#रिटर्न गिफ्ट #
माझ्या नातवाने मला आज निरूत्तर केले. दररोज रात्री तो कितीही उशीरा घरी आला तरी माझ्या जवळ १०-१५ मिनिटे शांतपणे बसल्याशिवाय तो जेवत नाही. माझा मुलगा आणि सुनबाई ह्या बाबतीत माझ्याकडे सतत तक्रार करताना म्हणतात की मी त्याला लाडावून ठेवलं आहे. आता तर त्याचं लग्न देखील झालं आहे. घरी आल्यावर लवकर जेऊन त्याने त्याच्या बायकोसमवेत वेळ घालवला पाहिजे. पण तसं होत नाही. आज अखेर तो नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत आल्यावर मी त्याला तशी विनंती देखील केली. पण त्याचं उत्तर ऐकून मला गहिवरून आलं. मी निरूत्तर झालो. त्याला जवळ घेऊन मी घट्टपणे कवटाळून धरलं. माझ्या आजारपणाचा मला क्षणभर विसर पडून मी मनसोक्तपणे रडलो. पण माझ्या नातवाचा माझ्यात अडकलेला जीव पाहून मी सुखावलो देखील.
माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवत तो मला म्हणाला,” आबा, रोज मला घरी आल्यावर भेटायला यायची गरज नाही असं जे आज तुम्ही म्हणालात ते आजचं आणि शेवटचंच. ह्या बाबतीत मी काय करायचे ते माझे मलाच ठरवू दे प्लीज 🙏. तुम्ही आईबाबांचं नका ऐकू. तुमचं माझं नातं नुसतं आजोबा नातवाचं नसून त्यात बऱ्याच आठवणी दाटीवाटीने बसलेल्या आहेत.
माझी आठवण जिथं पर्यंत मागे जाते तेंव्हापासून तुम्ही माझ्या सोबत आहात. अगदी लहानपणापासून आईबाबांचा हट्ट होता की मी वेगळ्या स्वतंत्र खोलीत झोपावे. मला तेव्हा एकटं झोपायला खुप भिती वाटायची. पण मी डोळे मिटेस्तोवर तु मला कपाळावर थोपटत श्लोक म्हणायचास. तुझा तो रेशमी स्पर्श झाला की किती बरं वाटायचं. त्यानंतर शाळेला जाताना बसस्टॉपवर तु मला सकाळी सोडायला आणि दुपारी आणायला यायचास. घरी आल्यावर शाळेतील मजा माझ्या तोंडून ऐकताना तु रंगून जायचास. मी मोठा होत गेलो पण माझ्यासाठी तु तोच राहिलास. मोठ्या शाळेत स्पोर्ट्स डे असो किंवा गॅदरिंग तु येतच राहिलास घरचा प्रतिनिधी म्हणून.
पुढे काॅलेज ऍडमिशन साठी फाॅर्म च्या लाईनीत उभा राहिलास. काॅलेजच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून संध्याकाळी माझ्यासोबत फोटो काढून घेतलास. माझी फायनल एक्झॅम असताना माझ्यासाठी रात्र रात्र जागून सोबत केलीस. डोळ्यांवरची पेंग जाण्यासाठी मला काॅफी बनवून द्यायचास. दोन वर्ष पदव्युत्तर शिक्षणासाठी मी परदेशी जायचं ठरवलं. मी तुझ्यापासून लांब रहाणार ही कल्पना सहन न झाल्याने एक दिवस तु स्वतःला खोलीत कोंडून घेतलंस. मी निघायच्या दिवशी मात्र मला हसत हसत निरोप दिलास पण हट्टाने मला विमानतळावर सोडायला आलास. तिथे तु मला मारलेली मिठी मी नाही विसरू शकणार.
आबा लहानपणी जेव्हा भिती वाटायची तेव्हा तु सोबत केलीस,माझ्या शैक्षणिक कालखंडातील प्रत्येक टप्प्यावर तु हिमालयासारखा माझ्या मागे उभा राहिलास. जेव्हा कधी निराश झालो तेव्हा मला सावरायला तु खंबीरपणे उभा राहिलास. परदेशातून शिकून आल्यावर नोकरीच्या पहिल्या दिवशी घरी आल्यावर हक्काने मला घेऊन प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन माझ्यासाठी प्रार्थना केलीस. आठवायचं म्हटलं तर कितीतरी गोष्टी आठवतील. तु खरंच सावली सारखी सोबत केलीस माझी. मी कमी वेळात आज जी काही प्रगती करून सुखी आयुष्य जगतोय ह्याच्या मागे तुझाच आधार आणि आशिर्वाद होता रे. म्हणूनच नोकरी सुरू झाली त्या दिवशीच मी माझ्यापुरता एक निर्णय घेतला . रोज घरी आल्यावर न चुकता तुझी विचारपूस करण्यासाठी तुला भेटायचेच. उशीर झाला तरी हरकत नाही. तुला झोप लागली असली तरी सुद्धा तुझ्या बेडजवळ थोडा वेळ बसून जायचं. माझी आणि केतकीची पहिली भेट झाली तेव्हा मी तुझ्या बद्दल सगळं सांगितलं तिला. मग तिनेच हट्ट केला म्हणून एक दिवस तुला बाहेर हाॅटेलात घेऊन गेलो तिच्यासाठी. आज आमचं लग्न झालं असलं तरीसुद्धा मी तुला आल्यावर भेटायला पाहिजे असा तिचा देखील आग्रह असतो.
आबा आजवर तु माझ्यासाठी जे जे केलंस त्याबदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून मी तुला रोज भेटतो. तुझी विचारपूस करतो. तुझ्या कपाळावर हात ठेवला की दिवसभराचा थकवा आणि टेन्शन क्षणांत दूर होतं. म्हणूनच मी शेवटपर्यंत भेटतच रहाणार. तु आई बाबांचं ऐकून मला तुला भेटण्यापासून परावृत्त करू नकोस प्लीज 🙏.
आबा तु माझा श्वास आहेस. तुझ्या शिवाय जगणं ही कल्पनाच मी करु शकत नाही. तुझ्या आजारपणात तु खुप थकला आहेस. उलट आता तर मी आणखी थोडा वेळ तुझ्या सोबत घालवयचा विचार करतो आहे. म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे तुला की माझ्या रिटर्न गिफ्टचा तु आनंदाने स्विकार करावास आणि मला एका ऋणातून मुक्त होण्यासाठी मदत करावीस “.
खरंच गेल्या जन्मीची पुण्याई म्हणून की काय असा नातू माझा जीव की प्राण बनला आहे. त्यामुळे नाईलाजाने का होईना पण त्याने दिलेली रिटर्न गिफ्ट स्विकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही.
” राजे तुमची रिटर्न गिफ्ट मला मान्य आहे” त्याचे दोन्ही हात माझ्या छातीजवळ धरुन मी म्हणालो आणि त्याच आनंदात त्याने माझ्या कपाळावर त्याचे ओठ अलगद ठेवून मला गुड नाईट करत तो माझ्या खोलीबाहेर पडला.
© सतीश बर्वे
१९.०४.२४.