देश विदेशमंथन (विचार)मनोरंजन

परिपूर्ण  ©® ज्योती रानडे

परिपूर्ण  ©® ज्योती रानडे

©® ज्योती रानडे

आजी तिच्या मऊ मऊ गुलाबी लुगड्याची चौघडी शिवत बसली होती. पाच वर्षाचा आदित्य शाळेतून घरी आला तेव्हा आजी म्हणाली, “आदि, बघ तुझ्यासाठी काय शिवलय मी! ही चौघडी आता तुझी!”

आदिला ती मऊ गुलाबी चौघडी खूप आवडली. फिक्या गुलाबी रंगाच्या चौघडीवरची छोटी पांढरी फुलं बघून तो आजीला म्हणाला, “आजी आज प्राजक्ताची फुलं चौघडीवर बसवलीस का ग?”
आजी म्हणाली, “हो रे! बाळकृष्ण सगळी मागत होता पण त्याला सांगितलं.. अर्धी तुला आणि अर्धी आमच्या आदिला!” आदि खुदकन् हसला. गालाला चौघडीचा मऊ स्पर्श होताच त्याला खूप बरं वाटलं.
आजी झोपण्यापुर्वी कृष्णाची गोष्ट सांगत होती.. लोणी चोरणारा कृष्ण कसा लब्बाड होता ते ऐकून त्याला खूप हसू आलं. चौघडी गुंडाळून आजीबरोबर बसून गाणी गोष्टी ऐकणं हे स्वर्गसुख होतं. आजी त्याला थोपटताना छान गाणं म्हणायची.

“लाडका आदि राजा, सर्वाना हवा हवा
सुखी ठेव त्याला, गजानना ॥

त्या गाण्याच्या ओळी आजीच्या मूडप्रमाणे बदलत असत. पण तिचं कोणतीही गाणं ऐकत, चौघडी गुंडाळून निर्धास्त झोपण्यात फार मजा होती. आजी अभंग, भावगीते छान म्हणायची. त्याचे अर्थ सांगायची.

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर.. चा अर्थ सांगताना त्याने विचारले, “आजी चकोर दाखव ना मला! चंद्राकडे उडत जातो का तो?” कैवल्य, चकोर या गोष्टी खूप नवीन होत्या आदिसाठी आणि फारश्या कळतही नसत पण तरी त्याला ते सारे ऐकायला आवडायचे!

नंतर कधीतरी आजीने “स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा..” चा अर्थ सांगितला होता. १४ वर्षाच्या आदिला “गोडी अपूर्णतेची… ” कळत नसे. आजी अपूर्ण गोष्टीत गोडी कशी असेल ग? फॉर एक्झॅंपल,” चित्र घे एखादे. ते अपूर्ण ठेवले तर बरे दिसेल? दिसणार नाही. काय वेड्यासारखे लिहतात म्हणत त्याने आजीशी वाद घातला होता. आजी हसून सर्व ऐकून घेत असे.

बघता बघता आदिची उंची वाढत जाऊन चौघडी पुरेनाशी झाली. ती त्याच्या पायाच्या घोट्यापर्यंत यायची. तो आजीला म्हणायचा, “ अग आजी किती लहान शिवली आहेस ही चौघडी!” आजी हसून म्हणायची,” हो रे सोन्या. पण त्यातली माया इतर कुठे नाही बरं!”

आदिला वाटलं हे मात्र खरं आहे. वाढलेला अभ्यास, सारख्या येणाऱ्या परीक्षा आणि त्याचे टेन्शन हे सगळे चौघडीच्या आश्वासक स्पर्शात निघून जात असे. आई दहावेळा म्हणाली होती, “आदि, नवे ब्लॅंकेट आणलय ते घे. किती दिवस ती विरलेली, जीर्ण चौघडी वापरणार आहेस?” पण आदिला चौघडी शिवाय दुसरे काही नको असे.

आता चौघडी अजून लहान वाटत होती. जिम मध्ये जाऊन कमावलेलं शरीर, मेडिकलचा अभ्यास आणि रॅट रेस मध्ये दमलेले शरीर रात्री चौघडीत शिरताना हलके होऊन जात असे. “लाडका, आदि राजा.. हे स्वर पण त्यातून ऐकू येत असतं. आजीला हल्ली काही आठवत नसे. ती जेवण झाल्यावरही कधी जेवायचे विचारू लागली होती. आदिला अल्झायमर्स च्या खुणा चांगल्याच माहित होत्या. तो आजीजवळ जाऊन बसत असे आणि ती कधी असंबंध बोलत असेल त्यातील सुसंबध्दता बघत असे पण आजीची एकही जुनी आठवण असंबद्ध नव्हती. आजी काही ना काही सतत शिवत बसायची. त्यात मात्र काही फरक नव्हता.

आदि आता डॉक्टर होऊन प्रॅक्टिस करू लागला होता. चौघडी विरून खूप जुनी दिसू लागली होती पण तिच्यातील मऊपणा खूप वाढला होता. फिका गुलाबी रंग अजूनच फिका झाला होता. आजी खूप आजारी होती. तिला त्याच्याच हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले होते. त्याचे डोळे भरून येत होते. कधी त्यातला डॉक्टर जागा होऊन आजी जाणार हे मान्य करत असे तर कधी त्याच्यातला लहान आदि आजी कायमची हवी म्हणून हट्ट करत असे.

एक दिवस हॉस्पिटलमध्ये आजी काही वेगळ्या मूड मध्ये होती. तिने आदिला जवळ बोलावले. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. आदिचे डोळे भरून वाहू लागले. “आदि, बाळा मी छान आहे. निघू आता? आणि ऐक.. तीन लुगडयाच्या तीन चौघड्या बनवायला सुरुवात केली होती पण त्या पूर्ण झाल्या नाहीत. खालची शिवण वगैरे झालेली नाही तर त्या शेजारच्या सुमन कडून पूर्ण करून घे. तुझ्या बायकोला आणि मुलाबाळांना माझ्याकडून भेट म्हणून दे. काल ती डॉक्टरीण बाई आली होती ना, मीनल, ती माझ्या पाया पडून गेली तेव्हाच मला कळले की ही तुझी फार जवळची मैत्रीण आहे! निघू आता?” आजीच्या कृश चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. तिचं एकही वाक्य असंबद्ध नव्हतं..

आदिच्या तोंडून शब्द आले,
“लाडकी आजी आमुची, सर्वाना हवी हवी
देवाजीने द्यावी जन्म भरी||

आजी प्रसन्न चेहऱ्याने ऐकत होती. आजीच्या हातातील उष्णता कमी कमी होऊन संपली. एक दिप विझताना आपलं तेज दाखवून पुढचा प्रवास प्रकाशमय करण्यास पुढे गेला होता.

आदि एक कमालीची शांतता अनुभवत होता.आजीला निरोप देऊन घरी येऊन त्याने आजीचे कपाट उघडले. तिथून तीन चौघड्या बाहेर काढल्या. काही टाके वेडे वाकडे पडले होते यावेळी. पण निळ्या, पिवळ्या चौघड्यावर तिच प्राजक्ताची फुले होती. तोच मऊ मऊ स्पर्श होता आणि तेवढीच माया होती. राहिलेल्या शिवणी कुठल्या सुमन कडून करून घेण्याची जरूरच नव्हती कारण त्याच्या दृष्टीने त्या चौघड्या परिपूर्ण होत्या. आजीचे हात लागलेल्या, तिचं अस्तित्व जाणवून देणाऱ्या व पुर्णत्वाला पोचलेल्या चौघड्या आपल्या मुलांना देण्यासाठी त्याने पिशवीत घालून जपून ठेवल्या.

अपूर्णतेतील परिपूर्णता बघत आजीची गोष्ट कधीतरी आपल्या मुलांना सांगायची होती.

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा… या ओळीचा खरा अर्थ समजावत आजी समोर उभी होती.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}