गुंतवणूक आणि अनुभव वृद्धिंगत करणारा दिवस – बी यूनिटी इन्वेस्टमेंट ग्रुप– थेट भेट
गुंतवणूक आणि अनुभव वृद्धिंगत करणारा दिवस – बी यूनिटी इन्वेस्टमेंट ग्रुप– थेट भेट
रविवार दिनांक – २९. ०९. २०२४ – सकाळी सकाळी मुळशीच्या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोचलो ‘स्वछंद फार्म’ला, जिथे आपल्या B Unity च्या इनव्हेसमेंट ग्रुपचे गेट टुगेदर होते. रात्रीचा पाऊस गवतात चमकत होता, नदीचा खळखळाट गाणे गात होता आणि हिरवागार निसर्ग डोळ्यांना सुखावत होता. आमची कार तिथे पोचणारी पहिलीच असेल कदाचित, हळहळू एकेक गाडी पार्किंग मध्ये लागत होती आणि त्यातून प्रत्येकी ४ ते ५ लोकं उतरत होती. कुणी ओळखत नसेलही कुणाला तरी ‘आपला माणूस’ बघून पटकन नातेवाईकासारखे ओळख दाखवत होते. बघता बघता तब्बल ८०-८५ लोकं मैदानात दिसू लागले. रोज व्हाटसप वर दिसणाऱ्या नावांना चेहरे जोडले जाऊ लागले. ओळख नवीन असली तरी बोलण्यातला विश्वास आणि आदर मात्र जुना होता. जणू हे सगळे एकाच कुटुंबातले.
तेवढ्यात रिसॉर्टच्या मॅनेजरने चमचमीत मिसळ आणि पोहे आणून, दोन ब्रेकफास्टचे काउंटर सुरु केले. मिसळ पाव आणि पोह्यांवर ताव मारत गप्पा अजूनच रंगल्या. छोटे छोटे वर्तुळ बनून आपोआप मित्र जमायला लागले. असं वाटतच नव्हतं कि हि मंडळी पहिल्यांदाच भेटत आहे. तेवढ्यात माइकवरून एका गोड आवाजाने लक्ष वेधले. जो आवाज होता सूत्रसंचालिका कादंबरी तानवडे यांचा. विस्कळीत चालेल्या गप्पांना कादंबरीने पटकन रुळावर आणले आणि “स्वतःची ओळख” सांगण्याच्या उपक्रमाला सुरवात झाली.
आपले नाव, गाव सांगून झाले कि प्रत्येकाने काही ना काही विशेष सांगितलेच. इथे काही शेयर मार्केटचे मात्तबर तर काही आताच बिथरत सुरवात केलेले होते. काही शिकणारे, काही शिकवणारे, काही कोट्याधीश तर काही स्वप्न बाळगणारे प्रयत्नशील. काही पुणे, मुंबई तर काही सांगली, अहमदनगर. सर्वांची ओळख होता होता, सर्वांच्याच चेहऱ्यावर श्रीमंतीचे तेज दिसत होते. ही श्रीमंती होती चांगल्या लोकांची.
ओळख संपेस्तोवर उपेंद्र पेंडसे, श्रीरंग गोरे आणि काही उत्साही मंडळींनी आतला हॉल सेशन्ससाठी तयार करून घेतला. छानसा प्रोजेक्टर आणि नीटनेटक्या लागलेल्या खुर्च्या, सर्व अगदी व्यवस्थित मॅनेज केलेलं वाटत होत. मी एक छानशी जागा शोधून बसणार तोच लक्षात आलं कि आपण साधा रायटिंग पॅड आणि पेन आणलेला नाही. नोट्स कश्या घ्याव्या हा विचार करतच होतो तेवढ्यात CA अदिती वझे यांनी नोटपॅड आणि पेन हातात आणून दिला. किती बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेतली जाऊ शकते हे या आयोजनावरून शिकण्यासारखं आहे. कादंबरीने कार्यक्रमाची रूपरेषा आखून नवीन सभासदांसाठी बियुनिटीची आजवरचे कार्य सांगण्यासाठी माईक दिला – आपले लाडके ऍडमिन आणि Bunity चे फाउंडर मेम्बर श्री उपेंद्र पेंडसे यांना.
खरं सांगू, मी अंदाजे ४ वर्ष झाले बि युनिटीचा मेम्बर आहे, पण मला सुद्धा बि युनिटीचा कार्यविस्तार इतका सखोल माहिती नव्हता. कोरोना काळ, कोल्हापूरचा पूर, वृद्धांना मदत, पुरोहितांना शेती आणि राशन हे सगळे कार्य ऐकून मी भारावून गेलो. उपेंद्र सरांनी बियुनिटीच्या प्रवासाची आणि शेयर मार्केटच्या प्रवासाची सांगड घालत, हे सेशन खूपच इंटरेस्टिंग बनवले. उपेंद्र सर म्हणाले – “आपल्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये असलेली सर्व नावं म्हणजे आपल्या पोर्टफोलिओचे डॉक्टर आहेत, त्यांच्या कडून एकदा आपला पोर्टफोलिओ तपासून घ्या” – हे वाक्य मी रायटिंग पॅडमध्ये लिहून त्याखाली दोन रेषा मारून ठेवल्या. “सर्व सेशन झाल्यावर एक सप्राईज देतो”. असे वचन देऊन उपेंद्र सरांनी माईक सोपवला.
वेळ न दवडता कादंबरीने माईक श्री जितेंद्र महाजन यांना दिला. सेशनचा विषय होता “रिस्क मॅनेजमेंट आणि मुचुयल फंड वीजडम”, रिस्क मॅनेजमेंटचे महत्व काय, डायव्हर्सिफिकेशन कसं असावं, तुमचा कोअर आणि इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ वेगळा ठेवावा, स्वतःची सिस्टीम बनवावी असे सुरेख मुद्दे भराभर सगळे नोट करत होते.
म्युच्युअल फंड मध्ये कसे, किती, कधी आणि का इन्व्हेस्ट करावे यावर सविस्तर चर्चा झाली. जितेंद्र सरांचे सेशन आधी संपते कि माझे नोटपॅड अशी जणू पैजच लागली होती.
लगेच दीपाली खळदकर यांचे PSU बॅंक्स वरती सेशन झाले. PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग हे मला तेव्हाच कळलं. या बँकांमध्ये सरकारची हिस्सेदारी असते म्हणून यामध्ये इन्व्हेस्टमेंट योग्य असू शकते. आपल्या इन्व्हेस्टमेंट स्प्रेड मध्ये PSU बॅंक्स चा वाटा असावा हे मला शिकायला मिळालं.
मग आम्ही वळलो आयोजक श्रीरंग गोरे यांच्या सेशन कडे. सेशन चे नाव होते – Fundamental Analysis of Companies from Quarterly results. मुळातच मला बापड्याला या सर्व इंग्रजी शब्दांना कुणी एकत्र का आणलं हेच उमगेना. पण माझा कवी मित्र श्रीरंग गोरे यानी कंपन्यांचे तिमाही रिजल्ट्सचे विश्लेषण करून आपण उत्तम किमतीत चांगल शेयर खरेदी करू शकतो हे उदाहरणासहित स्पष्ट केलं. त्यासोबतच कॅपिटल बघणे, PE बघणे, FII, DII, प्रोमोटर स्टेक, कंपनीवर कर्ज अश्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या. अर्थात त्याचा माझ्या मेंदूला स्पर्शही झाला नाही. आता हळूहळू सर्व शिकण्याचा प्रयन्त सुरु आहे.
श्रीरंगचे सेशन संपता संपता प्रचंड भूक लागली होती आणि हॉलच्या बाजूलाच किचन मधून पौष्टिक वास येत होता. एक दोनदा मनात आलं, कि जाऊन नुसतं बघून येतो.. नुसतं बघतो .. पण मी स्वतःला थांबवलं. तेवढ्यात कादंबरीने जेवणाची सुट्टी जाहीर केली आणि माझा जीव ताटात पडला. मस्तपैकी मिक्स व्हेज आणि शेवायाच्या खिरीवर ताव मारून आम्ही अल्मोस्ट वामकुक्षीच्या अवस्थेत खुर्चीवर येऊन बसलो. यातून आम्हाला खाडकन जागं करण्याचा विडा उचलला श्री मंदार भालेराव यांनी.
“इन्फ्लेशन अँड असेट अलोकेशन” असा कठीण विषय मंदार भालेराव यांनी सोपा करून सांगितला. इन्फ्लेशन कसं काम करत, इन्फ्लेशन म्हणजे काय, आपण रियल रिटर्नस कसे मोजायचे, कॅशफ्लो कसा काढला पाहिजे असे धीर-गंभीर विषय समजावून अगदी पुणेकरांची सुद्धा झोप उडाली.
हे सर्व सेशन सुरु असतांना, प्रेझेन्टेशनच्या स्लाईडस केदार फडके त्याच्या लॅपटॉपवर छान सांभाळत होता. आणि यानंतरचे सेशन केदारचेच होते. विषय पण फार छान होता – ट्रेडिंग सायकोलॉजी. मग काय? स्लाईडची पानं पलटवण्याची जबाबदारी मला देऊन केदार स्टेजवर गेला. ट्रेडिंग करतांना लागणारी शिस्त, स्टॉप लॉसचे महत्व, स्वतःची सिस्टीम टेस्ट करून फॉलो करणे असे उत्तम मुद्दे केदारने त्याच्या विशेष खेळकर पद्धतीने मांडले. “आपल्याला पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, इमोशन्स नाही” या वाक्यावर केदार “वन्स मोअर” घेतो कि काय, असे वाटले. हे वाक्य मला विशेष लक्षात राहिले.
यानंतरच्या सेशनसाठी श्री पराग गोवईकर स्टेजवर आले. आणि नंतरचे चाळीस मिनिट सगळे फक्त मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. थीमॅटिक इन्व्हेस्टमेंट अँड सेक्टर इन्व्हेस्टमेंट हा विषय घेऊन, आपण शेयर आपल्या ऑबझर्व्हेशन मधून कसे निवडू शकतो, फस्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन ऑफ ओप्पोर्च्युनिटी कशी बघावी. थीम कशी सिलेक्ट करावी यावर कितीचं कंपन्यांचे उदाहरणं त्यांना तोंडपाठ होते. जेवढा अभ्यास त्यांचा एका थीमवर होता तेवढा मी बारावी मध्ये जरी केला असता तर ….. असो.
आता वेळ होती उपेंद्र सरांच्या सप्राईजची, पण जशी १२ वाजता भूक लागते तसा ४ वाजता चहा लागतो. आणि चहाचा मुहूर्त टळू नये म्हणून पटकन ब्रेक जाहीर करण्यात आला. चहाच्या रांगेत सेशनच्या चर्चा कुजबुजत होत्या. सोबत खमंग पालकपुऱ्या दरवळत होत्या. गप्पाच्या ओघात मी दोन कप चहा झोडपून मी परत आपल्या खुर्चीवर येऊन बसलो. पाच मिनिटात सप्राईजच्या आशेत हॉल कुतूहलाने भरला.
उपेंद्र पेंडसे स्टेजवर आले आणि “विप्र निवेश लिमिटेड” या इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापनेची घोषणा झाली. मेम्बर्समध्ये नुसता जल्लोष सुरु झाला. टाळ्यांचा कडकडाट झाला. कारण “सर्वांनी मिळून एक फंड उभा करावा आणि इन्व्हेस्टमेंट करावी” अशी चर्चा बरेचदा ग्रुपमध्ये झाली आणि याआधी एक प्रयत्न देखील झाला. पण काही लीगल कारणांनी तो प्रयन्त मागे पडला. पण यावेळी मात्र ३० प्रमोटर्स सोबत घेऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्यात बियुनिटीला यश मिळले आहे. त्याचेच नाव “विप्र निवेश लिमिटेड” असे ठेवण्यात आले. विप्र निवेशच्या ऑफिशियल स्थापनेसाठी अगदी तुरळक व्यवहार बाकी असून लवकरच आपल्याला ग्रुप वरती याचे प्रॉस्पेक्टस दिसणार आहे. अश्या कंपनीचा भागीदार होणे कुणाला आवडणार नाही बरं ? प्रमोटर्सचे कौतुक करून कार्यक्रम शेवटाकडे वळला.
कार्यक्रम संपतांना सर्व सेशन घेणारे टीचर्स यांना, तसेच आयोजक आणि इतर सर्व प्रकारची मदत करणारे व्हॉलेंटियर्स यांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
इथून परत घरी जाताना माझ्यासोबत खूप सुरेख अनुभव, डीप नॉलेज, नवीन मित्र, बियुनिटीचा मेम्बर असल्याचे समाधान आणि ब्राह्मण असल्याचा ज्वाजल्य अभिमान सोबत जात होता. परत असा कार्यक्रम झाला तर कधीही मिस करायचा नाही एवढंच मी स्वतःला सांगत होतो. सुखावत होतो.
अंबरीष अरुण देशपांडे
चिखली (पिंपरी चिंचवड़)
d.ambarish@gmail.com
7276547983