मनोरंजन

कमाल  ©️ वर्षा पानसरे कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व

कमाल  ©️ वर्षा पानसरे
कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व 🎉
#कथाविश्व

“काय कमाल आहे ग तुझ्या सासूची !” अवनीने आईचे हे वाक्य ऐकलं आणि मनात म्हंटल झालं, आज आता एक नवीन चहाडी. गेले चार महिने तिची सासू आणि आई दोघी अडकल्या एकाच घरात. त्याचं झालं असं, की अवनीच्या सासुबाई अमेरिकेतून खास भाच्याच्या लग्नासाठी भारतात आल्या होत्या. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात लग्न तर धुमधडाक्यात पार पडलं. पण नेमक्या अवनीच्या सासूबाई तिच्या आईकडे भेटायला आणि चार दिवस रहायला आणि लॉकडाऊन सुरु व्हायला एकच गाठ पडली.

आईचा पहिला फोन आला तेव्हा चारच तर दिवसांचा प्रश्न आहे असा विचार करून अवनीने दुर्लक्ष केलं होतं आणि तक्रार कसली तर, “कमाल आहे हं तुझ्या सासूची. ” आईचं वाक्य ऐकून अवनी गोंधळली, “का गं, काय झालं ?” अवनीने जरा काळजीनेच विचारलं. “अगं, काल रात्री इथे आल्या त्याच मुळी मॅक्सि घालून. आणि आत्ता सकाळी बघतेय तर त्या आपल्या समोरच्या कोमल सारख्या टी शर्ट आणि शॉर्ट्स मध्ये. कोमल घालते ते सुद्धा मला अजिबात पटत नाही. तिला मला बोलता तरी येतं, पण ह्यांचं काय ?” अवनी खो खो हसत सुटली आणि म्हणाली, “हो अगं, त्या घरात असेच कपडे घालतात. लग्नघरात त्यांना तुमच्या प्रमाणे वावरवं लागलं असेल आणि आता तुझ्याकडे, त्या अगदी रिलॅक्स झाल्या असतील.” “म्हणून काय हे असले चिवटेबावटे, लांडेटिचके कपडे घालून फिरायचं? आपलं वय काय आणि आपण करतोय काय! कसलाच विचार नाही. कमाल आहे बाई तुझ्या सासूच्या अवखळपणाची.”

अवनीच्या सगळा प्रकार लक्षात आला. गेले पाच वर्ष तिच्या सासूबाई त्यांच्याकडे अमेरिकेत रहायला आल्या होत्या. त्यातच एकदा अगदी किरकोळ निमित्ताने त्यांचा पाय मोडला होता. तेव्हापासून त्या घरात शॉर्ट्स आणि टी शर्ट्सच वापरत. बाकी काही असो, पण सासूबाईंच्या कोणत्याही बदलाला सामोरं जायच्या वृत्तीला अवनीने सलाम केला होता. पण आईचं काय? ती अजून तिथेच होती. खरंतर, दोघीही साधारण एकाच वयाच्या आणि सारख्याच सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून तावून सुलाखून बाहेर पडलेल्या. अगदी दोघींचे जीवनसाथीदारसुद्धा थोड्या फार अंतराने त्यांना सोडून गेले होते. दोघीनांही अवनी आणि प्रथमेशने अमेरिकेत येण्याबद्दल विचारलं पण अवनीच्या आईने साफ मना केलं तर सासूबाई एका पायावर तयार झाल्या.

परत पुढच्या आठवड्यात अवनीला असाच आईचा फोन आला, “कमाल आहे बाई तुझ्या सासूची.” “का गं, आता काय झालं?” अवनीने विचारलं. “अगं, समोरच्या सुखटणकर वहिनी आणि मी काल संध्याकाळी म्हटलं एकत्रच जेऊया. पॉटलक गं.” “बरं मग?” अवनी म्हणाली. “आता सुखटणकर दोघे आले जेवायला तर ह्यांनी विचारलं कि काय सुखटणकर, घेणार का थोडी वाईन? आणि त्यांच्या ब्यागेतून काढली कि त्यांनी बाटली.” आई तावातावाने बोलत होती. “आणि मग ?” अवनीने हसू दाबत विचारलं. “मग काय, सुखटणकर कशाला नाही म्हणतायत? बसले दोघे दारू ढोसत. कमाल आहे बाई तुझ्या सासूच्या आगाऊपणाची .” अवनीला दिसत नसला तरी आईचा क्रुद्ध चेहरा स्पष्ट दिसत होता. तिच्या पारंपारिक विचारांना सरळ सरळ छेद देणारी कृती तिच्या सासूने केली होती. “आई अगं आगाऊपणा काय म्हणतेस? रसिक आहेत त्या. आणि इकडे तू बघितलंच होतंस कि कोणीही जेवायला आलं कि आम्ही वाईन विचरतोच. तसं त्यांनी विचारलं. ” अवनीने सासूची बाजू घेतली आणि प्रकरण मिटवलं.

असाच थोड्या दिवसांनी परत फोन आला. “कमाल आहे बाई तुझ्या सासूची.” अवनी आता कोणत्या समस्येला तोंड द्यायचंय ह्याच विचारात होती. ” अगं, काल कोमलची आई जरा वैतागूनच कोमलची तक्रार करत आली आपल्याकडे. पाठोपाठ ह्या सुद्धा येऊन बसल्या आमच्या गप्पा ऐकायला.” अवनी लक्ष देऊन ऐकू लागली. “प्रज्ञा कोमलच्या वागण्याने झांजरलीय त्यात ह्यांचा भोचकपणा. दुखावली गेली असेल ग प्रज्ञा.” “अगं पण झालं तरी काय एवढं प्रज्ञा आणि कोमलमध्ये आणि बोलल्या तरी काय आई?” अवनीने विचारलं. “ती शहाणी कोमल, एवढी तिशीला टेकली, एवढा भलाथोरला पगार कमावते तरी शहाणपण म्हणून काही नाही. आता काय तर म्हणे तिकडे प्रभातनगर मध्ये नवीन जागा घेऊन एकटीच राहायला जाणार आहे. आणि कारण तरी किती फुसकं कि ह्या वर्क फ्रॉम होम आणि स्कूल फ्रॉम होम मुळे सगळ्यांना जागा पुरत नाहीये. हिचं लग्न जमत नाहीये म्हणून आधीच प्रज्ञाचा जीव अर्धा झालाय. त्यात आता हिने ही नवी टूम काढली. प्रज्ञा केवढी अस्वस्थ झालीय.” आईच्या आवाजातली काळजी अवनीला कळत होती पण तिला तिच्या सासूबाईंचं म्हणणं आणि त्यांनी काय भोचकपणा केला तेही जाणून घ्यायचं होतं. “बरं मग? ” अवनीच्या प्रश्नाने तिची आई आणखीनच तावातावाने बोलू लागली. “आता कोमलला समजवायचं सोडून तुझी सासू प्रज्ञालाच बोलू लागली कि असं बघ प्रज्ञा, कोमल स्वतःच्या पायावर उभी आहे आणि खरोखरच प्रत्येकाला ह्या वर्क फ्रॉम होमच्या मुळे जागा लागतीय. ती स्वतःहून ठरवतेय तर कशाला अडवतेस?” अवनीची आई तिच्या सासूबाईंची वाक्य सांगत होती. आणि अवनीच्या डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा रहात होता प्रज्ञा म्हणाली, ” अहो, पण ही अशी एकटी ? ” तिचं वाक्य तोडतच त्या म्हणाल्या, ” का ग, केदार त्याच्या बायकोला आणि मुलाला घेऊन दुसऱ्या घरात राहिला असता तर हेच म्हणाली असतीस का?” प्रज्ञाने लगेच म्हंटल, “अहो, त्याची गोष्ट वेगळी हिची वेगळी. अजून हिच्या लग्नाचं जमत नाहीये त्यात हि अशी वेगळी रहायला लागली म्हणजे झालंच.” “प्रज्ञा, आपला पालकांचा दृष्टिकोन कसा असतो माहितेय, वीस वर्षांच्या मुलीचं लग्न आपण करून तिला अनोळखी माणसाबरोबर घरच काय पण गाव अगदी देश सोडून बाहेर पाठवू पण तीच मुलगी जरा स्वाभिमानाने जगू पहातेय तर आपल्याला चालणार नाही.” प्रज्ञा आता रडवेली झाली, “अहो पण एकटीच कशी राहील? जेवणाखाण्याचं काय करेल? दार नीट लावेल ना? ह्यांचं तर आत्ताच ब्लड प्रेशर वाढलंय.” तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तिचं लग्न झालं असतं आणि तिचा नवरा परगावी रहात असता तर तुम्हाला चाललं असत. तेव्हा तुमच्या मनात असे प्रश्न आले असते का? नाही ना मग आत्ता का? तुमचा तुमच्या लेकीवर आणि तुम्ही केलेल्या संस्कारांवर विश्वास हवा ना. आणि कोण जाणो, एखादा मुलगा तिच्या अश्या आत्मनिर्भर असण्यावरच भाळेल.” आईने सगळं संभाषण शब्दन्शब्द, अनुस्वार, वेलांट्या अगदी अश्रू उसास्यांपर्यंत सांगितलं. वरती शेवटचं वाक्य, “आणि आता गेल्यात कोमलचं नवीन घर लावून द्यायला. कमाल आहे बाई तुझ्या सासूबाईंच्या भोचकपणाची.” नेहमीप्रमाणे संभाषणाचा शेवट झाला. खरंतर, अवनीला तिच्या सासूबाईंचीच बाजू पटली होती पण सरळ सरळ त्यांची बाजू घेऊन तिला आईला दुखवायचं नव्हतं.

“कमाल आहे बाई तुझ्या सासूची.” थोडे दिवसांनी आलेल्या आईच्या फोनवर आता सासूचा कुठला प्रताप ऐकायला मिळतोय ह्याचाच अवनी विचार करू लागली. “परवा संध्याकाळी अगदी लाली,लिपस्टिक, नेलपेंट लावून तयार काय झाल्या, नवीन कपडे आणि दागिने घालून काय नटल्या. कशाला तर म्हणे त्यांच्या शाळेतल्या मैत्रिणी त्या टॅब वरच्या कुठल्या त्या झूम का टूमवर भेटणार होत्या. काही विचारू नकोस, तासभर अगदी जोरजोरात गप्पा आणि खिदळणं. शोभतं का ते ह्या वयात?” खरंतर अवनीला ओरडून सांगावसं वाटत होतं कि त्यांच्या नटण्याचा तुला काय त्रास? ह्या. वयातही त्या आपला जीव रमवतायत तर चांगलं आहे ना! पण आईला दुखवायला नको म्हणून ती गप्प बसली आणि अपेक्षेप्रमाणे फोनवरच्या संभाषणाचा अंत “कमाल आहे बाई तुझ्या सासूच्या नटमोगरे पणाची” ह्या वाक्याने झाला.

असेच थोडे दिवस गेले आणि “कमाल आहे बाई तुझ्या सासूची ” फोन झाला. आता तर प्रथमेश आणि अवनीने तिच्या फोनच नावच कमाल आहे तुझ्या सासूची असंच ठेवलं होतं.

“कमाल आहे बाई तुझ्या सासूची. अगं, दहा दिवस झाले रुक्मिणी कामावर यायला लागली त्याला. तर ह्यांनी तिच्या मुलासाठी नवा मोबाईल घेऊन दिला. बरं, ती काय तर थोडी उचल मागत होती. ह्यांनी केलाच भोचकपणा आणि विचारलं कश्यासाठी, का वगैरे. रुक्मिणीबाई तर काय लगेच लागली रडायला आणि सांगायला, ‘मुलाची शाळा त्या मोबाईलवर सुरु होती तर तो मोबाईलच मोडला. त्यात यांची रिक्षा बंद आहे. गिर्हाइकच नसतं सध्या तर कुठून पैसे आणायचे.’ वगैरे वगैरे रडायला लागली तर ह्यांनी तिच्या नवऱ्यालाच रिक्षा घेऊन बोलावलं. मला पण घेऊन गेल्या बरोबर. उगाच इकडेतिकडे फिरून मोबाईल घेतलाच वरती रिक्षा भाडे दोनशे पस्तीस झाले तर सरळ पाचशेची नोट देऊन मोकळ्या झाल्या. कमाल आहे बाई त्यांच्या उधळपट्टीची.” संभाषणाचा शेवट अपेक्षेप्रमाणेच झाला.

गेल्या चार महिन्यातले सगळे फोन कॉल्स अवनीच्या कानात घोंगावू लागले. आज मात्र अवनीने ठरवलंच होतं कि काहीही झालं तरी आईला सुनवायचंच. तेव्हा आईला सुनवण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करे पर्यंत तिचीच आई म्हणाली, “काय अफाट तत्परता आहे ग त्यांच्यात. काल वळवाचा पाऊस झाला बघ इकडे. सकाळी मी बाल्कनीत तुळशीला पाणी घालायला गेले आणि कशी कोणास ठाऊक पण धाडकन पडले.” अवनी जोरात किंचाळलीच, “आई, अगं काय हे? काय पुण्य मिळवायचंय ते घरात बसून मिळव ना. बरी आहेस ना तू ? कुठे लागलं तर नाही ना?” तिच्या आवाजात काळजीयुक्त कंप होता. “अगं हो हो हो, थांब. मला सांगू तर देशील? हां, तर काय सांगत होते कि मी पडले. एका क्षणात डोळ्यासमोर अंधेरी आली. मनगट आणि हात जबरदस्त दुखत होता. तुझ्या सासूबाईंच्या मदतीने कशीबशी उठले. त्यांनीच शेकायला बर्फ दिला आणि रुक्मिणीच्या नवऱ्याला बोलावलं. रुक्मिणीच्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. अगं, डॉक्टरांनी विचारल्यावर मला माझी साधी औषधं आठवेनात. पण ह्यांनी लगेच आपल्या केमिस्टला फोन लावून माझं प्रिस्क्रीपशन मागवलं. माझ्या मनगटाच हाड मोडलंय. प्लॅस्टर घातलं डॉक्टरांनी पण त्या पूर्णवेळ माझ्याबरोबर मला धीर देत उभ्या होत्या. रुक्मिणी आणि रघूकडून सगळी धावपळ करून घेत होत्या. आम्हाला सगळं आटोपून घरी यायला दुपारचे दोन वाजले. घरी आलो तर सुखटणकर वहिनींनी आमच्यासाठी सगळं जेवण तयार ठेवलं होतं. प्रज्ञाने माझ्यासाठी घरात घालायला दोन गाऊन्स आणून ठेवले होते. आणि गंमत म्हणजे संध्याकाळी कोमलची मैत्रीण येऊन माझे लांबसडक केस कापून छानसा बॉबकट करून गेली. सगळं सगळं तुझ्या सासूने केलं हं आणि तेही एका जागी बसून. आता मलाही त्या स्मार्टफोन वापरायला शिकवणार आहेत. खरंच कमाल आहे हं तुझ्या सासूची.”

©️ वर्षा पानसरे
कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}