मना सज्जना …..अनिल पाटणकर
मना सज्जना …..अनिल पाटणकर
वंदनाताई सकाळची कामे उरकून निवांतपणे टीव्ही लावून बसल्या होत्या. घरात काका आणि वंदनाताई दोघेच असायचे. काका कुठेतरी बाहेर सोसायटीच्या कामात, मित्रांमध्ये बिझी असायचे. खरं म्हणजे दोघे ही रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत होते.
पण का कोणास ठाऊक वंदनाताई ना आपल्या आयुष्यात काहीतरी करायचे राहून गेले राहून गेले या भावनेने ग्रासले होते. असे हल्ली त्यांना बऱ्याचदा वाटत असे. अगदी अलीकडे तर त्यांना असुरक्षित वाटत होते.
खरं म्हणजे वंदनाताई अगदी साध्या सरळ, समाजकार्याची आवड, त्यांचा स्वभाव अतिशय मोकळा त्यांच्या खूप मैत्रिणी, पण एकदा नोकरी संपून रिटायर झाल्यावर हे सगळे संपले. एक मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्याशी बोलायला कोणालाच वेळ नव्हता.
इतक्यात दारावरची बेल वाजली. वंदनाताई दार उघडायला लगबगीने उठल्या. मुख्य दरवाजा उघडून सेफ्टी डोअर उघडणार इतक्यात बाहेरून आवाज आला
ताई नका दार उघडू …
समोर एक काळीसावळी बाई
उभी होती. बाई कसली जेमतेम तिशीतली मुलगीच ती. पिवळसर रंगाची कॉटनची साडी, गळ्यात एक बॅग आणि कपाळाला छोटीशी टिकली. मोहक व्यक्तिमत्व होते.
म्हणाली, मला फक्त तुमची तीन मिनिटे हवी आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. अपेक्षा एवढीच आहे की फक्त मला तीन मिनिटे तुमच्याशी शांतपणे बोलायचे आहे.
मी कुठलीही स्कीम घेऊन आले नाही, मी सेल्समन देखील नाही. फक्त आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवायचेत. मी बोलेन पण तुमची परवानगी असेल तरच.
वंदनाताई ना काय बोलावे सुचेना. त्या दोन क्षण स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या ठीक आहे हरकत नाही मी दार न उघडता ऐकेन तुमचे.
हे बघा ताई मी तुम्हाला बाहेरूनच नमस्कार करते तुम्ही जर थोड्याशा आस्तिक असाल तरच मी तुमचा वेळ घेईन. वंदनाताईंनी होकारार्थी मान हलवली.
आमची एक संस्था आहे भान नावाची. आम्ही लोकांना फक्त एक जाणीव करून देतो आपल्या कर्तव्याची. आमची एक दिनचर्या आहे त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावे अशी माफक अपेक्षा आहे आमचा संस्थेची.
प्रत्येक कार्यकर्त्यांनी एका महिन्यात निदान पंचवीस घरी तरी ही जाणीव करून द्यावी अशी अपेक्षा आहे आमच्या संस्थेची. गणेश चतुर्थीपासूनच सुरुवात केली आहे आम्ही.
आमच्या संस्थेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेशी सुतराम संबंध नाही. आम्ही एक पैसा देखील चूणाकडून घेत नाही, चूणाला त्यांचा मोबाईल नंबर विचारत नाही. एवढेच काय चूणाच्याही घरात जाण्याची देखील आम्हाला परवानगी नाही.
वंदनाताईंनी या मुलीला मध्येच थांबूवून सांगितले, अहो काही संकोच बाळगू नका तीन मिनिटे काय तीस मिनिटे सुद्धा मी ऐकायला तयार आहे. करा सुरुवात.
ताईने सुरुवात केली.
आपल्यातील बरेच लोक कर्मकांडांच्या मागे असतात आणि काहीतरी अपेक्षेने देवाच्या मागे लागतात आणि येता जाता नमस्कार करत सुटतात. अगदी रस्त्यात कुठले ही देऊळ दिसले तरी यांचा हात अर्धवट छातीवर जातो व त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते.
आमच्या अपेक्षा.
शक्यतो सूर्योदयाच्या वेळी सूर्याला किंवा पूर्वेकडे बघून नमस्कार करा.
सकाळी उठल्यावर घरातील तुमच्या आवडत्या ठिकाणी किंवा देवघराजवळ बसून कुलदेवतेचे स्मरण करा.
मग तुमच्या आई-बाबांना
नमस्कार करा मनातल्या मनात.
तुमचे पूर्वज मनातल्या मनात आठवा, चार पिढ्या मागे जा व त्यांचे स्मरण करा. हेच खरे श्राद्ध. रोजच पितृपक्ष म्हणा हवे तर.
पृथ्वी तेज आप वायू आकाश
या आपल्या खऱ्या देवता.
सकाळी चहा करायला गॅस पेटवाल तेव्हा आधी त्या ज्योतीला नमस्कार करा कारण तोच अग्नी.
मग येतो पाण्याचा नंबर त्यालाही हात जोडा.
संध्याकाळी देवासमोर शूभंकरोती म्हणा मन प्रसन्न राहते. संध्याकाळी किंवा रात्री चंद्राकडे बघण्याचा प्रयत्न करा नमस्कार नाही केला तरी चालेल.
संध्याकाळी शक्यतो भीमसेनी कापुराची आरती घरात फिरवा.
महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बरोबर चंद्रोदयाच्या वेळी शक्य झाले तर घरातील सगळ्यांनी चंद्राचे दर्शन घ्या.
आणि सगळ्यात महत्त्वाचे.
आपल्या घरात कूणी लहान मुले असतील तर त्यांना देखील या सवयी लावण्याचा प्रयत्न करा ते अतिशय महत्त्वाचे आहे.
आठवड्यातील एका ठराविक वारी नित्यनेमाने तुमच्या आवडत्या व स्वच्छ अशा देवळात जा. देवळात जर घंटा असेल तर शक्यतो हळू आवाजात घंटा वाजवून घंटेच्या खाली शांतपणे उभे राहा.
आणि हो, एक सांगायचे राहिले की देवळात जाताना किंवा येताना जर भिकारी दिसले तर त्यांना शक्यतो भिक्षा देऊ नका. भीक मागणे हा त्यांचा व्यवसाय आहे, ते गरजू नाहीत.
होता होई तो पर्यंत सायंकाळच्या टेलीव्हीजनवरच्या मालिका अज्जिबात पाहू नका. होई तो पर्यंत बातम्यांचे सगळे चॅनल्स पाहणे थांबवा आणि सगळयात शेवटचे..
तुमची आवडती आरती, स्तोत्र, तेही नाही जमले तर अगदी एखादे क्लासिकल भारतीय गाणे म्हणा तेही घरातील सर्व मंडळींनी, सामुदायिकपणे आणि रोज. या सगळ्यात महत्त्वाचे आहे ते सातत्य आणि ठराविक वेळ.
बस, धन्यवाद काकू.
माझी तीन मिनिटे संपली.
आमची संस्था तुम्ही मानत असलेले देव, स्वामी, तुमचे गुरू, तुमची श्रद्धास्थाने यात ढवळाढवळ करणार नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
बस येते मी.माझे नाव तन्वी.
मी येताना तुमच्या वॉचमनच्या पुस्तकात एन्ट्री केलीय, त्यात नंबर आहे माझा. आणि हो. येण्यापूर्वी तुमच्या सेक्रेटरीची देखील मी परवानगी घेतली आहे काळजी नसावी. योग आला तर परत भेटूच. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
वंदनाताई कितीतरी वेळ सेफ्टी डोअरपाशी उभ्या होत्या, त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत.
अनिल पाटणकर