हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख …बिनखांबी गणेश मंदिर
माहिती संकलक .... योगिता गुर्जर

श्री गणेशाय नमः
आज आपण भेट देणार आहोत करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर या परिसरात असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिरास.
अंबाबाई मंदिराच्या परिसरात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. पश्चिमेला कपिलतीर्थ मार्केटमध्ये कोल्हापूरचे ग्रामदैवत कपिलेश्वर, उत्तरेला काशी विश्वेश्वर व जोतिबा, पूर्वेला जुन्या राजवाड्यातील भवानी मंदिर तर दक्षिणेला रंकभैरव, विठ्ठल आणि बिनखांबी गणेश मंदिर आहे
मंदिरात एकही खांब नसल्याने या बिनखांबी मंदिर म्हणले जाते. पूर्वाभिमुख मंदिराचा भव्य प्रशस्त दरवाजा दगडी आहे. मंदिराचा सभा मंडप २० फूट लांब व २० फूट रुंद आहे.
मध्यभागी की स्टोन किंवा आर्किटेक्ट ज्याला आयकॉन म्हणतात त्या पद्धतीने झालेली छताची बांधणी हे या मंदिराचे वैशिष्ट्य, यामुळेच या छतास एकाही खांबाचा आधार नाही. कोल्हापुरात 1700 ते 1800 सालाच्या दरम्यान बांधल्या गेलेल्या अनेक वस्तूंमध्ये या की स्टोन पद्धतीचा वापर केलेला दिसून येतो.
मंदिराचे बांधकाम छत्रपती संभाजी दुसरे यांच्या कालात झाले आहे त्यांनीच अंबाबाई व त्या परिसरातील सर्व मंदिरांचे जीर्णोद्धार केले असल्याने यावरील शिखर हे अंबाबाईच्या मंदिरावरील शिखराशी मिळते जुळते असणारे आहे.
मंदिरात प्रवेश करताच दोन्ही बाजूला चौकोनी सहा दिवळ्या आहेत. भिंती चुन्याने रंगवल्या आहेत. घंटी ज्या ठिकाणी बांधली आहे तिथे कोरीव दगडी शिल्प आहे.
मंदिरात प्रवेश करता दिसते, ती सहा फूट उंच चार फूट रुंदीची उंच गणेश मूर्ती.
ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्याच्या मागील बाजूस जोशीराव यांचा वाडा आहे या वाड्यातील विहिरीचा काळ उपसताना एक गणेश मूर्ती मिळाली, बराच काळ ही गणेश मूर्ती त्या विहिरीवर तशीच ठेवण्यात आली होती व भाविक त्याचे दर्शन घेत असत, काही काळानंतर या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करावी असे भाविकांनी जोशीराव यांना सुचवले व त्यानंतर या मंदिराची निर्मिती झाली. सध्या मंदिरात असलेली मूर्ती ही जरी भव्य दिव्य असली तरी मूळ मिळालेली मूर्ती ही छोटीशी होती व त्याचे दर्शनही भाविक घेऊ शकतात कारण ही मूर्ती देखील या मंदिरामध्ये आजही जतन करून ठेवण्यात आली आहे. करवीर महात्म्य या ग्रंथानुसार हा इच्छापूर्ती गणेश आहे त्यामुळेच गणेशोत्सवात व इतरही वेळी इथे भाविकांची सतत ये जा असते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला यापुढे जेव्हा जाल त्यावेळी या बिनखांबी गणेश मंदिराचे व त्यातील इच्छापूर्ती गणेशाचे दर्शन अवश्य घ्या.