अडीच लाख! तिला आता हळूहळू पैसा मिळू लागला होता पण चांगल्या मोठ्या बॅनरखाली नायिकेचं काम काही मिळेत नव्हते. नाही म्हणायला पत्थर के सनम मध्ये सह नायिकेचा रोल मिळाला होता. पण भले भले नायक स्टंटपटाची नायिका म्हणून तिच्या बरोबर काम करायला तयार नव्हते.
१९६७ साली बी. नागी रेड्डींच्या “राम और श्याम” मधे तिला दिलीपजींच्या समवेत नायिकेची सुवर्ण संधी मिळाली आणि तीने मिळालेल्या संधीचं खरोखरीच सोनं केलं. दिलीपकुमार यांचेबरोबर तोडीस तोड सहज अभिनय करून त्यांचेकडून प्रशस्ती पत्रक ही मिळविले होते. तिला बालम तेरे प्यारकी ठंडी आगमें जलते जलते”.हे सुंदर गाणंही मिळालं. त्याच वेळी शांताराम बापूंचा “बूंद जो बन गई मोती” हा चित्रपट त्यांची मुलगी राजश्री हिने नाकारल्यामुळे मूमताजकडे आला. “ब्रम्हचारी” मध्ये तीचा पाहुणी कलाकार म्हणून “आजकल तेरे मेरे प्यारके चरचे हर जुबानपर” हा शम्मीजीं बरोबरचा डान्स पण तेवढाच एकदम भारीच केला आहे आहे. एकदम एक नंबर परफॉर्मन्स.
मुमताजला चागंले चित्रपट मिळायला १९६९ साल उजाडले. राज खोसलाच्या दो रास्ते” मधे राजेश खन्ना बरोबर भूमिका होती. रोल फार मोठा नसला तरीही मोठा बॅनर आणि चार उत्तम गाणी तिच्या वाट्याला आली होती.
या नंतर लगेच आला राजेश खन्ना सह बंधन, जितेंद्रचा जिगरी दोस्त नंतर आदमी और इन्सान ह्यात सहाय्यक भूमिका असली तरी महत्वाची होती. त्यानंतर तिच्या अभिनय सामर्थ्याला वाव देणारा चित्रपट आला खिलौना प्रेयसी ने धोका दिल्यामुळे स्वतःचं मानसिक संतुलन गमावलेल्या एका तरुणाच्या आयुष्यात आलेली गणिका! ही भूमिका मुमताजने एवढी उत्तम केली कि तिच्या कामाची वाहवा होऊ लागली. याला लक्ष्मी प्यारेंच सुमधूर संगीत होतं.तिला ह्या भुमिकेमुळे”फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला
१९७० साली आलेल्या सच्चा झूठा मधे आधी शशी कपूर काम करणार होता पण मुमताजचं नाव ऐकल्यावर स्टंटपटातील नायिकेबरोबर काम नाही करायचं म्हणून त्यांनी नकार दिला. दैवाचा खेळ कसा असतो पहा. पुढ याच मुमताचची कारकिर्द ऐन भरात असताना चोर मचाए शोर चित्रपटात मुमताज हिरोईन होगी तोही काम करुंगा! असे म्हणून ते अडून बसला. “सच्चाझूठा” मधे राजेश खन्नाने मुमताज बरोबर काम केले आणि चित्रपट जबरदस्त हीट झाला.
१९७१ मध्ये मेला मध्ये (संजयखान) चाहत (जितेंद्र,विश्वजीत), उपासना (संजयखान & फिरोजखान) हे चित्रपट बर्र्यापैकी गाजले. १९७१ ला मुमताजचे अजून तीन चित्रपट हीट झाले ते म्हणजे तेरे मेरे सपने हरे रामा हरे कृष्णा (देवआनंद ) आणि दुश्मन (राजेश खन्ना) यात मुमताजच्या भूमिका फार मोठ्या नसल्या तरी आता ती एक उत्तम ए ग्रेड ची यशस्वी अभिनेत्री म्हणून प्रसिध्द होती. तिच्या मानधनात ही खुप वाढ झाली होती.
त्यानंतर १९७२/७३ मध्ये पुन्हा ओळीने गोमती के किनारे, अपराध रुप तेरा मस्ताना .अपना देश बंधे हाथ लोफर झीलके उस पार हे चित्रपट आले ज्यात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, फिरोज खान, धर्मेद्र हे सहनायक होते..
१९७४ मध्ये आलेल्या आपकी कसम मध्ये ती फारचं सुंदर दिसली आहे विशेष करुन जय जय शिवशंकर” ह्या गाण्यात या चित्रपटात तिची मध्यवर्ती भूमिका होती. राजेश खन्ना तिचा नायक आणि संजीवकुमार सहाय्यक भूमिकेत होता! नवर्र्याने अकारण घेतलेल्या संशयाने अतिशय दुखावलेली पत्नी तिने खूप सुंदर साकारली. त्यानंतर *रोटी आणि प्रेमकहानी हे चित्रपट आले. १९७७ मध्ये तिचे आईना लफंगे आणि नागीन हे चित्रपट झळकले जे ती लग्नाआधी पूर्ण करुन गेली होती.
मुमताजने मयूर माधवानी या लंडन स्थित उद्योगपतीशी विवाह केला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला राम राम ठोकला. ह्या आधी मुमताज शम्मीकपूरचे ब्रह्मचारी चित्रपटात ‘”आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर” या गाण्याच्या शूटींग दरम्यान सूर जुळलेले. तिला शम्मी कपूर ने लग्नासाठी विचारले होतें. पण लग्नानंतर चित्रपटात काम करायचे नाही अशी अटही घातली होती. ही अट मुमताजला कोणत्याच दृष्टीने परवडणारी नव्हती. कारण एकतर ती कनिष्ठ मध्यमवर्गिय कुटुंबातून आली होती आणि तिच्या घरच्यांना तिच्याच आर्थिक आधाराची गरज होती. शिवाय ज्युनियर आर्टिस्ट पासून सुरु झालेले तिचे करियर आता कुठे बहरात आले होते. यामुळे तीने नकार दिला आणि ती शम्मी कपूर बरोबरची प्रेमकहाणी अर्ध्यावरचं संपून गेली.
मुमताज फक्त अभिनयासाठी कधीच प्रसिध्द नव्हती. पण जिथे जिथे तिला संधी मिळाली तिने त्या त्या भूमिकेचं सोनं केलं. काही वर्ष अशीच गेली. ती अधून मधून भारतात येत राहिली. दोन मुलींपैकी मोठी तान्याचं फिरोजखानच्या मुलाशी लग्न झालं. अशातच एक दिवस तिला कॅन्सर झाल्याची दुःखद बातमी आली. कधीमधी तिचे वृत्तपत्रात फोटो यायचे . पण ती सुंदर, अवखळ, मोहक मुमताज जणू हरवून गेली. ५१ व्या वर्षी तिला कॅन्सर डिटेक्ट झाला होता. गेली २० वर्ष ती या आजाराशी जिद्दीने लढतेय.
१९९६ साली तिला “फिल्मफेअर”ने लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने गौरविले. तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सोनेरी कारकिर्दीसाठी तीला आयफा पुरस्कार मिळाला. मध्ये १९९० साली डेव्हीड धवनच्या आँधियां चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा बरोबर ती झळकलेली. बस्स! तो तिचा शेवटचा चित्रपट! आता मुमताज कधीमधी भारतात येते कुठल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमाला.मुलीला भेटायला..आम्ही त्या चुलबुली” “शोख”, “हसीन”, अपर् नाक वाल्या मुमताजची वाट बघतोय जी आम्हाला खरी खरी नाही तरी स्वप्नात तर जरुर भेटेल…
मुमताजची काही गाजलेली गाणी…
*बालम तेरे प्यारकी ठंडी आगमे जलते जलते….
*रात सुहानी जाग रही है धीरे धीरे
*खिजाके फूलपे आती कभी बहार नहीं
*ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे
*बिंदिया चमकेगी चुडी खनकेगी
*छुप गए सारे नजारे ओय क्या बात
*आना है तो आओ बुलाएंगे नहीं
*बिना बदरा के बिजुरा कैसे चमकेगी
*हो कहदो कहदो तुम भी कहदो
*यूं ही तुम मुझसे बात करती हो
*अगर दिलबरकी रुसवाई हमें मंजूर हो जा
*गोरीके हाथमें जैसे ये छल्ला
*रुत है मिलनकी साथी मेरे आरे
*आओ तुम्हे मैं प्यार सिखादूं
*ए मैंरे कसम ली ए तूने कसम लीsss
*जीवनकी बगिया महकेगी
*कांची रे कांची रे ^प्रीत मेरी सांची
*दिलकी बाते दिलही जाने
*बडे बेवफा है ये इश्कवाले
*दुश्मन दुश्मन दोसतोंसे प्यारा है
*बलमा सिपैया हाय रे तेरी दंबूक से डर लागे
*देखो देखो देखो बाईस्कोप देखो
*तुम मिले प्यारसे मुझे जीना गंवारा हुआ
*हमारे सिवा तुम्हारे और कितने दिवानेहै
*चल चले ऐ दिल कर किसिका इंतजार
*क्या नजारे क्या सितारे सबको है इंतजार
*दुनियामें लोगोंको धोखा कभी हो जा है
*कजरा लगाके गजरा सजाके
*आज मौसम बडा बेईमान है
*कोई सहरी बाबू दिल लहरी बाबू
*मैं तेरे इश्कमें मर ना जाऊ कहीं
*सुनो कहो कहा सुना कुछ हुआ क्या
*करवटे बदलते रहे सारी रात हम
*जिंदगी के सफरमें गुजर जाते है
*चल दरियामें डूब जाए
*फूल आहिस्ता फेंको फूल बडे नाजूक होते हैं.
**