हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः
राजस्थान मधील नारी गणेशाच्या दर्शनानंतर आज आपण भेटणार आहोत केरळ मधल्या मधुरा श्री मंदिरातील सिद्धिविनायकाला.
हे मंदिर मदनांतेश्वर मंदिर म्हणूनही प्रसिद्ध आहे. मदनांतेश्वर अर्थात मदनाचा अंत करणारा शंकर. यावरून लक्षात येते की हे मूलतः शिवाचे मंदिर आहे परंतु इथे शिवासह मुख्य पूजेचा मान हा त्याच मंडपात असलेल्या सिद्धिविनायकाचा देखील आहे.
केरळ मधील कासारगोड या जिल्ह्यातील मधुरवाहिनी नदीच्या किनारी हे मंदिर वसलेले आहे. म्हणून याला मधुर गणेश असे पण नाव आहे.
या मंदिराची निर्मिती दहाव्या शतकात झाली असल्याचे पुरातत्व विभागाच्या नोंदीवरून समजते..
मुळातील स्वयंभू शिवलिंग असलेले हे मंदिर गणेशाचे मंदिर म्हणून प्रसिद्धी पावले त्याची एक कथा आहे, एके दिवशी तेथील प्रमुख पुजार्यांचा लहान मुलगा मंदिरात आला आणि त्याने शंकरांच्या जवळच्याच एका भिंतीवर छोट्याशा गणपतीची एक प्रतिमा कोरली. काही काळानंतर पुजारी तेथे आले असता या कोरलेल्या आकृतीचे मूर्ती स्वरूपात रूपांतर झाल्याचे आणि तिचा आकार थोडासा वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले त्या दिवसापासून या मूर्तीचा आकार हळूहळू वाढत आजच्या महाकाय मूर्तीपर्यंत गेला अशी दंतकथा आहे.. या चमत्कारानंतर हे मंदिर शिवमंदिरापेक्षा गणेश मंदिर म्हणून अधिक ओळखले जाऊ लागले.
या मंदिराच्या भोवतीने एक नैसर्गिक रित्या तयार झालेला तलाव आहे मधुर अर्थात मोगराल नदीच्या पाण्याचा हा तलाव अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याचे समजते. टिपू सुलतान च्या राजवटीच्या वेळेस केरळ वर हल्ला करण्यात आला. त्यावेळी स्वतः टिपू हे मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी येथे आला होता मंदिरात शिरण्यापूर्वी या तलावाचे पाणी त्याने प्राशन केले आणि त्यानंतर काही क्षणातच मंदिर उद्ध्वस्त करण्याचा विचार त्याच्या मनातून आपोआप नाहीसा झाला आणि तो तेथून आपल्या सैन्यासह निघून गेला परंतु सैन्यातील कर्मठ मुस्लिम आणि सनातरी मुस्लिम धर्मगुरू यांना नाराज न करण्यासाठी म्हणून जाण्यापूर्वी त्याने हल्ला केल्याची खूण म्हणून विहिरीच्या बाहेरील प्रवेशद्वारावर तलवारीने एक मोठा छेद केला अजूनही हा छेद तिथे बघता येतो. परंतु मूर्तींना अथवा आपल्या परिसराला धक्का न लावता तो तिथून निघून गेल्याने आजही येथील पूजाअर्चा यथा सांग चालूच आहेत. टिपूच्या या मतपरिवर्तनानंतर या मंदिराची ख्याती अजूनच वाढली आणि तेव्हापासून आजतागायत इथे भाविकांचा ओघ हा अखंड चालू असतो.
पाच हजार वर्षांपूर्वी तुलनाडू या नावाने अस्तित्वात असलेल्या दक्षिणेकडील भल्या मोठ्या साम्राज्यातील सहा प्रमुख गणेश मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे.
मधुर महागणपती मंदिरात मुदप्पा नावाचा खास आणि विशेष उत्सव साजरा केला जातो. गणरायाच्या मूर्तीला गोड तांदूळ आणि तुपाचे मिश्रण करून लेपन केले जाते. यालाच मुदप्पा असे म्हणतात. या या
मंदिराचे स्थापत्य हे कन्नडिगा संस्कृती आणि केरळ संस्कृतीची एक अद्वितीय रचना म्हणून बारकाईने पहावे असे आहे.
हत्तीच्या पाठीच्या आकाराची त्रिस्तरीय रचना असलेल्या या मंदिराचे सर्वात वरचे दोन मजले हे पूर्णतः तांब्यापासून बनलेले आहेत तर त्यानंतर इतर मंदिर रचना ही दगड आणि इतर काही धातू तसेच लाकूड वापरून करण्यात आली आहे. अनेक गोपुरे तसेच छतावर रामायण महाभारत यातील प्रसंगांचे सुंदर चित्रण दिसते. आतील बाजूस अनेक लाकडी खांब आणि तुळया असेल सर्वांवरच अतिशय सुंदर रेखांकन किंवा कोरीव काम केले आहे. संपूर्ण मंदिर बघण्यासाठी एक दिवस अपुरा पडेल इतके देखणे आणि भव्य असे हे काम आहे.
गणपतीची मूर्ती देशातील इतरत्र नेहमीच्या मूर्तींपेक्षा वेगळी आहे. येथे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. येथील गणपतीकडे अमृताचे भांडे (अमृता कलसम) आहे. हा गणेश महाकाय असला तरीही बालगणेश स्वरूपातील आहे ..त्याचा चेहरा अत्यंत निरागस बालकाच्या चेहेर्यासारखा असून त्याकडे पाहताच मनात भक्तिसह वात्सल्याची एक अनोखी अनुभूती घेता येते.
या मंदिराच्या व्यवस्थापना तर्फे दर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ब्राह्मण समाजातील लहान मुले व तरुण यांच्यासाठी वेद पठण तथा अध्ययन यांची विशेष व्यवस्था केली जाते या काळामध्ये विद्यार्थ्यांचे राहणे जेवणे व शिक्षण या सर्वांची सोय मंदिर परिसरातील इमारतीमध्ये करण्यात येते.
अशा या वैशिष्ट्यपूर्ण आणि प्राचीन मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. केवळ केरळ वा देशभरातून नाही, तर जागतिक स्तरावरील पर्यटकही
मंदिराचे वैशिष्ट्य पाहण्यासाठी आवर्जुन येत असतात. भक्तगण मनोकामना पूर्ण करण्यासाठी बाप्पाचरणी साकडे घालतात. या मंदिरातून कधीही, कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही, अशी येथील मान्यता असल्याचे सांगितले जाते.
माहिती संकलक …. योगिता गुर्जर
सर्व उपक्रम खूप छान व कथा ही खूप आवडल्या
ब्राह्मण युनिटी च्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा