Classifiedमनोरंजन

तमसो मा ज्योतिर्गमय! ©® ज्योती रानडे

तमसो मा ज्योतिर्गमय!

©® ज्योती रानडे

सई शाळा संपवून घरी आली. “बाई ग! या मुलांना शिकवताना जीव दमून जातो अगदी!” म्हणत तिनं कुकर लावला. दिवाळी अगदी महिन्यावर आली होती. तिला आशिष साठी नवा पंचावन्न इंचाचा मोठ्ठा टीव्ही केव्हापासून घ्यायचा होता! सरळ साधा होता आशिष. अपंग असलेल्या दिलदार आशिषच्या स्वभावामुळे तर ती त्याच्या प्रेमात पडली होती. किती कौतुक आहे त्याला आपलं!

आशिष बँकेत कामाला होता. लंगडा, पाय ओढत जाणारा आशिष क्रिकेट बघताना मात्र स्वत:चं व्यंग विसरून जायचा. दोन गोजिरवाणी मुलं होती. नीतू आणि निनाद! त्यांना एका महागड्या इंग्लीश शाळेत घातलं होतं. निनादला क्रिकेटची बॅट हवी होती. नीतूला लेमन कलरचा शरारा! दिवाळी म्हटल्यावर इतरांना चार भेटी देणं आलचं म्हणून ती पैसे साठवत होती.

आशिष तिची धावपळ बघत होता. काही वर्षांपूर्वी एका लग्नात तिच्या बहिणीने घातलेला सोन्याचा सेट तिला खूप आवडला होता हे आशिषनं बघितलं होतं. तसा सोन्याचा नेकलेस व मॅचिंग भोकरांचा सेट तिला यावर्षीच्या दिवाळीत द्यायचाच असं त्याने ठरवले होते. पण गेल्या महिन्यात नेमकी मुलांच्या शाळेची फी अचानक वाढली होती त्यामुळे तो चिंतेत होता.

एक दिवस जमवलेले सर्व पैसे घेऊन सई कामानंतर चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स या टीव्हीच्या दुकानात गेली. ती बरेचदा जाता येता तो टीव्ही सेल वर आला आहे का नाही बघत असे. सेल नव्हता पण आता थांबायला वेळ उरला नव्हता. त्या पंचावन्न इंचाच्या टिव्हीवर क्रिकेट बघताना आनंदी झालेला आशिषचा चेहरा तिच्या डोळ्यापुढे आला. पैसे द्यायला ती काउंटरवर गेली.

“अहो ते नेहमीचे मॅनेजर कुठे आहेत?” तिने विचारले.

तेवढ्यात तिला कामावरच्या सदाचा फोन आला. गेली तीस वर्षे सदा शाळेचा शिपाई म्हणून काम करत होता.

“मॅडम, मी सदा बोलतोय. माझ्या मुलाला गाडीने धडक दिली. मोडकांच्या हॅास्पिटलात नेलय पण त्यांनी आधी बरेच पैसे भरायला सांगितले आहे! माझा सगळा बोनस दिवाळीमुळे संपलाय मॅडम..मला द्याल का एक पंचवीस तीस हजार रूपये उधार? काळे बाईंना पण विचारले. त्या आत्ता जमत नाही म्हणाल्या. फार जरूर आहे हो मॅडम..” सदा रडत बोलत होता.

सई टीव्हीची ॲार्डर न देताच बाहेर पडली. तिने बरोबर आणलेले पैसे मोडकांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन सदाच्या मुलासाठी भरले. सदा व त्याची बायको तिच्या पाया पडले.

“सई मॅडम, माझ्या वेळेला उभी राहिलीस. देव कधीही तुला काहीही कमी पडू देणार नाही बघ.” सदा डोळे पुसत म्हणाला. बायको हात जोडून उभी होती.

ती संभ्रमात घरी आली. उरलेल्या पैशात मुलांना हव्या असलेल्या गोष्टी घेतल्या पण मोठा टीव्ही मात्र घरी यावर्षी येणार नव्हता. आता आशिषला नवी पॅंट व शर्टच देऊ आता असा विचार करून तिने टीव्ही पुढच्या वर्षावर टाकला. काळे बाईंचा नवरा दोन वर्षांपूर्वीना अचानक हार्ट अटॅक येऊन वारला होता म्हणून त्यांनाही तिनं दिवाळीचे चार दिवस बोलावलं होतं.

दिवाळीची दिवस उजाडला..

अभ्यंगस्नान करून फराळाला बसल्यावर आशिष एक लाल रंगाची बॉक्स घेऊन आला. ती बॉक्स त्याने सईला दिली. आतमध्ये लखलखणारा सोन्याचा नेकलेस व टपोरी भोकरं होती.

तिनं काळजीयुक्त स्वरात विचारलं, “कुठून आणलेस एवढे पैसे?”
तो म्हणाला, “घाल ना दागिने! कसे दिसतात ते तरी बघू!”

तिनं गोंधळलेल्या चेहऱ्यानं दागिने घातले. त्या दागिन्यांनी आधीच सुंदर असलेला तिचा चेहरा अजूनच उजळला. आशिष कौतुकाने तिच्याकडे बघत राहिला..
“आशिष, कुठून आणलेस पैसे?” तिने विचारले.
“अग झाडाला लागलेत.. ” तो हसत म्हणाला. “अचानक धनलाभ” झालाय!”

तिला काही कळत नव्हते. तिने फराळाची तयारी केली. काळे बाई छोटी सुटकेस घेऊन आल्या. मुलांनी त्यांना मिठी मारली.
तेवढ्यात बाहेर एक मोठा ट्रक येऊन थांबला. त्यात एक भली मोठी बॉक्स होती. चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स चा ट्रक बघून ती चपापली.
“मॅडम, तुमचा ५५ इंचाचा टीव्ही जोडून देतो. ” ट्रक मधून उतरलेला मुलगा म्हणाला. त्याने सर्व काही जोडताच मोठ्या स्क्रीनवर क्रिकेटची मॅच दिसू लागली. आशिष आणि मुलांचा आरडा ओरडा आणि आनंद बघून तिच्या डोळ्यातून आसवं वाहू लागली.

काळे बाई म्हणाल्या,”या दिवाळीला छान घेतलीस ग गिफ्ट! आशिष बघ.. कसा मुलांहून मुल बनला आहे.”
“अहो बाई, मी नाही घेतला हा टीव्ही. कसा आणि कुणी पाठवला कळत नाही.” ती गोंधळून गेली होती.

“मी सांगते काय झालं ते. अग, सई, सदाचा मुलगा मॅनेजर आहे चैतन्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. तुला कधी बोलला नाही का तो? त्याचा अपघात झाला तेव्हा सदाला कुणाचीच मदत मिळत नव्हती. जो तो दिवाळीचे खर्च करण्यात गुंतलेला! मलाही सदाचा फोन आला होता पण माझ्या घरात पाणी गळत आहे ना त्या दुरुस्तीमध्ये सगळे पैसे गेले माझे.

सदाच्या मुलानं हॉस्पिटलमध्ये तुला त्याच्या बाबांशी बोलताना बघितले होते.. तो सदाला म्हणाला, “या मॅडम कोण? या गेले चार महिने मोठा टीव्ही सेल वर आला आहे का बघायला येत आहेत.”

सदाने तुझी सर्व माहिती त्याला दिल्यावर तो म्हणाला, “बाबा, त्यांना आवडलेला टीव्ही मी त्यांच्या घरी दिवाळीला पाठवणार आहे. आमची कंपनी सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट म्हणून टीव्ही सवलतीच्या दरात देत आहे. या बाई माझ्यामागे देवासारख्या उभ्या राहिल्या…त्यांना माझा टीव्ही मी भेट देणार आहे. जगलो नसतो या अपघातात तर तो टीव्ही घेऊन काय करणार होतो?”

सई, असा हा टीव्ही तुझ्या घरी तुझ्या दानशूरतेने आणला आहे.” काळे बाईंनी उलगडा केला.
दारात सदा, त्याची बायको आणि त्याचा मॅनेजर मुलगा उभे होते. सदा म्हणाला, “मॅडम, हा आता चालायला लागलाय बघा. कुबड्या वापरून का असेना पण चालतो आहे तो. तुम्हाला नमस्कार करायला आला आहे.”

तिने त्याचे हात पकडून त्याला कोचावर बसवले. “तू सदाचा मुलगा आहेस हे माहित नव्हते रे मला. कधी तसे बोलणे होण्याची वेळ आली नाही. पण आज एवढ्या मोठ्या अपघातातून तू वाचलास याचा फार आनंद फार आहे.
तुझ्या घरात आज पणती तेवली ही “त्याची” कृपा आहे रे!” सईने आकाशाकडे बघितले.

आशिष कौतुकाने हा सर्व सोहळा बघत उभा होता. स्वतःच्या घासातील घास दुसऱ्याला देणारी सई त्याला नवी नव्हती. सगळे जग सुंदर करण्याचा ध्यास असलेली आपली श्रीमंत पत्नी! बरं झालं.. तिच्यासाठी यावेळी तरी सोन्याचा सेट घेता आला.

तिच्या गळ्यातील नेकलेस व कानातील भोकरं बघून काळे बाई म्हणाल्या, “अगबाई, पाडव्याची भेट मिळाली आहे वाटतं!”
सई म्हणाली, “बाई, आशिष ने कुठून आणला हा सेट कोण जाणे. तो सांगतही नाहीये मला!”

आशिष म्हणाला, “बाईसाहेब, काळे बाईंना धन्यवाद द्या. त्या मला सराफांच्या दुकानात भेटल्या होत्या. मी हा सेट बघितला व न घेता परत चाललॊ होतो.
त्या म्हणाल्या, “आशिष, सईने गेल्या काही वर्षात माझ्यासाठी जे केलय ना त्याला तोड नाही. हे गेल्यावर मी अगदी एकटी पडले होते. त्यावेळी खरंच वाटले की स्वतःचं मुलं असायला हवे होते पण सई माझी लेक होऊन माझ्या पाठीशी उभी राहिली. मला तिच्यासाठी काही घ्यायचे आहे. आपण दोघे मिळून अर्धा अर्धा खर्च करून तिच्या आवडीचा एखादा सेट घेऊया का? मला माझे सोने आईच्या मायेने तिला द्यावेसे वाटतंय.”

सई घरात जमलेल्या “तिच्या” माणसांकडे कौतुकानं बघत होती. नसेना का रक्ताचे नातं..माणुसकीचं नातं त्याहून मोठे होते. एकमेकांवर विश्वास असलेली वेगवेगळी माणसे दया, माया आणि प्रेमाच्या धाग्यांनी एकत्र बांधली गेली होती.

सईने लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशात तिचे घर उजळून निघाले होते पण त्याहीपेक्षा अंतरीच्या दिव्यांचा प्रकाश लक्ष लक्ष पणत्या पेक्षा तेजस्वी होता. त्या पवित्र प्रकाशात फक्त सईचे नाही तर बाकीची चार घरंही उजळून निघाली होती.

सदाचे शब्द तिच्या कानात गुंजत होते. “खरंच सांगतो मॅडम, तुमच्यासारख्याना देव कधी काही कमी पडू देणार नाही!”

“तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणत तिने परमेश्वरासमोर हात जोडले.

©® ज्योती रानडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}