।। गणपती बाप्पा मोरया ।। गणपती उत्सवात अजून एक उपक्रम १० दिवस १० गोष्टी ( लघुकथा , सुखान्ति कथा )
★★ज्येष्ठा कनिष्ठा★★ सौ मधुर कुलकर्णी, पुणे
★★ज्येष्ठा कनिष्ठा★★ सौ मधुर कुलकर्णी, पुणे
“सुधा, ज्येष्ठा, कनिष्ठा दोघीही आल्या ग. लवकर बाहेर ये.” वसंत लगबगीने फाटकशी आले.
“आलेच” सुधाताईंनी भाकर तुकडा घेतला आणि लेकींना ओवाळायला दाराशी आल्या. लग्नानंतर प्रथमच पुण्यात दोघीही माहेरपणाला आल्या होत्या. महिन्याच्या अंतराने पाठोपाठ दोघींचं लग्न झालं होतं.दोघीही मुंबईतच होत्या. एक पार्ल्याला, एक घाटकोपरला.
नीती आणि श्रुती बॅग घेऊन रिक्षेतून उतरल्या. दोघींच्या हातातली एक बॅग घेत वसंतराव दिलखुलास हसत म्हणाले,”या माहेरवाशिणी.”
दोघींवर सुधाताईंनी भाकर तुकडा ओवाळून टाकला.दोघींकडे त्यांनी कौतुकाने बघितलं. दोघीही उजळल्या होत्या, नवविवाहितेचं तेज दोघींच्याही चेहऱ्यावर खुलून आलं होतं.
“हुश्श, आई, मी आता आठ दिवस एकही काम करणार नाही. फक्त आराम.”नीती खुर्चीवर बसत म्हणाली.
” गणराया आणि गौराईची छान सरबराई करून आलोय दोघीही. आता इथे निवांत राहणार.” श्रुती आईच्या गळ्यात पडत म्हणाली.
दोघींना बघून वसंतचे डोळे पाणावले. एवढ्याशा लेकी माझ्या. बघता बघता मोठ्या झाल्या आणि सासरची जबाबदारी सांभाळताहेत.
“मी चहा ठेवते.” सुधा म्हणाली.
“आई मस्त आलं घालून कर ग. आमच्या घरी आलं घातलेलं आवडतच नाही.”नीती म्हणाली
“आमच्या घरी तर सगळे कॉफीच घेतात. मला एकटीसाठी करायचा कंटाळ येतो. आता मी पण कॉफी सुरू केली.” श्रुती म्हणाली.
सुधाताई वसंतकडे बघून हसल्या. दोघींच्याही लग्नाला वर्ष सुद्धा व्हायचं होतं पण सासर आता आपलं घर झालं होतं……
वसंत आणि सुधाच्या घरात नीतीचं फुल आलं. आणि तिच्या कोडकौतुकात दोघेही रमले. नीती वर्षाची झाली आणि सुधाला परत बाळाची चाहूल लागली. सुधा भांबावली. नीतीच इतकी छोटी होती. तिला सांभाळताना दमछाक होत होती. तिला ते मूल नको होतं. पण सासूबाईंनी तिला समजावलं,
“देवाने पदरात टाकलंय ते स्वीकार कर, अव्हेरू नकोस. भाऊ झाला तर राखी बांधेल,बहीण झाली तर सुखदुःख वाटून घ्यायला तिला एक मैत्रीण मिळेल.”
श्रुतीचा जन्म झाला आणि सुधा संगोपनात इतकी रमली की तिला श्वास घ्यायला फुरसत नव्हती. दोघीही लाड,कौतुक करवून घेत होत्या. दोघी एकाच शाळेत शिकत होत्या. दोघींचेही एकमेकींशवाय पान हलत नव्हतं. दोघींनाही एकाच वर्षी,एकाच वर्गात घातलं होतं, जणू काही जुळ्याचं दुखणं.
बारावी आली आणि दोघीही जोमाने अभ्यासाला लागल्या. पण ऐन परीक्षेच्या वेळी श्रुतीला ताप येऊन ती आजारी पडली. नीतीने तिची रात्र रात्र जागून सेवा केली. तिने त्या वर्षी बारावीत ड्रॉप घेतला.
उत्तम गुण मिळवून दोघीही पदव्युत्तर झाल्या. पुढचं शिक्षण घेऊन नोकरीला लागल्या. श्रुतीने तिचा आयुष्याचा जोडीदार निवडला पण नीतीला अनेक ठिकाणी नकार आला. श्रुतीच्या सासरच्या लोकांनी तिला लग्न करण्याचा आग्रह केला पण श्रुती ठाम होती. नीतीचं झाल्याशिवाय मी लग्न करणार हे तिने सासरी स्पष्ट सांगितलं. नीतीला तिच्या योग्य जोडीदार मिळाला आणि मगच श्रुतीने लग्न केलं….
“आई, आज पुरणपोळी कर ग. तुझ्या हातची खावीशी वाटतेय. आमच्या घरी गुळाची पुरणपोळी असते पण तुझ्या हातची सर नाही.” श्रुतीच्या बोलण्याने सुधा आठवणीतून जागी झाली.
“आज तुझ्या आवडीची पुरणपोळी आणि नीतीच्या आवडीचा मसालेभात असा मेनू आहे.” सुधा हसत म्हणाली.
“मस्त,मला मसालेभातात भरपूर तूप हवं हं आई,आणि सोबतीला कुरडई आणि पापड.” नीती म्हणाली.
मुली येऊन चार दिवस झाले. गप्पा,आठवणी संपतच नव्हत्या. चार दिवस झाल्यावर दोघींची चुळबूळ सुरू झाली.
“आई,मी उद्या निघते. सासूबाईंना भिशीच्या ट्रिपला जायचं आहे.” नीती म्हणाली.
श्रुती तिच्या पाठोपाठ बोलली, “आई,मी पण नीतीबरोबरच जाते. मला सोबत होईल.”
“नवरोबाशिवाय करमत नाही असं सांगा की. दोघीही कारणं सांगताय.” सुधा हसून म्हणाली.
नीती,श्रुती दोघीही गालात हसल्या.
लेकींना निरोप दिला आणि सुधाचे डोळे भरून आले. “चार दिवस घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. दोघींच्या गप्पा,सासरचे कौतुक.”
“आपल्याला ह्यात आनंदच आहे न सुधा. त्या सासरी रमल्या, ह्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही.” वसंत म्हणाले.
“खरंय तुमचं. गौराई तरी तीन दिवसांच्या वर कुठे राहते माहेरी. सासर हेच आता लेकीचं घर.” सुधा डोळे पुसत म्हणाली.
चार दिवस घरात पडलेला पसारा सुधाने आवरायला घेतला. प्रत्येक वस्तू हळुवारपणे कुरवाळत कपाटात ठेवत होती कारण तिच्या ज्येष्ठा आणि कनिष्ठाचा त्या वस्तूंना स्पर्श झाला होता…..
××समाप्त××
सौ मधुर कुलकर्णी, पुणे