।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )
★★आईची भुणभुण★★ ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★आईची भुणभुण★★ ©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
पिहूने घडाळ्यात बघितलं. आठ वाजले होते.तिने परत पांघरूण डोक्यावरून घेतलं आणि झोपली.इतक्यात आईची हाक ऐकू आली.
“पिहू,उठ बरं. आठ वाजलेत.आजोबा पूजा करताहेत आणि तू लोळते आहेस. घरात पूजा सुरू असताना अजिबात झोपायचं नाही.चल उठ.” सविता तिच्या अंगावरचे पांघरूण काढत म्हणाली.
“काय ग आई,झोपू दे न.आज किती दिवसांनी शाळेला दोन दिवस सुट्टी मिळाली आहे.रविवारी सकाळी क्लास म्हणून मला झोपता येत नाही.या दहावीच्या वर्षाने सगळा आनंद घालवून टाकलाय आयुष्याचा.”
“ते सगळं ठीक आहे पण आठ म्हणजे काही लवकर नाहीय.”
“देव दुसऱ्या खोलीत,मी इथे.माझ्या झोपण्याचा आणि पूजेचा काय संबंध आहे ग?”
“वाद घालू नकोस.उठ पटकन.मी कॉफी करते.आणि पांघरुणाची घडी घाल.आपल्या पांघरुणाची घडी आपणच घालावी.दुसऱ्या कुणी नाही.” सविता किचनमध्ये गेली.
पिहूला अगदी राग राग आला.रोज उठल्यावर हिचे तेच डायलॉग,आता पाठ झाले सगळे. नाराजीनेच उठली.सगळं आवरून फुगलेल्या गालांनी डायनिंग टेबलवर आली.तिचा नूर बघून आजी म्हणाली. “काय ग,गाल का फुगले तुझे?”
“आजी,तुला आणि आबांना म्हातारपणामुळे झोप येत नाही.आबांना इतक्या सकाळी पूजा करायची काय गरज आहे? काहीच तर काम नसतं त्यांना.”
“पिहू,फार बोललीस.आजीशी बोलताना भान ठेव.वडील माणसांशी असं बोलायचं का?”
“सविता,असू दे.आज तिचा मूड नाहीय.पिहूराणी,पूजा नेहमी आठच्या आधीच करावी.ती वेळ प्रसन्न असते.तू एकदा सकाळी सकाळी देवापुढे फक्त उदबत्ती लावून बघ.तुलाच इतकं प्रसन्न वाटेल.” आजोबा खुर्चीत बसत म्हणाले.
पिहुला वाटलं, बाबाच फक्त माझ्या बाजूने बोलतात नेहमी.पण काही नाही,शिस्तीचे धडे सुरू झाले की ते पण ह्या तिघांच्या गटात सामील असतात.कॉफी घेऊन रागातच पिहूने कप ओट्यावर ठेवला.ते बघून सविता म्हणाली.”कपात पाणी घालून ठेव ग.खरतर विसळून ठेवायला हवास.आता काही लहान नाही तू.”
आज पिहूचं सगळं रागात, अबोल्यातच चाललं होतं.अभ्यासाला बसणार इतक्यात रियाचा फोन आला. “पिहू,आज माझ्याकडे नाईट आउट ठरलीय.तू, मी,पूजा आणि निहिरा. येतेस आहेस न? म्हणजे येच. काही कारण सांगू नको.”
“आईला विचारून तुला कळवते.बाय.”
इतक्यात सविता पिहूच्या खोलीत आली.हातात पुसायचं कापड.पिहूला कळलं आता अजून एक डायलॉग.
“किती धूळ ही पिहू, स्टडी टेबलवर.एक चित्र काढता येईल त्यावर.तुम्हा मुलांना सगळं स्वतंत्र हवं असतं पण आपली खोली,टेबल हे नीटनेटकं ठेवता येत नाही.”
पिहूला राग अनावर झाला.आता हिची परवानगी वगैरे काही घेत नाही.मी रियाकडे जाणार म्हणजे जाणार. तिने सरळ सविताला सांगून टाकलं.
“मी आज रात्री रियाकडे जाणार आहे.आम्ही कॉमन स्टडी करणार आहोत.मी बाबांना फोन करून सांगते.ते ऑफिसमधून यायच्या आतच मी जाणार आहे.” पिहूने टॉवेल घेतला आणि आंघोळीला गेली.सविताला बोलायची फुरसतच दिली नाही.
**
रियाकडे आल्यावर पिहूला अगदी मोकळं मोकळं वाटलं.निदान काही तास तरी आता डोक्याला आईची भुणभुण नव्हती.
रियाची आई नोकरी करत होती.बाबा देखील ऑफिसमधून यायचे होते.चौघींनी मस्त धमाल केली.गाणे लावून भरपूर नाचल्या. शॉर्ट रिल्स करून मीडियावर अपलोड केल्या.कसलच बंधन नव्हतं.
रियाने सगळ्यांसाठी सरबत आणि खायला कच्चे पोहे केले केलं.खाणं झाल्यावर चौघींनी प्लेट्स,ग्लास ओट्यावर ठेवले.पिहूला काय वाटलं कुणास ठाऊक, तिने सगळ्या ग्लासमधे पाणी घालून ठेवलं आणि प्लेट्स मधलं उरलेलं कचऱ्याच्या डब्यात टाकून प्लेट,चमचे व्यवस्थित सिंकमधे ठेवले.
संध्याकाळी रियाची आई आल्यावर तिला आश्चर्यच वाटलं, “रिया,आज सूर्य कुठे उगवलाय?तू चक्क ग्लास मधे पाणी घालून ठेवलंय,प्लेट्स व्यवस्थित ठेवल्या.”
“ओह!ते मी नाही ग.ह्या पिहूने केलंय.” रिया बेफिकिरपणे म्हणाली.
रियाच्या आईने पिहूला जवळ बोलावलं.तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली,” गुड गर्ल.”
पिहू संकोचून गेली.
रात्री झोपायच्या आधी चौघींनी खूप गप्पा केल्या.
झोपायची वेळ आली तशी रियाने स्वतःचं पांघरूण, स्वतःची उशी लगेच बाजूला ठेवली.पिहूला आठवलं,एकदा तिची मामे बहीण तिच्या खोलीत झोपायला आली तेव्हा आईने बजावलं, “तिची सोय आधी कर आणि मग तुझी.ती आपल्या घरची पाहुणी आहे. ‘अतिथी देवो भव’ अशी आपल्याकडे म्हण आहे.
पिहूला सकाळी आठ वाजता जाग आली.उठल्यावर एक क्षण वाटलं,आज आजोबांची स्तोत्र घंटानाद,उदबत्तीचा सुवास काहीच नव्हतं.तिला लक्षात आलं,काल रात्री आपण रियाकडे झोपलोय.तिला आजी, आजोबांची तीव्रतेने आठवण आली.
सकाळची कॉफी घेऊन तीघीही आपापल्या घरी जायला निघाल्या. रियाच्या आईने तिघींना मिठाईचा बॉक्स दिला.पिहू त्यांच्या पाया पडली तसं तिला उठवून ,रियाची आई म्हणाली,”खूप छान संस्कार केलेत तुझ्यावर तुझ्या आईने बेटा. गुणी मुलगी आहेस तू.”
एक समज देणारा अनुभव घेऊन पिहू घरी निघाली.
**
दाराची न थांबणारी बेल ऐकून सविता धावतच दाराकडे आली.तिने दार उघडताच पिहू तिच्या गळ्यात पडली ,” आई ग,लव्ह यु अँड युअर भुणभुण.”
इतकं बोलून ती धावत ” आजी,आबा” म्हणून आत गेली.
आपल्या लेकीला अचानक काय झालं,हे सविताला कळेचना.ती तिच्याकडे कौतुकाने बघत राहिली….
—–समाप्त—–
©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे
किती सुंदर गोष्ट मधुर, खूपच छान
सम – विषमचा ४ था भाग अपलोड कराना प्लिज, तो वाचलाच नाहीये
मस्त आहे गोष्ट!