चातुर्मास माझ्या आवडीचा भाग एक … खाद्यसंकृतीचा … नीता चंद्रकांत कुलकर्णी 9763631255
चातुर्मास माझ्या आवडीचा भाग एक …
खाद्यसंकृतीचा ….
त्यादिवशी जेवायला थालपीठ, भरीत, कांद्याची चटणी असा बेत होता.
हे म्हणाले ” आज काय कांदेनवमी आहे का ?”
मी नुसतीच हसले. कांदेनवमी करायला हल्ली चातुर्मास कुठे पाळला जातो? पूर्वी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाल्यावर जेवणात कांदा ,लसूण, वांगी वर्ज्य असे. त्याच्या आधी कांदेनवमी साजरी केली जायची. भाकरी, भरलं वांग, कांदा भजी , लसणाची चटणी असा बेत केला जायचा .
आषाढी एकादशीचा उपवास घरातल्या सगळ्यांना असायचा. पंढरपूरच्या पांडुरंगाची आठवण असो – नसो पण उपवास आवडीने केला जायचा.
सकाळच्या फराळाला भगर ,दाण्याची आमटी, रताळ्याचे गोड काप, बटाटा भाजी आणि तळलेल्या साबुदाण्याच्या पापड्या असायच्या.आई आधीच बटाटा चिवडा करून ठेवायची. रात्री खिचडी , दही, थालपीठ ,साबुदाण्याच्या पिठाचा लाडू असा बेत केला जायचा. अक्षरशः एकादशी आणि दुप्पट खाशी असं होत असे .आदल्या दिवशी एवढं खाऊनही उपवास सुटायचा म्हणून दुसऱ्या दिवशी गोडधोडं केलं जाई.
आषाढ महिन्यात एकदा तरी “आखाड तळणे ” हा प्रकार व्हायचा. पाण्यात गुळ विरघळून घ्यायचा त्यात कणीक भिजवून त्याच्या जरा मोठा आकाराच्या शंकरपाळ्या केल्या जायच्या. त्या वरून कडक पण आतून नरम असायच्या. तीळ, ओवा घालून कडबोळी तळली जायची. कणकेत गुळ घालून गोड धीरडी केली जायची.
आषाढ अमावस्येला दिव्यांची पूजा असायची. घरातले एकूण एक दिवे घासून पुसून लखलखीत केले जायचे. पितळी दिवे चिंच लावून घासायचं काम मुलींचे असायचं. मग ते दिवे पाटावर मांडून त्यांची हळदी कुंकु वाहून , हार फुलं, घालून पुजा केली जायची. त्या प्रकाशाकडे बघताना खूप प्रसन्न वाटायचं.
आषाढ संपायच्या आधीच घरोघरी श्रावणाचे वेध लागलेले असायचे. नागपंचमीला नागाची पूजा होत असे.दुध लाह्याचा नेवैध असायचा. त्याला थोड्याशा लाह्या लागायच्या. पण आई चांगला मोठा डबा भरून लाह्या फोडायची. पुढे बरेच दिवस त्याचा चिवडा, दहीकाला, लाडू केले जायचे. खालचे “गडंग “थालपीठाच्या भाजणीत घातले जायचे.
नागपंचमीच्या दिवशी काही तळायचे नाही ,भाजायचे नाही असा संकेत असायचा. पुरण न वाटता नुसते घोटून घ्यायचे. ते कणकेच्या लाटीत भरून त्याचे उंडे केले जायचे. वाफेवर ते उकडायचे आणि साजूक तुपाबरोबर गरम खायचे.
श्रावणात खायची प्यायची चंगळ असायची .आई आजीचे दर एक-दोन दिवसांनी उपवास असायचे .त्यामुळे वेगवेगळे पदार्थ केले जायचे. रताळ्याचा कीस, शेंगदाण्याचे लाडू, शिंगाड्याची खीर असे प्रकार व्हायचे. राजगिरा घरीच फोडायचा. त्याच्या वड्या, लाडू करायचे .साबुदाण्याची जायफळ वेलदोडे लावून मोठं पातेलं भरून खीर केली जायची. ती गरम गरम वाट्या वाट्या प्यायली जायची.
श्रावणातल्या सोमवारच्या जेवणाची तर फार गंमत वाटायची .तो ऊपवास संध्याकाळी सोडायचा असायचा. त्यामुळे शाळा लवकर सुटायची. दुपारीच आई स्वयंपाकाला लागायची. खीर ,शिरा,सांज्याची पोळी असा एखादा गोडाचा पदार्थ केलेला असायचा.
शंकराचं मोठं देऊळ असेल तिथे जत्रा भरायची. जेवण झालं की तिथे जायचं .दर्शनाला खूप मोठी रांग असायची .दर्शन केव्हा होतंय असं वाटायचं. कारण खरी ओढ जत्रेची असायची. टिणंटिणं, प्लास्टिकची दुर्बिण, रिबिनी, शिट्टी ,भिरभिरं असं काही काही विकायला आलेल असायच.ते बघायला गंमत वाटायची.
त्यातल एखाद आई घेऊन द्यायची.
श्रावणात नात्यात, ओळखीच्या कुणाची तरी मंगळागौर दरवर्षी असायची. आदल्या दिवशी फुलं, पत्री गोळा करत हिंडायचं .ती ओल्या फडक्यात घालून ठेवायची .दुसऱ्या दिवशी पूजा ,आरती धामधूम… चालायची.
झिम्मा, खुर्ची का मिरची,आगोटं पागोटं, नाच ग घुमा असे खेळ खेळायचे. म्हाताऱ्या बायकाही त्यात उत्साहाने सामील व्हायच्या.
एकमेकींना नाव घ्यायचा आग्रह व्हायचा. प्रसंगला साजेसे, मनाने रचलेले उखाणे लाजत लाजत घेतले जायचे .तो दिवस खास बायकांचा असायचा.
रात्रीच्या जेवणात मटकीची उसळ, नारळाच्या करंज्या, मुगाची खिचडी केली जायची.
श्रावणातल्या शुक्रवारला फार महत्त्व .त्या दिवशी माहेरवाशीण सवाष्ण म्हणून बोलवायची. गजरा, फुलं माळून, जरीची साडी, एखादा दागिना घालून ती यायची.
वरण, भात ,कटाची आमटी ,कुरडई पापड तळले जायचे. तव्यावरची पुरणाची पोळी पानात पडायची. वर तुपाची धार ..खणा नारळाने तिची ओटी भरली जायची. तिचं मन आनंदुन जायचं .ही प्रथा किती छान आहे ना .त्यामुळे स्त्रीकडून स्त्रीचा सन्मान केला जातो .
सकाळीच “शुक्रवारचे गरम फुटाणे” असे ओरडत फुटाणेवाला यायचा. संध्याकाळी बायका हळदी कुंकवाला यायच्या. त्यांना गरम दूध, फुटाणे दिले जायचे .पावसाळी हवेत फुटाणे खाल्ले की सर्दी होत नाही अस आजी सांगायची.
रविवारी आईचं सूर्यनारायणाचं व्रत असायचं. पहाटे कुणाशी न बोलता मुक्याने ते व्रत करायचं असायचं. सूर्यनारायण यायच्या आधी आई उठून पूजेला लागायची. पाटावर रक्त चंदनाने सूर्यनारायण काढलेले असायचे. पूजा झाली की आई कहाणी वाचायला बसायची. ती ऐकल्यावर आम्हाला दूध मिळायचे. तशी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर पाटावर बसून त्या त्या वाराची कहाणी वाचली जायची.
श्रावणातल्या पौर्णिमेला राखी पौर्णिमा येते. नारळी भात वर्षातून एकदा म्हणजे त्यादिवशी व्हायचा. बदाम ,काजू ,लवंग, वेलदोडे,ओलं खोबरं घातलेला तो सोनेरी भात आवडीने खाल्ला जायचा. रक्षाबंधनात देण्या घेण्याची पद्धत त्याकाळी फार नव्हती. भावाला राखी बांधायची याचं महत्त्व असायचं.
श्रावणात घरोघरी सत्यनारायण असायचे .त्याचा दुधातला ,केळी घातलेला प्रसादाच्या शिऱ्याची चव अफलातुन असायची .त्यात एक वेगळा गोडवा असायचा.
त्या दिवसात नारळ स्वस्त असायचे . आई त्याच्या वड्या करायची . खोबरं घालून दडपे पोहे व्हायचे. खोबऱ्यात खवा आणि रंग घालुन वड्या केल्या की आई त्याला बर्फी म्हणायची.
बैलपोळ्याचा सण ठराविक लोक साजरा करायचे. दरवर्षी आईला तिच्या माहेरच्या बैलांची आठवण यायची .त्यांचं कौतुक ती आम्हाला सांगायची. मातीचे बैल आणून पाटावर मांडून ती त्यांची पूजा करायची. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायची. दिवसभर आईला शेत, विहीर, मोट ,पीकं, पाणी यांची आठवण येत असायची.
पिठोरीची पूजा होऊन श्रावण संपायचा.
तोपर्यंत गौरी गणपतीची चाहूल लागलेली असायची .
पार्वतीला जसा शंकर मिळाला तसा चांगला नवरा मिळावा म्हणून हरतालिकेचा उपवास मुलींना करायला त्यांच्या आया सांगायच्या. मुलींच्या उपवासाचे घरात कौतुक असायचं. खजूर ,केळी ,सफरचंद आणले जायचे. खास बदामाची खीर केली जायची.
गणपतीची तयारी तर जोरदार असायची. गणपतीची आरास करायचं काम मुलांचं असायच. पुठ्ठे रंगवून, चित्रं काढून …दरवर्षी नविन काहीतरी करायचे.
गणपतीच्या नेवैध्याला उकडीचे मोदक असायचे .वडिलांना आवडतात म्हणून गुळाच्या सारणाचे तळलेले मोदक केले जायचे .
रोज संध्याकाळी आरतीला वेगवेगळा प्रसाद असायचा.
.ऋषिपंचमीला बैलाच्या कष्टाचे काही खायचे नाही असा संकेत असायचा. गंमत म्हणजे ती स्पेशल भाजी त्या दिवशी विकायला यायची .महाग असली तरी ती आणली जायची. ऋषीपंचमीचं म्हणून असं खास काळं मीठ मिळायचं .ते आई ,आजीसाठी आणलं जायचं .
गणपतीच्या मागोमाग गौरी यायच्या. यायच्या दिवशी तिला मेथीची भाजी आणि भाकरी असा नेवैध असायचा. दुसऱ्या दिवशी गौरीचा थाट काय विचारता? पंचपक्वांन्न, सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, कढी, पंचामृत असा साग्रसंगीत बेत असायचा. डाळिंबाच्या दाण्यांची कोशिंबीर पाच फळं घालून वर्षातून एकदा त्या दिवशी होत असे.
शिवाय गौरीपुढे ठेवायला करंजी, अनारसे , बेसनाचे लाडू केले जायचे. गौरी विर्सजनाला मुरडीचा कानवला आणि दहीभात असायचा.
अनंत चतुर्दशीला कोरडी वाटली डाळं आणि दही पोहे केले जायचे. गणपती बरोबर शिदोरी म्हणून दही पोहे दिले जायचे .तेही पातेलेभर केले जायचे .त्या दिवशी रात्री जेवायची भूक नसायची.
गणपती झाल्यावर थोडे दिवस सुनेसुने जायचे. की नंतर नवरात्रीचा सण यायचा. नवरात्रात काही बायकांचे नऊ दिवस उपास असायचे. तिला “उपवासाची सवाष्ण ” म्हणून खास आमंत्रण देऊन बोलावले जायचे. तिच्यासाठी स्पेशल पदार्थ केले जायचे.
भगरीचे धिरडे, शिंगाड्याच्या पुऱ्या, श्रीखंड असा बेत करायचा. बटाट्याची गोड ,तिखट कचोरी व्हायची. एकीपेक्षा दुसरी काहीतरी वेगळं करायची .आईने एकदा उपवासाचे दहीवडे केले होते त्याचे खूप कौतुक झाले होते .
