मंथन (विचार)मनोरंजन

रुसवा  सौ दया सुहास ढमढेरे प्रकाशित कॉपीराईट प्राप्त कथा

रुसवा  सौ दया सुहास ढमढेरे

__सौ दया सुहास ढमढेरे
छोट्या सईची छोटीशी कथा…
रुसवा
आज छोटी सई रुसली होती. कारण अगदी तसंच होतं. नुकताच पावसाळा सुरू झाला होता. पावसाळा सईला खूप आवडायचा. पाण्यामध्ये भिजत मस्ती करायला तिला अतिशय आवडायचं. आजही तिला असंच पाण्यात मस्ती करायला जायचं होतं. पाऊस पडू लागला की त्यात मनसोक्त नाचायचं होतं. पावसाच्या सुरुवातीला तिची आई तिचा हा हट्ट पुरवत देखील असे.
पण या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सई सर्दीने बेजार झाली होती. शिंकांनी तिला हैराण केलं होतं. त्यामुळे सईच्या आईने तिला दटाऊन घरातच बसवलं होतं. एकीकडे कामे उरकता उरकता सईला स्वतः समोर बसवून आई तिच्यावर करडी नजर ठेवून होती.त्यामुळे तिचा डोळा चुकून पळ काढणं देखील सईला शक्य होत नव्हतं. त्यामुळे तिचे गोबरे गाल रुसव्याने लालेलाल झाले होते. आईशी गट्टी फू करून ती फुंगटून बसली होती.
हळूहळू संध्याकाळचे चार साडेचार झाले. आणि सई चे लाडके पाटील मामा उगवले. आईने लटक्या रागात त्यांच्याकडे सई ची तक्रार केली.
चहा पिऊन झाला आणि मामा म्हणाले,
“वहिनीसाहेब वाईज पडवळच बी रुजाया घालायचंय. दरवर्षीप्रमाणे सईचा हात लागू द्या की रुजवणाला. तिच्या हातन बी रुजवलं की लई झ्याक पडवळ येतात बघा. परड्यात तिला घेऊन असा जातो आणि असा येतो. दहा मिनिटाचं काम हाय बघा. आता पाऊस देखील थांबलाया नव्ह? नेतो पोरीला, बी रुजवाया.”
ही मात्रा मात्र बरोबर लागू पडली. दरवर्षी पाटील मामांच्या मदतीने सईच पडवळच बी पेरायची. मग काय रीतसर परवानगी मिळाल्यावर सई उड्या मारत मारत पाटील मामां बरोबर परसदारी आली.
मांडव घातलेलाच होता. फक्त त्याच्या एका कोपऱ्यात जागा करून बी पेरायचं होतं. पाटील मामां बरोबर हसत खेळत , खिदळत सईने बी पेरायला सुरुवात केली. आणि बी पेरत असताना अचानकच गच्च मेघ दाटून आले, आणि सर सर पर्जन्यधारा बरसू लागल्या.
मग काय जमीन नीट करून ते नैसर्गिक शिपणं झेलत पडवळाच्या बियांबरोबर सई देखील हात उंचावून नाचू लागली.
बरसणाऱ्या वर्षाधारांबरोबर तिचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला. आणि पाटील मामांच्या कडेवर बसून थोड्याच वेळात ती विजयी मुद्रेने खुशीत घरात परतली !!! …..
__सौ दया सुहास ढमढेरे
(प्रकाशित कॉपीराईट प्राप्त कथा. कथा लेखिकेच्या नावासकट शेअर करण्यास कोणतीही हरकत नाही. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}