हेरिटेज न्युज दहा दिवस दहा गणेश मंदिरांची छोटीशी ओळख
श्री गणेशाय नमः.
अनेक पुरातन शिल्पकलेचा अद्भुत नमुना असलेली, देशाच्या विविध भागातील मंदिरे पाहिल्यानंतर आज आपण भेट देणार आहोत जगातील सर्वात उंच जागी असलेल्या गणेश मंदिराला.
देशभरात अनेक जागी श्री गणेशाची स्थापना झालेली आहे आणि त्याची पूजाअर्चाही होत असते. परंतु शिव आणि पार्वतीचा पुत्र असलेल्या गणेशाचे आपल्या मातापित्यांच्या सानिध्यातील सर्वात जवळचे स्थान कोणते हा एक कुतूहल मिश्रित प्रश्न ही मालिका लिहीत असताना अनेक वेळा मनात आला. याचा शोध घेत असताना अवचित माहिती मिळाली ती उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात असलेल्या कलवा गणेश किंवा कालू गणेश या मंदिराची
आजवर आपण बघितलेल्या इतर अनेक मंदिरांप्रमाणे हे भव्य शिल्पकलेचा नमुना नाही. परंतु तरीही कदाचित हे सर्वात भव्य असे गणेश मंदिर आहे कारण या मंदिराच्या आजूबाजूला अतिविशाल अशा संगमरवरी हिमालयाच्या भिंती आहेत. मान्यता अशी आहे की गणेश व कार्तिकेयाच्या पृथ्वी प्रदक्षिणे नंतर श्री गजाननाला शिव व पार्वती यांनी वरदान मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तुम्हा दोघांच्या चरणी माझा सतत वास असू दे असे वरदान मागितले. आणि शंकरांनी त्यांना हे स्थान बहाल केले. या मंदिराच्या बरोबर डाव्या बाजूस त्रिशूल हे शिखर तर उजव्या बाजूस नंदादेवी हे माता-पार्वतीचे स्थान असलेले शिखर असून या दोघांच्या बरोबर मधोमध पायथ्याशी असेल हे गणेशाचे मंदिर आहे. काळया पाषाणातील पाच फूट उंचीची हे गणेश मूर्ती. त्याच्या अवतीभवतीने अनेक वर्षांपूर्वी बहुधा या भागात येणाऱ्या गुराख्यांनी तेथील संगमरवरी दगडाचे तुकडे वापरून एक छोटेसे साधेसुधे मंदिर बांधले आहे. काळया पाषाणातील असल्याने याचे नाव कालू विनायक किंवा कलवा विनायक असे पडले आहे. या मूर्तीला एक हात नाही. इतरत्र खंडित अशा मूर्ती पुजल्या जात नाहीत परंतु इथे या मूर्तीची रोज पूजाअर्चा होते. असे सांगितले जाते की शेकडो वर्षांपूर्वी ही पाषाणमूर्ती याच ठिकाणी बर्फामध्ये गाडलेली सापडली इतक्या उंचा वरती अत्यंत दुर्गम भागामध्ये ही अवजड आणि बऱ्यापैकी मोठी मूर्ती कोणी व कशी आणली असावी ? वर्षातील बहुतांश काळ ही मूर्ती बर्फा मध्ये गाडलेली असते.
शंकराचे स्थान म्हणून मान्य असे त्रिशूल शिखर व भवानीचे स्थान नंदादेवी शिखर यांच्या मधोमध असलेल्या रूप कुंड या ग्लेशियर तलावाच्या चढाईत किंवा ट्रेकमध्ये कलवा गणेश हे एक विश्रांतीचे मुख्य स्थान आहे. या अत्यंत बर्फाळ प्रदेशात या कलवा गणेशच्या जवळपास हिरवळ असलेले अल्पाइन कुरण नजर वेधून घेते. इथल्या चौशिंगी मेंढ्या जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत.
या तलावा बद्दलही एक रंजक कथा आहे. नंदादेवी हे देवी भवानीचे स्वरूप मानले जाते आणि शंकराची पत्नी देवी भवानी जेव्हा माहेरी जायला निघाल्या त्यावेळी वाटेत त्यांना स्वतःचे रूप एकदा पहावेसे वाटले तेव्हा शंकरांनी त्यांच्या मनातील ही इच्छा जाणून तेथे हे नितळ पाण्याचे कुंड निर्माण केले ज्यामध्ये त्यांनी आपले रूप मनसोक्त पाहून घेतले. यामुळेच या कुंडाला रूप कुंड असे नाव पडले आहे. जवळपास 17 हजार फूट उंचीवरील हा तलाव साधारणतः हजार ते पंधराशे स्क्वेअर मीटर इतका विस्तीर्ण आहे. वर्षातील बहुतांश भाग हा गोठलेला असतो आणि उन्हाळ्यामध्ये त्याचे नितळ पाणी आजही आरशा इतके लख्ख असते.
इतकी सुंदर कथा असलेला हा तलाव एका भयावह घटनेचा साक्षीदार आहे. 1940 42 च्या सुमारास एका गुराख्याला या भागात मानवी हाडे व सांगाडे दिसले अधिक पुढे जाऊन पाहिले असता यांची संख्या वाढत होती आणि या तलावाच्या काठाशी अनेक सांगाडे पडलेले दिसले. तलावाच्या तळाशी सुद्धा शेकडो मानवी हाडे आहेत. सुमारे तीन मीटर खोली असलेले, रूपकुंड सरोवरा तील बर्फ वितळतो तेव्हा त्याच्या तळाशी मानवी हे सांगाड्याचे अवशेष दिसतात. बर्फाच्या वादळात सापडलेल्या एखाद्या व्यापारी अथवा सैनिक समूहाचे हे अवशेष असावेत असा अंदाज आहे. त्यातील काही अवशेषांचे डीएनए टेस्टिंग केले असता हे बरेच पुरातन असे अवशेष असल्याचे सिद्ध झाले आहे.
अनेक वर्ष हा भाग ट्रेकर्स साठी एक आव्हानात्मक ट्रेक होता परंतु ट्रेकिंग दरम्यान इथल्या अल्पाइन कुरणांचे आणि तिथल्या जैवविविधतेचे अपरिमित नुकसान होत असल्याने गेली अनेक वर्ष हा ट्रेक बंद आहे.
याच भागात प्रत्येक बारा वर्षातून एकदा नंदादेवी जात ही यात्रा होत असते कुमाऊ आणि उत्तराखंड या भागातील हजारो भावी या अवघड यात्रेत सहभागी होतात. दक्षिण आशियातील ही सर्वात जास्त लांबीची पायी यात्रा आहे. या मागची कथा अशी आहे की नंदादेवी दर बारा वर्षांनी आपल्या माहेरी जाते आणि काही दिवस राहून वाजत गाजत परत सासरी जाते
याच मार्गावर वाटेत तिने धर्माचा भाऊ असलेल्या लाटू भगवान या आपल्या या भावाला काही प्रमाद घडल्याने बंदीवासाची शिक्षा दिल्याचे समजले जाते व त्याचे प्रतीक म्हणून तिथे या भावाचे एक छोटे मंदिर देखील आहे. वर्षातून एकदाच या मंदिरातील लाटू भगवान या प्रतिमेला बाहेर काढले जाते व त्याची पूजा करून नैवेद्य दाखवून पुन्हा त्याला मंदिरात बंदिस्त केले जाते.
ज्या तिथीला ती सासरी परतते त्या तिथीला दर बारा वर्षांनी ही यात्रा घडते आणि या यात्रेमध्ये या कलवा गणेशाला विशेष महत्त्व आहे. इथे थांबून माय लेकरांची भेट घडवली जाते आणि त्यानंतर ही यात्रा पुढे निघते.
विशेष म्हणजे या यात्रेचे प्रमुख मानकरी तेथील बारा ब्राह्मण कुळे आहेत.
नंदादेवी शिखर हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे तर जगातील तेविसाव्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. इथल्या प्रचंड जैवविविधता असलेल्या राष्ट्रीय उद्यानात युनेस्को चा जागतिक वारसा दर्जा प्राप्त आहे.
तर असे हे रहस्यमय तरीही अती सुंदर प्रदेशातील, शिवपुत्र गणेशाचे एक अनोखे स्थान.
माहिती संकलक …. योगिता गुर्जर