हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः
दहा दिवस दहा गणपती या मालिकेतील
आजचा गणपती आहे पार्वती नंदन गणपती.
त्रिशुंड गणपती प्रमाणेच हा देखील पेशव्यांनी स्थापन केलेला आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवर चतु:शृंगी मंदिराच्या थोडे पुढे गेल्यावर असलेले हे मंदिर . गजबजलेल्या भागात असून देखील शांत आणि मनसोक्त दर्शन घेता येईल इतपत मोकळे असते. हा स्वयंभू गणपती आहे आणि या मूर्तीचे वैशिष्ट्य असे की या चतुर्भुज मूर्तीला अंगचा स्वतःचा असा दगडी मुकुट पण आहे. मूर्ती अडीच ते तीन फूट उंच आणि आणि शेंदूर चर्चित आहे.
एकेकाळी गावच्या वेशीवर असलेले हे मंदिर, पेशवे लढाईसाठी मोहिमांवर जाण्यापूर्वी इथे येऊन गणपतीच्या चरणी तलवार ठेवून आशीर्वाद घेत असत अशी मान्यता आहे. हा नवसाला पावणारा गजानन म्हणूनही प्रसिद्ध आहे . सुंदर चिरेबंदी दगडी बांधणीच्या मंदिराच्या मागे भला मोठा शमीचा वृक्ष आहे. आणि भोवतीने तेथील गुरुजी व देखभाल करणारे कर्मचारी यांची छोटी घरे आहेत.
गाव वेशीवर असलेल्या या स्वयंभू गणेशाच्या समोर एक विहीर होती आणि सतराव्या शतकामध्ये पाषाण गावातील रहिवासी श्री शिवराम भट्ट चित्राव यांनी येथे काही दुरुस्त्या करून घेतल्या व देखभालीचे काम सुरू केले त्यावेळी ही विहीर उप असताना या विहिरीमध्ये त्यांना खजिना सापडला तो खजिना त्यांनी थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारी सुपूर्द केला. बाजीरावांनी हा खजिना मंदिराची बांधणी आणि त्याचे देखभाल यासाठी वापरण्याचे सुचवले आणि त्याकाळी सालाना एक हजार रुपयांची तरतूद यातून केली गेली
पुण्याची वाढ होत गेली तसे मंदिराच्या परिसरात बहुमजली इमारती उभ्या राहिल्या; मंदिर लोखंडी जाळ्यांनी बंदिस्त झाले; घडीव दगडांवर तैलरंगांचे थर चढले; शहाबादी फरशांच्या जागी सिमेंटच्या टाइल्स आल्या, मंदिराच्या परिसरात स्टेनलेस स्टीलची बाके आली; जुन्या लाकूड कामाची रया गेली आणि जुन्या बांधणीचे पार्वती नंदन नावाचे ऐतिहासिक गणेश मंदिर कुरूप झाले.
पुण्यातील एका व्यावसायिकाने मंदिराला पुन्हा जुने रूप देण्याचे ठरवले आणि वास्तुविशारद किरण आणि अंजली कलमदाने यांच्याकडे ते काम सोपवले. या मंडळींनी काळ्या पाषाणावरील तैलरंगांचे थर उतरवले व तुटक्या दगडांच्या जागी नव्याने घडवलेले ताशीव दगड बसवले. खराब झालेली लाकडी कामे बदलली व मंदिराला बंदिस्त करणाऱ्या जाळ्या काढून टाकल्या. गणपतीच्या मूर्तीसमोरील लाकडी कमानींवरील तैलरंग काढून टाकल्यावर त्यांवरील कोरीवकाम उठावदारपणे दिसू लागले. कमानींमधील बांधकाम पाडून टाकल्याने या भागात उजेड आणि मोकळी हवा खेळू लागली, आणि शेवटी २०१५ साली मंदिर पुनः जुन्यासारखे झाले.
या कामासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक संस्थेने कलमदानी दांपत्याचा ’ऑनरेबल मेन्शन’ हा पुरस्कार देऊन गौरव केला आहे
अर्थात असे असले तरी आजूबाजूला भेटलेल्या इमारती आणि वाहता विद्यापीठ रस्ता यामुळे मंदिर झाकून गेले आहे हे मात्र खरे या मंदिर परिसरात तीन सुरेख दगडी दीपमाळा होत्या आजही शाबूत आहेत.
मंदिरासमोर चा रस्ता सोडल्यावर दिसणाऱ्या काँक्रीटच्या बिल्डिंगच्या गर्दीत समोरच या दीप माळा काहीशा केविलवाण्या स्वरूपात उभ्या आहेत.
देवळात प्रवेश करताना उजवीकडे तोंड केलेला व शेपूट उंचावलेला दुर्मिळ मारुतीही आहे.
चाफेकर बंधूंनी याच मंदिरात बसून रँडच्या वधाच्या योजनेला पूर्ण स्वरूप दिले होते. मंदिरातील वातावरण आजही अतिशय प्रसन्न असून. कुठलेही अवलंबन नसलेली साधीसुधी सजावट व रोज होणारी सकाळ संध्याकाळची आरती याचे पावित्र्य राखून आहेत. दर मंगळवार व चतुर्थी यावेळी इथे विशेष आरती होते. आणि माघी जयंतीला उत्सव साजरा होतो.. आजही याची वहिवाट पेशव्यांनी नेमून दिलेल्या निधीतून होते आहे.
प्रत्येक पुणेकरांनी आवर्जून एकदा तरी भेट द्यावे असे हे ऐतिहासिक नवसाला पावणाऱ्या गजाननाचे पार्वती नंदन देवस्थान.
ओन्ली ऑन युनिटी एक्स्प्रेशन
unityexpression.in
माहिती संकलक …. योगिता गुर्जर
खूप उत्कृष्ट उपक्रम… फोटोज् सहित जी माहिती दिलेली आहे, त्यामुळे लेख अधिक वाचनीय झालेला आहे. असेच लेख इतरही विविध पर्यटन स्थळांबाबत लिहावेत ही अपेक्षा… आपलं अभिनंदन आणि शुभेच्छा…