मनोरंजन

फिटे अंधाराचे जाळे…! भाग नऊ

⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️

🍁भाग नऊ 🍁

कालच्या वातावरणाचे पडसाद आजही उमटत होते . वातावरणात तणाव जाणवत होता . खरं तर सत्या आज निघणार होता पण आबांनी त्याला थांबायला सांगितलं होतं .दादा सकाळपासूनच तोंड फुगवून बसला होता .आणि आता कोणालाच काहीच न बोलता बाहेर निघून गेला होता . आबांनी सगळ्यांना त्यांच्या खोलीत बोलवलं होतं पण दादा अजून आला नाही म्हणून आम्ही त्याची वाट पहात होतो .सगळेच अस्वस्थ होते ..सत्याला काही नको होतं तर आबांना त्याला द्यायचं होतं .दादाला सगळंच हवं होतं आणि मी .. मी तर या सगळ्याचा विचारच केला नव्हता . मुळात आबा हे सगळं काही काढतील अशी पुसटशी कल्पना कोणालाही नव्हती . आबा जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत पण एकदा संतापले की त्यांना आवरणं ब्रह्मदेवाला ही कठीण असं माई म्हणायची ! आणि दादा .. त्याला तर कसलाच पाच पोच नाही . जे काही बोलणं व्हायचं आहे ते शांतपणे व्हावं एवढीच इच्छा होती . त्यात आता आबांनाही बरं नाही .. दादा काही वेडं वाकडं बोलला तर ते त्यांना सहन होणार नाही आणि म्हणूनच काळजी वाटत होती .

माई वाती वळत होती ..मालन पाणी भरत होती ..सत्या काहीतरी वाचत होता आणि मी गाणी ऐकत होते . तेवढ्यात मालनचा नवरा धावत आला ..त्याचा शर्टी रक्ताने माखला होता ..’ मालक .. मालक ..लवकर चला ‘
त्याची ती अवस्था बघून आम्ही सगळेच घाबरून गेलो . आबाही त्याचा आवाज ऐकून बाहेर आले . ते म्हणाले ‘ काय रे बबन .. काय झालं .. हे रक्त कसं ..चिरंजीव कुठे आहेत ..’

‘ धनी.. थोरले मालक मळ्यात हैत .. त्यांना लई लागलंय .. रक्त व्हातंय समदं .. दादा तुमी चला ..’

सत्या घाईने त्याच्या बरोबर निघाला ..मी पण येते म्हंटल तर आबा म्हणाले नको ..मग वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता . माई अगदी घाबरून गेली होती ..देवासमोर दहा वेळा हात जोडत होती .गावात असं कोण आहे जो दादाला मारू शकेल आणि ते ही का ?

सत्या आणि बबन दादाला धरून घेऊन आले .त्याच्या खांद्यावर भरपूर रक्त दिसत होतं .ते पाहून आम्ही सगळेच घाबरलो .बबनने त्याचा शर्ट काढून जखम स्वच्छ केली .. सत्याने मलमपट्टी केली .आबांनी विचारलं ..

‘ कसं आणि काय लागलं .. इस्पितळात न्यावं लागेल ..सत्या चल मी पण येतो ..’
दादा गुरगुरत म्हणाला ‘ एवढं काही झालं नाहीये .. मी येणार नाही ‘

‘ अरे पण झालंय काय ते तरी सांग ..’ माई म्हणाली .

सत्या म्हणाला ‘ बबन ने सांगितलं आहे मला सगळं .. मळ्यात गेल्यावर रस्त्याच्या कडेने जी सरकारी आंब्याची झाडं आहेत त्याची पाहणी करण्यासाठी सरकारी अधिकारी आले .. त्यांना मागच्यावेळी जेवण मालनने बनवून दिलं होतं .त्यांनी विचारलं, जेवण छान होतं ..यावेळी नाही का .. झालं ..आधीच रागात असलेल्या दादाला ते आवडलं नाही शब्दाने शब्द वाढत गेला ..पण तरी ते दोघं निघून गेले .दादा रागाने धुमसत होता .तिथे असलेल्या ओंडक्यावर जोरजोरात कुऱ्हाडीने मारत होता .. मारता मारता कुऱ्हाड रागाने वर झाडात फेकली तीच खाली येऊन खांद्याला चाटून गेली .नशीब ..कुऱ्हाड लहान होती आणि डोक्यात पडली नाही ..याच्या आणि इतरही कोणाच्या ..पण तरी लोखंड लागलं आहे म्हणजे इंजेक्शन तर घ्यावंच लागेल . उद्या घेऊन जातो मी तालुक्याला ..’

नशीब अगदी थोडक्यात निभावलं होतं . आबांनी विचारलं ..

‘ एवढा कसला राग आहे तुम्हाला .. नेमका कशाचा राग आला होता तुम्हाला ..’

‘ लोकांच्या बायका म्हणजे वाटतात काय या लोकांना ..’

आबा आता गंभीर झाले . तिथे उभा असलेल्या बबनला म्हणाले ‘ जा तू मळ्याकडे ..आज खुरपणाला बायका असतील ना तर मालनलाही घेऊन जा ..’

आबांनी इतकं स्पष्ट सांगितल्यावर बबन ची तिथे थांबण्याची प्राज्ञा नव्हती . मालन दाराआड उभी राहून बघत होती .तिला त्याने खुणेनेच बोलवलं आणि ते दोघं निघून गेले .
काही क्षण शांततेत गेले . माई म्हणाली ‘ मी काय म्हणते .. जे झालं ते झालं .. पांडुरंगाची कृपा फार लागलं नाही .. आता उगाच विषय वाढवू नका ..’

आबा शांतपणे म्हणाले ‘ विषय सुरूच आता झाला आहे . किती दिवस मुलाला पाठीशी घालणार .आज विषय निघालाच आहे तर बोलू द्या मला ..’

‘ अहो .. नको ना .
तुमचीही तब्येत बरी नाही .. त्याला ही किती लागलं आहे .. आताच हे सगळं बोलणं गरजेचं आहे का ..?’

‘ हो .. तर काय म्हणत होता तुम्ही ? लोकांच्या बायका ? पण ते तर जेवणाबद्दल विचारत होते मग तुम्हाला एवढा राग का आला ? ‘

दादा रागात होता पण खाली मान घालून बसला होता ..त्याच्याकडे पहात पुन्हा आबा म्हणाले ..
‘ चिरंजीव .. मी तुमच्याशी बोलतो आहे ..’

दादाने माई कडे बघितलं .. माईने त्याला शांत रहा असं खुणवलं ..तरी तो म्हणाला ‘ काय ऐकायचं आहे तुम्हाला ? मालन बद्दल ते लोक बोलले म्हणून मी चिडलो असंच ना .. तर हो .. बास ‘

‘ दुसऱ्याच्या बायकोचा आदर वगैरे शहाणपण गेलं कुठे ..ती बबन ची बायको आहे की तुमच्या मालकी हक्काची वस्तू .. का वागता असे ? एवढा राग काय कामाचा ? सगळं मला द्या म्हणता पण ते सांभाळण्याची तुमची कुवत आहे का ते तपासून पहा ..आपल्यासाठी काम करणाऱ्या माणसांना सांभाळा .. सांभाळणं आणि पोसणं यात फरक आहे . तुम्ही दिलेल्या तुकड्यावर ते रहात असतील तर ते पोसणं पण कष्टाने कमवत असतील तर.. त्यांना हवं नको ते काळजीपोटी , वडीलधाऱ्या नात्याने बघणं म्हणजे सांभाळणं . शरीर फक्त पोसतं ..पण सांभाळताना मनाचाही विचार करावा लागतो .हाडा मांसाची माणसं आहेत ती .. एवढा जीव लावावा की वेळ पडली तर तुमच्यासाठी जीव देतील . पण शान शौक , शरीराचे चोचले पुरवण्यात तरुणपण चाललं तुमचं .. असलेल्या लक्ष्मी प्रती कृतज्ञ रहावं ..उतून माजू नये . तुम्ही घरच्या लक्ष्मीला गीनतच नाहीत हे आमच्या लक्षात येत नाही का ? आम्ही जे कमावलं ते टिकवणं तरी जमेल ना तुम्हाला ? मोठेपणा वागण्यातून दिसावा .. कर्तुत्व मोठं असावं ..लोकांनी ते मान्य करावं .वडिलांनी कमावलेल्या इस्टेटीवर तुम्ही माज करणार .. तुम्ही काय भर घातलीत त्यात .. नाही ना .. मळा वडिलोपार्जित आहे ..त्याला जोडून मी पन्नास एकर घेतलं . डेरी मी उभी केली ..लोकांसाठी झटलो .. आई बहिणींचा मान ठेवला .. त्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात . तुमचं स्वतः चं असं काय आहे ..सांगा .. आज बोलाच तुम्ही ..मी ऐकतोय .. हा तुमचा राग , माज कशासाठी आहे ते कळूच द्या ..जे काही आहे ते तुमचं तिघांचंच आहे .. जाताना मी वर घेऊन जाणार नाही . तुम्हां तिघांना ते सारखं वाटून द्यावं अशी माझी इच्छा आहे ..ते मी करणारच ..’

‘ पण आबा .. सत्याला काही नको आहे .. तो भणंगासारखा फिरत रहाणार ..इथे सगळं मी सांभाळणार , बघणार आणि तो नको म्हणत असतानाही त्याला द्यायचा तुमचा आग्रह का ? ‘

‘ फक्त त्यालाच नाही ..मी तीन हिस्से म्हणालो .. ताईसाहेबांचा ही तितकाच अधिकार आहे . एक बाप म्हणून माझं कर्तव्य आहे की मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही . सत्याला आज नको आहे .. पण उद्या त्याला गरज भासली तर त्याने तुमच्यासमोर हात पसरावेत का ? आणि हे सगळं तुम्ही एकट्याने का सांभाळावं .. सत्याचीही ती जबाबदारी आहे . त्याला दिलेल्या हिशश्याच काय करायचं ते त्याने ठरवावं ..’

‘ मनूला कशासाठी ? तिचं लग्न लावून देऊ .. तिला भरपूर सोनं नाणं देऊ आणि परत वर हा हिस्सा कशासाठी .. ती लग्न होऊन जाणार म्हणजे दुसऱ्याचीच भरती ..आणि ती माहेरपणाला येणार तेंव्हाही ..तिचं डोहाळजेवण, बाळंतपण , आणि काय काय सगळे कार्यक्रम करूच की .. सगळं तिचं करण्यातच घालवायचं का ..’

‘ तुम्हाला जसं नऊ महिने पोटात वाढवलं ..तुमच्या आईने तिच्या रक्ता मांसाने वाढवलं तसंच त्यांनाही . तुम्ही जसं आमचं मूल आहात तशाच त्या ही आहेत मग त्यांना का नाही द्यायचा हिस्सा . आणि त्यांना जसे दागिने घालू ..अजून काही करू तसं तुमच्या पत्नींना ही करूच ना .. अजून त्यांच्या लग्नाचा पत्ता नाही आणि तुम्ही पार त्यांच्या डोहाळजेवणा पर्यंत पोचलात . त्यांना जेंव्हा इथून हिस्सा मिळेल तेंव्हा त्या त्यांच्या घरी नणंदेला हिस्सा देतील .अशीच सुरुवात होईल .जसं सत्याच्या हिशशाचं काय करायचं ते त्याने ठरवायचं आहे, तसं ताईसाहेब त्यांचं ठरवतील ..’

‘ पण मला हे मान्य नाही .. ‘

‘ हे पहा .. ही माझ्या संपतीची वाटणी आहे आणि ती मी ठरवणार .. तुम्हाला मान्य नसली तरी .आणि मी कागदोपत्री जरी सगळ्या गोष्टी करून ठेवणार असलो तरी त्याला अजून काही कालावधी आहे . ते दोघेही तुम्हालाच सगळे अधिकार देणार असतील तर माझी हरकत नाही . मी आणि तुमची आई जोपर्यंत आहोत तोपर्यंत सगळे अधिकार माझेच रहातील .. आमच्यानंतर कशी वाटणी व्हावी त्याची तरतूद मी करणार आहे ..तुम्हाला नाही आवडलं तरी ..आणि यावर मला कसलीही चर्चा नकोय ..नात्यामध्ये व्यवहार असावा पण म्हणून लेकीच्या चोळी बांगडीचा ही हिशेब करू नका .. दुसऱ्याच्या बायकोला साड्या घेण्यापेक्षा याचा विचार करा ..उद्या तुम्हालाही मुलगी झाली तर तिच्याबरोबर ही व्यवहार बघणार का ? लेक म्हणजे दुसऱ्याच घरी जाणार म्हणून दूजाभाव करणार ?’

‘ पण आबा ..’

‘ पण नाही आणि काही नाही .. हा विषय संपला आहे .. सत्या तुला जायचं आहे ना .. तू जाऊ शकतोस ..आणि ताईसाहेब तुम्ही .. तुम्ही जरा मला खोलीत घेऊन चला ..’

आबांना हात देऊन मी उठवलं आणि त्यांच्या बरोबर खोलीत गेले . दादाचा आवाज येत राहिला ..आबांनी खिडकी लावून घ्यायला सांगितली . बराच वेळ डोळे मिटून पडून राहिले . खूप थकल्यासारखे वाटले .मुलगाच घराण्याचा वारस .. मुलगा झाला तर आयुष्याचं सार्थक झालं अशी मानसिकता असते ..पण माझे आबा ..माझ्यासाठी , त्यांच्या मुलीसाठी किती खंबीरपणे उभे होते . पण मला हे सगळं काही नकोय .. मला जे हवं आहे ते का नाही देत आबा मला . मी शांतपणे त्यांच्याकडे बघत बसून होते .

माई खोलीत आली .. तिने आबांसाठी दूध आणलं होतं .आबांचा डोळा लागला असावा .पण माईच्या चाहुलीने ते जागे झाले . इथून बसत म्हणाले ..’ या या .. बरं झालं तुम्ही आलात ..बसा ..’

माईने दिलेलं दूध त्यांनी संपवलं आणि गमचाने ओठ पुसत म्हणाले ‘ ताईसाहेब ..एक मागणं आहे तुमच्याकडे .. द्याल .. शेवटची इच्छा समजा हवं तर ..’

माई त्यांच्याजवळ बसत म्हणाली ‘ भरल्या घरात हे असं अभद्र कशासाठी बोलायचं .. काही होणार नाही तुम्हाला ..आणि आज जेवढं रामायण झालं तेवढं पुरे .. जे काही बोलायचं ते उद्या बोला ..’

मी म्हंटल ‘ आबा .. हे शेवटची इच्छा वगैरे काय आहे ..मी तुमच्या शब्दा बाहेर नाही ..सांगा काय हवं आहे तुम्हाला . मी काही एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काही द्यावं तरी प्रयत्न नक्की करेन ..’

‘ ताईसाहेब .. सगळीच सुखं पैशाने विकत मिळत नाहीत . तुम्ही जे समाधान मला देऊ शकता ते दुसरं कोणीही देऊ शकत नाही .. मला तुम्हाला सुखात पहायचं आहे ..’

‘ ते तर मी आहेच आबा … ‘

‘ तुमचा बाप आहे मी .. सगळं कळतं मला .. वेडा हट्ट सोडून द्या ..माझ्यासाठी लग्नाला तयार व्हा .. रघू चांगला नाही असं अजिबात नाही पण तो तुमच्यासाठी योग्य नाही .समजून उमजून मी तुम्हाला खाईत नाही ढकलू शकत ..परवा सोलापूरचे पाटील येणार आहेत .त्यांचा मुलगा मुंबईत असतो . तुम्हाला लग्नानंतर नोकरी ही करता येईल .. चांगले आहेत ते .. फक्त एकदा मी म्हणतो म्हणून त्यांना भेटून घ्या ..’

काय बोलू .. न सुचून मी गप्प बसून राहिले ..आणि तोच माझा होकार समजुन आबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले . मी ही ठरवलं .. बास आता आबांना अजून दुखवायचं नाही ..

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}