नवरात्रातील उपवास ! ******* दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
( गुरुवार, ३ ॲाक्टोबर पासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे. काही देवी उपासक नवरात्रात
उपवास करतात. या उपवासासंबंधी…….)
नवरात्रातील उपवास !
*******
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तु ते ॥
आश्विन महिन्यात शेतात तयार झालेले नवीन धान्य घरात येत असते. म्हणून या महिन्याच्या पहिल्या नऊ दिवसात निर्मितीशक्तीची म्हणजेच आदिशक्तीची पूजा केली जाते. निर्मितीशक्ती आणि नऊ अंक यांचे अतूट नाते आहे. बी पेरल्यानंतर नऊ दिवसांनी रोपटे तयार होते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्मास येते. नऊ ही सर्वात मोठी संख्या आहे, म्हणून नऊ संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. म्हणूनच निर्मितीशक्तीची पूजा करण्याचे नवरात्र नऊ दिवसांचे असते.
आश्विन शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी नवरात्रारंभ, घटस्थापना असते. या दिवशी कुलाचाराप्रमाणे तांब्याच्या किंवा मातीच्या घटावर ताम्हन ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता, महासरस्वती, महालक्ष्मी ,महाकाली आणि परिवार देवतांची स्थापना करतात.या घटाशेजारी नवे धान्य रुजत घालतात. हे रुजवण उत्सव समाप्तीनंतर मस्तकावर धारण करतात. देवता स्थापनेच्यावेळी नंदादीप, अखंड दीप लावतात. दररोज एक वाढत जाणारी नवी माळ मांडवाला बांधतात. सप्तशती, देवीभागवत, श्रीसूक्त ग्रंथाचे वाचन किंवा श्रवण करतात.
नवरात्रारंभापासून नवरात्र संपेपर्यंत दररोज उपवास करतात. काही उपासक फक्त महाष्टमी आणि महानवमीच्या दिवशी उपवास करतात. उपवास करतांना काही लोक साबूदाणा खिचडी व इतर फराळाचे पदार्थ खाऊन उपवास करतात, काही लोक केवळ फळे खाऊन किंवा फळांचा रस पिऊन उपवास करतात. तर काही लोक फक्त पाणी पिऊन कडक उपवास करतात. तर काही उपासक पाणीही न पिता कडक उपवास करतात. आज आपण नवरात्रात उपवास का करायचे आणि कसे करायचे याविषयी माहिती करून घेणार आहोत. तसेच उपवास करण्यामागे मूळ हेतू काय आहे हे समजून घेणार आहोत.
उपवास म्हणजे काय ?
हिंदू संस्कृतीमध्ये उपवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘ उपवास ‘ म्हणजे अन्नपाणी आणि सर्व भोग वर्ज्य करून राहणे ! परंतु सर्वसाधारणपणे उपवासाचा अर्थ ‘ हलका व कमी आहार घेणे ‘ असा गृहित धरला जातो. उपनिषदकालीही जाणत्या लोकांना उपवासाचे महत्त्व माहीत झाले होते. वेदवचनाचा आधार घेऊन यज्ञ, दान, तप आणि उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे चार मार्ग असे सांगितले गेले आहे. तपाच्या निरनिराळ्या प्रकारात उपवास हा मुख्य व श्रेष्ठ आहे असे महाभारतात सांगितले आहे. व्युत्पत्तीदृष्ट्या उपवास शब्द उप + वस् म्हणजे जवळ बसणे असा आहे. देवाच्या, गुरूच्या, सत्पुरुषांच्या सान्निध्यात बसणे असाही अर्थ समजला जातो.
धार्मिकदृष्ट्या पापक्षालनासाठी, ईश्वरप्राप्तीसाठी , पुण्यप्राप्तीसाठी आणि प्रायश्चित म्हणून उपवासाचे व्रत केले जाते. परंतु आधुनिक काळात सांगायचे तर शरीराच्या आरोग्यासाठीही उपवासाची आवश्यकता आहे. आधुनिक भाषेत आपण उपवासाला ‘ डाएटिंग ‘ असेही म्हणू शकतो. हलका आहार घेतला तर शरीरातील मांद्य कमी होण्यास मदत होते. शरीर हलके राहिल्याने चपळता येते. आपली कार्यक्षमता वाढते. वजनावर नियंत्रण राहण्यास मदत होते. उपवास करण्याचा आणखी फायदा म्हणजे आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची संवय आपणास लागते . हलका आहार घेणे हा उपवासाचा मूळ उद्देश आहे. हलका आहार घेतल्याने आपल्या शरीरातील मांद्य कमी होते, आळस आणि निद्रा न आल्याने उपासनेकडे आपले लक्ष एकाग्र करणे सुलभ होते. मन सात्विक व जागृत राहते. नवरात्रात देवीच्या उपासनेत याचा उपयोग होतो.
उपवासाला काय खावे ?
उपवासामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत याबद्दल मतभिन्नता आहे. कोणत्याही धार्मिक मान्यवर ग्रंथात याविषयी स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही.
तांदूळ सोडून ‘ हविष्य अन्न ‘ उपवासाला खाण्यास हरकत नाही असे सांगण्यात आले आहे. हविष्य म्हणजे हेमंत ऋतूत झालेली ! अग्नीस आहुती देण्यायोग्य अन्नधान्ये,गहू, मूग, यव, तीळ, वाटाणे, मटार, देवभात , नारळ, चंदनबटवा, चाकवत, मुळा, सेंदोलोण, गाईच्या दुधाचे दही व तूप, लोणी न काढलेले दूध, फणस, आंबा, हरीतकी, पिंपळी, जिरे, नागरंग, चिंच, केळे, आवळा, गूळ सोडून ऊसाचे इतर पदार्थ, हे सर्व पदार्थ तेलात तळलेले असता कामा नये. अन्न ही संज्ञा भातालाच आहे. शास्त्रीयदृष्ट्या सांगायचे म्हणजे उपवासाला अन्न हे पूर्ण वर्ज्य आहे.
उपवासाला साबुदाण्याची खिचडी किंवा खीर चालते असे कुठल्याही मान्यवर ग्रंथात लिहिलेले नाही. खरं म्हणजे साबुदाणा आरोग्यास खूप अपायकारक असतो. साबुदाणा तयार करण्याची पद्धत तुम्ही जर पाहिलीत तर कधीही साबुदाणा उपवासाला खाणार नाही. बटाटे हे सुद्धा मूळ भारतीय नाहीत. हे पदार्थ उपासाला खाल्ले जातात हे पाहून वाईट वाटते. भगर ही आरोग्यास चांगली आहे. ती उपवासाला खायला हरकत नाही. फळे , दूध वगैरे हलका आहार उपवासास घ्यायला हरकत नाही.
एक गोष्ट मात्र नक्की ती म्हणजे निर्जळी म्हणजे पाणी देखील न पिता उपवास करणे हे योग्य नव्हे ! ते आरोग्यास घातक असते. काही वर्षांपूर्वी वृत्तपत्रात आलेली ती बातमी तुम्ही वाचलीही असेल. सासूच्या आग्रहाखातर नवरात्रात नऊ दिवस असा निर्जळी उपवास केल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता. शरीराला पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक तितके पाणी पिऊन आणि हलका आहार घेऊनच उपवास करायला पाहिजे. आरोग्य चांगले राहिले तरच आपण सामर्थ्यवान होऊ. आरोग्यास अपायकारक असे उपवास करता कामा नयेत. स्वत: आनंदी व सुखी राहणे आणि इतरांच्या जीवनात आनंद फुलविणे यासाठीच आपला जन्म असतो हे लक्षात ठेवावयास हवे.
देवीचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी आपण देवीची – निर्मितीशक्तीची पूजा करीत असतो. आपणही सतत वर्तमानकाळात सतत कृतीशील राहिले पाहिजे.
(१)आजी (२) आई(३) पत्नी (४) बहीण (५) सून (६) मुलगी(७) आत्या (८) मावशी (९) नात या देखील आपल्या नवदुर्गाच आहेत. देवीचे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकालीचे गुण आपल्या घरातील देवींमध्ये यावयास हवेत. घरच्या स्रीला आर्थिक व्यवहार करता यावयास हवेत, घरची स्त्री ही सुशिक्षित हवी. तसेच ती शारीरिक सामर्थ्यवान पाहिजे. कोणीही गुंड त्रास देऊ लागला तर त्याचा बंदोबस्त करण्याचे सामर्थ्य तिच्यात हवे.
देवीने समाजाला त्रास देणा-या शत्रूंचा नाश केला. आपणही आपल्यातील आळस, अनारोग्य, अनीती, अंधश्रद्धा, अस्वच्छता, असूया इत्यादी शत्रूंचा नाश करायला पाहिजे. त्यासाठी आपले शरीर आरोग्यदायी हवे. उपवास करतांना ही गोष्ट लक्षांत ठेवावयास हवी. देवीने राक्षसांशी नऊ दिवस युद्ध करताना चिकाटी, कणखरपणा दाखविला तशी चिकाटी ,कणखरपणा उपवासाने आपल्यात यायला हवा. उपवास करण्याने आपले मनोधैर्य वाढावयास हवे तरच खरा उपवास केला असे म्हणता येईल.
दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक