हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः
दहा दिवस दहा गणपती या मालिकेमध्ये आज आपण भेट देणार आहोत चेन्नई शहरात अत्यंत गजबजलेल्या मध्यवर्ती भागातील अनेक वेळा पुनर्निर्मिती झालेल्या अशा मध्य कैलास मंदिराला. हे मंदिर स्थानिक भाषेत नदुक्कलई या नावाने संबोधले जाते.
मंदिरातील गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती केवळ गणेशाची नसून गणपती आणि हनुमान अशी आहे. हा गणेश अध्यानंत प्रभू या नावाने ओळखला जातो. आदि अर्थात ज्याने सुरुवात झाली असा आणि अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा अर्थात चिरंजीव हनुमान. गणेश शिवाचा पुत्र आणि हनुमान शिवांश या अर्थाने ही हे दोघे इथे एकत्र आहेत. या मूर्तीच्या इतिहासाविषयी असे सांगितले जाते की खूप पूर्वी हे वेंकट विनायकार मंदिर म्हणून प्रसिद्ध होते…गणेश आणि विष्णू यांचे हे स्थान होते या मंदिराच्या एका पुजाऱ्यांच्या स्वप्नामध्ये पितृपक्षाच्या काळामध्ये गणपतीने या स्वरूपात त्यांना दर्शन दिले. त्यानंतर या मूर्तीची रचना केली गेली. ही मूर्ती महाराष्ट्रीयन शैलीमध्ये आहे मंदिरातील इतर सर्व मूर्ती दक्षिणात्य शैलीतील आहेत.
मंदिराच्या मुख्य गर्भगृहात असलेली मूर्ती ही lost Wax Process. ज्याला मराठी मध्ये फर्मा वितळ ओतकाम असे म्हटले जाते या तंत्राने निर्माण केली असल्याचे समजते.
या तंत्रामध्ये आधी जी मूर्ती बनवायचे असेल त्याचा मेणाचा साचा बनवून घेतला जातो व या साच्यामध्ये वितळलेल्या धातूचा रस एका विशिष्ट पद्धतीने ओतला जातो. या अतिशय तप्त अशा रसामुळे मुळातला साचा वितळून फक्त धातूची अशी मूर्ती तयार होते.
हा संपूर्ण मंदिर परिसर भव्य असून या मंदिरामध्ये अध्ययन्त प्रभू यांच्या खेरीज मूलवर म्हणजेच मुळातील गणेशाची मूर्ती, विष्णू सूर्य आणि शिवशंकर यांचीही मंदिरे आहेत. दक्षिणात्य शैलीच्या प्रथेनुसार यातील अनेक मंदिरे ही रथाकार रचना असलेली आणि अनेक पौराणिक कथा व शिल्पे कोरलेली अशी आहेत.
गेल्या शेकडो वर्षांमध्ये या मंदिराची अनेक वेळा पुनर्बांधणी झाली आहे सध्या अस्तित्वात असलेल्या मंदिराचे मुख्य गोपूर हे भव्य अशा अध्ययंत प्रभूंच्या मूर्तीने लक्षवेधी बनले आहे.
मंदिराचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे चेन्नई सारख्या महानगराच्या मध्यवर्ती भागामध्ये असूनही आणि आजूबाजूला सतत वाहनांची गर्दी व अनेक आवाज हे असूनही मंदिराच्या आत शिरताच या गोंधळाचा कोणताही आवाज ऐकू येत नाही.
पितृपक्षात दर्शन दिलेला हा गणपती असल्याने या मंदिरामध्ये पितृ कार्य अर्थात इतरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंडदान केले जाते. या पिंडदानाचा विधी देखील काहीसा अनोखा आहे. अद्यानंत प्रभू मंदिराचे ब्राह्मण पुजारी स्नान करून ओले त्याने या मंदिरात प्रवेश करतात आणि तेथील मूर्तीला दर्भ अर्पण करून तो दर्भ चरण स्पर्श करून उचलतात त्यानंतर तेथून सूर्य मंदिरामध्ये जाऊन हा तेथील देवतेचे दर्शन करून व तेथून तांदूळ घेऊन पुढे विष्णू मंदिरामध्ये जातात या विष्णू मंदिरामध्ये हा तांदूळ शिजवला जातो त्यानंतर तेथून पुढे शिव मंदिरामध्ये जाऊन या शिजवलेल्या तांदळाचा व दर्भाचा मिळून एक पिंड केला जातो आणि शिव मंदिराच्या बाहेरील कट्ट्यावर काकस्पर्शासाठी हा पिंड ठेवला जातो. अशा रीतीने मंदिराची संपूर्ण परिक्रमा करून इथे पितृ पूजन किंवा पितरांना श्रद्धांजली वाहिली जाते.
मंदिर परिसरामध्ये या प्रमुख चार मंदिरांसह अनेक देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत गणपतीचा भाऊ कार्तिकीय अर्थात मुरुगन देवी, भैरव, आदि शंकराचार्य इत्यादी अनेक मंदिरे इथे आहेत. हे मंदिर आदी शंकराचार्य यांनी स्थापन केलेल्या पाच पंथांपैकी गाणपत्य या पंथाच्या अनुयायांनी बांधलेले कदाचित एकमेव मंदिर आहे.
मुख्य मंदिरामध्ये आठ घंटा लावण्यात आले असून वारा आल्यानंतर या घंटा सा रे ग म प ध नी सा अशी ध्वनी निर्मिती करतात. आणि आठव्या घंटी मधून ओम चा अनाहत नाद ऐकता येऊ शकतो. इथले प्रमुख मंदिर आणि प्रमुख मूर्ती अशा रीतीने बसवण्यात आली आहे की दर विनायकी चतुर्थीला सूर्याचा प्रकाश याच्या चरणा वरती व्यवस्थित पडतो आणि अस्त होईपर्यंत सूर्य या मूर्तीवर किरणाभिषेक करतच राहतो. हा सोहळा बघण्यासाठी अनेक भाविक विनायकी चतुर्थीला आवर्जून या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात.
गर्भगृह बाहेर एक छोटा मंडप असून या मंडपात मुख्य मूर्तीची छोटी तांब्याची प्रतिकृती आहे. या प्रतिकृतीची पूजा कोणताही भाविक स्वतः करू शकतो तसेच तिथे कापूर अर्पण करू शकतो.
विनायकी चतुर्थी आणि हनुमान जयंती या मंदिरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जातात.
येथील अध्यांत प्रभू स्वरूपातील मूर्तीची पूजा मंत्र अभिषेक दीपदान एरुक्कु म्हणजेच अर्क पुष्प अर्थात रुईची फुले वाहून केली जाते आणि त्यानंतर या गजाननाला गोड भात आणि फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. गणपती सह हनुमान असल्यामुळे कदाचित रुईच्या फुलांचे महत्त्व इथे असावे.
माहिती संकलक …. योगिता गुर्जर
छान माहिती!