फिटेअंधाराचेजाळे …! ⚛️* 🍁भाग बावीस🍁
फिटेअंधाराचेजाळे …! ⚛️*
🍁भाग बावीस🍁
घरी येऊन ही दोन दिवस झाले होते . कशातच मन लागत नव्हतं .मी कोणाशीच बोलत नव्हते .माझ्या खोलीत बसून किंवा पडून रहात होते . वहिनी ने माझ्याशी खूप बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तिच्याशी ही बोलले नाही . ती माई ला फोन करून काय तयारी करायची काय नाही हे विचारून त्याप्रमाणे तयारी करत होती .तिने तिच्या भावाकडून सोलापूर पोलीस स्टेशनचा फोन नंबर घेतला होता ,तो मला देण्याचा प्रयत्न केला .पण आता मी या सगळ्याच्या पलीकडे गेले होते ..मला आता हा सगळा ताण नको होता . विचार करून करून आधीच डोकं फुटायची वेळ आली होती . लग्न आम्हा दोघांना करायचं होतं ..एकत्र दोघांना रहायचं होतं ..मग फक्त माझी एकटीची इच्छा असून कसं चालेल ? रघूने ही ती इच्छा दाखवायला हवी होती ना .. जाऊ दे .. हा विषय नकोच !
दादाने मात्र लग्नाची तयारी जोरात सुरू केली होती . रघूचं प्रेम ही कवीकल्पना होती तर सुहासशी लग्न हे माझं वास्तव होतं . आता मी कितीही त्रागा केला तरी ती वस्तुस्थिती बदलणार नव्हतीच .आज रघूला नाहीच पण सुहासला फोन करायचा असं मी ठरवलं . मला इथे येऊन महिना झाला होता ..अजून पंधरा दिवस कॉलेज ला सुटी असणार होती पण त्यानंतर मला जायलाच हवं . त्यासंदर्भातच सुहासशी बोलायचं असं मी ठरवलं . मी विचारात हरवलेली असे ..आता ही असाच काही बाही विचार करतच बसले होते .मालन आत आली .. ती ही माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिच्याशी ही बोललेच नव्हते .ती म्हणाली ..
‘ ताय .. बांगडीचं माप द्या .. चुडा भरायचा हाय न्हवं ..माप लागंल कासाराला..’
मी काहीही न बोलता बांगडी काढून दिली .तिने ती घेतली पण काहीच न बोलता समोर उभी राहिली . माझा अंदाज घेत असावी .
‘ ताय .. द्येयची का बांगडी ‘
‘ हो ..उगाच नाही ते प्रश्न विचारून माझं डोकं खाऊ नकोस .. जा तू ‘
‘ न्हाई .. जाते मी .. पन पुन्यांदा इचार करा .लगीन एकदाच व्हतंय .’
‘ हे तू मला नको सांगुस शहाणपण .. मला कळतं .मग काय करू एकटीच पळून जाऊ .. एकटीच राहू ..त्याला तर माझी काही किंमत नाही ..अशा माणसासाठी मी माझं आयुष्य उधळून लावू ‘
‘ आयुष्य तर तसं बी उदळूनच लावायला हैसा तुमी .. असं मना इरुद लगीन करून तुमी सुखी रहानार हैसा का .. नगा अविचार करू ..’
‘ मग काय करू .. काय करू सांग ना ..चुकीच्या माणसावर प्रेम केलं त्याची शिक्षा भोगते आहे मी . आणि ही शिक्षा आयुष्यभर भोगावी लागणार आहे मला ‘
‘ मी काय म्हंते एकडाव रघुदाला फोन करून बोला .. त्येंचं काय म्हंनन हाय ते तरी ऐका ‘
तितक्यात वहिनीही माझ्यासाठी चहा घेऊन आली . मालनने तिचं म्हणणं वहिनीला ही सांगितलं .त्यावर वहिनी म्हणाली ‘ मी काय म्हणते .. मी करू का फोन त्यांना .. मी विचारते त्यांची काय भूमिका आहे . त्यांनी यावर काय विचार केला आहे .तुम्ही बोलूच नका ..मी बोलते .. कसं आहे ना एक शेवटचा प्रयत्न करून बघू ..नाहीतर जे होईल ते पहात बसण्याशिवाय हातात दुसरं काय आहे ?’
वहिनी माझ्याकडे बघत होती . मी गप्प बसलेली बघून तोच माझा होकार समजुन वहिनी आणि मालन निघून गेल्या . मालन दाराजवळ उभी राहून दादा येत नाही ना ते बघणार होती . मला खूप वाईट वाटत होतं .प्रेमात खूप ताकद असते म्हणतात पण त्याच प्रेमाने मला पांगळं बनवलं होतं .स्वाभिमान सोडून शेवटचा प्रयत्न करायला मी तयार झाले होते . इतकी हतबलता मला कधी वाटली नव्हती . का एखादं माणूस इतकं महत्वाचं होतं आयुष्यात की आपण स्वाभिमान सोडून देतो .इतकी लाचारी ..आपण रघूला लाचार म्हणतो पण खरं तर मीच खरी लाचार आहे त्याच्या प्रेमात .प्रेमाने डोळसपणा द्यावा ना की प्रेमात आंधळं व्हावं . का झालीय मी अशी .माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं .खरं तर मला खूप रडावंस वाटत होतं .पण मी रडायचं नाहीच हे ठरवलेलं असल्याने त्या निकराने बसून राहिले .
वहिनी आणि मालन आल्या .वहिनी म्हणाली ‘ फोन केला तिथे पण रघू नाही भेटले ..गावाला गेलेत असं सांगितलं आणि त्यांनी महिनाभराची रजा टाकल्याचं ही समजलं .. मुंबईला वडिलांकडे गेले आहेत आणि ..’
वहिनी गप्प बसली .मी तिच्याकडे पाहिलं तसं तिने माझी नजर चुकवली .मालन ही खाली मन घालून उभी होती . दोघींचे चेहेरे आता मी नीट पाहिले दोघीही बावरलेल्या वाटत होत्या .
‘ आणि काय वहिनी .. गप्प का बसलीस ..आयुष्यात एवढं काही घडलं आहे की अजून यापेक्षा काही वाईट होईल असं वाटत नाही .. सांग तू ..जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे माझी ‘
वहिनी कदाचित शब्दांची जुळवणी करत असावी .’ मला वाटतं ..तुम्ही सुहासरावांशी चांगल्या मनाने लग्नाला तयार व्हा ..’
‘ आतपर्यंत तर मी कसं आयुष्य उधळून लावलं नाही पाहिजे ..एक शेवटचा प्रयत्न केला पाहिजे म्हणत होत्या ना तुम्ही दोघी ..मग अचानक काय झालं ..’
वहिनी हळूच पुटपुटली ‘ ते लग्न करण्यासाठी गेले आहेत मुंबईला ‘
दुःख , संताप , वेदना या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी सुन्न होऊन बसले . मालन आणि वहिनी हळूच निघून गेल्या . काहीवेळा सांत्वनाच्या पलीकडे परिस्थिती असते ..माणूस मेलं तर ‘ तुमच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत ‘ असं म्हणता तरी येतं .पण काही दुःख अशी असतात की खूपच खाजगी असतात ..त्याचा त्रास न कोणाला समजतो न कोणाला सांगता येतो .प्रत्येक वेळी माणूस मेल्यानेच दुःख होतं असं नाही ..त्याच्या प्रतारणेनेही ते होतं . त्याची तीव्रता खूप जास्त काटेरी असते . रघूवर मी नको इतका विश्वास ठेवला का , त्याला किंमत नसताना नको इतका जीव लावला का ? आपण करत असलेल्या प्रेमाची कदर समोरच्या माणसाला नसेल तर ते प्रेम एकतर्फीच म्हणावं लागेल .एकतर्फी प्रेम हे दुधारी शस्त्र .. काहीही झालं तरी जखम ही होणारच ..आत्मघातकी ! मी सावरणार .. मी आयुष्य जगणार ..लागेल वेळ पण प्रयत्न करणार ! हार नाही मानणार ..माझ्या आयुष्याचं नियंत्रण मी दुसऱ्या माणसाच्या हातात नाही देणार .संध्याकाळ पर्यंत तशीच बसून होते . आता सावरलंच पाहिजे .. मी उठले .. हात पाय तोंड धुतलं .साडी बदलली .चेहऱ्यावर पावडर टिकली लावली . सुहासच्या आईंनी दिलेला आरसा बाहेर काढला .त्यात पाहून हसले ..एक डोळ्यात पाणी आलंच ..डोळे सुध्दा फितूर होतात कधी ! त्या कडे दुर्लक्ष करून हसतच राहिले . हसण्याची ही सवय करायला हवी आता आणि त्याचा ही सराव हवा .. सरावाशिवाय हसणं अवघड होईल कदाचित !
मी खोलीच्या बाहेर आले .माझ्याकडे बघून मी हसते आहे आणि गरजेपेक्षा जास्तच बडबड करते आहे हे पाहून सगळ्यांनाच नवल वाटत असावं पण मला कोणी काही बोललं नाही . मी दादाला म्हणाले ‘ सुहास च्या घरी फोन लावून दे ना .. सुहासशी बोलते .. नाही म्हणजे मीच करू शकते पण लग्न पाच सहा दिवसांवर आलेलं असताना मी असा फोन करणं बरं दिसणार नाही . तू आधी त्याच्या वडिलांशी बोल मग मी बोलते ‘
माझ्यातला बदल पाहून दादा खूप खुश झाला .त्याने फोन लावला . तो फोनवर हो का .. बरं बरं .. अच्छा .. असं बोलत राहिला मला म्हणाला ‘ घे फोन .. सुहासराव आणि त्यांचे आई वडील आबांना भेटायला गेले आहेत पुण्याला ..शरण्याताई म्हणजे त्यांची बहीण आहे .. बोल ‘
रिसिव्हर माझ्या हातात देऊन तो निघून गेला ..
‘ हॅलो ..’
‘ हॅलो वहिनी .. मी शरण्या म्हणजे शरू .. तू मला ओळखतेस .. दादाने आणलं होतं ना तुला .. तुझे उपकार मी आयुष्यभर फेडू शकणार नाही .तुझ्यामुळे माझं माहेर मला परत मिळालं आहे ..वहिनी ..तू माझ्यासाठी देव आहेस ..’
‘ एक मिनिट ..मला काहीच समजत नाहीये .. हो आम्ही आलो होतो पण तुमच्या घरी न येता बाहेरूनच परत फिरलो होतो ..मग तुम्हाला कसं कळलं ..आणि उपकार वगैरे नका हो बोलू ..’
‘ वहिनी .. एकतर तू मला अहोजहो नको करू ..तू मला शरूच म्हण . सुहासदादा म्हणतो तसं .दादाने सांगितलं मला सगळं ..तूच त्याला सांगितलंस ना माझ्या घरी जाऊन ये ..प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कुठलाही निष्कर्ष काढू नकोस . दादा स्वतः मला भेटायला आला होता . शरद बँकेच्या परीक्षा देतच होते ..त्यांना चांगल्या बँकेत ऑफीसर म्हणून नोकरी लागली आहे आणि आम्ही आता पुण्याला रहायला जाणार आहोत हे सांगितल्यावर खूप खुश झाला .पुण्यासारख्या शहरात क्वार्टर मिळणार ..पगारही चांगला त्यामुळे त्याचा विरोध मावळला . माझं प्रेम तर होतंच शरदवर मी खुश ही होते .पण सुख सुध्दा पैशात मोजलं की नाही कळत.. मोठ्या लोकांसाठी या व्यवहार्य गोष्टी पण खूप महत्त्वाच्या होत्या . जे चुकीचं नाही म्हणणार मी .. सगळं विसरून दादाने मला घरी आणलं . तुमच्या लग्नापर्यंत मी इथेच रहाणार आहे . तुला न पहाता ही तुझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं .. तुझा फोटो दाखवला दादाने .. खूप खूप सुंदर आहेस ..अगदी नूतन सारखी ..’
माझ्या घशात आवंढा आला . काय बोलू ते काहीच सुचेनासं झालं .शब्द घशात आडकले .
‘ वहिनी .. आहेस ना .. भेटूच लवकर ..’
‘ अं .. हो .. हो ..भेटू ..’
मी फोन ठेवून दिला . ज्या माणसावर स्वतः पेक्षा जास्त विश्वास ठेवला त्याने विश्वासघात केला आणि ज्याच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवली नव्हती तो माझ्या म्हणण्यानुसार वागत होता . सुहास ला ओळखण्यात आपण चूक केली का ..कदाचित रघूला ओळखण्यात चूक झाली .
रात्री उशिरा माईचा फोन आला ..उद्या आबांना घेऊन येणारं म्हणत होती . लेकीच्या ग्रहमकाला जायचंच त्यांनी इतकं मनावर घेतलं होतं म्हणे .. आता बरीच बरी तब्येत आहे त्यामुळे ते येणार आहेत . ते आल्यावर त्यांच्यासमोर खुश रहायचं ठरवलं मी .. आता रघूचा विचार नाही करायचा . रघूच्या वागण्याची शिक्षा सुहासला का द्यावी !
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी