⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️ 🍁भाग वीस 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️
🍁भाग वीस 🍁
जीप जवळ आली आणि माझ्या लक्षात आलं की जीपमध्ये रघू आहे . मला पहाताच तो उडी मारून खाली आला . त्याला पहाताच इतका वेळ अडवून धरलेलं रडू यायला लागलं ,मी ते आवरत म्हणाले ‘ आबा .. आबांना दवाखान्यात घेऊन जायचं आहे ..’
माझं बोलणं ऐकून घेऊन रघू काहीही न बोलता बैलगाडी जवळ धावतच गेला .आबांना अगदी सहज उचलून घेतले. मालनने तेवढ्या वेळात सगळं सामान जीप मधे टाकलं मालनला आम्ही बैलगाडीतून घरी पाठवून दिले .
मी जीपमध्ये बसले . दहाच मिनिटांत आम्ही हॉस्पिटलमधे होतो .रघूने आबांना उचलून आणेपर्यंत मी पळतच जाऊन डॉक्टरांना बोलावून आणलं .
आत मध्ये आबांवर उपचार चालू होते . मी , रघू बाहेर उभे होतो . कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते . मी सतत देवाचा धावा करत होते . ‘ देवा , पांडुरंगा ..माझ्या आबांना वाचव ..यापुढे मी तुला काहीही मागणार नाही .’ रघू ही अस्वस्थ होऊन येरझाऱ्या घालत होता . त्याची अस्वस्थता ही जाणवत होती . पाच वाजत आले होते आणि उन्हं कलंडली होती . आजूबाजूला सगळेच पेशंट आणि त्यांचे नातेवाईक !प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर एक काळजी ..ती काळजी त्या वातावरणात भरून राहिली होती . त्या हॉस्पिटलच्या आवारात बरीच मोठी मोठी झाडं होती . त्या झाडांखाली पेशंट्सचे नातेवाईक ग्रुप करून बसले होते .हॉस्पीटल मधल्या औषधांचा वास , संध्याकाळची वेळ असल्याने चहाचा वास , बाहेरच असणाऱ्या गाडीवरून येणारा भज्यांचा वास , कदाचित हॉस्पिटलच्या मागेच मोठी कचरा कुंडी असावी तिथून येणारा कुबट वास .. हे सगळे वास एकत्रितपणे येत होते . पोटात ढवळल्यासारखं झालं. इथे आबांना आणायला नकोच होतं असं वाटून गेलं . पण त्यावेळी जे मला योग्य वाटलं आणि सुचलं ते मी केलं . तरी रघू भेटला म्हणून बरं झालं ..नाहीतर त्या बैल गाडीने इथपर्यंत यायला वेळ लागला असता आणि आबांना त्रास झाला असता . मला एकदम माई , दादाची आठवण झाली . त्यांना सगळी खरेदी करून घरी यायला संध्याकाळचे सात तरी वाजतील .त्याआधी त्यांना कळवावे तरी कसे ? तेवढ्यात एक वॉर्डबॉय ने बाहेर येऊन ‘ डॉक्टर बोलवत आहेत’ असं सांगितलं . आम्ही धावतच आत गेलो .
डॉक्टर म्हणाले ‘ तुम्ही पेशंटच्या कोण ? ‘
‘ मी मुलगी आहे त्यांची ..’
‘ निर्णय घेणारं कोणी नाही का त्यांच्याबरोबर .. त्यांचा मुलगा वगैरे ‘
‘ म्हणजे ? काय निर्णय घ्यायचा आहे ..आणि मी आहे ना मी घेऊच शकते निर्णय ..तुम्ही मला सांगा ‘
‘ मला तसं म्हणायचं नव्हतं .. पण त्यांना अटॅक आला आहे .. माईल्ड आहे पण त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यामुळे काळजी तर घ्यावीच लागेल . इथे उपचार करताना आम्हाला काही मर्यादा आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी नेलं तर चांगलं होईल.’
रघू मधेच म्हणाला ‘ जे योग्य असेल ते करू .. मी घेऊन जातो जिल्ह्याला ..पण जायलाच तीन तास लागतील .. तेवढ्या वेळात मधे त्यांना काही त्रास नाही ना होणार ..’
‘ म्हणूनच मी म्हणालो होतो की निर्णय घेणारं कोणीतरी हवं ..इथे ठेवण्यात धोका आहेच ..पण प्रवासातही धोका आहे . म्हणजे त्रास होईलच असं नाही पण त्रास होणारच नाही असं मी खात्रीनं नाही सांगू शकत ..’
‘ डॉक्टर .. आम्ही घेऊन जातो जिल्ह्याच्या ठिकाणी .. मी तुम्हाला एक विनंती करतो ..प्लीज तुम्ही आमच्याबरोबर चला ..मी तुम्हाला परत इथे आणून सोडतो पण प्रवासात काही त्रास झाला तर तुम्ही बरोबर असाल तर सोयीचे होईल.’
‘ नाही .. मला शक्य नाही ..पण माझे एक ज्युनिअर आहेत त्यांना पाठवतो तुमच्याबरोबर ..सगळ्या प्रिकॉशन्स घेऊ आपण ..मला इथे थांबावं लागेल ..इथल्या पेशंट्सची माझी जबाबदारी आहे . फक्त एक करा .. त्यांना फार प्रेशर येईल , टेन्शन येईल असं काही बोलू नका ..इथलं बील भरून टाका ..तुमची निघण्याची तयारी करा .. मी ही बाकी औषधं वगैरे सांगतो तुमच्याबरोबर जो येईल त्याला .. ओके ..’
‘ डॉक्टर ..एक दहा मिनिटं वेळ देता प्लीज .. आम्ही बोलून सांगतो तुम्हाला ..’
‘ हरकत नाही .. मी आहे केबिन मधे ‘
मधेच रघू असं का म्हणाला ते काही समजेना . मी विचारलं ‘ आपण निघू ना .. मधेच हे विचार करायचं का काढलं आहेस ‘
‘ तुझ्या लक्षात आलं नाही का .. डॉक्टर म्हणाले त्यांना प्रेशर , टेन्शन येईल असं काही बोलू नका ..आपण दोघे त्यांच्या बरोबर असू तर त्यांना टेन्शन येणार नाही का ..मालकांना समजलं की ते इथे आल्याशिवाय रहाणार नाहीत. आता जिल्ह्याच्या ठिकाणी हलवा ..तिथून ते म्हणणार पुण्याला न्या .. त्यापेक्षा आजची रात्र इथेच काढू ..हे डॉक्टर सुध्दा मला हुशार वाटले ..उगाच रस्त्यात काही त्रास झाला तर आडनिड्या वाटेवर आपण काय करणार आहोत .दोन्ही बाजूंनी रिस्क आहे तर मग त्यातल्या त्यात सेफ काय आहे ते आपण बघुया .. आपण थांबू इथेच ‘
आम्ही डॉक्टरना इथेच थांबतो आहोत असं सांगितलं . आम्ही आबांना भेटू शकतो का असं विचारलं तर त्यांनी हरकत नाही असं सांगितलं .आबांना स्पेशल रूम दिली होती .तिथे आय सी यु ची वगैरे काही व्यवस्था नव्हती पण डॉक्टर चांगले होते महत्वाचं म्हणजे अनुभवी होते . आम्ही आबांच्या खोलीत आलो .त्यांना ऑक्सिजन लावलेला होता .खूप दमल्यासारखे वाटत होते . मी रघूचा हात घट्ट पकडला होता . आबांना त्या अवस्थेत पाहणं आमच्यासाठी खूप त्रासदायक होतं .आम्ही दोघेही त्यांच्या पलंगा जवळ जाऊन उभे राहिलो . एका बाजूला मी तर दुसऱ्या बाजूला रघू ! आबांच्या डोळ्याच्या कडेला पाणी जमलं ..मी हळुवारपणे ते टिपून घेतलं . आमची चाहूल त्यांना लागली होती पण ते डोळे मिटून पडून होते . रघू त्यांच्या पायाशी बसला . हलकेसे पाय दाबत हळुवारपणे म्हणाला ..
‘ थोरले मालक ..तुम्ही माझ्यासाठी सर्व काही आहात . तुमच्यामुळे मी आहे ..तुम्ही माझे माय बाप धनी देव सगळं तुम्हीच आहात .माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय ही गोष्ट मला सहन होणारी नाही . मला माफ करा . तुम्ही कसलंही टेन्शन , दडपण घेऊ नका .. बाकी सगळं विसरून जा ..तुम्ही फक्त लवकर बरे व्हा .तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी वाटते ना .. मी शब्द देतो तुम्हाला ..तुम्ही तिचा हात माझ्या हातात दिलात तर आणि तरच मी तिच्याशी लग्न करेन .. नाहीतर आयुष्यभर बीन लग्नाचा राहीन ..तुम्ही निश्चिंत रहा .. मी आताच गेलो असतो पण मालक येऊ द्या .. मी जाईन ..तोवर इथेच बाहेर उभा आहे ..येतो मी .. फक्त तुम्ही बरे व्हा ‘
रघू उठून बाहेर निघून गेला . आताच्या परिस्थितीत तो जे वागला ते अतिशय योग्य वाटत होतं .आमच्या दोघांच्या सुखासाठी आम्ही आबांचा बळी नाही देऊ शकत . मी आबांच्या उशाशी बसून राहिले . थोड्या वेळानी आबांनी डोळे उघडुन पाहिलं ..’ आबा काही हवं आहे का तुम्हाला ‘
त्यांनी नकारार्थी मान हलवली . मी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला .’ मी एवढाही वाईट नाहीये ..ताईसाहेब ‘
‘ आबा .. आता हे काहीच नको ..तुम्हाला त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही ..आता आधी तुम्ही छान बरे व्हा ..’
‘ तो कुठे आहे ..’
‘ आहे आबा ..बाहेर उभा आहे ..पण दादा आला की जाईल तो ..शब्दाचा पक्का आहे तो ‘
‘ बोलव त्याला ..’
मी रघू ला आत बोलवलं . मला वाटलं आबांना माझ्यासमोर त्याच्याशी बोलायला अवघड वाटेल म्हणून मी म्हणाले ‘ मी जरा घरी फोन करून येते ..’
मी फोन करण्यासाठी म्हणून हॉस्पिटलच्या रिसेप्शनवर आले .घरी फोन लावला .अजून दादा आणि माई पोचलेच नव्हते घरी . मालन होती .तिला सांगितलं दादा घरी आला की त्याला आणि माईला सगळं सांग फक्त रघू भेटल्याचं वगळून . इथे आल्यावर कळेलच पण येतानाच राग राग नको .माणूस चिडलेला असला की वागतानाचा तोल ढळतो त्याचा आणि मी म्हणेल तेच बरोबर अशी अहंकारी भूमिका होते .पाच दहा मिनिटं इथेच थांबून पुन्हा फोन करावा का असा विचार आला डोक्यात..पण तो विचार बाजूला सारून मी खोलीत आले.
आबा रघूशी काही बोलले असतील का .. काय सांगितलं असेल ? पुन्हा एकदा माझा नाद सोड असंच सांगितलं असेल का ? आबांसमोर मी रघूला काहीच विचारू शकत नव्हते .आबांनी विचारलं ..
‘ झाला का फोन ..’
‘ हो आबा .. पण अजून ते घरी पोचले नाहीत .. पोचतीलच थोड्या वेळात ..निरोप मिळाला की येतीलच ..तुम्ही काळजी करू नका ‘
ते शांतपणे डोळे मिटून घेत पडून राहिले . मी रघूकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं .त्याने काही नाही अशा अर्थाने मान हलवली . मी रघूला म्हणाले ‘ तू निघ आता .. तुला खूप रात्र होईल ..दादा , माई येतीलच ‘
‘ नाही मी थांबतो आहे ..’
मी आश्चर्याने त्याच्याकडे बघीतलं .तो काहीच बोलला नाही . आम्ही दोघेही शांत बसून राहिलो . अधून मधून डॉक्टर , सिस्टर येत राहिल्या .आबांची तब्येत स्टेबल होती ही जमेची बाजू !
एक तासानंतर रघू चहा घेऊन येतो म्हणून बाहेर गेला . माई आणि दादा आले पण त्यावेळी रघू तिथे नसल्यामुळे मोठा वाद टळला होता . दादा डॉक्टरांशी बोलायला गेला ..मी आणि माई आबांजवळ बसून होतो . ‘ काय गं .. काय होऊन बसलं हे ..त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्षच झालं जरा .. घरात त्रास ही काही कमी नव्हता ..’
माई ने डोळ्याला पदर लावला .आबांनी रडू नका असं खुणवलं .’ एकटीने कसं गं केलंस ..देव देतो बळ .. तसं बुध्दी ही देवो ‘ असं म्हणून माई ने हात जोडले . रघू चहा घेऊन आत आला आणि माई ला बघताच , दारातच थबकला .. तेव्हढ्यात डॉक्टर आणि रघू ही बाहेरून आले आणि खोलीत रघूला पहाताच दादा त्याच्या अंगावर धावून गेला . मी आणि माई त्याला आवरण्याचा प्रयत्न करत होतो . रघू बाहेर निघून गेला . दादा रागातच होता .. त्याला डॉक्टर नी बाहेर जायला सांगितलं .तो धुसफूसत बाहेर गेला . मला ही त्यांनी बाहेर बोलवलं .ते खूप चिडले ‘ मिस्टर हे हॉस्पीटल आहे तुमचं घर नाही .मी तुम्हाला आताच सांगितलं होतं त्यांना त्रास होईल , टेन्शन येईल असं कोणी वागू नका , बोलू नका तर तुम्ही त्यांच्यासमोरच असं वागताय .वडिलांच्या जिवापेक्षा काय महत्वाचं आहे तुम्हाला ..आणि ज्यांच्या अंगावर तुम्ही धावून गेलात ते होते म्हणूनच तुमचे वडील वाचलेत ..समजलं .. त्यांना सडेशन देतो आहे ..ते झोपेत असताना त्यांना घेऊन गेलात तर बरं होईल ..आणि हो ते आहेत ते पोलीस ऑफीसर आहेत ते बरोबर असतील तर बाकी काही लीगल कंपलीकेशंस येणार नाहीत .. अर्थात तुमचा निर्णय असेल ..पण जे काय ठरवायचं ते लवकर ठरवा ‘
आबांकडे बघून दादा खूपच हळवा झाला होता . मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला .. मला समजतंय तसं आयुष्यात पहिल्यांदा मी त्याला स्पर्श केला होता .स्पर्शाची एक भाषा असते ..जे शब्द ही सांगू शकत नाहीत ते स्पर्श सांगून जातो .आपलं म्हणणं अगदी थेट पोचतं . आताही तसंच झालं . मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसं तो लहान मुलासारखा रडायला लागला . मला हे दादाचं रूप खूपच नवीन होतं . मला त्याची दया आली . मी त्याला शांत होऊ दिलं मग सावकाश म्हणाले ‘ हे बघ दादा .. ही वेळ या नको त्या गोष्टी पहाण्याची नाही . मी आणि त्यानेही आबांना शब्द दिला आहे ..आम्ही आबांच्या शब्दाबाहेर नाही जाणार .. आता आपण फक्त आबांच्या तब्येतीला जपायला हवं .आबांना पुण्याला न्यायचं की जिल्ह्याला ..तुला काय वाटतं .’
दुसऱ्याच क्षणी दादा एकदम शांत झाला आणि म्हणाला ‘ पुण्याला निघायला हवं ..मी माईशी बोलतो .आणि त्याला सांग माझ्यासमोर यायचं नाही ..’
पुण्याला निघण्याची तयारी आम्ही केली . रघू पुन्हा खोलीत आलाच नाही . आबांना जीपमध्ये झोपवलं .. मी आणि माई त्यांच्याजवळ बसलो .आबांनी सगळीकडे नजर फिरवली आणि विचारलं ‘ तो कुठे आहे ..’ मी निरुत्तर होते .
माई सांगितलं ‘विश्वा ना ..हे काय समोर बसला आहे ना ..’
आबा मान हलवत म्हणाले ‘ रघुवीर ..’
माई आश्चर्याने आणि दादा रागाने बघायला लागला .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी