⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग एकोणीस 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️
🍁भाग एकोणीस 🍁
घरात लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती . वाड्या बाहेर मोठा मांडव घातला होता .रोज बायका जमत आणि वळवट , पापड , इतरही रुखवताचे प्रकार अगदी हौसेने करत असत .त्यांची थट्टा मस्करी चालत असे . कोणाकडे काही कार्य असेल किंवा सणवार असेल तर असं एकत्र जमून गप्पा होत असत त्यांच्या .त्यामुळे त्या सगळ्या खूपच खुश असत .मी अजिबात बाहेर येत नाही हे सगळ्यांना विचित्र वाटत असणार पण माईला तसं कोणी विचारायला धजावत नसे . वहिनीशी आडून आडून बोलायचा प्रयत्न करत असत पण वहिनी ही हसून वेळ निभावून नेत होती . एकदा माई ने मला दटावले ‘ सगळ्या विचारतात तू कुठे आहेस .. लग्न तुझं आहे ..का येत नाहीस अजिबात बाहेर ..हे वागणं शोभतं का तुला . हे बघ ह्यांनी निर्णय दिला आहे आणि एकदा त्यांनी निर्णय दिला की त्यात बदल होणं अशक्य असतं हे तुला माहिती आहे .उगाच तमाशे नको आहेत मला ..’
‘ तमाशा तर तुम्ही करताय माझ्या आयुष्याचा ..’
‘ तू वागताना च नाही तर बोलतानाही ताल सोडला आहेस . तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही .’
रागाने माई निघून गेली होती .
सुहासच्या आईचा फोन आला होता .. बांगडीचं माप पाठवा ..एकदा मनवाला सोलापूरला पाठवा तिच्या पसंतीने दागिने , मंगळसूत्र घेता येईल .मला तेवढीच एक आशा होती . या निमित्ताने का होईना मला सोलापूरला जाता येईल .पण माई आणि आबांना मला सोलापूरला पाठवण्यात धोका आहे हे माहीत होतं . त्यामुळे माई ने अगदी गोड बोलून ‘ आता दिवस किती कमी राहिले आहेत .. आमचीही सगळी तयारी राहिली आहे ..तुम्ही घ्याल ते आवडेल तिला ‘ असं सांगितलं होतं . मी पण भांडण काढलं .’माझ्या आवडीचं काहीच होऊ द्यायचं नाही का तुला .. नवरा नाही किमान दागिने तरी आवडीचे घेऊ देत .’ असं कुचकटपणे बोलले .पण माई आहे ती ..तिने माझं बोलणं नाही घेतलं मनावर ! किती विरोधाभास आहे हा ..नवरा पसंतीचा असो वा नसो त्याच्यासाठी म्हणून जे घालायचं ते मंगळसूत्र मात्र पसंतीच असायला हवं . त्यावर ही माईचं ‘ हे हल्ली फॅड निघालं आहे . आम्हाला तर काळया पोतीत मणी मंगळसूत्र असायचं पण त्याचं मोल खूप होतं . आता ते काळे मणी सोन्यात गुंफतात पण तरी त्याची किंमत ,त्याचं पावित्र्य काही राहिलं नाही ‘ हे म्हणणं होतं .
बघता बघता चार दिवस निघून गेले.विठूकाका मुंबईला मधूकडे गेल्याचं समजलं होतं . जाताना सांगूनही गेला नाही म्हणून आबा दुखावले गेले होते .त्यांचं कोणाचंच तोंड पहायची इच्छा नाही म्हणणाऱ्या आबांना विठू काकाने सांगून जायला हवं अशी अपेक्षा का असावी ? कितीही म्हंटल तरी जुने पीळ असे सहजासहजी सुटत नाहीत हेच खरं .रोज मी बाहेरचा अंदाज घेत होते पण म्हणावी तशी काहीच माझ्यबाजूने हालचाल होत नव्हती . आता दहा दिवसांवर लग्न आलं . रघू आठ दिवसांत येतो म्हणाला होता . तो कधीही येऊ शकतो . तो येण्याआधी मला त्याच्याशी बोलणं खूप आवश्यक होतं ..त्यासाठी त्याचा फोन नंबर मिळवणं ही आवश्यक होतं पण घरात सतत माणसांचा राबता आणि सतत काहीतरी काम चाललेलं असे त्यामुळे वहिनीला तिच्या भावाला फोन करण्यासाठी वेळ मिळत नव्हता .आज शालू आणि साडी खरेदी करायची म्हणून तालुक्याला जायचं ठरलं . माई ने गृहित धरलं होतं की मी जाणारच नाही ..त्यामुळे ती वहिनीला बरोबर घेऊन जायचा विचार करत होती .तिने आबांना तसं सांगितलं
‘ होय हो .. मी काय म्हणते ..आज सूनबाईना घेऊन जाते .. विश्वा ला ही नेते बरोबर ..तालुक्याला जायचं आहे . मनूच्या साड्या घेऊन येते . सुहास रावांनाही कपडे घ्यावे लागतील ..शिवाय व्याहयांचा आहेर , मानपान ..पुरुषांची खरेदी विश्वा करेल ..आम्ही विहिणीच्या मानपानाचं बघतो . तुमच्या सोबत मनू आहे आणि मालनही राहील घरीच ..’
मला वाटलं ही संधी चांगली आहे वहिनी साठी म्हणून मी म्हणाले ‘ माझ्या साड्या घ्यायच्या आहेत तर मी येते ना बरोबर ..वहिनी राहील घरी ..’
मी एवढी गोड बोलून बाहेर जायची तयारी दाखवते आहे हे त्यांच्या पचनी पडत नव्हतं . दादा ने तर सांगुनच टाकलं ‘ मनु अजिबात घराच्या बाहेर पडणार नाही . ही आणि मी येतो तुझ्याबरोबर ..माझा तिच्यावर आता अजिबात विश्वास राहिलेला नाही .’
ही पण संधी गेली म्हणून मी हिरमुसले होते . मी खोलीत जाऊन रागाने दार लावून घेतलं . वहिनी आणि माईचं आवरून झालं होतं .माई दारात उभी राहून आवाज देत होती पण मी बधले नाही . माई म्हणाली ‘ काही तरी खाऊन घे गं बाई .. कुठल्या जन्मीचा सुड उगवते आहेस ‘
वहिनीचा आवाज आला ‘ द्या सासूबाई .. मी बोलते त्यांच्याशी .. मी खाऊ घालते ..’
वहिनीने हाक मारायला सुरुवात केली .. पण मी दार उघडलंच नाही . वहिनी म्हणत होती ‘ अहो वंन्स .. दार उघडा तरी .
बघा तुम्हाला आवडतं तेच केलं आहे सगळं ..उघडा बरं दार .. सासूबाईंची शपथ आहे तुम्हाला ‘
माईची शपथ घातली की मी दार उघडणारच हे तिला चांगलं माहिती होतं . अगदी काहीही झालं तरी माई , आबा माझा जीव की प्राण !त्यांना काहीही झालेलं मला चालणारच नाही .शपथ मोडली तर खरंच काही होतं का ..असल्या प्रश्नात मी पडत नाही .माझ्यामुळे त्यांना काही व्हायला नको .उगाच विषाची परीक्षा नकोच .
वहिनी आणि माई आत आल्या . मी तोंड फुगवूनच बसले होते .वहिनीने ताट हातात दिलं .
दादा ‘माई ..माई ‘ आवाज देत होता . माई वहिनीला म्हणाली ‘ बघ गं जरा .. मी बघते काय म्हणतो आहे ते ‘ माई बाहेर गेली तसं वहिनीने एक चिटोरं माझ्या हातात दिलं ..म्हणाली ‘ माझ्या भावाचा नंबर आहे ..तुम्ही फोन करून बोलून घ्या ‘
सगळे तालुक्याला गेले आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं . आबा आता हिंडत फिरत होते त्यामुळे मी अगदीही निर्धास्त नव्हतेच . जेवण झाल्यावर त्यांनी दुपारची औषधं घेतली की त्यांना झोप लागते त्याच वेळी फोन करायचा असं मी ठरवलं .
उमाकाकु अचानकच आली .. विचारलं तर म्हणाली माईनी करंज्या करायला सांगितल्या आहेत . माईने अगदी हुशारीने माझ्यावर लक्ष ठेवण्याची सोय केली होती . मी पण अगदी सहज म्हणावं तसं म्हणाले ‘ काकु .. आबांचा डोळा लागला आहे . मी दिवाणखान्यात बसते पुस्तक वाचत .. चालेल ना .. तसं ही तू मला काही करू देणार नाहीस ..नवरीने काम केलं की पाऊस येणार म्हणते माई ..’
माझ्या या बोलण्यावर ती ही ‘ हो हो .. चालेल ना .. बस बस ‘ म्हणाली .
आबांच्या खोलीत जाऊन ते झोपले आहेत हे पुन्हा एकदा पाहून आले . पुस्तक हातात घेऊन मुद्दाम उमाकाकु समोरून मी बाहेर आले .दार बंद आहे हे पुन्हा एकदा पाहिलं . छातीत खूप धडधडत होतं . मी हळूच नंबर डायल केला . खूप वेळ रिंग झाली तरी पलीकडून कोणीच फोन उचलला नाही . पाच मिनिटं थांबून मी पुन्हा एकदा नंबर डायल केला यावेळी मात्र एका रिंग मधेच फोन उचलला ..
‘ हॅलो ..’
‘ नमस्कार दादा .. मी मनवा ..विश्वजीत ची बहिण .. वहिनींनी तुमचा नंबर दिला . माझं एक काम होतं तुमच्याकडे ..’
‘ बोला ना ताईसाहेब ..’
‘ मला शिवाजीनगर पोलीस स्टेशन , सोलापूरचा फोननंबर हवा आहे ..प्लीज तुम्ही देऊ शकाल का ?’
‘ हो .. अगदीच देऊ शकेन ..पण ताईसाहेब ..पोलीस स्टेशनचा नंबर कशासाठी हवा आहे .. काही अडचण आहे का ..दुसरी काही मदत हवी असेल तर सांगा ..माझे मित्र आहेत सोलापुरात ..तुमचं सासर सोलापूर आहे ..तिथे काही अडचण आहे का ..’
‘ नाही .. नाही दादा .. नंबर मलाच हवा आहे .’
‘ बरं बरं .. आबासाहेब किंवा जावई बापू आहेत का कोणी .. देता का मी बोलतो त्यांच्याशी ..’
‘ नाही नाही दादा .. एक विनंती आहे ..हा नंबर फक्त मलाच द्या किंवा वहिनीला द्या ..बाकी कोणाला मी तुमच्याशी बोलले हे ही सांगू नका .आणि वहिनीने मला तुमचा नंबर दिला आणि तुम्ही मला मदत केली हे कोणाला कळलं तर त्याचा वहिनीला खूप त्रास होईल .’
‘ ताईसाहेब .. ही नक्की काय गडबड आहे .तुम्ही दोघी चुकीचं तर काही करत नाही आहात ना ..मला आबासाहेबांशी बोलावंच लागेल .’
‘ हे पहा दादा .. तुम्हाला मला मदत करायची नसेल तर करू नका पण प्लीज आबांशी काही बोलू नका ‘
मी घाईत फोन ठेवून दिला . पण आपण केलं ते बरोबर की चूक हा भुंगा लागला डोक्याला .वहिनीचा भाऊ असला तरी तो एक पुरुषच होता आणि संस्कृती रक्षणाची जबाबदारी आणि स्त्रियांची काळजी करणं .. हा त्याचा जन्मसिध्द हक्क होता . शिवाय घरातल्या स्त्रियांनी , मुलींनी कसं वागावं याचे त्याचे ही काही नियम , अटी असणारच . तो समजुन घेईलच असं काही सांगता येत नाही . आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं झालं मला . रघूचा नंबर तर मिळाला नाही पण बिचाऱ्या वहिनीला माझ्यामुळे त्रास नको व्हायला . दादाला चुकून जरी कळलं वहिनी मला मदत करते आहे तर ..बापरे अंगावर काटाच आला माझ्या अंगावर !
मी स्वयंपाक घरात उगाच चक्कर मारल्यासारखे केलं आणि आबांच्या खोलीत गेले .त्यांच्यासाठी जाताना दूध घेऊन गेले . आबा उठून बसले होते पण त्यांच्या चेहेऱ्यावर वेदना वाटत होती . त्यांना दरदरून घाम आला होता . मी प्रचंड घाबरले ..
‘ आबा .. आबा .. काय होतंय तुम्हाला ..’
‘ आं … छातीत दुखतंय .. ‘
ते कसं बसं म्हणाले ..पुन्हा अटॅक आला की काय . खूप घाबरुन गेले . मालनला जोरजोरात आवाज दिला ..’ मालन .. जा लवकर .. पळत जा .. कोणाला तरी बोलावून आण .. गाडी घेऊन ये ..कोणाचीही असेल तरी .. बैलगाडी असेल तरी चालेल .. पळ लवकर .. आबांना त्रास होतोय ..’
मालन पळतच गेली . मी आबांशी बोलत होते ..त्यांचा घाम पुसत होते .. ‘ आबा .. काही होणार नाही तुम्हाला .. मी आहे ना .. ‘
मालन दहाच मिनिटात आली ..तिच्याबरोबर दोघे चौघे होते .आबांना गाडीत बसवलं . बरोबर पैसे घेतले . आबांसाठी शाल घेतली ..उमकाकुला सांगितलं आणि आबांना दवाखान्यात घेऊन निघाले .फोनची रिंग होत होती .. उमा काकुने फोन उचलला .. मला म्हणाली ‘ सूनबाईंच्या भावाचा फोन आहे ..’
‘ आबांची तब्येत बिघडली आहे असं सांग ..’ असं म्हणून मी आबांबरोबर निघाले .जीपने गेलो असतो तर दहा मिनिटांत पोचलो असतो पण बैल गाडीने अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागणार होता .
आबांना त्रास होत होता ..त्यांचा तो त्रास मला बघवत नव्हता .’ आलाच दवाखाना हां आबा ..थोडाच वेळ ‘ असं बडबडत मी बसले होते . एवढे मोठे आबासाहेब एक लहान मूल होऊन माझ्या मांडीवर झोपले होते. मी देवाचा धावा करत होते ..देवा माझ्या आबांना काही होऊ देऊ नकोस . गाडीवान वेगात गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होता ..पण शेवटी त्याला ही काही मर्यादा होत्याच .गावच्या वेशीबाहेर गाडी आली आणि समोरून एक जीप येताना दिसली . कोणीही असू देत ..आपण गाडी थांबवायची या विचाराने मी खाली उतरले आणि रस्त्याच्या मधोमध दोन्ही हात पसरून उभे राहिले .जीपचा वेग मंदावला ..
क्रमशः
अपर्णा कुलकर्णी