तेव्हा नवरात्रात घरोघरी भोंडला व्हायचा. पाटावर रांगोळीने हत्ती काढायचा. ऐलोमा पैलोमा गणेश देवा ,अक्कण माती चिक्कण माती ,अतुल्यामतुल्या, कृष्णाचं अंगड बाई कृष्णाचं टोपडं, एक लिंबू झेलुबाई…. अशी गाणी म्हणत फेर धरायचा.
खिरापतीला काय केले? हे ओळखायला लागायचं. त्यासाठी आया वेगवेगळे पदार्थ करायच्या. बीट गाजराच्या वड्या ,चुरम्याचे लाडू, तिखट दाणे ,नायलॉनच्या साबुदाण्याचा चिवडा असे आईचे पदार्थ आजही आठवतात .
आपली खिरापत मुलींना ओळखता आली नाही की आयांना आनंद व्हायचा .
दसऱ्याला श्रीखंडासाठी आधी एक दिवस दूध घेऊन त्याचे दही लावले जायचे .पंचात बांधून ते टांगून ठेवायचे. सकाळी छान घट्ट चक्का तयार व्हायचा . वेलदोडे घालून चांगले पातेले भर श्रीखंड केले जायचे. वडील श्रीखंड नको म्हणाले तर बासुंदी केली जायची .
पण खरा दुधाचा मान कोजागिरी पौर्णिमेला असायचा. गच्चीवरच्या गार हवेत चारोळी घातलेलं गरम दूध प्यायला घरातले जमायचे. ते दूध गच्चीत उघड्यावर ठेवायचं. त्यात चंद्राचा प्रतिबिंब पडलं की त्याची चव बदलते अशी समजूत होती.
काही दिवस गेले की दिवाळीच्या तयारीला लागलं पाहिजे अस आई घोकायची …कारण तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात पदार्थ लागायचे. चकली, कडबोळीची भाजणी भाजायची, अनारश्याच पीठ दळायचं ,करंजीचं सारण करायचं ,लाडूसाठी साखर दळून आणायची …एक ना दोन किती तरी कामं तिला दिसत असायची.
फराळाच्या जिन्नसांनी डबे भरून झाले की मग तिला हुश्श वाटायचं. दिवाळीच्या पहिल्या दिवशी वडील सकाळी सायकल वरून निघायचे. आत्या, मावशी ,काकू कडे डबे द्यायचे. त्यांच्याकडून येताना डबे भरून यायचे.प्रत्येकाची चव निराळी असायची .आवडीने ,चवीने ते पदार्थ खाल्ले जायचे .
ते दिवस कसे रमणीय होते .साध्या साध्या गोष्टीतही आनंद होता .
त्या आठवणीत विचारांच्या तंद्रीत मी हरवून गेले…..
यांच्या एका प्रश्नाने मनाने थोडी मागे जाऊन भटकून आले .
आज हे सगळं करणं शक्य होत नाही .तितकं खायला घरात माणसंही नाहीत. निवांत वेळ नाही .आयुष्य कसं बिझी बिझी, फास्ट होऊन गेले आहे.
नवीन पदार्थ बाजारात आले आहेत. खायच्या सवयी पण वेगळ्या आहेत.
पण मध्येच कधीतरी घारगे, शिंगोळे, गुळपापडीचे लाडू करावेसे वाटतात. सोडायचं म्हटलं तरी जुनं सोडवत नाही .नव्याशी अजून आमचा तितकासा मेळ बसत नाही .
कधीतरी वाटतं ह्या प्रथा बंद होतील का ?हे पदार्थ विस्मरणात जातील का?
पण एक मन सांगत असं होणार नाही .चातुर्मास आम्ही पाळत नाही पण ईतर जमेल तसं आम्ही अजूनही करतो.
कितीही आधुनिक पुढारलेले झालो असलो तरी आमच्या रक्तातून वाहणारा तो स्त्रोत बदललेला नाही. आमची नाळ त्याच्याशी जोडलेली आहे.
कारण हे नुसते खाण्याचे पदार्थ नाहीत तर त्यांच्या मागे आमची संस्कृती आहे परंपरा आहे .त्या त्या पदार्थाची आठवण त्याच्याशी निगडित अनेक नाती पण आहेत. ती आयुष्यभर तशीच राहणार आहेत…..
नीता चंद्रकांत कुलकर्णी
9763631255