हार्मोन्स. सुमन संतोष पाटणकर
🔸हार्मोन्स.🔸 सुमन संतोष पाटणकर
दुपारच्या निवांतक्षणी फोन वाजला. स्क्रीनवर “आई” नाव वाचून मी सुखावले. आईबरोबर गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानी ! हा आनंदाचा ठेवा लुटायला मी नेहमी अधीर असते….. माहेर दूर असल्याने प्रत्यक्ष भेटीचे योग दुर्लभच, त्यामुळे ह्या शब्दभेटीवर आम्ही मायलेकी समाधान मानतो.
ख्यालीखुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, “अगं, नुकतंच “गुरुचरित्राचे कथाप्रवचन ” ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत ! ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला.”
आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश ! गुरुभक्ती, नामसाधना, सत्संग असे अनेक विषय तिच्या रसाळ गप्पांतून मला प्रसन्न बनवत होते. आई सांगत होती, “समोरच्या ‘श्रावणधारा’ हौसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती – श्रद्धा यांचे दाखले देत किर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी – जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना,
श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतां पती- पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ. कडे आलेली ही केस…..
साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषांप्रमाणे दाढी – मिशा येत होत्या… दाट दाढी आणि मिशा…
ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी ! कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित, तज्ज्ञ स्टाफ ! माहेरही तसेच Wel – Educated ! दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली… अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित….. उपाय दिशाहीन……
पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढीमिशीसारखी ही दाढीमिशी रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला आँफिसला जावे लागे. कोणीतरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली, आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या.
ह्या उच्चपदस्थ, स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडीपरिक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.
सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मनमोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, “हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला, त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बाँस ही तुमची प्रतिमा ! कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार ! कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील…. तो ताणतणाव, बाँसचा अँटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या नसानसात भिनलाय.
खरंतर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरूषी स्वभावाचे लक्षण आहे. स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे दडपले….. आणि आँफिसरूटीनचे पुरूषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; की 20 -22 वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे हार्मोन्स बदलले……! ‘स्त्रीत्व’ संपून ते ‘पुरुषी’ बनू लागले…. त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढीमिशा !
बाई दचकल्या…. हे निदान अनपेक्षित होतं…. तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, “यावर उपाय आहे, तुमचा अँटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना, पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला ! ‘स्त्री’ सारख्या दिसा ! केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा… अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा.”
बाई स्तंभित ! डॉक्टरनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दिड महिन्यात फरक जाणवला… दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले…. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ….
डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत, तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नाँर्मल झाल्या !”
आई थांबली, म्हणाली, ” घटना ऐकताना मला तुझी आठवण आली. तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली.
शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी…..
सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला धन्यवाद देत मी फोन ठेवला.
सुमन संतोष पाटणकर