⚛️फिटे अंधाराचे जाळे …!⚛️ 🍁 अंतिम भाग चोवीस 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे …!⚛️
🍁 अंतिम भाग चोवीस 🍁
वहिनी घाईतच येऊन म्हणाली ‘ चला चला वंस ..पाहुणे आले ..त्यांचं चहा पाणी ही झालं.. आता आधी कार्यक्रम आणि मग जेवण ..चला ..आधी थांबा हा गजरा माळा मोगऱ्याचा .. काय सुंदर दिसताय ..’
‘ वहिनी .. एक मिनिट ..तू एवढी का खुश आहेस ..कालपर्यंत काही तरी मार्ग निघेल म्हणणारी तू ..आज एकदम अशी कशी बदलली .मला वाटलं होतं माझ्या दुःखाची जाणीव असेल तुला ..पण नाही ..तुला तुझ्याच दुःखाची जाणीव नाही तर माझ्या कुठून असणार ..’
वहिनी एकदम गंभीर झाली . कदाचीत मी तिची दुखरी नस दाबली होती .मलाच वाईट वाटलं .हे असं बोलून मला काय मिळालं .मी तिचं दुःख कमी तर करू शकत नाही उलट असं बोलून तिला दुखावलं मात्र ! तिने आपलं दुःख दूर करण्याचा प्रयत्न तरी केला ..आपण ..आपण काय केलं .मला खूप वाईट वाटलं .माणसाने बोलताना जपून बोललं पाहिजे हे पुन्हा एकदा जुनंच नव्याने लक्षात आलं . मी तिच्या खांद्यावर हात ठेवला ..
‘ सॉरी वहिनी ..मला तसं म्हणायचं नव्हतं ..खरंच सॉरी ..’
‘ नाही वंस .. सॉरी कशासाठी म्हणताय ..तुम्ही जे बोललात ते खरंच बोललात .पण एक सांगू ..प्रत्येकजण च तुमच्या सारखा खंबीर असतोच असं नाही . मी एक अतिशय सर्वसामान्य बाई आहे . जिच्यासाठी नवरा हेच तिचं सर्वस्व आहे .आज ना उद्या तो सुधारेल ही आशा हे तिच्या जीवनाचं सूत्र आहे . मी त्यांच्याशी भांडून मला काहीही मिळणार नाही उलट झाला तर विपरीत परिणामच होईल . मी तुमच्या सारखी कमवत नाही म्हणून नाही पण बंड करण्याचा माझा पिंडच नाही . लहानपणापासून सतत कोणाचं तरी ऐकत आले ..भाऊ , वडील , आई जे सांगतील ते योग्यच सांगतील हा विश्वास ..त्यामुळे कसलाही तिढा नाही .सरळसोट आयुष्य माझं ..आणि तुम्हाला वाटतंय तितकं ही माझं आयुष्य वाईट नाही . हे माझ्यावर खूप प्रेम करतात . एकांतात प्रेमाच्या वर्षावात ते मला भिजवून टाकतात .. एवढं सुख देतात की बाकीचा त्रास सहन करण्याची ताकद मिळते मला .तुम्ही बंड पुकारून तुम्हाला हवं ते मिळवता मी सहन करून मिळवते . आज ना उद्या हे सगळं सोडून देतील हा विश्वास आहे मला . वेळ लागेल पण होणार हे नक्की . तुम्हाला सुध्दा तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी वेळ द्यावाच लागला ..संघर्ष आहेत फक्त त्याची जातकुळी वेगळी ! कोणी शांतीने ,कोणी त्राग्याने , कोणी असहकाराने तर कोणी सहनशीलतेच्या मार्गाने संघर्ष करतो . मी तो मार्ग निवडला आहे .. स्वतः ची कुवत ओळखून संघर्ष केला की माणसाला यश नक्की मिळतं ..असो ..मी बोलत काय बसले आहे ..चला लवकर ‘
वहिनीचं बोलणं ऐकून मी अचंभित झाले होते . खरं आहे ..तिचा संघर्ष .. त्याचा मार्ग मी कोण ठरवणारी . आता सुध्दा मी तिला तिरकसपणे बोलले तिने किती सहजतेने ते बाजूला सारलं . ही ताकद तिला यातूनच मिळत असेल का ? मी तिच्या पाया पडले ..’ अहो .. उठा .. काहीही काय .. चला बरं बाहेर ..नाहीतर सासूबाई ओरडतील मला .. गेली ती तिकडंच बसली म्हणून ..चला ..चला ‘
काही क्षणांपुरतं का होईना पण मी बाकी सगळं विसरले होते .पुन्हा ते सगळं आठवून कपाळावर आठी आली .मी तिच्याबरोबर बाहेर आले . मी कोणाकडेही न बघता खाली मान घालून बसले . माई जवळ येत म्हणाली ..’ चल ..मोठ्या लोकांच्या पाया पड ‘
यंत्रवत उठले आणि आता सगळीकडे नजर फिरवली .. मला आश्चर्याचा धक्काच बसला .. विठुकाका आणि मधू ही तिथे होते . हे दोघे कसे .. आणि चेहेऱ्यावर हसू ! मी थबकले .. तसं आबा म्हणाले ‘ ताईसाहेब ..नमस्कार करा सगळ्यांना ‘
मी सुहासच्या आई , बाबांना , आबांना , माईला , दादाला नमस्कार केला . इच्छा असून ही विठुकाकाला नमस्कार केला नाही . तसं आबा म्हणाले ‘ तुमच्या सासरे बुवांना ही करा की नमस्कार ‘
ते काय बोलतायत न समजून मी चुळबुळत उभी राहिले तसं त्यांनी मला विठु काकाजवळ नेलं आणि म्हणाले ‘ हे आहेत तुमचे सासरे बुवा .. करा नमस्कार ‘
मी नमस्कार केला .. सगळे हसत होते ..मी मात्र लाल झाले होते . राग , लाज , वेदना , सुख अशा सगळ्या भावना दाटून आल्या होत्या . हे कधी झालं आणि मला कोणीच काहीच का नाही सांगितलं .एवढं मोठा निर्णय असं गमतीत कसं घेऊ शकतात .मी जर माझ्या जिवाचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर .. कधी कधी एखादी गोष्ट मिळावी म्हणून आपण इतका आटापिटा करतो , सगळी शक्ती खर्च करतो मग ती गोष्ट साध्य झाली तोपर्यंत आपण इतके थकलेले असतो की त्याचा आनंद ही घेता येत नाही . असंच माझं काहीस झालं होतं . कालपर्यंत सतत डोक्यात रघूचाचं विषय होता पण आज इतक्या अनपेक्षितपणे तो माझा होणार हे कळलं तेव्हा ते पचनी पडायला ही मला वेळ लागला . गुरुजी म्हणाले ..
नवरदेवाला बोलवा .. बाजूच्या खोलीतून रघू आणि सत्या आले . सत्या .. सत्या कधी आला .. मला कसं कळलं नाही. रघू चौरंगावर जाऊन बसला . विधी सुरू झाले .. माई ने रघूला पाय धुण्यासाठी समोर घंगाळ ठेवले तेंव्हा मात्र रघू उठून उभा राहिला ‘ माफ करा गुरुजी .. हे मी काही करून घेणार नाही .. हे माझे विठ्ठल रखुमाई आहेत .. मी त्यांचा भक्त ..पूजा भक्ताने देवाची करायची ..’
तो माई आणि आबांच्या पाया पडला . माझं सुहास कडे लक्ष गेलं तो शांतपणे सगळे विधी पहात होता . हा एवढा शांत कसा .. माझं कशातच लक्ष लागत नव्हतं . हे सगळं काय चाललं आहे ? हे नक्की माझ्याच आयुष्यात घडतंय का ? की मी स्वप्न पहाते आहे ? ‘ गुरुजींनी नवऱ्यामुलीने यावं ..’ असं सांगितलं तशी दचकलेच . माझ्या मनासारखं होत आहे ठीक आहे , नाही चांगलंच आहे .पण अशा संभ्रमित अवस्थेत मी माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात नाही करणार . मला सगळं समजलंच पाहिजे . दादा सुध्दा एवढा शांत कसा .एखादी जादूची कांडी फिरावल्यागत गोष्टी कशा नॉर्मल होत आहेत . याला काहीतरी कारण असणार आणि ते मला समजलंच पाहिजे .मी उठत नाही हे पाहून माई म्हणाली
‘ मनू ..येतेस ना ‘
मी ठामपणे म्हणाले ‘ हे सगळं कसं आणि का घडलं हे समजल्याशिवाय मी येणार नाही ‘
आबा म्हणाले ‘ तुला रघुवीरशी लग्न करायचं होतं ते आता होतंय मग बाकी सगळ्याचा आता तू कशाला विचार करतेस ‘
‘ आबा .. प्लीज मला सांगा .. माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात करताना मला तुमचे सगळ्यांचेच मनापासून आशिर्वाद हवे आहेत आणि म्हणूनच आम्ही इतके दिवस थांबलो होतो . तुम्ही मनापासून परवानगी देताय ना ‘
‘ हा काय प्रश्न झाला ..आम्हीच सगळी लग्नाची तयारी केली आहे म्हणजे आमची परवानगी आहेच ना ..नाहीतर मी रघुला इथं येऊ दिलं असतं का ..’ दादा म्हणाला .
काय बोलावं ते न सुचून मी गप्प बसले . मी सुहास कडे पाहिलं .तो ही माझ्याकडेच पहात होता . आमची नजरानजर झाली .माझ्या डोळ्यातला प्रश्न त्याने वाचला .. तसं तो म्हणाला ‘ हे बघ ..मी काही तुला पहिल्यापासून ओळखत नव्हतो .तू मला आवडली होतीस पण माझं तुझ्यावर प्रेम बीम नव्हतं .पण शरूच्या लग्नामुळे मी ताठर झालो होतो .तुझ्याच सांगण्यावरून मी शरू कडे गेलो होतो ..ती सुखात आहे याची खात्री पटली होती . पण हे एकमेव कारण नाही . आबासाहेबांनी मला बोलवून घेतलं होतं पुण्याला .त्यांनी जेंव्हा विनंती केली तेंव्हा मी निर्णय घेतला ‘
‘ पण आबांनी असं का केलं आणि जर त्यांचा निर्णय झाला होता तर मला का नाही सांगितलं ..’
दादा म्हणाला मी सांगतो ‘ त्यांना माझी भीती होती . पण मी त्यांना आणायला गेलो तेंव्हा डॉक्टरांची भेट झाली होती . ते म्हणाले फक्त तीस टक्केच त्यांचं हृदय काम करत आहे .त्यांना प्रेशर येईल असं काहीच करू नका . त्यामुळे आबांनी जेंव्हा तुझ्या आणि रघूच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला .. माझी शेवटची इच्छा समज म्हणाले तेंव्हा मात्र सगळं विसरून या लग्नाला तयार झालो . आबांसाठी मी माझा जीव पण देईल ..ही गोष्ट त्यापुढे फार मोठी नव्हती ..’
आबा म्हणाले ‘ रघूमुळे माझा जीव वाचला ..त्यादिवशी वेळेत उपचार मिळाले नसते तर आज हे सगळं बघायला मी नसतो .आणि त्याहीपेक्षा त्यावेळी तो जे बोलला त्याने मला हळवं केलं .तुमच्यापेक्षा मला जास्त काहीही नाही म्हणाला .तुम्ही म्हणत असाल तर कधीच लग्न करणार नाही म्हणाला . तेंव्हाच मी त्याला सांगितलं होतं .. सत्याचा दादाला फोन झाला तेंव्हा तुझ्या लग्नाबद्दल त्यालाही सांगितलं त्यामुळे तो ही येवू शकला आणि बाकी सगळं कसं झालं असेल त्याचा आता तुम्हाला अंदाज आलाच असेल ..आता चला उठा ..उशीर करू नका ..उद्या सकाळी लवकरचा मुहूर्त आहे .मी तुम्हाला सांगितलं होतं ना ..सगळं तुमच्या मनाप्रमाणे होईल . वडिलांचा आशिर्वाद कधीच खोटा होत नसतो ..आपल्या लेकीसाठी त्याचं हृदय धडधडत असतं . खरं हृदय फक्त तीस टक्के काम करत असलं तरी लेकीसाठी त्यात कायमच शंभर टक्के प्रेम , आशिर्वाद असतात . माझी लेक सुखात असेल ना .. मी केलं ते बरोबर केलं ना असे प्रश्न ठेवून मला मरायचं नाही म्हणून हा खटाटोप ..’
मी आबांच्या तोंडावर हात ठेवला ‘ नको ना आबा .. मरणाची भाषा नको ..’
सगळे विधी अगदी एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात हसू असे पार पडले .रात्री झोप तर लागलीच नाही .मी फक्त माई ,सत्या आणि आबांजवळ बसून होते . त्यांच्या सहवासाचे सुख क्षण साठवून ठेवत होते .
लग्न सोहोळा पार पडला . पाठवणीच्या वेळी आबा , माई, सत्या खूपच हळवे झाले . दादा ही खूप हळवा झाला .. मी त्याच्या गळ्यात पडत म्हणाले ‘ दादा .. काळजी नको रे करू माझी ..’
भरल्या गळ्याने म्हणाला ‘ रघ्या .. माझ्या बहिणीला नीट सुखात ठेव नाहीतर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव ‘
सत्याच्या गळ्यात पडल्यावर आम्हा दोघांनाही रडू आवरणं खूपच अवघड होतं .माझे डोळे पुसत तो म्हणाला ‘ वेडाबाई .. आता कशाला रडायचं .. आता तर तुझ्या सगळं मनासारखं झालं आहे ना .. रघू ला नाही सांगणार सांभाळ म्हणून ..दोघेही एकमेकांना सांभाळा ..’
मी सुहासचे ही आभार मानले .तो म्हणाला ‘ रघुवीर ने त्याचं म्हणणं खरं केलं ..तुम्हीच तिचा हात माझ्या हातात द्याल म्हणाला होता ..रघुवीर तुला बायको दिली आता माझ्यासाठी तू बायको शोधायची आहेस ..कळलं ‘
सगळेच हसायला लागले .मधू , विठु काका सुहास च्या गाडीत बसले . दादाने रघूची गाडी मस्त फुलांनी सजवून घेतली होती . वहिनी , मालन , उमा काकु सगळ्यांचा निरोप घेतला .
भरल्या गळ्याने आणि डोळ्याने पुन्हा एकदा माईला मिठी मारली आणि जीपमध्ये बसले .माझ्या रडण्यामुळे रघू खूपच अस्वस्थ झाला . तो सगळ्यांच्या पाया पडून गाडीत बसला . गाडी दूरवर जाईपर्यंत , सगळ्यांचे चेहरे धूसर होईपर्यंत मी हात हलवत राहिले . माझ्या सुखाला माझीच दृष्ट नको लागायला असं वाटत राहिलं .पाऊस पडेल की काय असं सकाळ पासून वाटत होतं .नुसतंच अंधारून आलेलं आभाळ हळू हळू मोकळं होत होतं . सूर्याची एक सोनेरी तिरीप लखलखली ..हळुवार रेशीमधारा ही बरसली . आमच्या लग्नाला विधात्यानेही आशिर्वाद दिला होता .मी शांतपणे रघूच्या खांद्यावर मान टेकवली ..त्याने प्रेमाने समंजसपणे मला थोपटल्या सारखं केलं .आता आम्ही दोघं असंच एकत्र रहाणार होतो .. विश्वाच्या अंतापर्यंत !
समाप्त
©अपर्णा कुलकर्णी
नमस्कार
तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं .. रघू , मनवा , माई ,आबा ,दादा , सत्या , सुहास ही सगळी पात्र तुमच्या घरची झाली एवढा स्नेह दिला .पर्यायाने मला ही प्रेम दिलंत .तुमचं हे प्रेम , हा आशिर्वाद च मला लेखनाची , अधिक चांगलं देण्याची उर्मी देतो . तुम्ही खूप भरभरून प्रतिक्रिया दिल्यात ..प्रत्येक वेळी मला उत्तर देणं शक्य झालंच असं नाही पण तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया मी खूप मनापासून वाचल्या ..त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत .
असंच भरभरून प्रेम करत रहा ..लवकरच भेटू ..
धन्यवाद
©अपर्णा कुलकर्णी