मंथन (विचार)मनोरंजन

सिल्केशा सौ सुजाता संजय येवले, नाशिक रोड

सिल्केशा

अलीकडेच एका मेगामार्टमध्ये फेरफटका मारायला गेलो होतो. तसे मेगा मार्टमध्ये, मॉलमध्ये आम्ही फेरफटकाच मारायला जातो. खरेतर खिशाला फटका बसु नये म्हणुन मॉलमध्ये फक्त फेराच मारायचा असतो. असे माझे माझ्या सद्गुणसंपन्न लेकाच्या मते सतराव्या शतकातले विचार आहेत. तर चालता चालता त्या मार्टमधील एका कंपार्टमेंट की डिपार्टमेंटने माझे लक्ष वेधुन घेतले. चकचकीत काचेच्या आड काचांवरती रचलेल्या डोक्यावरचा मळ धुवुन काढणाऱ्या चीजा अर्थातच शांपु, प्रीवॉश आईंटमेंट, कंडीशनर्स, आफ्टर कंडीशनर्स, बापरे बापरे बघुनच छाती दडपली. आणि एक एक करून सोडून गेलेल्या विरळ, धवलसावळ्या केसवस्तीच्या डोक्याला हात लावुन मी त्याच्याकडे बघु लागले.
शुद्ध शाकाहारी, नॉनव्हेज पदार्थांचे नाव घेणे सुद्धा पाप आहे अशा शिस्तप्रिय, धार्मिक घरात जन्मल्यामुळे ‘कुठलाही शांपु अंडे घातल्याशिवाय बनतच नाही’ असे लेकाचे सततच चिडवणे सुरु असते. म्हणुनच डोक्यावर शांपु घालताबरोबर शेदिडशे केस लगेचच डोक्यावरून पलायन करतात. उरलेले रंग पलटवण्याच्या तयारीला लागतात. घरात नातेवाईकांबरोबर, किटी पार्टी, बहिणी बहिणी प्रेमाचे बोलणे, नणंद भावजय सुसंवाद(?), मैत्रिणी मैत्रिणी शिळोप्याच्या गप्पा, सासु सुन संवाद( ला रसिक वाचकांनीच नाव द्यावे वा नावं ठेवावेत). सर्वच प्रकारच्या संवादामधुन गप्पांची गाडी केव्हा ना केव्हा केसगळतीवर येऊन ठेपणार. त्यात माझ्या मावशीच्या वयाच्या ब्यायशीव्या वर्षी पण बऱ्याचश्या काळ्या केसांची उपस्थिती, अमकीच्या टाचेला भिडणाऱ्या केसांनी घराण्याच्या भरभराटीचा कसा गळा कापला, तमकीचे केस कँसर मध्ये उडाले, एखादीचे कोविडने छिनून घेतले, एखादीच्या दाट वाटणाऱ्या कुरळ्या केसांना रबर लावल्यावर खाली कशी कोथिंबीरीची जुडी वाटते, इत्यादी असंख्य उदाहरणांचे चर्वित चर्वण झाल्यावर हजारो इलाज पुढे येणार ज्याच्यात खाण्यापिण्यापासून, तेलं, गोडाचा तिरस्कार, प्रोवॉश मध्ये कांद्याचा रस, कोरफड, आदल्या रात्री मेथी दाणे, कढीपत्ता तेलात उकळवून त्या तेलाचा मालिश असे असंख्य उपचार सुचवले जाणार. सुकेशा, सफेदकेशा, विरळकेशा, बॉबकटकेशा, स्टेपकटकेशा इलाज पुढे
आणणार, सर्व इलाज गप्पांपुरतेच मर्यादित राहणार. घरी आल्यावर केस धुतांना परत बाथरूममधली बाटलीच डोक्यावर ओतली जाणार. नंतर केस विंचरतांना कोणे एके काळी आपण सुकेशा, सिल्केशा असल्याची आठवण येऊन मन दुःखी होणार. किंवा गाणे बघत बघत रेखा, श्रीदेवी, जयाप्रदा, हेमामालिनी, यांचे लांबसडक सीधेसरळ सिल्की काळेभोर केस बघुन स्वतःचे केस कुरवाळत मनही मन कुढत बसणार. आणि उरल्यासुरल्या केसांमधुन परत काही केस रजा घेणार. त्याच मॉलमध्ये चकचकीत शोकेसच्या बाजुला रिठे, शिकेकाई, नागरमोथ्याने भरलेले मळकट पोतेही धुळ खात पडलेले अस्मादिकांनी निश्चितच पाहिले होते. ‘ अर्रे लब्बाडा, कुठे लपुन बसलास शोन्या?, किती वर्षांनी भेटतोस?, किती वाळलास!, ये बाहेर ये राजा’ असे म्हणत त्याला हात धरून बाहेर ओढावेसे वाटले. पण चकचकीत शांपुच्या धारदार नजरेने आणि त्याच्या दरवळाने ( कि दर्पाने ), धाकाने आपसुक माझ्या ममतेला मीच आवर घातला आणि आशाळभुत नजरेच्या त्या बालपणीच्या ( लहानपणी सर्वाधिक रडवणाऱ्या ) खोडकर मित्राला जड अंतःकरणाने इग्नोर करून तिथुन काढता पाय घेतला.
तारकमेहता मधल्या
उनाडटप्पूला ओठ तिरके करून केसांची बट उडवताना बघितले की आमची ही लेकरे तसा अनसक्सेसफुल प्रयोग करताना दिसतात. पण आईच्या हाताने तेलाने चापलेले केस ढिम्म हलतच नाही. मग आईच्या ट्रॅडिशनल बिहेवियर चा उद्धार झाल्याशिवाय पोरांना राहवत नाही. रस्त्याने जाता येता बऱ्याच वेळा मोठमोठ्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील हेअर सलून की सॅलॉन, हेअर केअर, हेअर स्पा बघितले की आमच्या गावातल्या शांताराम काकाच्या विजय हेअर कटिंग सलून ची आठवण येते. लहानपणी त्याच्या खुर्चीवरच्या बाकड्यावर एक फळकुट टाकून पाठीवरून एका पांढऱ्या कपड्याची गाठ गळ्यापुढे तो मारायचा. केसांवर, गळ्यावर पाणी फवारलेले तेव्हा खरच खूप गोड वाटायचे. मग अर्धे केस पुढे विंचरून भुताचा अवतार करायचा. पण नंतर केस किंचित ओढत कापताना इवल्याश्या, नाजुक डोक्याला खूप त्रास व्हायचा. पण वडिलांच्या करड्या नजरेसमोर डोळ्यातून पाणी काढायची बिशाद नसायची. घरी आल्यावर तेवढा एकच दिवस आई हळुवार प्रेमाने न्हाऊ घालायची. थोड्या किंचित ओल्या केसांना अलवार हाताने कोमट तेल लावायची. आणि विंचरून वडिलांनी खास मुंबईहून आणलेल्या गुलाबी पिना माथ्यावर किंवा दोन्ही कानांवर लंबरेषेत खोचुन, तोंडाला पावडर, छोटेसे काळे गंध लावले की स्वतःचं ध्यान आरशात थोडे निरखून झाल्यावर स्वारी उत्साहाने उड्या मारत खेळायला पळायची. बाकी इतर वेळी म्हणजे दर रविवारी, हरितालिका, संक्रांत भोगी, धनतेरस भोगी, चौथ्या दिवशी चे नहाणे इत्यादी वेळा आमचे केस धुतले जात आहे ते आईने मारलेल्या धपाट्यांसहित पूर्ण गल्लीला कळायचे. तालासुरात लावलेला सा (की आ) मध्येच ‘आई ग!’ ‘आई ग!’ च्या यमनाने पूर्ण व्हायचा. खरे तर धुतानाची केसांची ओढाताण आईमुळेच व्हायची तरीसुद्धा ‘आई ग!’ च तोंडातून बाहेर पडायचे. डोळे उघडायची परवानगी नसायची. पण एखाद्यावेळी आई थकून सरळ उभी राहायची. ‘आई बाहेर गेली वाटते’ अत्यानंदाने डोळे उघडले की रिठे शिकेकाईचा शिरकाव डोळ्यात व्हायचा. मग आणखी वरच्या पट्टीतला ‘सा’ आईच्या पाठीवरच्या ‘ता धिन धिन धा’ सहित लागायचा. नंतर उरलेल्या रिठे शिकेकाईच्या टोचणाऱ्या चोथ्याने पाठ, पाय, हात व्यवस्थित रडत रडत रगडुन झाल्यावर अस्मादिक बाथरूम मधली मैफील समाप्त करून तांबारलेल्या डोळ्यांनीच बाहेर यायचे. मग आई पदराचा बोळा किंवा वडिल खिशातल्या रुमालाचा मऊसुत बोळा करून तोंडात धरून त्याला उब आणायचे. तो बोळा डोळ्यावर ठेवला की जगातल्या सर्वाधिक सुरक्षिततेची अनुभूती व्हायची. केस धुण्याच्या दिवसाची सकाळ मात्र मंतरल्यासारखीच असायची. झोपेतून उठतो तेच रिठा,शिकेकाई, नागरमोथ्याचा सुगंध नाकात शिरायचा. आमचे नेत्र उघडेपर्यंत ताई, आई यांचे केस धुतलेले असायचे. काहीही न ऐकता आई आम्हाला सरळ बाथरूम मध्ये ढकलायची. आणि काही कळायच्या आत डोक्यावर रिठ्याचे पाणी पडलेले असायचे. भल्या थोरल्या लाकडी पाटावर बसल्या बसल्या आमचा कथ्थक, तोंडातली रागदारी, पाठीवर आईचा तबला एकूणच सकाळ सुगम संगीताने भारावलेली प्रभात व्हायची. नंतर आईने प्रेमाने दिलेल्या वाफाळत्या चहा आणि सोबत रविवार स्पेशल नाश्ता, उन्हात बसून केस वाळवणे, विंचरण्याच्या आधी झटकणे, आणि विंचरताना, तेल लावताना सुगम संगीताचा परत एक राउंड.
अगदी लहान असतानाच गावात एकुलत्या एक कांडप मशीन वाल्या काकांनी रिठे, शिकेकाई दळण्याचे मशीन आणले. तिखट, हळद, मसाला दळणाऱ्या बायकांच्या लाईन पेक्षा रिठे दळणाऱ्यांची लाईन मोठी असायची. भाभीचे केस मशीन आणल्यापासून जास्त गळायला लागले. आई हसत हसत काकांना चिडवायची.
केव्हातरी आठवत नाही पण कचराकुंडी भोवती गटारांच्या कडेला रस्त्यांच्या कडेला शाम्पूच्या छोट्या छोट्या पुड्या (रिकाम्या) सापडायला लागल्या. आणि आईची चिडचिड सुरू झाली. गटारी तुंबतात, पुड्या जनावरांच्या तोंडात जातात त्यांच्या आतडी फाटत असतील. नदीनाल्यात शांपुचे पाणी मिसळते, जनावरे पाण्याला तोंडतरी लावतील का? आजूबाजूच्या आयाबायांशी गप्पा मारताना आवर्जून पुड्यांच्या घातक परिणामांचा विषय व्हायचा. आई पुडयांच्या घातकपणाचा विषय हिरिरीने मांडायची. कधीतरी मेडिकल, किराणा दुकानात एक अख्खी शोकेस शाम्पू ने व्यापली आणि बाथरूम मधली सुगम संगीत मैफिल इतिहासजमा झाली. भंगार वस्तूंमध्ये शाम्पूच्या बाटल्यांची वर्णी लागली. केस, त्वचा वर्णप्रमाणे, वयाप्रमाणे बायकांचा, पुरुषांचा, मुलींचा, मुलांचा, बेबीजचा (नवजात, थोडे मोठे, आणखी थोडे मोठे,) शाम्पू डॉक्टर सजेस्ट करू लागले. टीव्हीवरील सिरीयल, सिनेमे अगदी आकाशवाणी मध्ये सुद्धा शाम्पू च्या जाहिरातींनी प्रचंड घुसखोरी केली. प्रत्येक दहा जाहिरातींमध्ये चार जाहिराती शाम्पूंच्या असतात. पूर्वी दगडावरच्या एकुलत्या एक लाइफबॉय किंवा हमाम साबणाची जागा व्यक्ती परत्वे वेगवेगळ्या शाम्पूजने घेतली. शिकेकाई साबण सुद्धा हल्ली दुर्मिळ झाला आहे. रिठे, शिकेकाई शाम्पूच्या बाटलीवरच्या कंटेंट मध्ये आहे म्हणे! इंग्रजी नावे आम्हा पामरांना परकीच. कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात डोक्यावर एकच पांढऱ्या केसाने दर्शन दिले, जगातले सगळे पहाड डोक्यावर कोसळल्याचा भास झाला होता. सहज कोणाचे लक्ष गेल्यासही जमीन दुभंगुन पोटात घेईल तर बरे असे वाटु लागले होते. आईची सुद्धा ‘रातों की नींद हराम हो गयी थी’ मेहंदी लावून फिरणाऱ्या बायकांना आईचा ‘नटकसाळ’ शब्दप्रयोग आठवत आठवत पांढऱ्या केसांना कलपाने झाकता झाकता आईचे संस्कार विसरल्यासारखे झाले की काय? असे वाटू लागते .पण पर्याय नाही ‘केसांवर भांडे’ ओरडणारी बाई आली की केसांचा गुंतावळा सोडवल्यानंतर कंगव्यातील केसांची बोटांवर गुंडाळी करून त्यावर फुंकर मारून ‘इडा पिडा टळो ‘ म्हणून कानशीला मागे बोटे मोडणारी आई आठवते. आणि अवकाळी डोळ्यातून पावसाच्या सरी बसायला लागतात.

सौ सुजाता संजय येवले,
नाशिक रोड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}