⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁 भाग एकवीस 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️
🍁 भाग एकवीस 🍁
आबांनी जेंव्हा रघुवीरचं नाव घेतलं तेंव्हा दादा चिडलाच होता . पण आबा एकदम शांत होते .. त्यांनी माईला उद्देशून सांगितलं ‘ रघुवीरला पण बरोबर घ्या ..मला तो बरोबर हवा आहे ..आणि हा विषय इथेच संपला आहे ‘ एवढं बोलताना पण त्यांना दम लागलेला पाहून दादाला चरफडत गप्प बसावं लागलं .तरी माईकडे पाहून तो गुरगुरलाच ‘ मी त्याच्याबरोबर गाडीत येणार नाही .. हवं तर मी बसने येतो ..तुम्ही ही जीप घेऊन जा ‘
‘ अरे .. त्याच्याकडे त्याची जीप आहे .. त्याचं तो येईल ..विश्वा एवढं टोकाचा राग काय कामाचा ..परिस्थितीनुसार बदलायला हवं माणसाने ‘
बाजूला उभा असणाऱ्या रघूला माईने सांगितलं ‘ तू ये तुझ्या जीपने ..आमच्या आगे मागेच रहा ..’
शेवटी सगळा त्रागा सोडून दादा निघाला . मला राहून राहून आश्चर्य वाटत होतं ते माईचं ! फक्त आबा म्हणाले रघूला येऊ दे की ती लगेच आमूलाग्र बदलली होती . जी माई रघू समोर आल्यावर डोळे पण उघडायला तयार नव्हती ती माई चिडलेल्या दादाला ठामपणे सांगत होती ..परिस्थितीनुसार बदलायला हवं ! ही एवढी लवचिकता कुठून येते ..एवढी एकरूपता कुठून येते ?आबांचा शब्द प्रमाण म्हणण्याची विनयशीलता ..आपल्या दृष्टीने हे कणाहिन वागणं झालं .पण तिला ते तसं अजिबात वाटत नाही . आबा चुकीचं वागुच शकणार नाहीत हा एवढा विश्वास येतोच कुठून ? तिचं शरीर वेगळं आहे म्हणून ती वेगळी पण तिचं स्वतः चं असं काही वेगळेपण नाहीच .पण त्यातच ती खुश आहे .हे समर्पण तिने सहजी कसलाही त्यागाबिगाचा आव न आणता स्वीकारलेलं आहे .आबांचा माणूस म्हणून तिने स्वीकार केला आहे आणि आपल्यापेक्षा त्यांना जास्त कळतं , अनुभव आहे हे मनापासून अगदी सहजतेने स्वीकारलं आहे .म्हणूनच त्यांचं नातं खूप सुंदर आहे .त्या दोघांनीही त्यांची कार्यक्षेत्र वाटून घेतली आहेत आणि त्यामधे डोळे झाकून ते एकमेकांवर विश्वास ठेवतात . आबांनी नाही का .. सोलापूरला सुहासच्या घरी माईनेच जायला हवं हा आग्रह धरला होता . ते एकमेकांचा आदर करतात म्हणूनच त्यांचं नातं सर्वांग सुंदर आहे .वहिनी ही दादाचं सगळं ऐकते पण त्यात समर्पण नाही भीती आहे आणि दादा वहिनीला बायको म्हणजे मालकीची वस्तू असं वागवतो .आपलं नातं कसं असेल ? मला जमेल असं निर्लेपतेने रघूवर विश्वास ठेवायला ..अहंकार सोडून वागायला . माई आणि आबांच नातं मुरलं आहे ..सहवासाने एकमेकांना गृहित न धरता त्यांच्या संसारात सगळ्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे ..प्रेम , विश्वास , आदर आणि आकर्षण !
आबांना आय सी यू मधे ठेवलं होतं . त्यामुळे एकावेळी एकच माणूस त्यांना भेटायला जाऊ शकत होता .हॉस्पीटल मधेही कोणीतरी एकच माणूस राहू शकत होता . आबांच्या रूम मधे सध्या माई गेली होती . बाहेर मी , रघू आणि दादा हे इतकं विचित्र होतं की आम्ही तिघेही अवघडलेल्या अवस्थेत होतो .शक्यतो रघू बाहेरच निघून जात असे . आताही तसंच झालं ..माई बाहेर आली आणि म्हणाली ‘ रघू कुठे आहे ..हे त्याला बोलवत आहेत .’
रघू तर बाहेर गेला होता .. बाहेर म्हणजे तो हॉस्पिटलच्या आजुबाजूलाच उभा असे ..तो माझ्याकडे बघत सुध्दा नसे . मला त्याचं खूप कौतुक वाटत असे ..सोलापूर ला माझी आणि त्याची नजरानजर झाली तेंव्हा मी त्याच्या डोळ्यात अख्ख्या जगाचं प्रेम पाहिलं होतं .प्रेमात संयम खूप महत्वाचा ..हे त्याच्या संयत वागण्यातून जाणवतच होतं आणि मी अजूनच त्याच्या प्रेमात पडत होते .आता माईने रघूला आबांनी बोलवलं म्हणून सांगितल्यावर पंचाईत झाली . मी रघूला बोलावलेलं दादाला चालणारच नाही ..माई बाहेर जाणं ही त्याला पटणारं नव्हतं आणि स्वतः होऊन रघूला बोलणं हे तर त्याला अजिबातच आवडणार नाही . माईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून तो तसाच बसून राहिला .
माईच्या ते लक्षात आलं तसं म्हणाली ‘ ठीक आहे .. तू जा त्यांच्याकडे .. काय म्हणतायत ते बघ ..’
‘ काही नको .. त्यांना कुठे माझ्याशी बोलायचं आहे .आता त्यांना त्या रघ्याचा का एवढा पुळका आला आहे समजत नाही ..त्याला बघीतलं तरी माझे हात शिवशिवतात ..’ तो धुसफूसतच होता .
माई त्याच्याजवळ बसत शांतपणे म्हणाली ‘ विश्वा .. आपलं माणूस आपल्याजवळ हवं .. ते असतील तर राग , लोभ , प्रेम , तिरस्कार , अहंकार या भावनांना अर्थ आहे . सध्या मला फक्त यांची तब्येत महत्वाची वाटते बाकी काहीच नाही .अगदी मला कोणी सांगितलं तुझा जीव दे त्यांना बरं वाटेल तर तो ही मी देईन ..त्यामुळे हे शेवटचं सांगते त्यांना दुखवायचं नाही ..ते म्हणतील तसंच होईल ..त्यात मला पण , परंतू नको आहे .एक तर त्यांच्या खोलीत तू जा नाहीतर रघूला बोलावून आण ‘
दादा दोन मिनिटं विचार करत बसला . मधेच उठून आबांच्या खोलीत गेला . तो आत गेला तसं माई मला म्हणाली ‘ जा गं .. लवकर बोलावून आण त्याला . यांच्या काय डोक्यात आहे , काहीच समजत नाही . इतकं विचारलं तरी मलाही सांगत नाहीत ‘
त्या मलाही मधलं दुखरेपण जाणवलंच मला .पण माई ने ते किती सफाईदारपणे झाकलं .मी विचारातच गेटच्या बाहेर आले ..तर समोरच रघू उभा होता . मला पहाताच तो धावतच आला ..
‘ तू का आली आहेस बाहेर .. काय हवं आहे ‘
‘ आबा तुला बोलवत आहेत ..’
‘ चल ..’
‘ रघू..’
‘ हं..’
‘ आबा तुझ्याशी काय बोलले ..’
‘ विशेष काही नाही .. योग्य वेळ आली की सांगेन ..’
रागच आला मला . माईला आठवून तो राग गिळून टाकला .आम्ही दोघं आत पोचलो तरी दादा अजून बाहेर आला नव्हता . जीव भांड्यात पडला . रघू दूरवर उभा राहिला . मी आणि माई दादाची वाट पहात होतो . दादा बाहेर आला तो खूप खुशीत वाटत होता . माई ने विचारलं ..
‘ रघू आला आहे .. जाऊ दे ना त्याला आत ..’
दादाने होकारार्थी मान हलवली तसं रघू आत निघून गेला . दादा मला म्हणाला ‘ चल आपल्याला निघायला हवं ..’
‘ दादा .. इथे माईला एकटीला सोडून आपण जायचं ..’
‘ जास्त शहाणपणा करू नकोस ..आबांनीच सांगितलं आहे . माई ..आबांनी मला मनू ला घेऊन जायला सांगितलं आहे . मी लगेच बबन आणि मालनला पाठवून देतो तुझ्यासोबत . आबा म्हणाले , लग्नाची तयारी जोरदार करा ..मी लवकरच बरा होऊन येतोय .माई .. तू काही काळजी करू नकोस ..आबांची इच्छा शक्ती एवढी जबरदस्त आहे ना की ते लवकरच बरे होतील .मी बबनला जीप घेऊनच पाठवतो ..तुम्ही तीन चार दिवसांतच घरी याल ‘
मला धक्काच बसला ..म्हणजे एवढा वेळ रघूशी जे चांगुलपणाने वागत होते ते नाटक होतं . रघूला बरोबर घ्या असं आबांनी सांगितल्यामुळे माझ्या आशा पल्लवीत झाल्या होत्या .पण आता तर सगळं वेगळंच घडत होतं .आबांनी सांगितलंय म्हणजे माई वेगळं काही म्हणणारच नाही हे माहिती होतंच .
रघू बाहेर आला ..तो खूप शांत वाटत होता . त्याच्या चेहेऱ्यावरून कसलाही अंदाज बांधता येत नव्हता .तो माईला म्हणाला ‘ माई साहेब मी तुमच्याजवळ थांबतो आहे ..बबन आला की मी उद्या सकाळी सोलापूरला जातोय .’
आमच्याकडे न बघता रघू बाहेर निघून गेला .मला खूप वाईट वाटलं ..डोळ्यातून पाणी यायला लागलं . म्हणजे आबांनी त्याला एक गड्याचा मुलगा म्हणूनच थांबायला सांगितलं . जसं बबन येणार होता तसं ..फक्त माईला सोबत ! आपल्या तुकड्यांवर जगणारी माणसं ,आपल्याला हवं तेंव्हा हवं तसं त्यांच्याशी वागून त्यांचा अपमान केला तरी तोंडातून ब्र ही काढणार नाहीत . आता मला रघूचा ही खूप राग आला . एवढं कसं एखादं माणूस लेचंपेचं असू शकतं .पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत होती . रघू आधी जसा वाटला तसाच आताही वाटला ..लाचार ! ही एकमेव संधी होती आम्हाला एकत्र येण्याची पण रघूने ती वागण्याने घालवली होती . मी निमुटपणे दादा बरोबर निघाले . डोळ्यात पाणी भरलं होतं ..मधेच दादा ला थांबवून मी आबांना भेटून येते म्हणून आबांच्या खोलीत गेले .
आबांच्या हाताला सलाईनच्या सुया होत्या . चेहेरा त्रासलेला वाटत होता ..पण शारीरिक त्रासलेपण असावं . ऑक्सिजन लावलेला होता .माझ्या डोळ्यात पाणी होतं यावेळी ते अपेक्षाभंगाचं होतं .मी त्यांच्या हातावर हळुवारपणाने हात फिरवला .
त्यांनी सावकाश डोळे उघडले ..मी प्रत्यक्ष त्यांच्याशी काहीच बोलत नव्हते ..पण मनातून खूप प्रश्न विचारत होते .’ का ..का वागलात आबा असं .. काहीही असलं तरी तुमच्या जिवापेक्षा मला जास्त काहीच महत्वाचं नाही . माझं अवघं आयुष्य तुमच्यावर ओवाळून टाकलं आहे मी ..पण आता मी खुश रहाण्याची अपेक्षा माझ्याकडुन तुम्ही कधीच करू नका ..शरीर जीवंत असून मेलेलं मन घेऊन मी जगत रहाणार ..’
माझ्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या हातावर पडलं .कितीही आवरलं तरी आवरता नाहीच आलं .मी उठले ..त्यांच्याशी बोलण्यासारखं काही राहिलंच नव्हतं .आमच्या नात्यात फक्त नात्याची अपरिहार्यता आणि औपाचारिकता राहिली होती . त्याच भावनेने मी म्हणाले ‘ आम्ही निघतोय .. काळजी घ्या ‘
त्यांनी डोळे मिटून घेतले . मी निघाले ..दाराजवळ गेले असताना त्यांनी आवाज दिला ‘ ताईसाहेब ..’
मी वळून पाहिलं ..त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं .की मला भास होतोय ..ते पाणीही फसवंच असेल त्यांच्या वागण्यासारखं कदाचित ! त्यांनी हात वर करून मला जवळ बोलावलं .. इच्छा नसतानाही मी जवळ गेले ..
माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले ‘ तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ..सुखी रहा ‘ आता मात्र मी स्वतः ला आवरूच शकले नाही . हुंदका आला आणि मी धावतच बाहेर आले . माईच्या गळ्यात पडून कितीतरी वेळ दाबून धरलेलं रडू रडत होते .हॉस्पीटल आहे याचं भान ठेवून आणि ही सगळी आपली म्हणणारी माणसं आपली नाहीतच याची पुन्हा तीच नव्याने झालेली जाणीव ठेवून मी रडून घेतलं .
दादा आणि मी निघालो .मी आता ठरवलं होतं रघूला विसरून जायचं ..कितीही त्रास झाला तरी .सुहास म्हणाला तसं ..प्रेम काय होत राहील . ते प्रेम होईल याची वाट पहात आयुष्य काढायचं .बाकी सगळं व्यवहारानुसार होत राहील ..फक्त प्रेम होईल की नाही ते काळच ठरवेल !गाडी कोपऱ्यावरून वळताना रघू दिसला ..त्याला पहाताच मी मान वळवली . तो माझ्याच कडे पहातोय हे लक्षात येत असूनही मी अट्टाहासाने दुसरीकडे बघत राहिले .ज्या रस्त्याला जायचंच नाही तिकडे का वळा ? तरी आरशातून तो दिसत राहिला ..
दूर दूर जाताना !
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी