हिशोब एका चुकीचा.~ नितीन राणे
हिशोब एका चुकीचा.
आज पहील्यांदा अचानक गावी जावून आईबाबांना आश्चर्यचकीत करणार होते. मला त्यांच्या डोळ्यातून ओसंडणारा आनंद पाहायचा होता. तब्बल चार महीन्यानी मी गावी जात होते.
‘माझ्या असानमेंट पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे मला गावी यायला नाही जमत आहे’
असे अण्णांना सांगून मी मोबाईल बंद केला आणि मी माझी बॅग भरायला घेतली. हॉस्टेलमध्ये माझ्यासोबत आमच्याच गावातील सरीता असल्यामुळे मला कधीच आई बाबांना आश्चर्यचकीत करता आले नव्हते. पण कालच सरीता तिच्या मामाच्या गावी गेली होती. त्यामुळे हा प्लान मला आखता आला होता.
माझ्या मोबाईलवर सरीताचा कॉल आला तेव्हा नाखुशीनेच मी तो उचलला.
“हॅलो, बोल गं”
“मी पोचले, तुझा काय प्लान आहे, शनिवार रविवारचा?” असे सरीताने विचारल्यावर मी सावध पवित्रा घेतला.
“मी नानेघाटच्या ट्रेकला जातेय, नाईट स्टे आहे” मी ट्रेकला जाते म्हटल्याबरोबर तिने तिचे बोलणे आवरते घेतले.
“ठीक आहे, बरं झालं मी मामाकडे निघून आले ते. मस्त आराम करायचा सोडून कसले ते डोंगर चढता कोणास ठाऊक?” असे बोलून तिने कॉल कट केला.
पिच्छा सुटला एकदाचा हीचा आणि समजा सरीताला बाबांनी कॉल केला असता तरी आई बाबांनाही काही कळणार नव्हते. स्वत:भोवतीच गिरकी घेत मी पलंगावर पडले.
सकाळी ५ वाजताची पुणे – कणकवली बस होती. ती चुकवून चालणार नव्हते.
मी सकाळी हॉस्टेलवरून बाहेर पडले तेव्हा हवेत खुपच गारवा होता. आज खुप दिवसानी सकाळची शुद्ध हवा अनूभवायला मिळत होती. बस अगदी वेळेवर आली होती. जशी बस चालू झाली तस माझं मन भुतकाळात जाऊ लागले. मनात गोड हूरहूर लागून राहीली.
जेव्हा मी डॉक्टर होण्यासाठी पुण्यासाठी गावाहून निघाली होते तेव्हा उर भरून आला होता. सासरी जाणाऱ्या मुलीसारखी मुसमुसत होते मी. शेवटी मला बाबानी पुण्यापर्यंत आणून सोडले होते. सुरूवातीला खुप आई बाबांची खुप आठवण यायची. मी आई बाबांची लाडकी होते. पण अण्णा संस्कार आणि शिस्तीमध्ये कोणतीही तडजोड करत नसत. छोट्याश्या गावी राहून पण मला आज इथपर्यंत घेऊन आले होते. अजुन एका वर्षाने मी डॉक्टर होणार होते. मी डॉक्टर व्हावं ही त्यांची इच्छा होती. त्यांच्या इच्छेला मी माझी महत्वकांक्षा बनवली. आमच्या कुटूंबाच्या कमाईचे एकमेव साधन असलेली जमिन विकून मला डॉक्टर व्हायचे नव्हते. पण ते काही केल्या ऐकत नव्हते. माझ्या डॉक्टरकी शिक्षणासाठी लागणारा पैसा त्यांनी रातोरात उभा केला. ज्या जमिनीत हक्काचा संसार होत होता तिथे त्यांना गुलामी करताना मला बघवत नव्हते. लवकरच त्यांना सुखात ठेवणार होते.
बस सकाळी पाच वाजता पुणेहून निघाली पण कणकवलीत पोहोचेपर्यंत खुप लेट झाली. माझी संध्याकाळची शेवटची एस टी ही निघून गेली होती. अंधार पडला होता. आमच्या गावातले रिक्षावाले पण निघून गेले होते. नेमका मोबाईलही बंद झालेला. मी माझ्या कणकवली शहरात राहणाऱ्या मैत्रिणीकडे जायचे ठरवले. तिच्या घराजवळ पोहोचले तेव्हा तिथेही निराशाच पदरात पडली. तिच्या घराला कुलूप होते. मी परत रिक्षा स्टँडला आले. आमच्या गावात जाण्यासाठी इतर रिक्षावाले अव्वाच्या सव्वा भाडे सांगत होते. माझ्याकडे मोजकेच पैसे होते. मी परत एस टी स्टँडला आले. सावंतवाडी बस लागली होती. ही बस आमच्या गावाजवळून जात असली तरी पुढची वाट अंधारातून चालतच जावी लागणार होते. पण नाविलाज होता. पूर्ण रात्र स्टँडला बसून राहू शकत नव्हते. मी सावंतवाडी बस पकडली. तिठ्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणीतरी सोबतीला मिळेल असा विचार करून बसमध्ये चढले. बाजुलाच एक गृहस्थ मोबाईलमध्ये कालनिर्णय कॅलेंडर ओपन करून पाहत होते. माझा लक्ष आजच्या तारखेकडे गेला. ती रात्र अमावास्येची होती. एरव्ही धीट असणारी थोडी घाबरले. बसमधून उतरल्यावर मर्गजांच्या दुकानावर कोणी नसले तर आपण एकटे कसे जायचे. हा प्रश्न मला सतावत होता. मनात रामरक्षा म्हणत तशीच बसून राहीले.
थोड्यावेळाने माझा बसस्टॉप आला तशी मी उतरले. समोर पाहते तर मर्गजांचे दुकान बंद होते. भर थंडीच्या दिवसातही मला घाम फुटला. आई बाबांना आश्चर्यचकीत करायचा प्लान अंगाशी येणार असं वाटू लागले. हायवे वरून जाणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्स खेरीज कोणताही उजेड तिथे नव्हता. मी हताश झाले होते. माझा मूर्खपणा मला नडला होता. अमावस्येची रात्र , मिट्ट काळोख .. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. तिथून घरापर्यंतचा रस्ता सोपा नव्हता. मी काहीवेळ तशीच बसून राहीले. काय करावे सुचत नव्हते. दुरवर एक घर दिसत होते. तिथे जाऊन मदत मागायची ठरवले. मी माझी मोठी बॅग तिथेच ठेऊन हायवेच्या बाजूने चालायला सुरूवात केली. इतक्यात गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याकडून कोणीतरी येताना दिसले. मी जागीच थांबले.
ती व्यक्ती माझ्याजवळच येत होती. त्या व्यक्तीने माझ्यावर विजेरीचा प्रकाश टाकला. मी डोळ्यावर हात पकडत समोर पाहीले. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. माझ्या समोर साक्षात माझे बाबा उभे होते.
“अण्णा , तुम्ही इथे कसे?” असे बोलून मी त्यांना बिलगायला गेले तर ते थोडे मागे झाले.
“अगं भारती ,मला हात नको लावूस, मी गावात एकाच्या प्रेतयात्रेला गेलेलो, तिथूनच थेट इकडे आलोय.”
“तुम्हाला कसं कळले की मी गावी येणार आहे ते?” माझ्या प्लान जरी फसला असला तरी बाबा मला न्यायला आले होते याचा आनंद खुप होता.
“पोरी मी तुझा बाप आहे, काल रात्री तुला फोन केल्यापासून मला सारखं वाटतं होतं की तु गावी येणार.” त्यांचे हे बोल ऐकून मला अगदी भरून आले.
खरचं आई बाबा मुलांच्या बाबतीत मनकवडे असतात. त्यांना मुलांनी न सांगताही सारं कळत असते. मी कीती नशिबवान आहे, असं वाटून गेलं.
मी बाबांच्या मागोमाग चालत राहीले. वाटेत माझीच बडबड चालू होती. बाबा शांतपणे सारं ऐकत होते. तसे आमचे अण्णा मितभाषी. जेवढ्यास तेवढे बोलण्यावर भर. मी मात्र आईसारखी बडबडी झाले होते. थोडे पुढे चालत गेल्यावर एका ठीकाणी वळणावर नदीचा किनारा लागतो तिथे वरून कसला तरी जोराचा आवाज झाला. मी घाबरले. बाबांना पकडायला गेले. पण बाबा मात्र दूर झाले. मुलीला जरी डॉक्टर करायला निघाले असले तरी ते स्वत: मात्र जुन्या विचाराचे होते. घरी जाऊन आंघोळ केल्याशिवाय मला शिवायला देणार नव्हते. समोर पाहतो तर रस्त्याच्या वरच्या बाजूने दहा ते बारा डुकरांचा कळप खाली येत होता. अण्णा थांबल्याबरोबर मीही थांबले. विचित्र आवाज करत तो कळप नदीच्या दिशेने खाली गेला. छोटीशी घाटी चढून आम्ही आमच्या गावात आलो. आता अण्णांची पावले झपझप पडत होती.
“भारती माझ्यासाठी काय आणलस?” अण्णानी विचारले.
“अण्णा तुमच्यासाठी खादीचे सदरा आणि पायजमा आणलाय” अण्णांचे खादीप्रेम मला चांगलेच ठाऊक होते.
“मला दाखव ना!”
“आता इथे?”
“हो , मला आताच पाहायचे आहे” बाबांचा हट्ट पाहून मी आश्चर्यचकीत झाले.
वाटेतच थांबून बॅग मधून कपड्याची पिशवी बाहेर काढली. माझ्या हातातून ती पिशवी एखाद्या लहान मुलासारखी खेचून घेतली.
“अण्णा काय केलेत हे. तुम्ही शिवलात ना त्या कपड्यांना” मी लटकेच अण्णांना रागवले.
“राहूदे गं, मला आता घालायचे आहेत ते कपडे.” अण्णांचे हे असंबद्ध बोलणे मला कळले नव्हते.
“भारती तू हो पुढे, मी जरा जाऊन येतो” पांदीमधुन आमच्या वाडीत शिरलो तेव्हा बाबा हाताची करंगळी दाखवत म्हणाले. कपड्यांची पिशवी मात्र स्वत:जवळ ठेऊन घेतली.
मला आता उजेडाची गरज नव्हती कारण ठीकठीकाणी ग्रामपंचायतीने सौरउर्जेवर चालणारे दिवे लावले होते. मी आईला भेटण्याच्या ओढीने झपाझप चालू लागले. थोडं पुढे गेल्यावर आमचे घर दिसू लागले. आमच्या घरासमोर जमलेली खुप माणसे पाहून मला काहीच कळेना. इतक्यात ढोल वाजायला सुरूवात झाली. माझ्या काळजात धस्स झालं. ढोलाचा विचित्र लय आणि घरातून येणारा रडण्याचा आवाज ऐकून काहीतरी विपरीत घडलेय याची मला खात्री देवून गेला. मी तिथे धावतच पोचले. पडवीतून लोकं अण्णांचे कलेवर धरून अंगणात आणत होते. ते समोरचं दृश्य पाहून मी जागच्या जागी कोसळले. कोणीतरी माझ्याकडे धावताना दिसले.
मला शुद्ध आली तेव्हा मी एका हॉस्पीटलमध्ये होते. कॉटशेजारी माझा मामा आणि मामी बसल्या होत्या. मी उठायचा प्रयत्न केला तसा मामाने मला परत झोपवलं.
मला दोन दिवसापुर्वी घडलेले सारं काही आठवले. माझ्या डोळ्यातून ओघळणारे अश्रु थांबायचे नाव घेईनात. दाटून आलेला हुंदका अनावर झाल्यामुळे मी जोरात हंबरडा फोडला. मला समजवताना मामाही मनातून हादरला होता. त्याच दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. आम्ही रिक्षेतून घरी निघालो. माझ्या मनात बरेच प्रश्न आ वासून उभे होते.
अण्णानी या जगातून गेल्यावरही मला दिलेली सोबत मी कधीही विसरणार नव्हते. आता कळत होतं की अण्णा त्यांना न शिवायचे कारण खोटं का बोलले ते.
मी घरी पोचले तेव्हा माझी आई एका बाजूला खोलीत पायात डोकं खुपसून बसली होती. तिच्या चारी बाजूला पातळ सोडून तिला आत बसवली होती. मला पाहून ती ओक्साबोक्शी रडू लागली. मी घरी आल्यावर वाडीतील बऱ्याच बायका जमल्या होत्या. घरातील रडारड काळीज हेलावून टाकत होती. आई थोडी शांत झाल्यावर त्या दिवशी काय झाले ते सविस्तर सांगीतले
“तू गावी येत नाही समजल्यावर अण्णा खुप नाराज झाले होते. त्यांना तू गावी यायला हवं होतं गेले चार पाच दिवस त्यांच्या छातीत दुखत होते. मी हजारदा सांगून पण माझ्यासोबत डॉक्टर जवळ जायला तयार नव्हते. तू आल्यावरच डॉक्टर जवळ जाईन असा हट्ट धरला होता. नंतर नाराज झालेले अण्णा स्वस्थ न बसता त्यानी सरीताला कॉल लावला जेणेकरून तू खरचं कामात आहेस की आम्हाला आश्चर्यचकीत करण्यासाठी खोटं बोलत आहेस. पण सरीताने अण्णांना तू ट्रेकला जात असल्याचे सांगीतले. ते ऐकून ते खुपच नाराज झाले. त्या रात्री त्यांचा डोळ्याला डोळा लागला नाही. सगळी रात्र तळमळत काढली. सारखे काहीतरी बडबडत होते. मी त्यांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते खूप दुखावले होते. दुसऱ्या दिवशी ते सावंताच्या बागेत कामाला गेले आणि तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पीटलमध्ये नेईपर्यंत ते आपल्याला सोडून गेले होते.” असे बोलून आई रडायला लागली.
हे सर्व ऐकून मी परत बेशुद्ध पडले. थोड्या वेळाने मी सावध होताच मामीने मला पोटाशी कवटाळत कुशीत घेतले. आईने जे काही सांगीतले होते त्यामुळे घुसमट होत होती.
“आई, अण्णांच्या मृत्यूला मी जबाबदार आहे” मी असं बोलल्या बरोबर सगळेजण माझ्याकडे पाहू लागले.
“असा नको बोलाव भारती , तुका कायच म्हायत नाय हूता. इतक्या दिवसानी तू गावाक येणार हूतस आणि थोडा आवशी बापाशीक चकीत करूचा वाटला तर तेतूर तुझो काय दोष?” मामी मला कुरवाळत माझी समजूत काढत होती.
“भारती तुझ्या अण्णाना मी फारसा पसंद करत करत नव्हतो. ते माझ्याशी कधीच नीट वागले नव्हते. आमचे मेहूणा – भाओजीचे नाते कधी खुलले नाही. आमचे नीट पटत देखील नव्हते. किंबहूना आमच्या स्वभावातच भिन्नता होती. पण तुझ्या मेडीकल प्रवेशाच्या वेळी ते स्वत:हून माझ्याकडे आले तेही अडचणीत असताना. त्यावेळी त्यांनी जे काही केले ते पाहून मी अवाकच झालो होतो. तुझ्या मेडीकलच्या ऍडमिशन साठी जमिन विकून पण खुप पैसे कमी पडत होते. जमिनीचे पैसे फारसे आले नव्हते. त्यावेळी ते माझ्याकडे पैशाला आले नव्हते. त्यांनी त्यांची एक किडनी विकली होती समोरचा व्यक्ती त्याचे काही पैसे द्यायला टाळाटाळ करत होता. ते पैसे वसूल करण्यासाठी माझी मदत त्यांना हवी होती. राजकीय ओळखीची मदत घेऊन मी ते पैसे मिळवून दिले. ही गोष्ट कोणालाही सांगू नये असं ते म्हणाले. खरतरं आजही ही गोष्ट तुम्हाला सांगणार नव्हतो पण त्यांचा हा त्याग सर्वांना माहीत असायला हवा.” मामा बोलता बोलता भावूक झाला होता.
“भारती एक गोष्ट मला खटकतेय, ज्या दिवशी तूझे बाबा गेले त्यादिवशी अंगणात तुळशीच्या बाजूला खादीचा सदरा आणि पायजमा कोणी ठेवला? आणि आम्ही तोच सदरा – पायजमा तूझ्या बाबांना नेसवला. खरंतर आम्ही अंत्ययात्रेच्यावेळी लागणारे कपडे आणायला आम्ही विसरलोच होतो. ” मामा माझ्याकडे पाहत म्हणाले.
“मामा, ते कपडे बाबांकडे मी दिले होते” मी पटकन बोलून गेले.
” काय? कधी? ते कुठे भेटले तूला?” सगळेच आश्चर्यचकीत झाले होते.
मी गावी येताना घडलेले सारं काही सांगीतले. सगळे जण थक्कच राहीले.
“तूझ्यावर खुप जीव होता गं” आई आपला हूंदका आवरत म्हणाली.
खरं होतं. माझ्यावर त्यांचा खुप जीव होता. पण त्याची शिक्षा मात्र त्यांनाच झाली होती.
मला काहीच समजत नव्हते. मनातून अपराधीपणाची भावना जात नव्हती. अण्णांनी आपली भूमिका मात्र अगदी चोख बजावली होती आणि मी, माझं कुठे आणि काय चुकलं याचा हिशोब मांडत बसले होते. मन आतल्या आत आक्रंदत होते. अण्णांची मनोमन माफी मागत होते.
समाप्त…
या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.
—————————————-
~ नितीन राणे