भूक
भूक
रात्रीचे साडेदहा वाजल्या असतील.घरात लाईट नसल्यामुळें गावातली पोरं गावकुसाबाहेर असणा-या झेड.पी.शाळंत मुक्कामी अभ्यासाला जात व्हती, त्यातलाच बबल्या एक व्हता.आज काही केल्या त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं,ना डोळ्यात झोप येत व्हती. काय करावं काही कळंत नव्हतं.घराकडं जावं तर खायला काय मिळंल याची खात्री नव्हती कारण आईनं सकाळीच पीठ मागून भाकरी केली व्हती.वर्गाच्या पत्र्याकडं बघत पडला.आता काय करावं ? शेवटी पोटातली भूक जेव्हा उद्रेक करते तेव्हा काहीही करायला ताकत येते.
बबल्यानं इकडं तिकडं पाहिलं, आजुबाजुला पोरं गाढ झोपेत व्हती.मास्तर मात्र झोपेत व्हतं पण अधुन मधून कुस बदलत व्हतं.अचानक बबल्याच्या लक्षात आलं आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार हाय.आईनं नक्कीच लक्ष्मी साठी तरी काही केलं असलं.निदान भातसाखरंचा निवद तर केला असेल.त्यानं ठरवलं मी जाणार.
असं म्हणून तो धाडस करून उठला खरा पण वर्गाच्या खिडकीतून बाहेर पाहिलं तर सर्वत्र काळाकुट्ट अंधार दिसला.तो घाबरला पण पुन्हा मन घट्ट करून त्यानं अंगावरची चादर बाजूला केली. कुणाला जराही धक्का न लागता जोरपावलानं दाराजवळ गेला.हळूच कडी काढली आणि थेट घराच्या दिशेने निघाला.शाळा आणि गाव अंतर बरंच लांब होतं.गावाजवळ येताच कुत्री भुंकू लागली पण त्यापेक्षा जोरात पोटातली भूक आक्रोश करंत होती.तो जाऊ लागला.कुत्री अंगावर येत होती पण हा सरळ निघाला.कसंबसं जीव मुठीत धरून त्यानं घर गाठलं.दारावरची कडी वाजवली.आतून बा नं दार उघडलं.आई बी जागी व्हती.बबल्याला एवढ्या उशीरा दारात बघून दोघंही घाबरली.आईनंच इचारलं बबल्या काय झालं रं? एवढ्या रातचं का आलास ?
बबल्याचा घसा कोरडा पडला व्हता ,आवाजबी बाहेर येईना तसाच म्हणाला,” आई भूक लागलीय ? ”
उरलेलं कोरकोर भाकर खाऊन आई बा पडली व्हती. त्याचं भूक लागलीय या शब्दानं काळीज पिळून निघालं. खोटी आशा दाखवणं शक्यंच नव्हतं,आईनं सरळ सांगून टाकली कायबी नाय रं बाळा.म्हणंत त्याला उराशी कवटाळून अश्रूंला वाट करुन दिली.बापाचा तर पुतळाच झाला व्हता.घास कोरघास भाकरीसाठी पोरगं एवढ्या अपरात्री घरी आलं ,घरात तर कायंच नव्हतं.
तरीबी बबल्यानं विचारलं.आई आज गुरुवार हाय,देवाला भात करती नव्हं .ती तर दि की.
आईनं नाही रं माझ्या बाळा आज लक्ष्मीला बी भाकरीचाच निवद दावला . काय करणार ?
बबल्यानं सारी परिस्थिती जाणली.तो दहावीला व्हता तो डे-याजवळ गेला तांब्याभर पाणी पेला आणि आल्यापावली परंत गेला.
शाळेकडं जाताना पावलं हळूहळू पडत व्हती पण डोक्यात विचार वेगात थैमान घालत व्हते.ही परिस्थिती बदलायची तर मला अभ्यासाशिवाय पर्याय नाही.हे त्यानं जाणवलं.वर्गाच्या दाराच्या फटीतनं आत बघितलं तर सारी झोपेत व्हती.आता काय टेंशन नव्हतं कुणी उठलं तरी लघवीला गेलतो म्हणता येत व्हतं.
वायरच्या पिशवीतलं इंग्रजी पुस्तक काढून वाचन करत राहिला.
मनाशी पक्की खुणगाठ बांधली ही सारी अवस्था बदलण्यासाठी मी वाट्टेल ते करेन.कितीही अभ्यास करेन पैला नंबर मिळवून दाखवीण असं ठरवलं.परिक्षा तालुक्याच्या गावी झाली.सारे पेपर छान सोडवले.दोन महिन्यांनी निकाल आला आणि तो पहिल्या श्रेणीत पास झाला.घरात फक्त अश्रूंचा संवाद होत होता.
कारण ज्या परिस्थितीत त्यानं अभ्यास केला ते सारं खुप कठीण होतं.पण जिद्द सोडली नाही.ईच्छा तिथं मार्ग खरं करुन दाखवलं.
पुढं काँलेजही याच जिद्दिनं केलं.स्पर्धा परिक्षेतून वर्ग दोनचा अधिकारी झाला,नव्हे तो सर्व सुखाचाच तो अधिकारी झाला.आज बबल्याकडं सारं आहे पण ती रात्र आणि तो गुरुवार मात्र आजही सारं वैभव उजळून टाकते.
आज परिस्थितीनं पिचलेल्या प्रत्येकांसाठी हा प्रसंग प्रेरणादायी आहे.खुप काही बोध देणारा आहे.जरुर वाचा.