⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग पंधरा🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️
🍁भाग पंधरा🍁
सुहास डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाला ..’अतिशय लाडा कोडात वाढलेली शरू प्रेमात पडली ..ते पण तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा असणाऱ्या माणसाच्या .तो आमच्याच हातमागाच्या मील मधे अकौंटंट होता .नानांचा खूप विश्वास .. सतत नानांबरोबर असायचा .नानांचा खूप विश्वास .आईवडील नाहीयेत त्याला .. आईबापाविना पोरगं म्हणून नानांनी खूप जीव लावला.प्रत्येक सण वाराला घरी जेवायला बोलवत असत . दिसायला एकदम गोरा गोमटा .. छान छान गप्पा मारायचा , कविता करायचा . तुम्हां मुलींशी थोडं गोड बोललं की पाघळता तुम्ही ! रोजच्या जगण्यातलं बोलण्यात काही नसतं ..चंद्र , सूर्य , तारे ,फुलं , पानं , झाडं असं ज्यामुळे रोजच्या जगण्यात काहीच फरक पडणार नाही अशा गोष्टी बोलतात ही मुलं .थोडे दिवस गोड गोड गप्पा मारतात , स्वप्न दाखवतात ..पण ते फक्त थोड्याच दिवसांसाठी असतं , लग्न होई पर्यंत ! तू बरोबर असशील तर मी कुठेही आणि कशीही राहीन असं वदवून घेतात .पण हातातला कप सुध्दा न उचलणाऱ्या मुलीला तुला असं घागरीने पाणी भरावं लागेल हे नाहीत सांगत .. तुझा एकटीचा महिन्याचा जो खर्च आहे तेवढा माझा पगार आहे हे नाहीत सांगत . हातापायाशी नोकर असणाऱ्या मुलीला घरातली अगदी भांडी घडण्यापासून कामं करायला लागतील .. स्वतः ची स्वतंत्र खोली असणाऱ्या मुलीला कॉमन टॉयलेटला जावं लागेल आणि बाथरूम टीचभर ते ही अर्धी भिंत असलेली मोरी असेल हे नाही सांगत तिला ..कवितांनी पोट भरत नाही . त्याच्या हुशारी बद्दल मला शंका नाही ..पण या हुशारीने त्याचा फक्त अभिमान सुखावतो ..पोसतो ..शरीराचं काय ? सुखवस्तू शरीराला आधी सगळं स्वप्नवत वाटणारं जग मग आपल्या विरुध्द झालं आहे असं भासायला लागतं … शरूने पण नाही ऐकलं कोणाचंच .शरद माझ्याबरोबर नसेल तर कितीही सुख माझ्या पायाशी लोळण घेत असेल तर मला सुख वाटणार नाही म्हणाली .आम्ही सगळ्यांनीच खूप समजावून सांगितलं ..नाही ऐकलं ..रडली पडली , जेवणखाण सोडलं ,सगळ्यांशी असहकार पुकारला ..जबरदस्ती केली आम्ही ..एक स्थळ आणलं काकाने ..चांगलं होतं ..मुलगा उच्चशिक्षित होता ..त्याला गुपचूप सांगितलं शरद बद्दल ..ठरलेलं लग्न मोडलं .. नाना आजारी पडले ..आई खंगली पण ती कोणालाच बधली नाही . एक दिवस शरद बरोबर लग्न करूनच घरी आली . या घटनेला दोन वर्ष झाली . तुझ्याच बरोबरीची असेल शरू . तू जेंव्हा मला तुझ्या प्रेमाबद्दल सांगितलंस तेंव्हा मला पुन्हा हे सगळं आठवलं . नाना , काका , आई , काकु , मला झालेला त्रास आठवला .तेंव्हाच ठरवलं होतं ..काहीही झालं तरी मी लग्न तुझ्याशीच करणार .आणि हे प्रेम बीम होत रहातं . तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम नसतं तर तुला मी आवडलो असतो की नाही ..काय वाईट आहे माझ्यात ? मुलगी लग्न करून जाते पण ती सुखात नसेल तर सगळं कुटुंब दुःखात रहातं .मला तू पहाता क्षणी आवडलीस ..आहेसच तू आवडण्यासारखी ..तो जो कोणी आहे ज्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणतेस त्याला तू आवडलीस यात नवल ते काय ? तू मला सगळं सांगितलंस म्हणजे तू प्रामाणिक ही आहेस ..उद्या माझ्याशी लग्न झालं की तू माझ्याशी प्रामाणिक रहाशील ही खात्री वाटली आणि मला अजून एक शरू होऊ द्यायची नव्हती म्हणून मी तुला होकार दिला आणि माझ्या निर्णयावर मी ठाम आहे .’
त्याचं बोलून झालं होतं . तो खूप प्रामाणिकपणे अगदी सच्च्या भावनेने बोलत होता . त्याचा शब्द न शब्द खरा होता . पण ही त्याची बाजू झाली ..शरूला काय वाटतंय ..ती सुहासला वाटते तसं खरंच दुःखात आहे का ? इतक्या दुरून पाहून तिच्या मनस्थितीचा अंदाज बांधणे कितपत योग्य आहे .तिच्याशी बोलायचा सुहासने कधी प्रयत्न केला आहे का ..माझे विचार पळत होते . सुहास माझा अंदाज घेत असावा ..मग म्हणाला ..
‘ मला वाटतं तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं असेल आणि मी माझ्या निर्णयावर किती ठाम आहे हे ही तुला कळलं असेल ..चल घरी जाऊ आपण ..’
‘ बहिणीच्या घराच्या इतक्या जवळ येऊन तिच्या घरी नाही जायचं का ?’
‘ तिलाही नाही आवडणार ..दोन वर्षात मी तिच्याकडे गेलो नाही .’
‘ मग तिच्याकडे न जाताच तुम्ही ती सुखात नाही हे कसं ठरवलं .. की तुमच्या कडे काम करणारा माणूस म्हणून त्याच्याकडे जायला कमीपणा वाटतो आहे .’
‘ तो आता आमच्याकडे कामाला नाही ..लग्न केलं की त्याने राजीनामा दिला आहे . तो आता काय काम करतो , कुठे काम करतो आम्हाला काहीही माहिती नाही ..’
‘ हे तुमचं प्रेम की अहंकार .. आमच्या मुलीने आम्ही सांगतो तेच ऐकलं पाहिजे .तिने मनाने वागायचं ठरवलं तर तुम्ही तिला वाळीत टाकणार ..ती जिवंत आहे की मेलीय हे पण तुम्ही बघणार नाही . कदाचित तिने घेतलेला निर्णय तुम्हाला अयोग्य वाटत असेल पण तिच्या आयुष्यात ती खूश असेल .आणि समजा नसेल खुश .. तिला तिचा निर्णय चुकला असं वाटत असेल तर तुम्ही तिला समजून घ्यायला काय हरकत आहे .लग्न झालं म्हणजे तिचं आयुष्य संपलेलं नाही .तिला शिकू द्या .. तिला स्वतःच्या पायावर उभी राहू द्या .. तुम्ही तिला मदत करा .कर्तव्य आहे म्हणून नाही तर तुमचं तिच्यावर प्रेम आहे म्हणून. आणि तुम्ही माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला त्याचा मी नक्कीच आदर करते .तुम्ही खूप चांगले माणूस आहात सुहास .पण प्रत्येकाला एकच तराजूत तोलण्याची चूक करताय . माझं रघुवीर वर प्रेम आहे पण म्हणून घरच्या लोकांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन मी लग्न केलं नाही आणि हा निर्णय माझा एकटीचा नव्हता तर रघूचाही होता. मी स्वतः च्या पायावर उभी आहे , रघू ही एम पी एस सी पास झाला आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर झाला आहे . भौतिक सुख म्हणजेच फक्त सुख असं मी अजिबात मानत नाही . रोजच्या जगण्यात फक्त कविता उपयोगी पडत नाही हे फक्त मलाच नाही तर रघूलाही माहीत आहे . माझ्या आणि त्याच्या जीवनमानामधे जमीन अस्मानाचा फरक आहे हे आम्हाला दोघांनाही माहिती आहे .पण गेली तीन वर्ष मी मुंबईत एकटी हॉस्टेलवर रहात होते त्यामुळे नोकर चाकर आणि सुख सुविधांशिवाय रहाण्याची मला सवय झाली आहे .त्यामुळे परिस्थितीचं भान मलाही आहे आणि त्यालाही. सगळ्यात महत्वाचं रघूने मला कधीही खोटी स्वप्न दाखवली नाहीत या उलट सतत परिस्थितीचं भान त्याला होतं ..त्याने मलाही ते दिलं .त्याच्यामध्ये खूप संयम आहे आणि त्याने वेळोवेळी तो दाखवलाय .. फक्त गोड गोड आणि छान छान बोलण्याला मी भाळले नाही ..कितीही प्रतिकूल परिस्थितीत भांबावून न जाता शांतपणे निर्णय घेण्याचा त्याचा गुण मला आवडतो . स्वतःच्या परिस्थितीची जाणीव असणं आणि त्याची लाज वाटणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत . त्याला परिस्थितीची जाण आहे पण म्हणून त्याची त्याने कधी लाज बाळगली नाही ना ही कधी माझ्याच नशिबात हे का? म्हणून कडवटपणा ठेऊन फक्त त्रागा केला. ती बदलण्याचा त्याने मनापासून प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला . माझ्याबरोबर आहे त्या परिस्थितीत रहा असं न म्हणता माझ्यासाठी त्याने परिस्थिती बदलली .थोरामोठ्यांचा आदर करणं तो अगदी मनापासून करतो .तुम्ही म्हणालात तसं त्याचं माझ्यावर प्रेम असेल तर तो माझ्याशी लग्न करेलच ..पण ही संधी त्याला मिळायला हवी ना .म्हणूनच मी तुम्हाला अजून विनंती करते की तुम्ही मला नकार द्या ..’
‘ ते आता शक्य नाही .. फोन वर्षात पहिल्यांदा घरात काहीतरी आनंदाची गोष्ट घडली आहे .माझे नाना , आई त्या सगळ्या दुःखातून बाहेर पडू पहात आहेत . मी पुन्हा एकदा तसंच वागून त्यांना त्रास नाही देणार ..काहीही झालं तरी मी नकार देणार नाही .मी तुझ्याशीच लग्न करणार ..’
पावसाची एक जोरात सर आली ..माझ्या डोळ्यातून ही पाणी वाहू लागलं ..बाहेरच्या पावसाने आणि आतल्याही बाहेरचं धूसर दिसायला लागलं .सुहासने माझ्या हातावर हात ठेवला ..पण माझा दगड झाला होता .
आम्ही तिथून निघालो .. मळा , बाग असं त्यानी मला सगळं दाखवलं ..पण ना माझं पहाण्यात लक्ष होतं ना त्याचं दाखवण्यात .कधी एकदा घरी जातोय असं मला होऊन गेलं होतं .त्याच्याशी बोलण्याची इच्छाच मारून गेली होती . मी माझ्या भूमिकेवर कायम राहिल्यामुळे तो ही ताठर झाला होता . तो ही गप्प बसून गाडी चालवत होता .नुकत्याच पडून गेलेल्या सरीमुळे वातावरणात थोडा थंडावा आला होता .रस्ते ओले झाले होते ..रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ जाणवत होती . आता मी हातांची घडी घालून डोळे मिटून बसून राहिले .सुहासने करकचून ब्रेक दाबला आणि जोरात ओरडला म्हणून मी डोळे उघडले तर एक सायकल वाला माणूस गाडीचा हलकासा कट लागून पडला होता . मला ‘ तू आतच थांब ‘ असं सांगून सुहास खाली उतरला . पण तो पडलेला माणूस सुहासशी वाद घालत होता .. ते पाहून आजूबाजूचे लोक गोळा व्हायला लागले . तो माणूस बहुदा त्याच भागात रहात असावा ..गर्दी वाढू लागली तशी मला भीती वाटायला लागली . जोरजोरात आवाज वाढायला लागले .. तितक्यात तिथे एक बुलेट येऊन थांबली . पोलीस ऑफिसर गर्दीला पांगवत समोर आला ..आणि त्या क्षणी मला काय वाटलं हे सांगूच शकत नाही . . पुन्हा एकदा नियतीने आपलं अस्तित्व दाखवून दिलं होतं .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी