देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम , भाग -४  लेखक मकरंद कापरे 

सम – विषम , भाग -४  लेखक मकरंद कापरे

डॉक्टर कडून घरी आल्यावर, जेवताना रेखाने विचारले,”काय झाले इंटरव्ह्यू चे, मघाशी विचारायचे राहूनच गेले.” “सेलेक्ट झालो आहे मी, स्वतः डायरेक्टरनेच घेतला इंटरव्ह्यू.. वीस लाखाचे पॅकेज देऊ म्हणाले, दोन दिवसात अपॉइंटमेंट लेटर पोचेल म्हणाले घरी…अशोक चा पण फोन आला होता” “काय म्हणाला अशोक, त्याच्या ओळखीने चांगले काम झाले बघ श्रेयस…” आई म्हणाली.
“हो ना, आमचे भेटायचे ठरले होते आज संध्याकाळी…आता उद्या भेटेन ग्राउंड वरून येताना. आणि गप्पा मारत छान जेवण करून तिघेही दिवाणखान्यात बसले. दोन बेडरूम हॉल आणि किचन आणि वरच्या मजल्यावर दोन रूम आणि छोटे स्टडी रूम असलेले टुमदार रो हाऊस होते श्रेयस च्या वडीलांनी लेफ्टनंट कर्नल कुलदीप भारद्वाज यांनी बांधलेले. आता वरच्या भागात रेखा तिने काढलेले पेंटिंग्ज ठेवण्यासाठी वापरत होती.
“कुठला चांगला पिक्चर आहे का, अमेझॉन प्राईम वर… पाहू या..आई तुम्हाला ‘ नाच ग घुमा ‘ पहायचा होता ना.. आला आहे अमेझॉन वर…” “नाच ग घुमा, हो आहे लावू का?” श्रेयस ने विचारले. “हो..हो… पाहू या..” आई म्हणाली.
सकाळी नेहमीप्रमाणे रेखा आणि श्रेयस सकाळी फिरायला जातात. “श्रेयस, बालगंधर्व ला तीन चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन भरणार आहे, मलाही आयोजकांनी सांगितले आहे…” “अरे वा, छान…” श्रेयस म्हणाला. “हो पण कोणते पेंटिंग्ज ठेऊ मला… सिलेक्शन ला मदत कर ना…” “ओके, आज संध्याकाळी करू या, अजून १५ दिवस आहेत आपल्याकडे…”
“हो, ते आहे म्हणा…” आणि दोघेही घरी परततात. श्रेयस त्याचे आवरून पी वाय सी ग्राउंड ला जायला निघतो,”मी येतो जाऊन,” हॉल मध्ये बसलेल्या आई ला सांगतो,”ये जावून लवकर तुझी आवडती भरली वांग्याची भाजी केली आहे” रेखा किचनमधून बाहेर येत म्हणते. “अरे वा …” आणि दार उघडल्यावर समोर शांताबाई असतात, “काय ओ, आज किती उशीर केलात, शांताबाई” श्रेयस गेल्यावर शांताबाई आत येत म्हणाल्या,”हो, उशीरच झाला आज”
संध्याकाळी चित्र प्रदर्शनात लावायला पेंटिंग्ज ची निवड चालू असते, रेखा ची मैत्रीण ईशा पण आली होती मदतीला. “सगळेच पेंटिंग्ज छान आहेत ग…सगळी नाही लावता येणार का प्रदर्शनात” तिने विचारले. “अग, जागा ठरवून दिलेली आहे, त्यात पंचवीस ते पस्तीस पेंटिंग्ज बसतात…” रेखा म्हणाली. “मला वाटते, फक्त ऑईल पेंटिंग्ज ठेऊ यात प्रदर्शनात…” श्रेयस म्हणाला. “हो, तसेच करू या…”
दुसऱ्या दिवशी श्रेयस सकाळी ग्राउंड वरून परत येताना अशोकला भेटतो,”काय रे, तुला वेळ पण नाही भेटायला…” अशोक म्हणाला. “काही पण बोल लेका, तुझ्या वेळेप्रमाणे आपण भेटत आहोत… मला ग्राउंड वरून परत गेले की दिवसभर काही जास्त काम नसते”. तेव्हड्यात वेटर चहा घेऊन येतो…”ज्यांनी तुझी मुलाखत घेतली, ते दिनकर पोटे कोण आहेत माहिती आहे का..तुला” अशोक ने विचारले. “तुझ्या आत्याचे मिस्टर, तूच सांगितले होतेस ना मागे…” श्रेयस म्हणाला. “हो रे, ते नाते झाले पण ते कोण आहेत माहिती आहे का?” “काय कोड्यात बोलतोस रे, तेच तर डायरेक्टर आहेत ना, वेरॉन स्टील चे…”
“हो, ते तर आहेत पण ते जनता पार्टी चे आमदार पण आहेत…” अशोक म्हणाला. “ओके, मी नाही ओळखले रे, कधी चालू केली त्यांनी ही कंपनी..” श्रेयस ने विचारले,”पंचवीस वर्षापूर्वी, कशी वाटली कंपनी तुला” अशोक ने विचारले.
“कंपनी चांगली आहे रे, पण मी काही इंप्रेस नाही झालो, इतक्या वर्षात पाचशे करोड तरी टर्न ओव्हर व्हायला पाहिजे होता.” श्रेयस म्हणाला. “साहेब, हे अमेरिका नाही…आणि पाचशे करोड पर्यंत जायचे आहे म्हणून तर तुझ्या सारखे लोक हवेत त्यांना”
अशोक म्हणाला. “माझ्याबद्दल काही बोलले का ते नंतर…” श्रेयस ने विचारले. “नाही…परवा एक लग्न आहे, तेव्हा भेट होईलच” इतक्यात श्रेयसचा फोन वाजतो,”हॅलो कुठे आहेस तू,” रेखाने विचारले. “अरे आई, बाथरूम मध्ये पडल्यात, डोक्याला खोक पडली आहे, रक्त थांबत नाहीये…” “काय? मी निघतोच अशोक पण आहे बरोबर”
“आई बाथरूममध्ये पडली, डोक्याला खोक पडली आहे म्हणे…रेखाने अँब्युलन्स बोलावली आहे…”
“देवा, काय रे हे, कोणत्या हॉस्पिटल ला घेऊन जाणार आहेत..”अशोक ने विचारले. “मंगेशकर हॉस्पिटल, वारजे” श्रेयस म्हणाला. “तू हो पुढे, मला गाडी काढेपर्यंत वेळ लागेल. मी सिटी हॉस्पिटल ला येतो डायरेक्ट…”
श्रेयस घरी पोचला तेव्हा अँब्युलन्स आली होती. “सिस्टर ने सलाईन लावले आहे, रक्त थांबत नाहीये..श्रेयस” रेखा म्हणाली. “रक्त थांबण्यासाठी काही इंजेक्शन नाही देता येणार का?” श्रेयस ने विचारले. “दिले आहे सर, आपण हॉस्पिटल ला पोहचेपर्यंत.
अकरा वाजता हॉस्पिटल ला पोहचताच, टाके घालण्यासाठी ऑपरेशन थिएटर ला घेतात. “सर, या फॉर्म वर सही करता का? आणि इन्शुरन्स आहे का?” डॉक्टर ने विचारले. “हो आहे, श्रेयस फॉर्म वर सही करत म्हणाला. “तळमजल्याला ऑफिस आहे इन्शुरन्स चे, मी केसपेपर बनवते, चोवीस तास असतात ते, तुम्ही रक्त मिळते का पहा, आणि तुमच्या आईला डायबेटिस पण आहे त्यामुळे रक्त गोठण्यासाठी वेळ लागत आहे. आम्ही पण पहात आहोत, AB – ve ब्लड ग्रुप चे रक्त खूप कमी ऊपलब्ध असते…”
“अशोक, AB – ve ब्लड हवे आहे,” बाहेर बसलेल्या अशोकला श्रेयस ने सांगितले. “ओके, तू काळजी नको करू.. मी करतो अरेंज” अशोक ने त्याच्या ओळखीतल्या ब्लड बँक आणि इतर ठिकाणी फोन केले. तोपर्यंत डोक्याला टाके घालून श्रेयस च्या आईला, ICU मध्ये आणले, “कसे झाले ऑपरेशन डॉक्टर, ” श्रेयस ने विचारले. “टाके घातले आहेत, अजून ग्लानीत आहेत त्या. रक्त कुठे मिळते का पह, O -ve पण चालेल …आमचा पण शोध चालू आहे…”
सिस्टर ने परत पुढचे सलाइन लावले. “किती सलाईन झाले सिस्टर?” रेखा ने विचारले. “हे सातवे आहे, काहीतरी करा… ब्लड साठी…आम्हाला पण कुठे मिळत नाहीये. “रेखा वहिनी, मी तीन ब्लड बँकेत जाऊन आलो… पण AB – ve ब्लड कुठेच नाही, श्रेयस कुठे गेला?” “खाली गेला आहे, औषधे आणायला…” रेखा ने सांगितले.
“ठीक आहे मी जाऊन येतो खाली” आणि अशोक खाली जायला निघाला. “श्रेयस, मी तीन ब्लड बँकेत जाऊन आलो.. पण AB -ve रक्त कुठे मिळत नाहीये…मी तुझा आणि रेखा वहिनीचा डबा वर ठेऊन आलो आहे” अशोक काऊंटर वर उभ्या असलेल्या श्रेयस ला म्हणाला…”हो, रे.. साडेआठ झाले…तू पण जेवण करून ये.. दहा वाजेर्यंत आलास तरी चालेल”
रात्री अकराच्या सुमारास एक वृद्ध गृहस्थ ICU बाहेरच्या टेबलवर बसलेल्या डॉक्टर ला म्हणाले,”पेशंट ला AB -ve रक्त हवे आहे ना, माझे घ्या AB -ve ब्लड गृप आहे माझा.” आजोबा म्हणाले. “पण…काका… तुमचे रक्त…कसे चालेल” डॉक्टर म्हणाली. “का? मी माणूस नाही…काहीतरी बोलताय…चला आवरा लवकर…” डॉक्टर भांबावून सिस्टर कडे पहात म्हणाल्या,”सिस्टर पलीकडच्या रूम मध्ये ब्लड बॅग आणि सिरींज घेऊन या…पटकन तयारी झाली…रक्त बॅगेत जमा व्हायला लागले… कुणीतरी डोनर आला आहे म्हणून रेखा आणि श्रेयस पण पहायला आले…”डॉक्टर रश्मी एकबोटे, तुम्हाला पण घाई आहे जायची…मी समजू शकतो… तुमची ड्युटी संपली आहे…तुमच्या वडिलांची उद्या सकाळी बाय पास सर्जरी आहे…तरीपण तुम्ही ड्युटी करत आहात..तुमचे वडील पण वरच्या मजल्यावर ICU मध्ये आहेत.” आजोबा म्हणाले. रश्मीने चमकून त्यांच्याकडे पाहिले,”तुम्हाला कसे काय माहीत…आणि माझे नाव…”
“सोपं आहे तुमचे वॉर्ड बॉय आणि नर्स बोलत होती बाहेर… आणि तुमचे नाव तुमच्या कोट च्या पट्टीवर आहे…मी थोडाच अंतर्ज्ञानी आहे…बॅग भरली दुसरी लावा..” आजोबा म्हणाले. “काय दहा मिनिटांत भरली पण, रश्मी बॅगेकडे पहात म्हणाली. “ती पेशंट ला लावा लगेच…” आजोबा आदेश वजा स्वरात म्हणाले. सिस्टर ती बॅग घेऊन श्रेयस च्या आईला लावायला गेली. दुसरी बॅग पण दहा मिनिटांत भरली. “अजून कुणाला रक्त हवे असेल तर सांगा…मी देतो” आजोबा म्हणाले. “नाही, आता तुमचे जास्त रक्त घेता नाही येणार, आणि तुम्ही पण एक महिना रक्तदान करू नाही शकत” रश्मी त्यांच्या हातावर कापूस आणि चिकटपट्टी लावत म्हणाली “असे म्हणता, ठीक आहे… तुम्ही म्हणाल तसे…” आजोबा थोड्या मिश्किल स्वरात म्हणाले. श्रेयस ने आणि रेखा ने त्यांना वाकून नमस्कार केला…”तुम्ही होतात म्हणून आज आईचे प्राण वाचले” दोघेही परत त्यांना हात जोडत म्हणाले.
“अरे काळजी नाही करायची…सम विषम चालूच राहणार आयुष्य आहे हे…आणि डॉक्टर रश्मी…तुमच्या बाबांची बाय पास सर्जरी करायची खरेच गरज आहे का ते पहा…” आणि त्यांच्या शर्टच्या बाह्या ठीक करत तरा तरा ते निघून गेले.
क्रमशः

सम – विषम , भाग -४  लेखक मकरंद कापरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}