मनोरंजन

अजब प्रेमाची गजब कहाणी विवेक पाटील मालेगाव (नाशिक) ९४०४२१२०३४

➖➖➖➖➖➖➖➖
🩵 अजब प्रेमाची गजब कहाणी
➖➖➖➖➖➖➖➖
मालेगावहुन १७-१८ किमीवर असलेल्या निमगावला नातलगाच्या लग्नाला मी माझे मित्र धन्या व बाळ्या गेलो त्यावेळी बस व्यतिरिक्त दुसरे खाजगी वाहन नसल्याने बस
स्थानकावरून निमगावी जायला निघालो साधारण एका तासाच्या अंतराने बसेस होत्या लग्नतिथी दाट असल्याने अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी बस स्थानकावर होती बसमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती दाटावाटी ,रेटारेटी करत आम्ही निमगावला पोहोचलो मालेगाव, नांदगाव रस्त्यावर असलेले छोटेसे निमगाव शिक्षणमहर्षी भाऊसाहेब हिरेंचे गाव पण निसर्गाचा निमगाव वर कायमच रोष कधीच येथे पाऊस मनसोक्त पडत नाही वर्षानुवर्ष दुष्काळाची झळ खात असलेले निमगाव बाजारपट्टीच्या आजूबाजूला लिंबाचे जुने वृक्ष सोडले तर सगळीकडे ओसाड जमीन शेतात फक्त ढेकळ दिसतात.
लग्नाला बराच वेळ असल्याने इकडे तिकडे फिरण्या व्यतिरिक्त दुसरे काम नव्हते त्यावेळी मोबाईल नसल्याने
संवाद चांगल्या पद्धतीने होत होता. गाव फिरून झाल्यावर पुन्हा आम्ही लग्न मंडपाकडे आलो.
बस प्रवास दगदगीने थकवा आला होता. जवळच छोटे चहाचे हॉटेल होते.माझ्याकडे भाडे,आहेर व्यतिरिक्त पैसे नव्हते त्यावेळी जेव्हडे पैसे लागत तितकेच पैसे मिळायचे पॉकेटमनी काय असते हे संपूर्ण शिक्षण होई पर्यंत कळाले नाही हॉटेलमध्ये जाऊन चंबुतील पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता धन्याकडे बसचे तिकीट काढताना बऱ्यापैकी पैसे दिसत होते परंतु अतिशय कंजूस मख्खीचुस म्हणून कुप्रसिद्ध होता. त्याच्याकडून अपेक्षा करणे म्हणजे लॉटरी तिकीट लागल्याचे स्वप्न बघण्यासारखे होते. प्रयत्न आमचे सुरु होते दोन-तीन वेळा पाणी प्यायला गेलो आमच्या पेक्षा क्लासभर जास्त पाणी पिऊन जायचा पन चहाचे नाव काढत नव्हता इतक्यात एक फियाट कार आमच्या जवळून धुराळा उडवत लग्न मंडपाजवळ थांबली कार मधून नवरीच्या मैत्रिणी उतरल्या त्यात शोभा पन होती ती आमच्याच काँलेजला शिकत होती धन्याच्या घराकडे रहात होती तप्त वाळवंटात अचानक पावसाच्या सरी कोसळुन गारवा निर्माण व्हावा असे आम्हाला झाले खिशातून कंगवा काढत केस विंचरत धन्या पुढे सरकला समोरच सलूनचे दुकान होते. न्हावी जागेवर नसल्याने क्षणाचाही विलंब न करता आम्ही दुकान प्रवेश केला पाण्याच्या बाटलीवर ताबा मिळवत चेहऱ्यावर मनसोक्त पाण्याचे फवारे मारले केस व्यवस्थित विंचरले दुकानदार दुरवर दिसत नसल्याचे बघुन पावडर चेहऱ्यावर लाऊन बाहेर पडलो चैतन्याची लहर निर्माण झाली वातावरण बदलून गेले उत्साह संचारला धन्याचा उत्साह खूप वाढला होता. संधीचा फायदा घेत त्याच्याकडे सहज म्हणून चहाचा प्रस्ताव ठेवला लगेच होकार देत आमची मागणी पुर्ण केली चहाची ऑर्डर देतांना दोन मध्ये तीन चहा द्या हे सांगायला मात्र विसरला नाही चहा पिऊन आम्ही थेट लग्नमंडपात गेलो नवरीच्या मैत्रिणी नवरीला दिलेल्या रूमच्या बाहेर गप्पा मारत होत्या वरंड्यात कारण नसताना आम्ही चक्कर मारत होतो.
धन्या मात्र हळूहळू चालत डोक्यावरून हात फिरवत तिरक्या नजरेने शोभाकडे बघत होता. एक पाऊल पुढे टाकत मुलींना थंड पाणी बर्फ टाकुन धन्या घेऊन गेला कोणीच पाणी न घेतल्याने थोडासा नाराज होऊन आमच्या जवळ येऊन थांबला त्याचा आत्मविश्वास वाढवत त्याला पुन्हा पाठवले चहा हवा का म्हनुन त्याने शोभाला विचारले येथे चांगला चहा मिळतो असे म्हणत तेथेच ऊभा राहीला कोणीच बोलत नव्हते व बघतही नव्हते लोचट व लापटपना काय असतो हे धन्याने त्या वेळी दाखवून दिले शेवटी शोभानेच चहा सांगितला आता मात्र पंचाईत झाली कारण हॉटेलात चहा कप बशीत मिळायचा हाँटेल मंडपाचे अंतर बघता चहा थंड तर होईलच पन कपबशी लहान असल्याने आणने अवघड होते. शोध म्हणजे सापडेल याचा प्रत्यंतर आम्हाला आला मार्ग सापडला मंडपातील पाणी पिण्याच्या ग्लासात चहा आणायचा आणल्यावर कपबशीत ओतून द्यायचा तेही लवकरात लवकर कारण चहा थंड होता कामा नये मुली विशेष करून शोभा नाराज होता कामा नये धन्या शक्य तितक्या वेगात म्हणजे पळतच सुटला काही मिनीटात घाम पुसत धन्या स्पेशल चहा घेऊन आला आम्हाला दोनात तीन चहा सांगणारा धन्याने मुलींना चहा जास्तीचा आनला होता. चहा कमी पडायला नको शोभा नाराज झाली नाही पाहिजे घरी कधी पाण्याचा ग्लास न भरून घेणाऱ्या धन्याची धावपळ काबिले तारीफ होती.कपाशीत चहा व्यवस्थित भरुन नववधू सारख्या लाजत चहा घेऊन गेला तेथे फक्त शोभानेच चहा घेतला चहा दिल्याबद्दल हसत थँक्स म्हणत कपबशी परत केली कपबशी नाही जणू प्रेमाने गुलाबाचे फुल दिले अशा थाटात हसत कपबशी घेत परत आला चेहराही गुलाब सारखा टवटवीत झाला
आम्हाला त्याच्या चेहऱ्यावरची लाली कमी होऊ द्यायची नव्हती शोभा एकटीनेच चहा का घेतला असे म्हणत त्याच्या डोक्यात हवा आम्ही भरत बोलत बोलत आम्ही हाँटेल जवळ आलो बाकीचा उरलेला चहा परत घ्या म्हणुन हाॅटेल मालकाच्या विनवण्या करत होता पन त्याने चहा परत घेण्यास स्पष्ट नकार दिला पैसे ऐवजी भजी द्या म्हणत उभा होता पन शेवटी छोटं तोंड करत जवळ आला आमच्या नाकात भजीचा वास व जिभेला सुटलेले पाणी व आमच्या चेहऱ्याचा अंदाज घेत धन्याने भजीची गरम एक प्लेटची आॅर्डर देत सोबत जास्त मिरची मागवली आज सढळ हाताने तो पैसा खर्च करत होता पन डायरीत खर्चाची नोंद लगेच करायला विसरत नव्हता परिवर्तनाचे वारे आम्ही अनुभवत होतो. भजीचा आस्वाद घेऊन आम्ही बाहेर पडलो धन्या पुन्हा सलुन दुकानात जाण्याच्या तयारीत असताना झाडाखाली बसलेला दुकानदार खेकसत भरड्या आवाजात अहीराणीत म्हणाला हाई पंचायतन दुकान शे का बापु हे ऐकताच धन्या पटकन मागे वळाला ईकडे मंडपात गर्दी जमली होती नवरदेव मंडपा जवळ आला शोभा दिसेल अशा ठिकाणी
धन्याला पुढे करत आम्ही मागे उभे राहिलो लग्न लागताच पहिल्याच पंगतीला जेवन करुन पुढच्या कामगिरीसाठी सज्ज झालो महिलांमधून चक्कर मारत धन्या कोणाला तरी शोधतो दाखवत होता. त्याचे एकंदर वागणे संशय निर्मान करणारे होते. माझा मामा सगळं बघता होता. जवळ येत धन्याला अहिराणी भाषेत म्हणाला हाई खेड शे शहर नही ईठे येडा चाळा कराना नहि असे म्हणून निघून गेला धन्या घाबरुन गेला काय करावे असा प्रश्न करु लागला शोभापर्यंत निरोप कसा पोहचवायचा या विषयी चिंता