दुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजन

★पुरस्कार★ मधुर कुलकर्णी

★पुरस्कार★

मराठी अवॉर्ड फंक्शनची रात्र. नवीन अभिनेते आणि अभिनेत्री फोटोग्राफरना पोजेस देण्यात व्यस्त होते. उंची वस्त्र,उंची परफ्युम आणि हाय, हॅलोने वातावरण ग्लॅमरस झाले होते. त्या सगळ्या गोंगाटातून दूर,अंतरा जरा आडोशाला उभी होती. इतक्यात नवीन अभिनेत्री तनया अंतराजवळ आली. तिने वाकून अंतराला नमस्कार केला.
“अंतराताई,मी तुमची फॅन आहे. तुमचा अभिनय मला खूप आवडतो. मी लहान असल्यापासून तुमचे सगळे सिनेमे बघितले आहेत. तुम्ही अभिनयाची कार्यशाळा आहात.”

“ओह! थँक्स.” किती दिवसांनी कोणाचे तरी कौतुकाचे शब्द अंतराच्या कानावर पडत होते. फोटोग्राफर कॅमेरा घेऊन आले तशी तनया पोज द्यायला गेली.

आकाश येताना दिसला आणि अंतराला हायसं झालं. “अशी एकटी का उभी आहेस?” आकाशने विचारलं.

अंतरा काहीच बोलली नाही.
“ह्या वातावरणात तुझं आत्तापर्यंतचं सगळं आयुष्य गेलं. तुला हे नवीन नाही.”

“चल, आत हॉलमधे जाऊ.” अंतरा चालायला लागली. आत गेल्यावर एक दोघांशी बोलून अंतरा तिच्या खुर्चीवर बसली. आकाश सर्वात पुढच्या रो मधे बसला होता. कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरवातीला टेक्निकल अवॉर्डस् जाहीर झाले. करमणुकीसाठी कोणाचं स्किट,नवीन अभिनेत्रींचे डान्स, कोणाचं गायन मधूनच सुरू होतं. सर्वात शेवटी अभिनयाचे अवॉर्ड घोषित करायची वेळ आली. अंतरा अस्वस्थ झाली. तळहात घामाने भिजला. छातीत धडधड वाढली.

“आजचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यास,मी ज्येष्ठ दिग्दर्शक राघव ह्यांना स्टेजवर आमंत्रित करते. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सिनिअर ऍक्ट्रेस अंतरा ह्यांना ‘ती रात्र’ ह्या चित्रपटासाठी जाहीर झाला आहे.”

अंतरा ते ऐकून अवाक् झाली. टाळ्यांच्या जल्लोषात तिला आकाश स्टेजवर घेऊन गेला. ज्येष्ठ दिग्दर्शक राघव तिच्या हातात पुरस्कार देत म्हणाले,
“वेल डन अंतरा. आफ्टर अ लॉंग टाईम.”

“खूप खूप धन्यवाद सर.” अंतराने पुरस्कार स्वीकारला. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. समोरचा प्रेक्षकवर्ग धूसर व्हायला लागला. त्या टाळ्यांच्या गजरात तिला पंचवीस वर्षापूर्वीचे प्रेक्षक दिसायला लागले. टाळ्यांच्या कडकडाटात तिने स्वीकारलेलं पहिलं अवॉर्ड. तिने आकाशचा हात घट्ट धरला. मन स्मृतींनी हळवं झालं होतं.
……..

अभिनयाचे रीतसर शिक्षण घेऊन इंडस्ट्रीत आलेली अंतरा,अल्पावधीतच लोकप्रिय झाली. जालना सारख्या छोट्या शहरातून पुण्याला येऊन तिने अभिनयाचे शिक्षण घेतले. सुरवातीला नाटक,मग सिरीयल आणि मग सिनेमा असा प्रवास सुरु झाला. पहिल्याच चित्रपटाने उत्तुंग यश मिळवलं आणि अंतराला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. निर्मात्यांची दारापुढे रांग लागली. महिन्यातले सगळे दिवस ती व्यस्त राहू लागली. प्रत्येक चित्रपटागणिक ती तिचे मानधन वाढवू लागली आणि तिला ते मिळू लागलं. आकाशची आणि तिची ओळख एका चित्रपटादरम्यान झाली. तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक आकाश होता. आकाश इंडस्ट्रीत नवीनच होता पण एक उत्तम दिग्दर्शक म्हणून त्याने नाव कमावलं होतं.

आकाशचं काम अंतराला आवडलं पण एका सीनवरून दोघांचा खटका उडाला. आकाशाला संयत अभिनय हवा होता आणि अंतरा ओव्हरऍक्ट करत होती.
“अंतरा मॅम, ह्या सीनमध्ये तुमचे हावभाव उग्र होताहेत. ही एका समंजस स्त्रीची भूमिका आहे. तिचा तिच्या भावनांवर ताबा आहे. तुम्ही ओव्हर रिऍक्ट होताय.”

“मिस्टर आकाश,तुम्ही इंडस्ट्रीत नवे आहात. मला पाच वर्षे होऊन गेली. मी अनेक उत्तम दिग्दर्शकांकडे काम केलं आहे. आय थिंक आय एम परफेक्ट.” अंतरा रागातच बोलली.

आकाशचा पारा चढला. कितीही ज्येष्ठ असली तरी एका अभिनेत्रीने दिग्दर्शकाला शिकवावं, हे त्याला पटलं नाही. प्रकरण चिघळायला लागलं,तसा निर्माता मधे पडला आणि अंतराची समजूत काढली. पण चित्रपट बघताना,त्या सीनमधला अंतराचा अभिनय बघून सगळ्यांनी तिचे आवर्जून कौतुक केले. अंतराने आकाशची माफी मागितली आणि त्या दिवसापासून दोघेही एकमेकांचे छान मित्र झाले. अंतराच्या सहवासात सतत राहून,आकाशला तिच्याविषयी नाजूक भावना निर्माण झाल्या. त्याने अंतराला एक दिवस विचारलंच,”अंतरा, मला तू माझी लाईफ पार्टनर म्हणून आवडशील.”

“आकाश,काय बोलतो आहेस? आत्ता कुठे मी यशाची चव चाखतेय. मला त्या बंधनात अडकायचं नाही. आपण दोघे मित्र म्हणूनच ठीक आहोत.”

अंतराला अपयश माहितीच नव्हतं. तिला हिंदी सिनेमांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि तिचे पदार्पण एका मोठ्या निर्मात्याच्या चित्रपटात झालं. त्या चित्रपटाने कोटीत कमाई केली. अंतराला दिवस पुरत नव्हता,इतकी ती व्यस्त झाली. जुहूला एका पॉश बिल्डींगमधे फ्लॅट घेतला. जालनावरून आईवडिलांना मुंबईत घेऊन आली. लोणावळ्याला फार्महाऊस,दाराशी तीन गाड्या,दिमतीला नोकर होते. सतत पार्ट्या, प्रीमिअर्स आणि अवॉर्ड फंक्शन हेच तिचं आयुष्य झालं. वाईनपासून सुरवात झाली आणि उंची दारू तिची रोजची रात्रीची सोबती झाली. व्यसन इतकं वाढलं की अनेकदा आकाश जर पार्टीत असेल तर तोच तिला घरी आणून सोडायचा.

आकाशचं लग्न झालं आणि त्याने अंतराला भेटणं कमी केलं. दोघेही आपल्या कामात व्यस्त होते. भेटी फार होत नसल्या तरी फोनवर बोलणं होत होतं. मधे अनेक वर्ष गेली. हल्ली अंतराचा अभिनय आकाशला एकसुरी जाणवायला लागला. दारूच्या अंमलामुळे शब्दोच्चार स्पष्ट येत नव्हते. ओढून ताणून काम करतेय असं वाटत होतं आकाशला हिंदी चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शनाची ऑफर आली,ज्यात अंतरा हिरोईन होती. अंतराला इतक्या दिवसांनी प्रत्यक्ष भेटल्यावर,तिच्यातील बदल बघून आकाश आश्चर्यचकित झाला. अंतराने चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली होती. तिच्या चेहऱ्यावरचे निरागस,कोवळे भाव पूर्ण गेले होते. डोळ्याखाली सूज होती. चेहऱ्यावर मेकअपचा थर होता आणि दारूच्या व्यसनामुळे हाताला कंप येत होता.

चित्रीकरणाचा पहिलाच दिवस होता. उदयोन्मुख पण अतिशय बुद्धिमान समर सेन ह्या चित्रपटाचा दिग्दर्शक होता. अंतराच्या अभिनयावर तो नाराज दिसत होता. “मॅम,आप तो बुजुर्ग है. आप से बहस नही करना चाहता. मगर चेहरे पर एक्सप्रेशन कम है. फिर से करते है.”
अनेकवेळा सांगूनही समरला अंतराचा अभिनय आवडत नव्हता. त्याने पॅकअप केलं आणि सेट सोडून निघून गेला. दुसऱ्या दिवशी अंतराला फोन आला. तिला चित्रपटातून काढलं आहे आणि तिच्या जागी नवीन हीरॉइन घेतली आहे. अपमानाने धुमसत अंतराने आकाशला फोन केला,”समजतो कोण हा समर स्वतःला? माझ्यासारख्या प्रथितयश आणि अनुभवी नायिकेला आता हा नवीन मुलगा अभिनय शिकवणार?”

आकाश दोन मिनिटं शांत होता. त्याने हिम्मत करून अंतराला सांगितलं, “अंतरा,आता टेक्निक खूप बदललं आहे. अभिनयाच्या कक्षा बदलल्या आहेत. वेषभूषा, केशभूषा, सगळंच झपाट्याने बदलत चाललंय. दर वर्षाला सुंदर कोवळ्या, आधुनिक तरुण मुली इंडस्ट्रीत येताहेत. तुझी चाळीशी कधीच उलटली आहे. आता हीरॉइनच्या रोलचा आग्रह धरू नको. आता चरित्र भूमिकांकडे वळ. मी समरपेक्षा अनुभवाने कितीतरी पुढे आहे पण मी वय स्वीकारलं आहे. असिस्टंट डिरेक्टरची ऑफर मी स्वीकारली, कारण आपली कर्मभूमी इंडस्ट्री आहे. इथे तग धरून राहायचं आहे. काळाच्या मागे किंवा पुढे राहून चालत नाही. काळाबरोबरच चालावं लागतं.”

“आकाश,माईंड युअर बिझिनेस. तू मला शहाणपण शिकवायची गरज नाही.” अंतराने रागाने फोन बंद केला.
……..

अंतरा तिच्या लोणावळ्याला असलेल्या फार्म हाऊसवर शिफ्ट झाल्याचे आकाशला काही दिवसांनी कळले. तिने अभिनयाला आणि इंडस्ट्रीला दूर केलं. आईवडील परत जालनाला गेले होते. एक उत्तम अभिनेत्री स्वतःच्या अहंकारापायी चांगले रोल्स गमावते आहे,हे आकाशला जाणवलं. त्याने तिच्या फार्महाऊसवर जाऊन तिला भेटायचे ठरवले. त्याने अंतराला फोन लावला,”अंतरा,कशी आहेस?”

“ठीक आहे. शांत आयुष्य जगते आहे.”

“तुला भेटायचं आहे.”

“ये की इथे फार्महाऊसवर. तुला कधीपासून परवानगी लागायला लागली?”

अंतराचं असं शांत बोलणं ऐकून आकाश सुखावला.
“उद्या येतो.”

दुसऱ्या दिवशी आकाश अंतराच्या फार्महाऊसवर पोहोचला. अंतराने दार उघडलं. एक अनुभवसंपन्न, यशस्वी, समाधानी स्त्री त्याच्यासमोर उभी होती. केस पिकले होते. चेहरा वय दाखवत होता,पण कुठलाही मेकअप नसलेला तो चेहरा,आकाशला त्या क्षणी जगातला सगळ्यात सुंदर चेहरा वाटला.

“ये, कसा आहेस?”

“मी मजेत. तुझ्याकडे काम होतं.”

“बोल की!”

“अंतरा,माझ्याकडे एक नवीन मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आली आहे. त्यात हिरोच्या आईचा रोल तू करावा अशी माझी इच्छा आहे.”

अंतराने आकाशकडे बघितलं. तिच्या घशात आवंढा आला.”मी ते सगळं कधीच मागे टाकलं आहे. परत तिथे जायची इच्छा नाही.”

“मला नाही असं वाटत. अंतरा, अभिनय तुझ्या रक्तातच आहे. तू त्याशिवाय राहू शकत नाहीस. माफ कर,परत स्पष्ट बोलतो. तुझ्या अहंकारामुळे तू दूर फेकल्या गेलीस. चांगल्या भूमिका हातून गमावल्या आहेस.”

“मला आता जमणार नाही. हे अभिनयाचं नवीन तंत्र मी आत्मसात करू शकत नाही.”

“मी तुला चॅलेंज देतो. तूच ती भूमिका उत्कृष्ट करशील,ह्याची मला खात्री आहे. उद्या सकाळी मुंबईत माझ्या घरी तुझी वाट बघतो आहे. हे चित्रपटाचं स्क्रिप्ट वाच आणि उद्या ये.” आकाशने तिला स्क्रिप्ट दिलं.

“आकाश,आता जेवूनच जा.”

“तुझा पाहुणचार घेतल्याशिवाय मी इथून हलणारच नाही.पण उद्या मला तू मुंबईत हवी.” आकाश हसत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अंतरा आकाशकडे,ठरलेल्या वेळेत पोहोचली. तिला बघून आकाशला अतिशय आनंद झाला.
“तुझी साइनिंग अमाउंट निर्मात्याला द्यायला सांगतो.”

“नको आकाश. आधी माझं काम त्यांना बघू दे. परत रिप्लेस व्हायची भीती वाटते.”

“वेडी आहेस का? पण ठीक आहे,तुझी इच्छा.”

शूटिंगला सुरवात झाली. अंतराचा उत्कट अभिनय बघून सेटवर सगळे भारावून जायचे. चित्रपटाने तुफान यश मिळवलं. सगळ्या वृत्तपत्रात अंतरावर स्तुतीसुमने उधळली होती. ‘अंतराचे दमदार पुनरागमन’, ‘Antara is back’ …आणि त्या भूमिकेसाठी अंतराला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
………

अंतराने पुरस्कार स्वीकारला आणि माईक हातात घेत बोलली, “हा पुरस्कार मला ज्येष्ठ दिग्दर्शक आणि माझे अतिशय जवळचे मित्र आकाश ह्यांच्या प्रेरणेने मिळाला आहे. त्यांच्यामुळे मी परत ह्या क्षेत्रात आले. नैराश्य आलं होतं,आत्मविश्वास गमावला होता. पण अशा वेळी खरा मित्र धावून येतो म्हणतात न,ते आकाशने केलं. आणि रसिक मायबाप,तुमचे मनःपूर्वक आभार. तुमच्या टाळीशिवाय,प्रोत्साहनाशिवाय मी आणि माझा अभिनय अपूर्ण आहे. खूप खूप धन्यवाद.”
परत टाळ्यांचा कडकडाट झाला.

दुसऱ्या दिवशी अंतराने आकाशला फोन लावला.
“आकाश थँक्स. तुझ्यामुळे माझ्यातली अभिनेत्री मला परत गवसली.”

“इतकी औपचारिक होऊ नकोस. आता मागे वळून बघू नकोस. तुझ्या आयुष्याचा यशस्वी उत्तरार्ध तुझी वाट बघतोय.” आकाश म्हणाला.

अंतराच्या पापण्या भिजल्या होत्या. आधी मिळालेल्या इतर अनेक पुरस्कारांमध्ये नवीन मिळालेला पुरस्कार दिमाखात उभा होता….

××××××××

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

3 Comments

  1. उत्तम कथा व वर्णनही अगदी नेमकं केलं आहे. कुठेही पाल्हाळ किंवा अपुरं वर्णन वाटत नाही. अंतरा व आकाशचं व्यक्तीमत्व पण छान उभं केलंय. एक गोष्ट सांगावीशी वाटते, प्रत्येक कथेतून काहीएक तात्पर्य किंवा टेकअवे थॅाट असतो ज्यामुळे कथा मनात काही वेळ घोळत रहाते. तसा विचार याकथेत उठावदारपणे समोर नाही आला. अंतरा व आकाश काही वेगळं शिकवून नाही गेले असं वाटत राहीलं. पण असं असलं तरी हे लेखन आवडलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}