करत होता. तिकडे शोभाला वनसाईड प्रेमाची पुसटशीही कल्पना नव्हती मग आम्ही प्लँन बी साठी सज्ज झालो चिठ्ठी लिहुन थेट तिच्या हातात द्यायचे ठरले कमी मजकूरात जास्त भावना व्यक्त करायच्या होत्या पन पेन नाही कागद नाही मग कागद पेनची शोधा शोध सुरू झाली शोधत शोधत थेट पानटपरी जवळ जाऊन पोहोचलो आणि रिकामे पाकिट न लाजता मागुन घेतलं पेन मिळत नव्हता आहेर टिपणारे खुप व्यस्त असल्याने पेन देत नव्हते वेळ कमी शोभा निघुन गेली तर नको त्या शंका धन्या घेत होता शेवटी गावातील एका दवाखान्यात जाऊन कंपाऊंडर कडुन पेन घेतला इतिहासात नोंद होईल असा मजकूर पाकिटावर लिहिला गेला.
शोभा महिलांच्या पंगतीत कधी बुंदी तर कधी ऊसळ हौसेने वाढत होती म्हणून सोप्या भाषेत तीला समजेल असे लिहिले तुझा होकार असेल तर बुंधी वाढ नकार असेल तर ऊसळ वाढ तुझा धनंजय वडाच्या झाडाखाली तुझ्या होकाराची वाट बघत ऊभा आहे.
एका लहान मुलाच्या हातात एक रुपयाचा डॉलर देत अगदी व्यवस्थित तीन चार वेळा समजून त्याची रवानगी केली काम बरोबर केले तर परत पन्नास पैशे द्यायचे कबुल केले सिगारेटचे रिकामे पाकीट म्हणजे आम्ही लिहिलेली चिठ्ठी घेऊन एक रुपया अधिक पन्नास पैसे त्याल्या पाच-दहा पैशापेक्षा जास्त कोणी दिले नसतील एकदम दिड रुपयांची त्याची लाँटरी लागली तो सुसाट पळत सुटला चोख कामगिरी करत शोभाच्या हातात देऊन आमच्याकडे बोट दाखवत हातवारे करत होता. निशाना बरोबर लागला होता. आनंदाने एकमेकांना टाळी देत आम्ही एकमेकांना आलिंगन दिले आता शोभा कुठली पाटी घेते बुंधी की ऊसळ याकडे आमचे लक्ष लागुन होते. तिने चिठ्ठी परत वाचली वाचून पुढे चालायला लागली बुंधी ऊसळ दोन पाऊलावर येऊन ठेपली धन्या बुंधीच्या पाटीकडे एकटक बघत होता. समोरच मंदिर होते देवाला हळू आवाजात काहीतरी नवस पुटपुटला शोभाने बुंदी ना ऊसळ घेतली सरळ माझ्या नातलग मँडमजींकडे धाव घेतली आमच्याकडे बोट दाखवत जोरजोरात रडायला सुरुवात केली नवरीची मैत्रीन नवरी सासरी जाईल पुन्हा लवकर भेटणार नाही म्हणून रडत असेल असे सर्वांना वाटले वातावरण हळूहळू गंभीर झाले आकाशात झेपणारे यान क्षणार्धात जमिनीवर कोसळावे अशी स्थिती आमची झाली परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरण व्यवस्थित हाताळत कुणालाही काही समजायच्या आत मॅडम शोभाला बाजूला घेऊन गेल्या ती शांत होईना आम्हाला काळजी वाटु लागली पब्लिक मार ऐकून होतो मिळतो की काय वाटायला लागले धन्याच्या लिलांना पाठिंबा देणारा बाळ्या घाबरला होता.चेहरा गंभीर येथुन पळता येईल का संधीची वाट बघत होता. मला सर्वच ओळखत असल्याने मी चिंतेत होतो.घरी समजले तर तेही टेन्शन होतो कारण बाळ्या, धन्याला ओळखणारे फार कोणी नव्हते मालेगाव जायला लगेच गाडी नव्हती थांबाण्या वाचुन पर्याय नव्हता माझा मामा झपझप पाऊले टाकीत जवळ आला सहानुभूतपुर्वक अहिराणी भाषेत म्हणाला आते जे व्हई ते ईठेच व्हई कुठे जावान नही मी ईठेच शे इथून पळु नका म्हणत लगेच निघून गेला आम्ही मन निगरगट्ट करत शिक्षा ईथेच भोगायची ठरवून जागेवर बसून घेतले
हृदयाचे ठोके वाढत होते डोक्यात नको ते विचार येत होते ज्यांना थोडी कुनकुन लागली होती ती जवळून टिंगल टवाळी करत होते.
इतक्यात मॅडम व शोभा येताना दिसल्या आम्हाला बघुन तीचे हुंदके पुन्हा वाढले मॅडम शोभाला समजत होत्या पण ती काही थांबायला तयार नव्हती धन्या सर्व प्रकार बघून पुन्हा समोरच्या मंदिराकडे बघत हळु आवाजात परत नवस पुटपुटला
मॅडमजी व शोभा
अगदी जवळ येऊन उभ्या होत्या काही सांगण्याच्या आत शोभाकडे बघत धन्या माफी मागु लागला मी बाळ्या लांब सरकत आमचा काही संबंध नाही असे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो धन्या शोभाच्या पायाकडे सारखा बघत होता. त्याची डोके टेकण्याची तयारी होती फक्त प्रकरन इथेच संपलं पाहिजे अशी त्याची इच्छा होती.
मँडमाजींनी यापुढे असे होता कामा नये म्हणत प्रकरण मिटवले जड पाऊलांनी आम्ही परत मालेगावकडे जायला निघालो चेहरा बदलला होता.अपमान झाल्याने मान खाली घालून आम्ही बसस्टँडकडे निघालो होते येतांना हास्य विनोद करत आलो जातांना मात्र सुतकी चेहरे ऐकमेकाच्या विरुद्ध तोंडे करत एकमेकांना दोष देत चाललो होतो. धन्या डायरी काढून झालेला खर्चाची आकडेवारी मांडत होता.
शंका कुशंका मनात अजूनही होत्या शोभा चार भावांची एकुलती एक बहीन होती. धन्या खूप घाबरलेला होता. मालेगावला पोहचताच सायंकाळी मित्रांची तातडीची बैठक बोलवण्यात आली पुढे काय ? यावर बऱ्याच वेळ चर्चा चालली शेवटी धन्याने ऊद्या काँलेज मध्ये शोभाची परत माफी मागावी असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला त्याच्या सुरक्षिततेची हमी सर्व मित्रांनी घेतली.
दुसऱ्या दिवशी सर्व काँलेज कँन्टिंगला जमले धन्याने लगेचच चहाची आॅर्डर देऊन टाकली लगेच कालच्या खर्चा खाली हा खर्चही लाला पेणने लिहाला सर्वांना खुष करुन टाकले ठरल्याप्रमाणे धन्यापुढे निघाला मागे हळूहळू आम्ही चालत वर्गा जवळ पोहोचलो शोभा मैत्रीनींसोबत गप्पां मारण्यात दंग होती अचानक धन्या तिच्यापुढे जाऊन ऊभा राहीला मुली सर्व प्रकार पाहुन काही काळासाठी घाबरुन गेल्या धन्या शोभाची माफी मागु लागला तीला हसावे की रडावे कळेना हिम्मत करत तीने माफी देऊन टाकली वातावरण पूर्ण बदलले मुली जोरात हसू लागल्या उद्या येतांना राखी घेऊन ये मगच माफी म्हणुन सगळेच चिडवत हसु लागले धन्या ओशाळला लाजला वर्गाच्या बाहेर पडत सरळ सायकलवर टांग टाकुनी घरच्या दिशेने निघुन गेला एकतर्फी प्रेमाचा शेवट अशा प्रकारे झाला.

लेखन
विवेक पाटील
मालेगाव (नाशिक)
९४०४२१२०३४

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}